अनुक्रमणिका
१. पार्वतीला ‘अपर्णा’ आणि ‘उमा’ म्हणण्याची कारणे
‘शंकराच्या प्राप्तीसाठी हिमालयाची कन्या पार्वती अत्यंत कठीण तप करते. ती अन्नपाण्याचा त्याग करते. संस्कृत भाषेत ‘पर्ण’ म्हणजे पान. पार्वती तप करत असतांना झाडाचे पानसुद्धा भक्षण करत नाही; म्हणून तिला ‘अपर्णा (पानसुद्धा ग्रहण न करणारी)’ हे नाव प्राप्त झाले. संस्कृत भाषेत ‘मा’ म्हणजे ‘नको’. मुलीला लाडाने ‘उ’ अशी हाक मारतात. पार्वतीचे तप पाहून तिच्या आईला तिची काळजी वाटते; म्हणून ती तिला ‘हे, उ ! मा’, म्हणजे ‘अगं लाडक्या मुली, एवढे कठीण तप करू नकोस !’ असे म्हणते. यासाठी पार्वतीला ‘उमा’ म्हणतात.
२. भगवान शंकराने पार्वतीला साधना करतांना शरिराची काळजीही घेण्यास सांगणे
पार्वतीच्या तपावर प्रसन्न झालेला भगवान शंकर ब्रह्मचार्याचे रूप घेऊन तिच्याजवळ येतो आणि तिला शरिराची काळजी घेण्याविषयी सांगतो. महाकवी कालिदासाच्या कुमारसंभव या महाकाव्यामध्ये ब्रह्मचार्याचा वेश घेतलेल्या शंकराच्या तोंडी पुढील वाक्य आले आहे.
अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशम्
जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते ।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।। – कुमारसम्भव, सर्ग ५, श्लोक ३३
अर्थ : अगं पार्वती ! तुला यज्ञादी कर्मांसाठी समिधा सहजपणे मिळत आहेत ना ! तुझ्या स्नानासाठी योग्य असे गरम पाणी तुला मिळत आहे ना ! तुझे तप हे तुझ्या शारीरिक क्षमतेनुसारच होत आहे ना ! (तप करतांना शरिराचीही काळजी घेतली पाहिजे); कारण ‘शरीर हे ‘धर्म’ या पुरुषार्थाचे सर्वांत महत्त्वाचे असे साधन आहे’, म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’.
३. शंकराने पार्वतीला केलेला उपदेश सर्वच साधकांसाठी मार्गदर्शक असणे
ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणार्या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. साधनेसाठी शरीर निरोगी हवे. यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करायला हवे. ‘आयुर्वेदानुसार आचरण म्हणजे काय’, हे सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ यात दिले आहे.’
४. साधकांनो, शरिराची हेळसांड करू नका !
‘मनुष्यजन्म पुष्कळ पुण्याईने मिळतो. साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यातच या मनुष्यजन्माचे सार्थक आहे. शरीर निरोगी असेल, तर साधना करणे सोपे जाते. अवेळी झोपणे, अवेळी उठणे, अवेळी जेवणे या अत्यंत चुकीच्या सवयी आहेत. या सोडायलाच हव्यात. ‘मला आतापर्यंत काहीही झालेले नाही’, असे म्हणून चुकीच्या सवयी तशाच चालू ठेवत असाल, तर थांबा ! विचार करा ! दूरच्या प्रवासाला जातांना आपण ‘आपले वाहन सुस्थितीत आहे ना’, याची निश्चिती करत असतो; कारण ते सुस्थितीत नसेल, तर वाटेत अडथळा येऊ शकतो. ईश्वरप्राप्ती हे आपले ध्येय आहे. हा दूरचा प्रवास आहे. त्यामुळे त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शरिराची काळजी घ्या !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२२)