सोलापूर येथील उद्योजकांसाठी ‘आनंदी आणि
तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान
सोलापूर – कलियुगामध्ये सर्वांत सोपी ‘नामसाधना’ सांगितली आहे. भौतिक सुखांमुळे केवळ क्षणिक सुख मिळते; मात्र साधना केल्याने चिरकाळ टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे प्रत्येकाने आनंदी जीवन अनुभवण्यासाठी साधना करा, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. शहरातील बाळीवेस येथे असलेल्या ‘ऋद्धी सिद्धी सभागृहा’त सनातन संस्थेच्या वतीने उद्योजकांसाठी ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
व्याख्यानाच्या प्रारंभी सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांनी व्याख्यानाचा उद्देश विषद केला. व्याख्यानासाठी शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थितांना ‘अनेकदा प्रयत्न करूनही अपयश का येते ?’, ‘जीवनात सुख सोयी असूनही आपण आनंदी का नाही ?’, ‘मनाची सतत होणारी अस्थिरता थांबवण्यासाठी काय करावे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी उद्योजकांनी साधनेविषयी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
व्याख्यान ऐकल्यानंतर काही जिज्ञासूंनी सत्संग चालू करण्याची मागणी केली, तसेच व्याख्यानाच्या ठिकाणी सनातनचे ग्रंथ खरेदी केले.