संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास (भाग ४)

अनुक्रमणिका

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

मागील भागात सनातन संस्थेशी परिचय झाल्यावर पू. कुलकर्णीकाका यांचा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रतीचा अपार भाव आणि त्यांना गुरुदेवांच्या विष्णुरूपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाहिल्या. आताच्या या चौथ्या भागात त्यांची गुरुदेवांशी झालेली भेट, त्यांची आणि पू. सुधाकर चपळगावकर यांची आध्यात्मिक पातळी घोषित होणे हा भाग पहाणार आहोत.

या लेखाचा भाग ३ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/89713.html

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

 

१७. न्यायालयीन सेवेस आरंभ !

१७ अ. विविध प्रासंगिक सेवा करणे आणि न्यायालयीन
सेवा करण्याची जाणीव गुरुदेवांनी अधिवक्ता केसरकर यांच्या माध्यमातून करून देणे

‘आरंभी मी संभाजीनगरला प्रासंगिक सेवा करायचो. त्यानंतर मी हिंदु राष्ट्र-जागृती सभा असलेल्या विविध ठिकाणी जाऊन प्रासंगिक सेवा करायचो. तेथे मी २ – ३ दिवस सेवा करायचो. या सेवा करत असतांना ‘ही माझी सेवा नाही. माझी सेवा न्यायालयीन सेवेच्या (वकिली सेवेच्या) माध्यमातून आहे’, याची जाणीव गुरुमाऊलींनी मला अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्या माध्यमातून करून दिली. (अधिवक्ता कुलकर्णीकाका यांची पुढील आध्यात्मिक प्रगती न्यायालयीन सेवेच्या माध्यमातून असल्याने गुरुदेवांनी त्यांना तसे करण्यास सांगितले.)

१७ आ. पू. पृथ्वीराज हजारे यांच्या अटकेचे प्रकरण

१७ आ १. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे माजी समूहसंपादक पू. पृथ्वीराज हजारे यांना अटक झाल्यावर ‘तो गुन्हा रहित व्हावा’, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवणे

‘सनातन प्रभात’, नियतकालिकांचे माजी समूहसंपादक पू. पृथ्वीराज हजारे यांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. हा प्रकार म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा ‘राईचा पर्वत करण्या’सारखा होता. त्यामुळे ‘मी मुंबईला जाऊन याचिका सादर करून हा गुन्हा रहित होण्यासाठी प्रयत्न करू शकतो’, असे मी अधिवक्ता श्री. केसरकर यांच्या माध्यमातून उत्तरदायी साधकांना कळवले.

१७ आ २. पू. हजारेकाकांनी सांगितल्याप्रमाणे ‘सेवाभावी वृत्तीने’ खटला चालवण्याची सिद्धता पू. कुलकर्णीकाकांनी दर्शवणे

मला दूरभाषवर पू. हजारेकाका यांनी सांगितले, ‘‘या खटल्याचे तुम्हाला मानधन मिळणार नाही. त्यामुळे सेवाभावी वृत्तीने हा खटला चालवण्याची तुमची सिद्धता असेल, तर ही सेवा अवश्य करा.’’ मी हे मान्य केले आणि मुंबईला गेलो. पुढे गुरुमाऊलीच्या कृपेने त्या प्रकरणात स्थगिती आदेश मिळाला. परिणामी या प्रकरणाची तीव्रता अल्प झाली.

१७ इ. पक्षकार आणि साधक यांचे खटले चालवण्यातील भेद कळणे

त्यानंतर मला मुंबई आणि संभाजीनगर येथे काही याचिका दाखल करण्याचा योग आला. तेव्हा मला ‘पक्षकारांसाठी खटला लढवणे आणि सेवाभावी वृत्तीने साधकांच्या वतीने खटला चालवणे’, यांतील भेद लक्षात येऊ लागला. गुरुमाऊली माझ्याकडून या सेवा करवून घेऊन मला साधना करण्याची संधी देत होती. यातून ‘माझी विचारधारा पालटत आहे’, असे मी अनुभवले.

१७ ई. प्रत्येक साधकाचे गुण शिकण्याचा प्रयत्न करणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आणि भारतभर असलेले सनातनचे साधक ज्या प्रकारे सेवा करत होते, ते पाहून मी त्या प्रत्येक साधकाचा एकेक गुण शिकण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळे माझ्या मनावर गुणांचे संस्कार दृढ होत गेले.

 

१८. रामनाथी आश्रमात जाण्याचा योग येणे

१८ अ. गुरुदेवांकडून गोव्याला येण्याचा निरोप मिळणे
आणि तो क्षण अविस्मरणीय अन् आयुष्याला कलाटणी देणारा असणे

आयुष्यात प्रत्येक शिष्य किंवा साधक ज्या परमोच्च क्षणाची वाट आतुरतेने बघत असतो, तो क्षण आला. ऑगस्ट मासात राखी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गुरुदेवांनी मला गोव्यात बोलावले. माझ्या आयुष्यातील ही फार मोठी गोष्ट असल्याने ‘माझी फार मोठी पुण्याई फळाला आली’, असे मला वाटले. माझ्या आयुष्याला कलाटणी मिळण्याचा हा क्षण होता. तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.

१८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे झालेले अविस्मरणीय दर्शन !

१८ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक दर्शनाने मन तृप्त होऊन त्यांच्याविषयी ‘यासम हा ’ असा विचार येणे

गुरुमाऊलीच्या भेटीचा तो दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. गुरुदेव भेटीच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यातील चैतन्य, सात्त्विकता आणि त्यांचे तेजस्वी रूप यांकडे मी बघतच राहिलो. त्यांची ती सुमधुर लाघवी भाषा दैवी होती. मी भक्तीमार्गी होतो आणि आहे. त्यामुळे यापूर्वीही मला काही संतांना भेटण्याचा योग आला होता; मात्र गुरुदेवांकडे पाहिल्यावर एकच विचार आला, ‘यासम हा !’

१८ आ २. गुरुमाऊलीचा प्रत्येक शब्द अंतर्मनावर बिंबला जाणे आणि त्यांचे दर्शन अन् मार्गदर्शन हा जीवनातील परमोच्च क्षण असणे

गुरुमाऊलींनी दिलेला दृष्टीकोन समोरच्याचे अंतर्मन, हृदय आणि शरीर यांवर बिंबला जातो. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते केवळ शब्दातीत आहे; मात्र आजही मी ते अनुभवत आहे. त्या रात्री मी अनेक घंटे झोपू शकलो नाही. गुरुमाऊलींचा चेहरा आठवतच पहाटे पहाटे मला झोप लागली. त्यानंतर जेव्हा कधी मला गुरुमाऊलीचे दर्शन व्हायचे, तो प्रत्येक प्रसंग माझ्यासाठी ‘परमोच्च क्षणच’ असायचा. गुरुमाऊलीचे दर्शन, त्यांचे रूप, त्यांची देहबोली आणि त्यांचे मार्गदर्शन यांचा माझ्यावर परिणाम होत असे अन् अजूनही होतो. तेव्हा तर मी जणू झपाटून गेलो होतो. प्रत्येक क्षणाला माझ्यातले साधकत्व आणि हिंदुत्व आणखीन दृढ होत होते. माझ्या मनावर ‘मला सेवा करायची आहे’, हा संस्कार होत होता. गेली काही वर्षे मी सूक्ष्मातून गुरुमाऊलीचे दर्शन घेत आहे; परंतु तरी मला त्यांचे सगुण दर्शन घेतांना वेगळाच आनंद होतो.

 

१९. पू. सुधाकर (बाळासाहेब) चपळगावकर
(सनातनचे ९७ वे संत, वय ७७ वर्षे) सनातन संस्थेशी जोडले जाणे

वर्ष १९९६-९७ मध्ये पू. बाळासाहेब चपळगावकर (सनातनचे ९७ वे संत, वय ७७ वर्षे) संभाजीनगरला वकिली करण्यासाठी आले. आम्ही दोघे एकाच पटलावर काम करायचो. तेव्हा मी सनातन संस्थेच्या संदर्भातील काही न्यायालयीन सेवा आणि काही प्रासंगिक सेवा करायचो. त्या निमित्ताने माझ्याकडे साधकांचे येणे-जाणे चालू होते. त्या वेळी काही साधक न्यायालयातही येत असत. तेव्हा पू. बाळासाहेब मला विचारायचे, ‘‘हे तेजःपुंज तरुण कोण आहेत ? त्यांचे तुझ्याकडे येणे-जाणे फार वाढले आहे.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘हे सनातन संस्थेचे साधक आहेत आणि मी सनातन संस्थेशी जोडला गेलो आहे.’’ साधकांची त्यागी वृत्ती, निःस्वार्थ सेवा, पदरमोड करून दुसर्‍या गावात जाऊन सेवा करणे, हे सर्व त्यांना फार आवडले. मी मुंबईत जाऊन सेवा करत होतो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही जा. मी येथील साधकांना साहाय्य करीन.’’अशा रीतीने  ते काही प्रमाणात सनातन संस्थेशी जोडले गेले.

 

२०. आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित होणे

२० अ. पू. बाळासाहेब चपळगावकर यांनी केलेल्या सेवा पाहून
उत्तरदायी साधकांकडून दोघांनाही रामनाथी आश्रमात येण्याचा निरोप मिळणे

मी पू. बाळासाहेबांच्या सहकार्याविषयी उत्तरदायी साधकांना कळवायचो. २ – ३ वर्षे त्यांनी केलेल्या सेवा बघून ‘त्यांना रामनाथी आश्रमात घेऊन या’, असा मला निरोप आला. आम्ही दोघे रामनाथीला गेलो. पू. बाळासाहेब सनातनचा आश्रम आणि सनातन संस्थेचे कार्य बघून प्रभावित झाले. ते मला म्हणाले, ‘‘आपण यांना साहाय्य करत जाऊ. त्यासाठी मी संपूर्ण सहकार्य करीन.’’

२० आ. आध्यात्मिक पातळी ६० टक्के घोषित होणे

मी आणि बाळासाहेब (सुधाकर चपळगावकर) अधिवक्ता केसरकरकाका यांच्या समवेत गुरुदेवांच्या भेटीला गेलो. दिवाळीनंतर ३ – ४ दिवसांनी गुरुदेवांनी आम्हा दोघांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित केले.

२० इ. पू. बाळासाहेबांनी ‘आपण झोकून देऊन सेवा करूया’,
असे सांगणे आणि त्यानंतर दोघांच्या काही एकत्रित, तर काही स्वतंत्रपणे सेवा चालू होणे

तेव्हा बाळासाहेबांना आध्यात्मिक पातळीविषयी काही ठाऊक नव्हते. त्यांना ‘त्यांचा गौरव झाला’, एवढे कळले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘सुरेश, गुरुदेवांनी आपली ६० टक्के पातळी झाल्याचे घोषित केले आहे; म्हणून यापुढे आपण झोकून देऊन सेवा करूया.’’ हा गुरुमाऊलीचाच संकल्प आणि प्रेरणा असल्याने पू. बाळासाहेबांच्या शब्दांतून ती व्यक्त झाली. माझ्या मनात मात्र हे आधीच खोलवर रुजले गेले असल्याने मी लगेचच त्यांना होकार दिला. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला भारतभर फिरून अधिवक्त्यांना संपर्क करण्याची सेवा मिळाली होती. अशा रितीने आमच्या दोघांच्या काही एकत्रित आणि काही वेगवेगळ्या अशा सेवा चालू झाल्या.

 

२१. संभाजीनगर येथे साधकांनी सत्कार करणे

गोव्यामध्ये आमची (मी आणि पू. बाळासाहेब यांची) आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर आम्ही संभाजीनगरला गेलो. तेथे साधकांनी आमच्या दोघांचा सत्कार केला.

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर. (३१.३.२०२२)

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास (भाग ५) https://www.sanatan.org/mr/a/89785.html

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment