कर्मयोग

कुठलेही कर्म निरपेक्षपणे आणि ईश्वरप्राप्ती हा हेतू ठेवून करणे, म्हणजे कर्मयोग. या योगाविषयी थोडक्यात माहिती या लेखात पाहू.

 

१. ‘कर्मयोग’या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. ‘कर्मयोग’ हा शब्द ‘कर्म’ आणि ‘योग’ या दोन शब्दांपासून झाला आहे. त्याचा अर्थ आहे – कर्माच्या द्वारे योग साधणे, म्हणजे जिवाला शिवाशी जोडणे, म्हणजेच कर्माद्वारे मोक्ष प्राप्त करणे होय.

‘तत्कर्म यत् न बन्धाय । (सा विद्या या विमुक्तये ।)’

अर्थ : ज्या कर्मामुळे चित्तावर कोणत्याही प्रकारचे बंधनात टाकणारे नवीन संस्कार होत नाहीत किंवा पाप-पुण्याच्या संबंधातील (हिशोबातील) नोंदी वाढत नाहीत, म्हणजेच आत्म्याभोवती कोणत्याही प्रकारचे नवीन बंधन निर्माण होत नाही, त्याला ‘कर्मयोग’ या शब्दाच्या संदर्भात ‘कर्म’ असे म्हणतात. (जी मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करून देते, तिला ‘विद्या’ असे म्हणतात). असे कर्म सतत करत रहाणे, याला ‘कर्मयोग’ म्हणतात.

आ. काम्य कर्मे (ज्या कर्मात काहीतरी कामना आहे, अशी कर्मे) न करणे आणि नित्यनैमित्तिक कर्मे (पूजा-अर्चा, व्रताचार यांसारखी उपासनाजन्य कर्मे) फलनिरपेक्षतेने करणे म्हणजेच ‘कर्मयोग’.

इ. योगः कर्मसु कौशलम् । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०

अर्थ : योग म्हणजे कर्मे करण्याचे कौशल्य.

भावार्थ : कर्मफलाचा लेप न लागेल, अशा रितीने निष्काम बुद्धीने कर्मे करणे. कर्मफल नसले, तरच मनुष्य बंधनमुक्त होतो.

 

२. कर्मयोगाच्या व्याख्या

अ. मनुष्य कर्मे का करतो, कर्मे बंधनात का अडकवतात, बंधनात न अडकता कर्मे कशी करावीत, कोणती कर्मे केल्याने मनुष्य संसाराच्या (मायेच्या) बंधनातून मुक्त होईल, जीवन्मुक्त झाल्यावरही कर्म करण्याचे महत्त्व काय इत्यादी गोष्टींचे ज्ञान करून देऊन त्याप्रमाणे अयोग्य कर्मापासून निवृत्त होण्यासाठी आणि योग्य कर्मे करण्यास प्रवृत्त होण्यासाठी मार्गदर्शन करून मोक्ष मिळवून देणार्‍या मार्गास ‘कर्मयोग’, असे म्हणतात.

आ. ‘आपली वृत्ती हळूहळू तमातून रजात आणि मग सत्त्वात अधिष्ठित होऊन त्याची परिणती भावात झाल्यानंतरच आपले तप विशेष तपात मोडते. त्यालाच ‘कर्मयोग’ असे म्हणतात.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे

 

३. कर्म आणि कर्मयोग

कर्म म्हणजे कृती. ‘कर्म’ हा शब्द फक्त शारीरिक कृतींपुरता, म्हणजे खाणे, पिणे, चालणे, हसणे इत्यादींपुरता मर्यादित नसून पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या कर्मांनाही लागू होतो. ‘कर्मयोग’ याचा अर्थ ‘जे कर्म केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होऊन आपण ब्रह्माशी किंवा ईश्वराशी कायमचे जोडले जाऊ, असे कर्म करत रहाणे’. थोडक्यात कृतीद्वारे जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्त होणे म्हणजे ‘कर्मयोग’.

‘कर्म क्रियासापेक्ष, तर कर्मयोग क्रियानिरपेक्ष आहे. याचा अर्थ कर्मयोगाची प्राप्ती क्रियेने नाही, तर विवेकाने होते. म्हणजेच कर्मयोग काही केवळ कर्म नाही. कर्मयोग आचरायचा म्हणजे आपल्यात असलेले विकार नष्ट करायचे. काम, क्रोध, लोभ इत्यादी विकार गेले पाहिजेत.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी लिहिलेला `श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३’ याचा मतितार्थ

 

४. फलाशा त्यागून चित्तावर संस्कार होऊ न देणारे कर्म भक्ती
आणि ज्ञानयोगी यांनी केले, तर साधना अधिक चांगली होण्यास साहाय्य होणे

जे कर्म केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होऊन आपल्याला ईश्वरप्राप्ती होते, असे कर्म करत रहाणे म्हणजे ‘कर्मयोग’. कर्म, मग ते व्यवहारातील का असेना, त्या योगे चित्तावर संस्कार होऊ न देता संस्कारबंधनातून कायमची सुटका करून घेणे, हे कर्मयोगात अभिप्रेत आहे. हिंदु धर्माला आणि धर्मशास्त्राला अपेक्षित असे कर्म आसक्ती आणि फलाशा त्यागून करणे, ही कर्मयोगाची श्रेष्ठ व्याख्या होय. भक्तीयोगी, ध्यानयोगी वगैरेंनीही त्यांच्या साधनेला कर्मयोगाची जोड दिली, तर त्यांची साधना अधिक चांगली होण्यास निश्चितच मदत होते. कर्मयोगातील कृतीचा ‘अध्यात्म’ हा अधिकार आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कर्मयोगाचे प्रास्ताविक’

 

५. कर्मयोग म्हणजे जीभ आणि मन यांनी केलेले उत्कृष्ट कर्म

कर्मयोगानुसार सत्य बोलल्याने पुण्य मिळते, तर खोटे बोलण्याने पाप. पापामुळे दुःख प्राप्त होते, तर पुण्यामुळे सुख. जिवाला अधिकाधिक सुखप्राप्ती होण्यासाठी सत्यकथन हा सरळ सोपा मार्ग आहे. सत्यकथनामुळे जिवाचे गतजन्मीचे पापक्षालन होते आणि त्याच्या पुण्याच्या संचयात वाढ होते. सत्यकथन करणे, म्हणजे जीभ आणि मन यांनी केलेले उत्कृष्ट कर्म होय !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कर्माचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रकार’

Leave a Comment