अकोला – दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक आणि परात्पर गुरु (कै.) परशराम महाराज पांडे यांचे स्नेही श्री. सुधाकर जकाते यांचा त्यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.
श्री. जकातेकाका स्थानिक रूद्राभिषेक मंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे रूद्र स्वाहाकार आणि इतर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. सनातन संस्थेच्या वतीने श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. श्रीकृष्णाची प्रतिमा पाहून त्यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझे गुरु प.पू. मनोहरनाथ महाराज यांनी मला श्रीकृष्णाचाच जप दिला आहे. मला या प्रतिमेत प्रत्यक्ष भगवंत (सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप डॉ. आठवले ) यांचेच दर्शन झाले आहे. सनातनचे साधक या सोहळ्याला उपस्थित राहिले, याचा मला आनंद झाला.’’
श्री. सुधाकर जकाते लष्करात मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सिव्हील इंजिनियर म्हणून परात्पर गुरु (कै.) पांडे महाराजांच्या समवेत कार्यरत होते. ९० व्या वर्षात पदार्पण करूनही ते माजी सैनिकांचे अध्यक्ष, जिल्हा ग्राहक मंचाचे मार्गदर्शक आणि रुद्राभिषेक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सेवा करतात. ‘‘आता या सर्व व्यापातून सुटून केवळ भगवंताच्या (सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप डॉ. आठवले यांच्या) दर्शनाची ओढ लागली आहे’’, असे त्यांनी शेवटी सांगितले.