१. पिंडदान करून श्राद्ध करणे
‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (१० ते २५.९.२०२२) या कालावधीत पितृपक्ष आहे. या काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात. पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोचते. त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात महालय श्राद्ध अवश्य करावे.
२. आमान्न श्राद्ध
काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास संकल्पपूर्वक ‘आमान्न श्राद्ध’ करावे. आमान्न श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गूळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा इत्यादी शिधा (साहित्य) एखाद्या पुरोहिताला द्यावा. पुरोहित उपलब्ध नसल्यास वेदपाठशाळा अथवा देवस्थान यांना दान करावे.
३. हिरण्य श्राद्ध
‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.
४. श्राद्धविधी करतांना करावयाची प्रार्थना !
‘हे दत्तात्रेया, आपल्या कृपेने आम्ही प्राप्त परिस्थितीत आमान्न श्राद्ध / हिरण्य श्राद्ध (जे श्राद्ध केले आहे, त्याचा उल्लेख करावा) केले आहे. याद्वारे पितरांना अन्न आणि पाणी मिळू दे. या दानाने सर्व पितर तृप्त होऊ देत. त्यांची आमच्यावर कृपादृष्टी राहू दे. आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त होऊ देत. आपल्या कृपेने त्यांना पुढची गती प्राप्त होऊ दे’, अशी प्रार्थना आहे.
– सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०२२)