‘ऑक्टोबर २०२१ मध्ये आम्ही उत्तरप्रदेश या राज्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत जिज्ञासूंना भेट देणे चालू केले. गुरुकृपेने या अभियानाला समाजातील विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘गुरुदेवांनी आधीच सूक्ष्मातून त्याचे नियोजन करून ठेवले होते आणि त्यांचा संकल्प सतत कार्यरत आहे’, याची अनुभूती प्रत्येक दिवशी आम्हाला येत होती. उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथे आम्हाला आलेले अनुभव कृतज्ञतापूर्वक पुढे दिले आहेत.
१. लक्ष्मणपुरी येथील शासकीय कार्यालयांत संपर्क करतांना अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. अभियानाच्या नियोजनात पालट होऊन वाराणसीऐवजी लक्ष्मणपुरी येथे एक
मास संपर्क करायचे ठरणे आणि ‘असा पालट होणे’, हे दैवी नियोजन असल्याचे लक्षात येणे
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंर्तगत आरंभी वाराणसी येथे प्रसाराचे नियोजन केले होते; परंतु काही कारणास्तव हे नियोजन पालटून लक्ष्मणपुरी येथे प्रसार करायचे ठरले. या प्रसारानंतर ‘हा पालट होणे’, हेही एक दैवी नियोजन होते’, असे आमच्या लक्षात आले. प्रसाराच्या आरंभी ‘४ दिवस लक्ष्मणपुरी येथील शासकीय कार्यालयांमध्ये संपर्क करून मग पुढचे नियोजन करूया’, असा आमचा विचार होता; पण गुरुकृपेने शासकीय कार्यालयांत मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आम्ही १ मास लक्ष्मणपुरी येथेच वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांत संपर्क केले.
१ आ. वर्ष २०१९ मध्ये प्रयाग येथील कुंभमेळ्यात शासकीय कार्यालयातील २ अधिकार्यांचा
परिचय होणे आणि त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या प्रसारासाठी साहाय्य करणे
आरंभी लक्ष्मणपुरी येथील शासकीय कार्यालयांमध्ये संपर्क करण्यासाठी आमच्या ओळखीचे एकच अधिकारी होते आणि शिक्षण विभागातील एक माजी अधिकारी यांचा परिचय झाला होता. वर्ष २०१९ मध्ये प्रयाग येथील कुंभमेळ्यात सनातन संस्थेने ग्रंथप्रदर्शन लावले होते. तेव्हा आम्हाला हे दोन्ही संपर्क मिळाले होते. आम्ही त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी सात्त्विक आणि धार्मिक अधिकार्यांची नावे आणि माहिती दिली. त्यामुळे आम्हाला प्रसाराची दिशा स्पष्ट होऊन शासकीय कार्यालयातील प्रसार अभियानाचे संपूर्ण नियोजन करणे फार सोपे झाले. तेव्हा आम्हाला ‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’, याची अनुभूती आली.
१ इ. विधानसभेचे तत्कालीन सदस्य आणि उच्चपदस्थ अधिकारी यांना सनातन संस्थेचे
कार्य आवडणे आणि त्यांनी विधानसभा सचिवालयाच्या ग्रंथालयासाठी ग्रंथांचे मागणीपत्र देणे
आम्ही लक्ष्मणपुरी येथील विधानसभा सचिवालयात गेल्यावर तेथील एक उच्चपदस्थ अधिकार्यांना सनातन संस्थेचे ‘ब्रोशर’ (रंगीत माहितीपत्रक) दाखवून कार्य सांगितले. तेव्हा ते फार प्रभावित झाले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘मी असे धर्मकार्य करणारी पहिलीच आध्यात्मिक संस्था पाहिली.’’ त्याच दिवशी आमची विधानसभेच्या एका माजी सदस्याचीही भेट झाली. सनातन संस्थेचे कार्य पाहून त्यांनी प्रशंसा केली आणि लवकरच ग्रंथांच्या मागणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सहर्ष आश्वासन दिले. अल्पावधीत आम्हाला उत्तरप्रदेशच्या विधानसभा सचिवालयाच्या ग्रंथालयासाठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील ग्रंथांच्या प्रत्येकी एका संचाचे मागणीपत्र मिळाले. यातून आम्हाला ‘गुरूंचे कार्य गुरुच करतात. आपण केवळ निमित्तमात्र असतो’, याची अनुभूती आली आणि पुढील कार्यासाठी आमचा उत्साह वाढला.
१ ई. एका धर्मप्रेमींनी उत्तरप्रदेश राज्यातील तत्कालीन मंत्र्यांची भेट घालून देण्याची इच्छा व्यक्त करणे
त्याच दिवशी आम्ही एका धर्मप्रेमींना भेटून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची माहिती दिली. ते सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ प्रभावित झाले आणि त्यांनी उत्तरप्रदेश राज्याच्या तत्कालीन मंत्र्यांची भेट घालून देण्याची इच्छा व्यक्त केली. या अभियानासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प कार्यरत असल्यामुळे आमची आवश्यक त्या व्यक्तींशी भेट सहजतेने होत होती.
१ ई १. विशेष ओळख नसूनही एकाच दिवसात उत्तरप्रदेश राज्याच्या ३ मंत्र्यांची भेट होणे आणि त्यांनी सनातनचे कार्य समजून घेऊन सकारात्मक प्रतिसाद देणे : लक्ष्मणपुरी येथे आमच्या विशेष ओळखी नसतांनाही एकाच दिवशी आमची एक तत्कालीन मंत्री आणि अन्य २ मंत्री यांची भेट झाली. ज्ञानशक्ती प्रसार अभियान आणि सनातनचे कार्य यांविषयीची माहिती ऐकून त्यांना आनंद झाला. त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘इतक्या सहजतेने अशा लोकांच्या भेटी होऊन त्यांना सनातनच्या कार्याची ओळख करून देता येणे आणि त्यांनी आम्हाला आवश्यक तेवढा वेळ देणे’, ही केवळ गुरुकृपाच आहे’, असे आम्हाला जाणवले.
२. विविध शासकीय विभागांतील उच्चपदस्थ
लोकांच्या घेतलेल्या भेटी आणि त्यांचा लाभलेला प्रतिसाद !
२ अ. समाजकल्याण विभागाच्या निर्देशकांनी
समाजकल्याण विभागाद्वारे संचलित सर्व शाळांसाठी ग्रंथांची मागणी देणे
आमची समाजकल्याण विभागाच्या एका तत्कालीन अधिकार्याशी भेट झाली. तेव्हा त्यांनी त्यांच्या विभागाद्वारे चालणार्या शाळांसाठी ‘मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ? सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, ‘मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा’ इत्यादी ग्रंथांची मागणी देण्याचे आश्वासन दिले. सनातनच्या कार्याविषयी माहिती सांगितल्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही सनातन धर्मासाठी जे कार्य करत आहात, त्याला आम्ही नक्कीच साहाय्य करू.’’ त्यानंतर लगेचच आम्हाला उत्तरप्रदेश समाजकल्याण विभागाद्वारे संचालित ‘जयप्रकाश नारायण सर्वाेदय विद्यालया’साठी ‘मुलांवरील सुसंस्कार आणि त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास’ या विषयावरील ग्रंथांचे मागणीपत्र मिळाले.
२ आ. उत्तरप्रदेश राज्याच्या सूचना आणि जनसंपर्क विभागातील
माजी मुख्य अधिकार्यांची भेट होऊन त्यांच्याकडून ग्रंथांची मागणी मिळणे
राज्याच्या सूचना आणि जनसंपर्क विभागाच्या माजी उपनिर्देशकांशी आमची भेट झाली. ग्रंथांची सूची दाखवल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हे ग्रंथ लोकांसाठी फार आवश्यक आहेत. मी तुमची जनसंपर्क विभागाच्या निर्देशकांशी भेट घालून देतो.’’ त्यानुसार दुसर्याच दिवशी त्यांनी सूचना आणि जनसंपर्क विभागाच्या तत्कालीन निर्देशकांशी आमची भेट घालून दिली. सनातनच्या आश्रमाचे ‘ब्रोशर’ (माहितीपत्रक) पाहून ते अधिकारी आम्हाला म्हणाले, ‘‘तुमच्याविषयी मला माहिती मिळाली आहे. आम्ही तुमच्याकडून ग्रंथ अवश्य घेऊ.’’ त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या विभागासाठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील ग्रंथांचे मागणीपत्र आम्हाला दिले.
२ इ. जनजाती विकास विभागाच्या माजी अधिकार्यांना ग्रंथ आवडणे
आणि विभागाच्या वतीने चालवल्या जाणार्या विद्यालयांसाठी ग्रंथांची मागणी देणे
आम्ही जनजाती विकास विभागाच्या तत्कालीन उपनिर्देशकांची भेट घेतली आणि त्यांना ग्रंथांची सूची अन् ग्रंथ दाखवले. तेव्हा ते उत्स्फूर्तपणे आम्हाला म्हणाले, ‘‘सर्वच ग्रंथ घ्यायला पाहिजेत’, असे मला वाटते.’’ त्यांनी जनजाती विकास विभागाच्या वतीने चालवल्या जाणार्या ‘राजकीय आश्रम पद्धती विद्यालयां’साठी ग्रंथांचे मागणीपत्र दिले, तसेच आम्हाला ‘भविष्यात हे ग्रंथ सर्वांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले. काही दिवसांनी आम्हाला ‘उत्तरप्रदेश जनजाती विकास’ या विभागाच्या अंतर्गत ‘स्वायत्त संस्थान ‘उत्तरप्रदेश अनुसूचित जनजाती शैक्षणिक आणि आर्थिक विकास समिती’च्या अंतर्गत चालवलेल्या ‘एकलव्य आवासीय विद्यालयां’साठी ग्रंथांचे मागणीपत्र मिळाले.
– श्री. गुरुराज प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वाराणसी, उत्तरप्रदेश.