थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय

Article also available in :

गणेशभक्त मोरया गोसावी

१. गाणपत्य संप्रदाय

शैव, वैष्णव, तसेच अन्य पंथियांच्या उपासनेत श्री गणेशपूजनाला स्थान आहे. असे असले तरी शिव, श्रीविष्णु आदी देवतांची उपासना करणार्‍या संप्रदायांप्रमाणे केवळ श्री गणपतीची उपासना करणार्‍यांचाही एक संप्रदाय आहे. ‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

 

२. गणेशभक्त मोरया गोसावी यांचे संक्षिप्त चरित्र

२ अ. जन्म

मोरया गोसावी यांचे घराणे मूळचे कर्नाटक राज्यातील शाली या गावचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वामनभट्ट आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. वामनभट्ट गणेशोपासक होते. ते उपासनेसाठी मोरगावच्या (जि. पुणे, महाराष्ट्र) गणपतीच्या ठिकाणी येऊन राहिले. तेथेच वर्ष १३७५ मध्ये मोरयाचा जन्म झाला.

२ आ. कडक साधना

आठव्या वर्षी मोरयाचे मौजीबंधन झाले. मौजीबंधनानंतर अध्यापन आणि उपासना चालू असतांना मोरया गोसावी यांची सिद्ध योगीराज या सद्गुरूंशी भेट झाली. त्यांच्या उपदेशावरून मोरया यांनी थेऊर (जि. पुणे, महाराष्ट्र) येथे जाऊन कडक तपश्चर्या केली. ४२ दिवसांच्या अखंड नामजपानंतर श्री गणपतीने मोरया यांना दृष्टांत दिला. त्यानंतर ते मोरगावला परतले.

२ इ. कौटुंबिक जीवन

माता-पित्यांच्या देहावसानानंतर त्यांनी मोरगाव सोडले आणि ते चिंचवड (जि. पुणे, महाराष्ट्र) येथे वास्तव्यास आले. तेथे त्यांचा गोविंदराव कुलकर्णी यांच्या उमा नामक सुलक्षणी कन्येशी विवाह झाला. लवकरच त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मोरया यांनी मुलाचे नाव ‘चिंतामणि’ असे ठेवले.

२ ई. श्री गणेशाचा स्वप्नदृष्टांत

प्रत्येक चतुर्थीला मोरया गोसावी मोरगावच्या गणपतीच्या दर्शनास जात असत. एके दिवशी मंगलमूर्तीने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितले, ‘तू एवढ्या दूर येऊ नकोस. कर्‍हा नदीत मी आहे. तेथून मला बाहेर काढ आणि तुझ्या घरी घेऊन जा.’ या दृष्टांताप्रमाणे मोरया यांनी कर्‍हा नदीतील श्री गणेशमूर्ती आपल्या चिंचवडच्या घरी नेली आणि तिची प्रतिष्ठापना केली. लवकरच मोरया गोसावी यांच्या साधुत्वाची कीर्ती सर्वदूर पसरली.

२ उ. समाधी

या थोर गणेशभक्ताने वयाच्या ८६ व्या वर्षी, म्हणजे वर्ष १४६१ मध्ये चिंचवड येथे समाधी घेतली.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’)

Leave a Comment