वैद्य मेघराज पराडकर
‘दूध घातलेला चहा प्यायल्याने पित्त वाढते. अल्पाहारासह आपण चहा पितो. अल्पाहारातील पदार्थांत मीठ असते. मीठ आणि दूध हा संयोग रोगकारक. या संयोगाला आयुर्वेदात ‘विरुद्ध आहार’ म्हणतात. कधीतरी चहा घेणे ठीक आहे; परंतु आरोग्यप्राप्तीची तळमळ असलेल्याने प्रतिदिन चहा घेण्याची सवय मोडावी. बर्याच जणांना ही सवय मोडणे कठीण जाते. अशांनी आरंभी चहाचे प्रमाण अर्धे करावे. पुढे दिवसाला २ वेळा चहा घेत असल्यास एकदाच घ्यावा. पुढे एक दिवसाआड चहा घ्यावा. ‘चहा न प्यायल्याने काही बिघडत नाही’, हे अंतर्मनाला उमजते, तेव्हा चहा आपोआप सुटतो.’
सतत उत्साही रहाण्यासाठी चहा-कशाय सोडा !
‘बरेच जण म्हणतात की, ‘चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे’, हे आम्हाला पटते; पण सकाळी आणि सायंकाळी काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. चहा प्यायल्यावर तरतरी येते आणि उत्साह वाटतो. त्यामुळे चहा सोडवत नाही.’ ‘चहाऐवजी कोरा चहा किंवा कशाय चालेल का ?’, असेही अनेक जण विचारतात. थोडक्यात उत्साह किंवा तरतरी यासाठी त्यांना कोणत्या तरी बाह्य गोष्टीची आवश्यकता असते. बाह्य साधनांनी येणारा उत्साह तात्कालिक असतो; परंतु शरिरातील अग्नी (पचनशक्ती) उत्तम बनल्याने जो उत्साह निर्माण होतो, तो दीर्घकाळ टिकणारा असतो. अग्नी उत्तम राहून सतत उत्साही रहाण्यासाठी चहा-कशाय सोडून केवळ २ वेळा आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवा !