धार्मिक विधीच्या ठिकाणी आणि सात्त्विकता असलेल्या ठिकाणी सात्त्विक प्राण्यांनी उपस्थिती लावणे !

पूर्वीच्या काळी ऋषि-मुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषी-मुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. त्या वेळी जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगात पहायला मिळत आहे. निसर्ग, सात्त्विक पशू-पक्षी यांना सात्त्विकता जाणता येते आणि ते त्यांना प्रतिसादही देतात.

 

१. धार्मिक विधीच्या ठिकाणी उपस्थिती लावणारी
बांदोडा, फोंडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील गोमाता !

बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात धार्मिक विधीच्या वेळी उपस्थित गाय

हिंदु धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक पांढरी शुभ्र गाय बांदोडा, फोंडा येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात फिरत आहे आणि ती मंदिरात होणार्‍या धार्मिक विधीला उपस्थिती लावते. यामुळे भाविकांसाठी हा कुतुहलाचा विषय झालेला आहे.
श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात काही दिवसांपूर्वी ब्रह्मवृंदाच्या वतीने धार्मिक विधी चालू होता. या वेळी सामूहिक मंत्रपठण चालू असतांना ही गाय ब्रह्मवृंदाजवळ येऊन बसली. गायीकडे पाहिल्यावर ‘गाय मंत्रपठण ऐकण्यात दंग आहे’, असे भासत होते. ही गाय मुख्य मंदिर आणि बाजूला असलेली इतर मंदिरे यांच्या पायर्‍यांशी बसलेली दिसते. सभामंडपात एखादा धार्मिक विधी चालू असल्यास ही गाय कुणीही न बोलावता स्वत:च त्या ठिकाणी उपस्थित रहाते. यामुळे धार्मिक विधीचे आयोजन करणार्‍या यजमानाला गोमातेच्या उपस्थितीमुळे आपले कार्य सिद्धीस गेल्याचे समाधान लाभत आहे.

 

२. मंदिराच्या प्राकारातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी गोमातेने उपस्थिती लावणे

बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी आलेली तीच गाय

बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारात श्रावण मासाच्या निमित्ताने सनातनने हल्लीच सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते. या ठिकाणी गोमातेने उपस्थिती लावली. गोमाता ५ मिनिटे तेथे उपस्थित राहिली आणि नंतर तेथून निघून गेली.

 

३. पणजी येथील कदंबा बसस्थानकावर सनातनच्या
ग्रंथप्रदर्शनाच्या स्थळी एक श्वान शांतपणे येऊन बसणे

अशाच प्रकारे पणजी येथील कदंबा बसस्थानकावर सनातनच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी एक श्वान शांतपणे येऊन बसला होता. जणूकाही तो सनातनच्या ग्रंथांमधील चैतन्यच ग्रहण करत होता. (काही संतांकडेही प्राणी आकर्षित होत असल्याची उदाहरणे आपण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून पाहिली होती. आता सनातनचे ग्रंथप्रदर्शन आणि समाजात होणारे धार्मिक विधी यांकडेही प्राणी आकर्षित होत असल्याचे आढळते. – संपादक)

Leave a Comment