लहान वयात कुटुंबियांना आधार देणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहाणारे सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे (वय ६० वर्षे) !

अनुक्रमणिका

सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांच्या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. यजमानांनी लहान मुलांच्या शिकवण्या
घेऊन त्यातून स्वतःचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे लहान असतांनाच त्यांचे वडील (कै. गजानन शिंदे) यांचे निधन झाल्यामुळे घरातील सर्व दायित्व ५ भावंडावर आले. यजमानांनी लहान मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यातूनच स्वतःचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि अनेक प्रयत्न केल्यावर त्यांना मध्य रेल्वेमध्ये नोकरी मिळाली.

 

२. एकत्र कुटुंबात झालेले संस्कार

२ अ. एकत्र कुटुंब पद्धतीचा संस्कार मनावर असल्याने घराजवळ
रज-तमात्मक वातावरण असूनही सर्व भावंडांवर तिथल्या वातावरणाचा कोणताही परिणाम न होणे

आमचे ठाण्यातील घर जुने आहे. तिथल्या वसाहतीमध्ये रहाणारे रहिवासी अगदी गुंडगिरी, मारामारी आणि निंदा करणारे होते. कधी मित्रांच्या नादाने किंवा तिथल्या वातावरणामुळे ते किंवा त्यांचे भाऊ बिघडू शकले असते; पण शिंदे कुटुंबात मुळातच संस्कार असल्यामुळे माझे यजमान किंवा त्यांचे भाऊ कधीच त्यांच्या सहवासात नव्हते. त्यामुळे ‘एकत्र कुटुंब पद्धतीचा संस्कार कसा नकळत मनावर घडतो’, हे मला शिकायला मिळाले.

२ आ. श्रीमती प्रभावती शिंदे (आई)(आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८६ वर्षे)
यांनी लहान वयातच केलेल्या चांगल्या संस्काराचे बाळकडू मुलांना मिळणे

पूर्वी कुटुंबात सर्व जण एकत्र रहात होते. त्यामुळे सगळे सणवार अगदी सोवळ्यामध्ये केले जात होते. त्यामुळे घरातील वातावरण आनंद देणारे होते. त्यांना घरातूनच लहान वयात चांगल्या संस्काराचे बाळकडू मिळाले. आई श्रीमती प्रभावती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८६ वर्षे) यांनी केलेल्या संस्कारांमुळे समाजात वावरतांना कधी चुकीच्या मार्गाने गेले नाहीत.

सौ. मीनल शिंदे

 

३. वैवाहिक जीवनास प्रारंभ

वर्ष १९९२ मध्ये आमचा विवाह झाला. तेव्हा मला व्यवहारातील काहीच ज्ञान नव्हते. केवळ सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यामुळेच माझ्यात निर्णयक्षमता, वागण्यातील सहजता आणि स्थिरता आली.

 

४. सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे
घरातील सर्व जण आणि नातेवाईक यांनी यजमानांना विचारून सर्व कृती करणे

यजमानांना मुळात वाचनाची आवड आणि अभ्यासू वृत्ती यांमुळे ते अनेक आध्यात्मिक ग्रंथ वाचत होते. त्या पद्धतीने आचरणही करत होते. सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे आमच्या घरातील सर्वच लहान-थोर मंडळी, तसेच नातेवाईकसुद्धा त्यांचा विचार घेऊनच कृती करत असत.

 

५. वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेशी संपर्क
आला आणि आम्हा दोघांच्या साधनेला प्रारंभ झाला.

५ अ. वेळेचे महत्त्व

यजमानांमध्ये मुळातच ‘वेळेचे महत्त्व’ हा गुण अधिक असल्यामुळे तो गुण साधना करतांना अधिक प्रभावी ठरला. त्यांच्यामुळे साधकांना आणि घरी आम्हालाही वेळेचे महत्त्व कळले.

५ आ. योग्य नियोजन करणे

ते साधनेत अनेक सेवा दायित्व घेऊन करत होते. त्या वेळी ते नोकरी करत होते. तेव्हा ते मुंबई, रायगड आणि नाशिक येथील दायित्व घेऊन सेवा करत होते. त्यामुळे ते प्रत्येक सेवेचे नियोजन कागदावर लिहून काढत असत. ‘कार्यालयाला शनिवार – रविवार सुट्टी असल्यावर पूर्ण दिवस नियोजन कसे कृतीत येईल ?’, यांसाठी साधकांच्या समवेत अनेक सत्संग घेत असत.

 

६. यजमानांच्या योग्य नियोजनामुळे आनंददायी झालेला चेन्नई येथील प्रवास !

मार्च २०२२ मध्ये आम्ही चेन्नई येथे प्रवास केला. त्यांनी सर्व छोट्या-छोट्या गोष्टी लिहून काढल्या. त्यामुळे नियोजनात कोणतीही त्रुटी राहिली नाही, तसेच प्रवास करून आल्यावर घरासाठी आणलेले साहित्य किंवा इतरांसाठी आणलेले साहित्य या वस्तूंचे वर्गीकरण करून संबंधितांना देण्याचे नियोजन केल्यामुळे कुठेही अडचणी आल्या नाहीत आणि आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला.

 

७. तत्त्वनिष्ठपणे चुका सांगणे

साधक, नातेवाईक किंवा आम्ही दोघी, मी आणि माझी मुलगी (सौ. मीनल शिंदे आणि  कु. वैदेही शिंदे) असो, यजमान सर्वांना जिथे चुकले आहे, तिथे कुठलीही भावना न ठेवता अगदी तत्त्वनिष्ठपणे चूक सांगतात. वैदेहीचे कधी कौतुकही करतात, तर कधी तिचे वागणे चुकीचे वाटले, तर वेळीच तिला समजही तेवढ्याच तत्त्वनिष्ठपणे देतात.

 

८. सेवेची तीव्र तळमळ

अ. एकदा त्यांना पुष्कळ बरे नव्हते; म्हणून मी म्हटले, ‘‘आता २ – ३ दिवस काही सेवा करू नका. बरे वाटले की, मगच सेवा करा.’’ तेव्हा त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, ‘‘मी  सेवा पूर्ण केली नाही, तर इतर साधकांना सेवा करतांना अडचण येऊ शकते.’’ त्या वेळी ‘सेवेचा ध्यास असा असायला हवा’, हे माझ्या लक्षात आले.

आ. यजमान सेवा करतात, त्या वेळी ‘सेवा ही गुरुकृपेचा प्रसाद आहे’, असा विचार करूनच ते सेवा करतात आणि ‘प्रत्येक साधक हा परात्पर गुरूंचा साधक आहे’, असा भाव ठेवून त्याच्याशी संवाद साधतात.

 

९. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वास्तव्याने घर चैतन्यमय होणे

यजमान घरी असतांना एकदा एक साधक घरी आले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘भिंतीना रंग लावला आहे का ?’’, तेव्हा मी म्हणाले, ‘‘रंग नाही लावला.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘घरात केवढा प्रकाश दिसत आहे.’’ त्या वेळी ते माझ्याही लक्षात आले, ‘आमच्या घराच्या भिंती पांढर्‍या शुभ्र दिसत होत्या’, हे केवळ यजमानांचे चैतन्य आणि सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांची कृपा यांमुळेच झाले होते.

 

१०. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव

आम्ही दोघे (सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सौ. मीनल शिंदे) कधीतरी भूतकाळाविषयी बोलतो. तेव्हा हे म्हणतात, ‘‘पूर्वी आपण कितीतरी अडचणींना सामोरे गेलो आणि यातून केवळ गुरुदेवांनीच आपल्याला बाहेर काढले. यांसाठी नेहमीच आपण कृतज्ञताभावात रहायला हवे.’’

ज्या स्मरणामात्रे मिळे सौख्य जिवा ।
असा जन्मोजन्मी सद्गुरु हा मिळावा ।
सदा देह लागो सत्कारणाला ।
नमस्कार साष्टांग गुरुमाऊलीला ।।

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले केवळ तुमच्या कृपेमुळेच मी हे लिखाण लिहू शकले’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 

Leave a Comment