सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! (भाग ३)

अनुक्रमणिका

७ ए. श्री. गिरिधर भार्गव वझे

७ ऐ. कु. सुषमा पेडणेकर

७ ओ. सौ. विजयालक्ष्मी आमाती

७ औ. सौ. नंदिनी चितळे

८. पू. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भातील अनुभूती

८ अ. डॉ. मुकुल गाडगीळ संत झाल्याच्या मिळालेल्या पूर्वसूचना

८ आ. इतर अनुभूती

९. श्री. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

 


 

या लेखाचा पहिला भाग वाचण्यावाठी येथे क्लिक करा.

 

या लेखाचा दुसरा भाग वाचण्यावाठी येथे क्लिक करा.

 

७ ए. श्री. गिरिधर भार्गव वझे

‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ (पू. काका) यांच्याकडून मला गेली ३ वर्षे लेख, अनुभूती इत्यादींच्या संकलनाची सेवा शिकण्याची संधी मिळाली. त्या काळात त्यांची लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

 

७ ए १. गुणवैशिष्ट्ये
७ ए १ अ. मितभाषी

पू. काका मितभाषी आहेत. संकलनाची सेवा करतांना किंवा आध्यात्मिक त्रास होत असतांना पू. काकांना कोणतेही सूत्र विचारले, तरी ते स्मितहास्याने मोजक्या शब्दांत; पण परिपूर्ण उत्तर देतात.

 

७ ए १ आ. चुका कडक शब्दांत न सांगता जाणिवेच्या स्तरावर, सहजतेने आणि मोजक्या शब्दांत सांगणे

ते संकलन शिकवतांना मला चुकांची जाणीव करून देत; पण ‘या चुका फलकावर लिही’ किंवा ‘अशी चूक कशी होते ?’, अशा प्रकारे कधीच कडक शब्दांत चुका सुधारण्याचा हेका धरत नाहीत. ते मोजक्या शब्दांत सहजतेने चुका सांगत. त्यामुळे चुकांसंबंधी स्वतःच्या मनावर ताण येत नाही. खरेतर मला नेहमी पू. काकांचा आधारच वाटतो.

 

७ ए १ इ. प.पू. स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितलेली सज्जनाची (उत्तम साधकाची) सर्व लक्षणे पू. गाडगीळकाकांमध्ये असल्यानेच त्यांना संतपदाची प्राप्ती झाल्याचे लक्षात येणे

पावस (जिल्हा रत्नागिरी) येथील प.पू. स्वामी स्वरूपानंद यांनी म्हटले आहे –

 

सुहास्यवदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण ।

मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ।।

एवं षड्विध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण ।

होतो वश परमेश वहातो जगदंबेची आण ।।

 

प.पू. स्वामींनी वर उल्लेखलेली सज्जनाची, म्हणजे उत्तम साधकाची सर्व लक्षणे पू. गाडगीळकाकांमध्ये आढळतात. त्यामुळेच त्यांच्यावर प.पू. डॉक्टरांसारख्या अवतारी पुरुषाची पूर्ण कृपा झाली, म्हणजे त्यांना संतपदाची प्राप्ती झाली आहे, असे लक्षात येते.

 

७ ए २. शिकायला मिळालेली सूत्रे
७ ए २ अ. तातडीची सेवा करतांनाही मनातून स्थिर रहाणे

पू. काका प्रत्येक धारिका पहिल्या वाचनातच अंतिम दृष्टीने संकलित करतात. ते सर्वच सेवा तत्परतेने अन् वेगाने करतात; तरीही ते मनातून पूर्णतः स्थिर असल्याचे त्यांच्या मुखाकडे पाहून सहज लक्षात येते. एकदा पू. काका तातडीची सेवा करत होते. तेव्हा त्यांची मुलगी कु. सायली ‘बाबा, माझ्यासमवेत खोलीत चला ना’, असा हट्ट करत होती, तरी पू. काका तिला सहजतेने ‘हां, येतो’, असे सांगून सेवा करत होते.

 

७ ए २ आ. तत्परतेने दुसर्‍याला साहाय्य करणे

आजपर्यंत पू. काकांना कोणतेही सूत्र कधीही विचारले, तरी ते पटकन त्याचे उत्तर देतात. ते अन्य कोणती धारिका संकलित करत असल्याने मला थोडा वेळ तिष्ठत थांबावे लागले, असे कधीच झाले नाही. ते नेहमी हातातील सेवा थांबवून तत्परतेने दुसर्‍याला साहाय्य करतात.

 

७ ए २ इ. पू. काका प्रत्येक साधकाशी आदरार्थीच बोलतात.

 

७ ए २ ई. निरपेक्षपणा अन् अंतर्मुखता यांमुळे पू. काकांच्या मुखावर आनंद पहायला मिळणे

एका साधिकेकडून ज्ञानाची सूत्रे टंकलिखित करतांना वारंवार त्याच त्याच चुका होत होत्या. त्यासंबंधी त्या साधिकेला मी कल्पना दिली; पण तिच्यात सुधारणा होत नव्हती. तेव्हा माझी चिडचीड होत असे. यासंदर्भात मी पू. काकांना सांगितले आणि ‘अशा वेळी आपण काय करायला हवे’, असे विचारले. त्यावर पू. काका म्हणाले, ‘‘तिला चुका सांगितल्या आहेत ना, तर त्यांच्याकडून सुधारणा होईल, अशी अपेक्षा ठेवू नका. त्या धारिकेतील चुका स्वतःच सुधारायच्या; कारण आपण दुसर्‍यामध्ये कधी पालट करू शकत नाही.’’ यावरून ‘निरपेक्षपणा अन् अंतर्मुखता यांमुळेच पू. काकांच्या मुखावर आनंद पहायला मिळतो’, हे लक्षात आले.

 

७ ए २ उ. पू. काकांनी ‘शिरोभाग लिखाणाच्या सेवेवर स्वतःची मक्तेदारी (मोनोपॉली) नाही; कारण देवाला प्रार्थना करताच तो कोणाकडूनही शिरोभाग लिहून घेतो’, असे सांगून कर्तेपण देवाला देणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या बहुतांश लेखांना पू. गाडगीळकाकांनीच वाचक अन् साधक यांना साधनेविषयी दिशादर्शन करणारे उद्बोधक असे शिरोभाग लिहिले आहेत. प.पू. डॉक्टरांनाही त्यांनी लिहिलेले शिरोभाग आवडतात.

 

एकदा शिरोभाग लिहायला शिकवतांना पू. काकांनी एका ताईला सांगितले, ‘‘शिरोभाग लिखाणासाठी गिरिधर यांना एका लेखाची धारिका द्या.’’ नंतर मी पू. काकांनी सांगितल्यानुसार देवाला प्रार्थना करताच आपोआप सूत्रे सुचली अन् त्या लेखासाठी शिरोभाग लिहिला गेला. नंतर मी ती धारिका पू. काकांना पडताळायला दिला. तेव्हा पू. काका म्हणाले, ‘‘शिरोभाग चांगला झाला आहे. शिरोभाग लिखाणाच्या सेवेवरही माझी मक्तेदारी (मोनोपॉली) नाही; कारण देवाला प्रार्थना केल्यावर तो कोणाकडूनही शिरोभाग लिहून घेतो.’’

 

७ ए ३. प्रार्थना

संकलन सेवेसंबंधीच नव्हे, तर तीव्र आध्यात्मिक त्रासांतून मुक्तता होण्यासाठीही माझ्यासह सर्वच साधकांना
पू. गाडगीळकाकांचा आधार वाटतो. पूर्वीपासूनच काकांशी बोलतांना किंवा त्यांच्या सान्निध्यात असतांना आम्हा साधकांवर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवायचे. आता तर प.पू. डॉक्टरांनी त्यांना ‘संत’ म्हणून घोषित केल्याने आध्यात्मिक उपायांची परिणामकारकता आणखी वाढली आहे. पू. काकांसारखी विविध गुणवैशिष्ट्ये आम्हा सर्वच साधकांमध्ये निर्माण होऊ देत अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाने सर्वच साधकांची शीघ्र गतीने संतपदाकडे वाटचाल होऊ दे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी आर्ततेची प्रार्थना !’

 

७ ऐ. कु. सुषमा पेडणेकर

७ ऐ १. गुणवैशिष्ट्ये
७ ऐ १ अ. प्रेमाने चुका सांगणे

‘पू. मुकुल गाडगीळकाका यांच्याशी माझा सेवेअंतर्गत सतत संपर्क येतो. ते माझ्याकडून झालेल्या चुकांविषयी प्रेमाने जाणीव करून देतात. त्यावर उपाय सांगून कृती करून घेतात. कधी कधी ते रागवतात. त्यांच्या रागवण्यातही प्रेम जाणवून मला आनंद मिळतो. त्यांच्या कुठल्याही वाक्यामुळे मला वाईट वाटले, असे कधीच झाले नाही. पू. काकांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे.

 

७ ऐ १ आ. साहाय्य करणे
७ ऐ १ आ १. अडचण सोडवणे

पू. काकांकडे पुष्कळ सेवा प्रलंबित असतात; पण त्यांना एखादी अडचण सांगितली किंवा साहाय्य मागितल्यास ते लगेचच होकार देतात. त्यांना काही विचारले, तर ते हातातली सेवा सोडून साहाय्य करतात.

 

७ ऐ १ आ २. आधार वाटणे

मला धारिकेविषयी शंका असल्यास किंवा आलेल्या लिखाणाचे प्राधान्य विचारल्यास पू. काका लगेचच दृष्टीकोन देऊन निरसन करतात. त्यामुळे संकलन विभागातील प्रत्येक साधकाला त्यांचा आधार वाटतो.

 

७ ऐ १ आ ३. पू. काका काही कामानिमित्त सांगलीला गेले होते. त्या वेळी मला माझ्या सेवेविषयी काळजी वाटायची. त्या वेळी पू. काका लगेचच म्हणाले, ‘‘तुला काही अडचण असेल, तर मला दूरभाष कर.’’

 

७ ऐ १ आ ४. गुरुपौर्णिमेला पू. काकांशी बोलतांना मी सहज गमतीने म्हटले, ‘‘तुम्ही संत झाल्यावर आम्हाला तुमच्याशी जास्त बोलता येणार नाही. तुमची सेवा पालटल्यावर आम्हाला येणार्‍या अडचणी कोणाला विचारणार ?’’ त्या वेळी पू. काका हसत म्हणाले, ‘‘मी कुठेही जाणार नाही. इथेच असणार.’’

 

७ ऐ १ इ. निरीक्षणक्षमता

पू. काका सकाळ-संध्याकाळच्या अल्पाहाराच्या वेळी आणि दुपारी-रात्री जेवतांना भोजनकक्षात कुठला साधक आश्रमात नवीन आलेला आहे आणि त्यांचा कुठला लेख द्यायचा आहे, हे टिपून ठेवतात आणि त्याचा लेख दैनिकात देतात.

 

७ ऐ १ ई. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे

पू. काकांकडे प्रत्येक धारिकेला शिरोभाग लिहिणे, संतांना प.पू. डॉक्टरांच्या वतीने पत्र लिहिणे किंवा निरोप देणे, प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक चौकट किंवा सूचना सिद्ध करणे, संतांचा वाढदिवस असल्यावर त्यांची छायाचित्रे आणि त्यांच्याविषयीचे लिखाण आराखड्यात व्यवस्थित बसवणे, ग्रंथांची सूक्ष्म-चित्रे पडताळणे, ग्रंथांची अनुक्रमणिका करणे, ग्रंथ करणे, विदेशी साधक आणि वाचक यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, अशा विविध प्रकारच्या सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात.

 

७ ऐ १ उ. तत्परता

आश्रमात काही वेगळी घटना घडली असेल, तर पू. काका तिथे उपस्थित असतात. ध्वनीचित्रीकरण विभागात काही प्रयोग चालू असेल, प.पू. डॉक्टरांच्या खोलीत काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली असेल किंवा कुठल्या गोष्टीचे परीक्षण करायचे असेल, तर ते लगेचच करतात.

 

७ ऐ १ ऊ. इतरांचा विचार करणे

कधी कधी साधकांची इच्छा असते की, माझ्या मुलाचे दैनिकात लिखाण यावे. कधी ‘अजून माझा लेख का आला नाही’, याविषयी प्रसारातील साधकांची विचारणा होते. त्याविषयी पू. काकांना विचारल्यावर ते लगेचच होकार देऊन लेख मुद्रित करण्यासाठी देतात. ते प्रत्येक वेळी सांगतात की, साधकांच्या मनात आपल्याविषयी विकल्प यायला नको.

 

७ ऐ १ ए. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे

कला विभागात धारिका पडताळतांना प.पू. डॉक्टरांनी एखाद्या साधकाविषयी काही वेगळे सांगितले आणि त्या वेळी पू. काका सेवा करत असले, तरी त्यांचे प.पू. डॉक्टर काय सांगतात, याकडे सतत लक्ष असते. प.पू. डॉक्टर कला विभागातून गेल्यावर ते तिथे उपस्थित असलेल्या साधकांना ‘प.पू. डॉक्टर काय बोलले’, हे विचारून घेतात.

 

७ ऐ १ ऐ. वेगळेपणा न जाणवणे

पू. काकांच्या खोलीत त्यांच्या पत्नी सौ. अंजली गाडगीळ यांच्याशी सेवेविषयी बोलण्यासाठी इतर साधक येतात. पू. काका त्यांच्याशीही बोलतात. त्यामुळे त्यांच्या खोलीत जातांना कोणालाही संकोच वाटत नाही.

 

७ ऐ १ ओ. अंतर्मुखता

पू. काकांकडे कधीही पाहिले, तरी ते सतत अंतर्मुख असल्याचे जाणवते. त्यांना एखादा प्रश्न किंवा शंका विचारली, तर ते लगेचच त्या प्रश्नाचे उत्तर देऊन परत सेवेत मग्न होतात.

 

७ ऐ २. जाणवलेली सूत्रे
७ ऐ २ अ. दैनिकात धारिका देण्याविषयी देवाला विचारून निर्णय घेणे

पू. काकांकडे पाहिल्यावर त्यांचे देवाशी सतत अनुसंधान असल्याचे जाणवते. एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘तुम्ही दैनिकात धारिका घेण्याविषयी कसे ठरवता ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘देवाला विचारायचे, जिथे बोट जाते आणि मनात जो पहिला विचार येतो, तो पकडायचा. ती धारिका दैनिकात घ्यायची. कुठली धारिका कधी घ्यायची, तेही देवाला विचारायचे.’’

 

७ ऐ ३. कृतज्ञता

प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे आम्हाला सतत संतांचा सहवास लाभतो. पू. काका म्हणजे प.पू. डॉक्टरांनी सिद्ध केलेला हिराच वाटतो ! तो सतत चमकत असतो. आम्हाला त्याच्यातून चैतन्य आणि आनंद मिळतो. अशा या हिर्‍याविषयी आणि हिर्‍याला सिद्ध करणार्‍या प.पू. डॉक्टरांप्रती अनंत कोटी कृतज्ञ आहोत. ‘या हिर्‍याकडून आम्हाला साधनेसाठी प्रेरणा मिळून आमच्याकडून त्यानुसार कृती व्हावी’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’

 

७ ओ. सौ. विजयालक्ष्मी आमाती

अतिशय साधी रहाणी, नेहमी शांत आणि स्थिर असलेले पू. मुकुल गाडगीळकाका !

‘कार्तिक शु. तृतीया, कलियुग वर्ष ५११३ (२९.१०.२०११) या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री. चेतन राजहंस यांची चौकट छापून आली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, ‘श्री. मुकुल गाडगीळ आणि श्री. संदीप आळशी यांना संत म्हणून घोषित करण्याची आवश्यकता नाही; कारण त्यांचे वागणे, बोलणे, चालणे या सर्वांतून संतत्व झिरपते.’ हा अनुभव रामनाथी आश्रमातील प्रत्येक साधकाचा आहे. श्री. संदीप आळशी यांच्या तुलनेत श्री. मुकुल गाडगीळ यांच्या संपर्कात मी अधिक आल्याने त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

 

७ ओ १. अतिशय साधी रहाणी, शांत स्वभाव आणि मितभाषी

जून २००० मध्ये श्री. गाडगीळकाका, त्यांची पत्नी सौ. अंजली गाडगीळ आणि कु. सायली गोव्यात आले. तेव्हा श्री. आणि सौ. गाडगीळ यांचे रहाणीमान अतिशय साधे होते. दोघेही त्यांना दिलेली सेवा मनापासून आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असत. मी आरंभीपासूनच सेवेनिमित्त त्यांच्या संपर्कात होते. दोघांचीही सेवा करण्याची पद्धत अनुकरणीय अशी होती. मला दोघांच्याही सहवासात रहायला जास्त चांगले वाटत असे. श्री. गाडगीळकाका अतिशय शांत स्वभावाचे; पण उत्साही होते. ते मितभाषी असले, तरी त्यांच्या बोलण्यात निरागसता आणि सत्यता जाणवत असे.

 

७ ओ २. विवाह झाल्यापासून दोघेही घरातील कोणतेही काम एकमेकांना न सांगता करत असल्याचे सौ. गाडगीळ यांनी सांगणे

२००१ मध्ये एकदा मी श्री. आणि सौ. गाडगीळ यांच्या घरी रहायला गेले होते. त्यांचे घर आरशाप्रमाणे स्वच्छ आणि नीटनेटके होते. रात्री आम्ही गप्पा मारत असतांना काकाही आमच्यासमवेत बसून सर्व ऐकत होते. ते मध्येच उठून आतल्या खोलीत सर्वांसाठी अंथरुणे घालून आले. सकाळी आम्ही उठण्यापूर्वीच काका दूध आणायला गेले होते. नंतर त्यांनीच सर्वांसाठी चहा केला. माझ्यासाठी हे सर्व आश्चर्यकारक होते. सौ. गाडगीळ यांना मी हे बोलून दाखवल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘विवाह झाल्यापासून घरातील कामांसाठी आम्ही एकमेकांशी कधी बोललोच नाही. घरातील प्रत्येक काम मी किंवा ते एकमेकांना न सांगताच करतो.’’

 

७ ओ ३. अहं अल्प असणे

आमची ओळख झाल्यानंतर साधारण २-३ वर्षांनंतर श्री. गाडगीळकाका हे विद्यावाचस्पती (डॉक्टरेट झालेले) असल्याचे समजले.

 

अ. पूर्ण वेळ साधक झाल्यानंतर थोड्याच मासांच्या कालावधीत सौ. अंजली गाडगीळ या सेवेत (साधनेत) भराभर पुढे जात राहिल्या; परंतु श्री. गाडगीळकाका मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि स्थिर होते. त्यांचे हे वेगळेपण मला प्रकर्षाने जाणवले. मला त्याचे जास्त कौतुक वाटत होते.

 

७ ओ ४. नंतरच्या काळात ते पूर्वजन्मीच्या खडतर तपश्चर्या करणार्‍या एखाद्या ऋषींप्रमाणे मला वाटत असत.

 

७ ओ ५. आध्यात्मिक त्रासावर अचूक उपाय सांगणे

जेव्हा जेव्हा मला आध्यात्मिक त्रास होत असे, तेव्हा अचानकपणे पू. काका विभागात यायचे आणि माझे त्रास पाहून त्यावर उपाय सांगायचे. त्यानुसार केल्यावर मी अल्प कालावधीत पूर्ववत होत असे.

 

७ ओ ६. लिखाण करतांना झालेले त्रास

वरील लिखाण थोडे असले, तरी ते पूर्ण करण्यासाठी मला तीन दिवसांचा कालावधी लागला. लिखाण करतांना न सुचणे, लिखाणात नेमकेपणा नसणे, आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ लागणे, अस्वस्थ वाटणे, यांसारखे त्रास मला होत होते.’

 

७ ओ ७. ग्रंथ विभागातील सेवेसंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्ये
७ ओ ७ अ. प्रेमभाव

ख्रिस्ताब्द २००६ मध्ये पू. गाडगीळकाका यांच्या समवेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करण्याची संधी मला ईश्वरकृपेने मिळाली. त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ चुका होत होत्या. त्याविषयी त्यांनी एकदाही नापसंती व्यक्त केली नाही. उलट ते मला सातत्याने सेवा चांगली करण्यासाठी प्रोत्साहनच देत असत. साधकांप्रती पुष्कळ प्रेमभाव असल्याविना हे घडणे शक्य नाही.

 

७ ओ ७ आ. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवर सेवा करत असल्याने धारिका चैतन्यमय होणे

पडताळणीसाठी पाठवलेली प्रत्येक धारिका पू. गाडगीळकाका मला अभ्यासासाठी परत देत असत. काही धारिकांमध्ये चुका नसतांनाही त्यांच्याकडून आलेली धारिका परिपूर्ण वाटत असे. याचे कारण म्हणजे मी सेवा स्थूल स्तरावर अधिक प्रमाणात करत होते आणि पू. काका ती सेवा स्थुलासमवेत सूक्ष्म-स्तरावर, म्हणजे भावपूर्ण करत असल्याने त्या धारिका चैतन्यमय अन् वाचत रहाव्याशा वाटायच्या. मुख्य म्हणजे त्यात कर्तेपण मुळीच जाणवायचे नाही.

 

७ ओ ७ इ. पूर्वी कठीण वाटणारी धारिका पू. काकांनी वाचल्यावर कठीण न वाटणे

काही धारिका भाषांतर आणि संकलन करण्यास मला कठीण वाटायच्या. त्या वेळी मी त्या पू. गाडगीळकाकांच्या संचिकेत वाचण्यासाठी ठेवत असे. ते एखादी धारिका वाचून ‘‘ही धारिका सोपी आहे. तुम्ही सेवेला आरंभ तर करा. तुम्हाला सुचेल’’, असे मला सांगायचे. त्यानंतर खरोखरच मला सुचायचे आणि ती धारिका पूर्ण होत असे.

 

७ ओ ७ ई. पू. काकांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे सेवा चांगल्या प्रकारे करू शकणे

भाद्रपद, कलियुग वर्ष ५११३ (सप्टेंबर २०११) या मासात पू. काकांच्या शेजारी बसून सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी त्यांच्यातील चैतन्यामुळे माझे मन आणि बुद्धी यांवरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होत असल्यामुळे मी सेवा चांगल्या प्रकारे करू शकत होते’.

 

७ औ. सौ. नंदिनी चितळे

७ औ १. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित सेवा करण्याची तळमळ

‘पू. गाडगीळकाका नियतकालिकांसाठी मजकूर देतात. एकदा साप्ताहिकासाठी त्यांनी देवतांच्या निर्गुण झालेल्या चित्राविषयी लेख दिला होता. तो लेख वैशिष्ट्यपूर्ण होता. त्या लेखाची मांडणी व्यवस्थित व्हावी, यासाठी काका थोड्या वेळाने येऊन पानावर त्या लेखाची संरचना कशी होत आहे, हे बघायचे आणि पालट सुचवायचे. त्यांनी आमच्याकडून
प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी संरचना करून घेतली.

 

७ औ २. नवा वैशिष्ट्यपूर्ण मजकूर लवकर वाचकांपर्यंत पोहचायला हवा, ही तळमळ

अनेकदा हिंदी मासिकाची सेवा अंतिम टप्याला असतांना काका नवा मजकूर द्यायचे. सनातनच्या इतिहासात काही वेगळे झाले, तर ते त्याच अंकात यायला हवे, अशी काकांची तीव्र तळमळ असते. त्या वेळी ‘हा नवा वैशिष्ट्यपूर्ण मजकूर लवकर साधकांपर्यंत पोहोचायला हवा’, असे ते सांगायचे. पू. काका नवीन लेख घेण्याविषयीही अतिशय नम्रपणे सांगतात. ते घेण्याची आवश्यकता सांगतांना त्यांच्या तोंडवळ्यावर कुठेही आग्रहीपणा नसतो.

 

 

८. पू. मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भातील अनुभूती

८ अ. डॉ. मुकुल गाडगीळ संत झाल्याच्या मिळालेल्या पूर्वसूचना

८ अ १. बाबा (डॉ. मुकुल गाडगीळ) संत झाले असून प.पू. डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या खोलीत रहाण्यास सांगितल्याचे स्वप्नात दिसणे

‘मागील गुरुपौर्णिमेला (२०१०) मला स्वप्नात दिसले, ‘माझे बाबा संत झाले आहेत. त्याची भेट म्हणून
प.पू. डॉक्टरांनी बाबांना त्यांच्या खोलीत रहाण्यास सांगितले आणि ‘आमची खोली उपायांसाठी वापरा’, असे सांगितले.’ – कु. सायली गाडगीळ (पू. (डॉ.) गाडगीळ यांची मुलगी), सनातन गुरुकुल, रामनाथी, गोवा.

 

८ अ २. पू. गाडगीळकाका संत होण्याच्या ३ – ४ दिवस आधी त्यांच्या मुखावरचे तेज वाढले असल्याचे जाणवणे

‘पू. गाडगीळकाका संत झाल्याचे घोषित केल्यावर मला एकदम ‘आपलेच बाबा संत झाले आहेत’, असे वाटून भरून येत होते. पू. काका संत होण्याच्या आधी ३ – ४ दिवसांपासून त्यांच्या मुखावर तेज वाढले असल्याचे जाणवले.’ – सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

८ अ ३. मागील २ – ३ दिवसांपासून डॉ. गाडगीळकाकांकडे पाहून मला शांत वाटत होते आणि ‘लवकरच काका संत होतील’, असा विचार तीव्रतेने माझ्या मनात आला. – श्री. आशिष जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११))

 

८ अ ४. मिरज आश्रमात ‘लाईव्ह स्ट्रीम’वर सन्मान सोहळा पहाण्यास आल्यावर ‘आमचे जावई श्री. मुकुल गाडगीळ संत होणार आणि तोच कार्यक्रम बघायला मिळणार’, अशी आतून पूर्वसूचना मिळणे आणि तसेच घडणे

‘कार्तिक शु. द्वितीया (२८.१०.२०११) या दिवशी आम्ही मिरज आश्रमात ‘लाईव्ह स्ट्रीम’वर सन्मान सोहळा पहाण्यास आलो होतो. तेथे आल्यावर मला सारखी आतून पूर्वसूचना मिळत होती की, आमचे जावई श्री. मुकुल गाडगीळ बहुतेक संत होणार आणि आम्हाला तोच कार्यक्रम बघायला मिळणार. तसेच झाले आणि देवाने आम्हाला पाच संत मिळवून दिले.

 

काल रात्री माझ्या स्वप्नात प.पू. डॉक्टर आले होते. तेव्हा मला वाटले की, ते मला सांगायलाच आले आहेत, ‘तुमचे जावई संत होणार आहेत.’ केवढी ही ईश्वरी कृपा. आम्ही सर्व कुटुंबीय देवाच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

 

– सौ. शैलजा परांजपे (पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या सासूबाई), सांगली

 

८ आ. इतर अनुभूती

८ आ १. पू. काकांमुळे उपाय होणे

पू. काकांच्या तोंडाकडे फार वेळ बघता येत नाही; परंतु त्यांच्या सहवासात आनंद मिळतो आणि उपाय होत असल्याचे जाणवते. पू. काकांचे मन निर्मळ असून त्यांच्याकडे पहाताक्षणी भावजागृती होते.

 

८ आ २. प.पू. डॉक्टर आणि पू. काका एकच असल्याचे जाणवणे

प.पू. डॉक्टर दिवसभरात दिसले नाहीत, तर मनाला रुखरुख लागते, तशीच रुखरुख पू. काका दिसले नाहीत किंवा त्यांच्याशी बोलणे झाले नाही, तर लागते. पू. काका माझ्यासाठी मोठा आधार आहेत. पू. काका सेवा सांगायला आल्यास ‘प.पू. डॉक्टरच मला सेवा सांगत आहेत आणि तेच माझ्याकडून करवून घेत आहेत’, असे वाटून कृतज्ञता वाटते.

 

– कु. सुषमा पेडणेकर

 

८ आ ३. पू. काकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

फेब्रुवारी २०११ मध्ये प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आता संगणकावरची अंतिम सूक्ष्म-चित्र मी पहाणार नाही. ते अंतिम पू. काकाच पहातील.’’ तेव्हा त्यांना चित्र दाखवल्यावर मला पुढील अनुभूती आल्या.

 

अ. ‘बर्‍याचदा माझे मन निर्विचार होत असे.

आ. पू. काका तेथे नसून प.पू. डॉक्टरच बसले आहेत, असे वाटायचे.

इ. ‘पू. काकांना नमस्कार करूया’, असा विचार मधे मधे यायचा.

ई. नामजप सुरळीतपणे होत असे.

उ. दिवसभरातील अहंचे प्रसंग आठवायचे. (असे २ – ३ वेळा झाले आणि मी ते लिहितांना हलकेपणा आणि आनंदी जाणवायचे.)’

 

– कु. भाविनी कपाडिया

 

८ आ ४. पू. काकांचे डोळे शून्यात असल्याचे जाणवते. त्यांच्या डोळ्यांकडे बघितल्यावर ‘आपण शून्यात गेलो आहे’, असे जाणवते आणि मन निर्विचार अन् स्थिर होते.’ – सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

 

९. श्री. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

१. प.पू. परूळेकर महाराजांनी साधनेसाठी आशीर्वाद देणे

‘२००२ साली प.पू. परूळेकर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेलो असतांना मी त्यांना म्हटले, ‘‘मला साधनाच करायची आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘बाळ, काही काळजी करू नकोस. आता तुझी साधनेत घोडदौड होईल !’’

 

२. प.पू. परूळेकर महाराज मला म्हणाले, ‘‘तुमचे साधनेमध्ये सर्व चांगले होत आहे, ते तुमच्या घराण्यात असलेल्या कोणा साधूपुरुषामुळे बरं !’’

(माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ पू. काशीनाथ गाडगीळ यांनी ब्रह्मचारी राहून ५५ वर्षे सज्जनगडावर सेवा केली होती. त्यांनी १९८० साली देहत्याग केला.)

 

३. नामजप करतांना स्वतःच्या जागी आजानुबाहू साधूपुरुष दिसणे

२००४ सालापासून नामजप करायला बसल्यावर मला माझ्या जागी कोणी आजानुबाहू साधूपुरुष ध्यानस्थ बसलेला दिसतो. तसेच मी कितीही शरणागतभावाने गुरूंच्या चरणांजवळ बसण्याचा प्रयत्न केला, तरी मला माझे ते मोठे रूपच दिसते.

 

श्री. गाडगीळ : प.पू. डॉक्टर, हे काय जाणवते ?

 

डॉ. आठवले : गेल्या जन्मीच्या ध्यानमार्गाच्या साधनेमुळे तसे दिसते.

 

४. ईश्वराने सुचवल्याप्रमाणे कृती करता येण्यामध्ये लक्षात आलेले टप्पे

अ. २००४ सालापासून सेवा करतांना ईश्वर मला त्यामध्ये मुद्दे सुचवायचे; पण त्या वेळी मला माझे विचार कोणते व ईश्वराचे कोणते, ते कळायचे नाही. त्याबद्दल विचारल्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ‘बुद्धीच्या अडथळ्यामुळे असे होते. पुढे तो अडथळा दूर होईल.’

 

आ. २००७ साली मला माझ्या मनात येणारे ईश्वराचे विचार कळायचे; पण त्याप्रमाणे मला कृती करता यायची नाही. नंतर प.पू. डॉक्टरांनी सांगितल्यावर ‘माझ्या मनात ईश्वराने तो विचार सुचवला होता’, हे लक्षात यायचे.

 

इ. सप्टेंबर २००७ मध्ये ईश्वराने सुचवलेल्या विचाराप्रमाणे कृती करता येत नसल्याचे प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी त्यावर स्वयंसूचना देण्यास सांगितले. तशी देण्यास सुरुवात केल्यावर आपोआप मनातील विचारांप्रमाणे कृती होऊ लागल्या.

 

५. जानेवारी २००८ पासून रामनाथी आश्रमात रहात असलेल्या खोलीतील फरशा गुळगुळीत झाल्याचे लक्षात येणे

जानेवारी २००८ पासून आम्ही (मी व पत्नी सौ. अंजली गाडगीळ) रहात असलेल्या रामनाथी आश्रमाच्या खोलीतील फरशा गुळगुळीत झाल्या असल्याचे मला जाणवू लागले. २४.२.२००८ रोजी त्याबद्दल प.पू. डॉक्टरांना सांगितले असता ते म्हणाले, ‘‘शाब्बास, तुमच्यामुळेच झाले हे !’’ त्यानंतर दुसर्‍या दिवशी ते वरच्या मजल्यावर आले असतांना आमच्या खोलीपासून ६-७ फुटांवर आल्यावर म्हणाले, ‘‘येथेही सुगंध येत आहे.’’ खोलीत प्रवेश केल्यावर ते म्हणाले, ‘‘कोबा असूनही तुमच्या खोलीतील फरशा खरंच गुळगुळीत झाल्या आहेत. कमाल आहे !’’

 

५ अ. डिसेंबर २००७ व जानेवरी २००८ मध्ये खोली निरीक्षणासाठी काही साधिका आल्या असतांना त्यांना ‘खोलीत खूप चांगले वाटणे, सुगंध येणे, नामजप सुरू होणे, प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे आणि उपाय होणे’, अशा अनुभूती आल्या.

 

६. एखादी चूक होण्यापूर्वी ती लक्षात आणून देऊन ईश्वराने चूक होऊ न देणे

फेब्रुवारी २००८ पासून ‘ईश्वर माझ्याकडून चुका होऊ देत नाही’, अशी अनुभूती येत आहे. माझ्याकडून एखादी चूक होण्यापूर्वीच मला स्वतःला त्याबाबत लक्षात येते किंवा माझ्याकडून आपोआप तशी कृती घडते किंवा एखादा साधक मला त्याबाबत सांगतो किंवा प.पू. डॉक्टर त्याबाबत सांगतात. त्यामुळे ती चूक माझ्याकडून आपोआपच होत नाही. त्याबद्दल मला कृतज्ञ वाटते.

 

७. फेब्रुवारी २००८ पासून प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले सहज लिहून होणे

फेब्रुवारी २००८ पासून माझ्या लक्षात आले की, प.पू. डॉक्टरांनी शिरोभाग किंवा काही लिहायला सांगितल्यास प्रार्थना केल्यावर बुद्धीने फार विचार न करता आपोआप ते लिहिता येते व ते लिहिण्यासाठी फार वेळही लागत नाही. त्यापूर्वी असे काही लिहिण्यासाठी मला खूप विचार करावा लागायचा व त्यामध्ये माझा खूप वेळही जायचा.

 

८. २४.२.२००८ रोजी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आता तुम्ही माझ्यापेक्षाही छान लिहिता !’’

 

– श्री. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment