अनुक्रमणिका
गेल्या काही वर्षांत जगभरात आणि भारतातही नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर आल्या. ‘वातावरणातील रज-तमाचा वाढता प्रभाव’ हे राष्ट्रावरील नैसर्गिक आपत्तींमागील आध्यात्मिक कारण असते. सध्या कलियुगांतर्गत ६ व्या कलियुगाच्या चक्राचा शेवट होण्यापूर्वीचा संधीकाल चालू आहे. या युगपरिवर्तनाच्या कालावधीत येणारा आपत्काळ आता चालू झाला आहे. जगात आणि भारतात घडणार्या विविध घटनांतून हा आपत्काळ सर्व जण अनुभवत आहेत. कोरोनासारखी महामारी हेही त्याचेच एक उदाहरण आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये ‘येत्या काळात मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होणार आहे’, असे अनेक द्रष्टे संत आणि प्रसिद्ध भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे.
१. युरोपमध्ये उष्णतेचा हाहाःकार !
नुकताच ब्रिटनसहित पूर्ण युरोपमध्ये प्रचंड उष्णता आणि अल्प पर्जन्यवृष्टी यांमुळे हाहा:कार माजला होता. युरोपच्या जवळपास ६० टक्के भूभागावर दुष्काळसदृश परिस्थिती ओढावली. हे क्षेत्रफळ भारताच्या क्षेत्रफळाएवढे आहे. युरोपातील १ कोटी ७० लाख लोक यात होरपळले. ‘येणार्या काही दिवसांत आणखी १ कोटी ५० लाख लोकांना अशा संकटांना सामोरे जावे लागू शकते’, असे सांगितले जात आहे. स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांमध्ये जुलै मासात ४० अंश सेल्सियसहून अधिक तापमान नोंदवले गेले. थंड प्रदेशातील नागरिकांना ते सहन करणे कठीण गेले. इंग्लंडमध्ये काही ठिकाणी अशी स्थिती झाली की, पिण्याचे पाणी विकत घेण्यावरून लोकांमध्ये मारामार्या झाल्या !
२. विनाशकारी वणवे !
वातावरणातील पालटामुळे जगभर जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढत आहेत. अलीकडच्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वणवे आणि वैश्विक तापमानवाढ यांमुळे आतापर्यंत शेकडो दशलक्ष हेक्टर भूमी आगीच्या लोळात जळून खाक झाली आहे. येथे वर्ष २०१९-२० मध्ये लागलेल्या वणव्यात ३०० कोटी पशू-पक्षी जळून खाक झाले. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, क्रोएशिया या देशांत सहस्रो लोकांना वणव्यांमुळे स्थलांतर करावे लागले आहे. या वणव्यांमध्ये शेकडोंचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे.
गेल्या वर्षी कॅनडामध्ये लागलेले वणवे इतके स्फोटक होते, की त्या धुरातून ढग आणि वादळ निर्माण झाले. ‘पायरो-क्युमुलोनिंबस’ प्रकारच्या त्या ढगांत विजा चमकून आणखी आग पसरली. पश्चिम अमेरिकेत १० सहस्र एकरवर पसरणार्या वणव्यांचे प्रमाण वर्ष १९७० च्या तुलनेत ७ पटींनी वाढले. अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, फ्रान्स, चीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलांमध्ये आगी लागत असून सहस्रो हेक्टर भूमी आणि जंगलसंपत्ती जळून राख झाली आहे, तसेच पशूपक्षी अन् जंगली प्राणी यांचे पुष्कळ मोठ्या प्रमाणात शिरकाण झाले आहे. भारतातही गेल्या दोन दशकांमध्ये जंगलातील आगीच्या घटना आणि तीव्रता यांत वाढ झाली आहे.
३. आहे-नाही ते सर्व वाहून नेणारा महापूर !
जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणात अतीतीव्र पालट झाले आहेत. भारतासह आशिया खंडात यंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि महापूरही येत आहे. एप्रिल मासात सौदी अरेबियासारख्या वाळवंटी देशात लोक पुरातून वाट काढतांनाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. वर्ष २०१९ मध्ये सांगली येथे आणि वर्ष २०२१ मध्ये चिपळूण येथे महापूर आला. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे पाण्याखाली गेली. भारतभरात नद्यांचे प्रवाह अडवल्याने पूरस्थिती ओढावली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची सेवा आपत्ती आल्यावर चालू होते. गेल्या काही वर्षांत थोड्या पावसानेही मोठे पूर येत आहेत. अलीकडे एकाच दिवसात २०० मि.मी. पावसाची नोंद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वर्ष २०२१ मध्ये महाबळेश्वरला ५५० मि.मी. पाऊस झाला. पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव आणि पाळीव प्राणी यांची जीवितहानी होते. घरे, शासकीय कार्यालये, धान्य कोठारे, अधिकोष आणि बाजारपेठा यांत पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य अन् पैसा यांची मोठ्या प्रमाणात हानी होते.
४. सर्व काही उद्ध्वस्त करणारी चक्रीवादळे !
जागतिक तापमानवाढ आणि प्रदूषणाचा थर यांमुळे अरबी समुद्रात चक्रीवादळाची संख्या या दशकात वाढणार असल्याचे पाश्चात्त्य तज्ञांनी मागील दशकात सांगितले होते. अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ०.३६ अंश सेल्सियसने वाढले आहे. अरबी समुद्रातील वादळे मुंबई आणि कोकण येथे थेट आदळली नाहीत, तरी मोठी हानी करतात. वर्ष २००९ मध्ये फयान आणि मे २०२१ मध्ये तौक्ते हे चक्रीवादळ दक्षिणपूर्व अरबी समुद्रात निर्माण झाले. या वादळांनी रायगड आणि कोकण येथे फळबागा, घरे आदी उद्ध्वस्त झाल्याने वित्त हानी झाली. चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा १०० हायड्रोजन बाँबपेक्षा अधिक असते. लहान घरे, झाडे, वीज आणि दूरध्वनी यांचे खांब आदींची वाताहात होते. छपरे उडतात, भिंती कोसळतात, समुद्राचे पाणी शेतात गेले, तर भूमी नापीक होते. वादळाच्या वेळी प्रचंड पाऊस पडून प्रलय येतो. सहस्रो लोक बेघर होतात. वीज, पाणी आणि संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडतात. नागरिकांचे आरोग्य, तसेच पुनर्वसन यांचा प्रश्न निर्माण होतो. वर्ष २००४ मध्ये आलेल्या तत्सुनामी वादळानेही मोठी हानी झाली होती. वर्ष २००८ मध्ये आलेल्या नर्गिस चक्रीवादळाने म्यानमारमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
५. सारे काही मातीमोल करणारा भूकंप !
वर्ष २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात ९ सहस्रांहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले, २३ सहस्रांहून अधिक घायाळ झाले. वर्ष १९९३ मध्ये महाराष्ट्रातील किल्लारीच्या भूकंपात मोठी जीवितहानी झाली होती. भारत आणि यूरेशियाई भागांत होणार्या भूगर्भीय हालचालींमुळे या क्षेत्रात भूकंपाचे क्षेत्र वाढले आहे. पश्चिम क्षेत्रात ३० हून अधिक जलाशये असल्याने त्यामुळेही भूकंपाची शक्यता आहे.
६. नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी भक्त व्हा !
द्वापरयुगात श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये इंद्रदेवाने मोठ्या प्रमाणात वर्षा चालू केली, तेव्हा श्रीकृष्णाने सर्व गोप-गोपींना गोवर्धन पर्वताखाली सुरक्षित ठेवले. त्याने स्वतःच्या करंगळीवर गोवर्धन उचलला आणि सर्व गोप-गोपींनी खालून त्याला काठ्या लावल्या. हे गोप-गोपी कृष्णभक्त असल्याने श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले. आताच्या आपत्काळातही गोप-गोपींप्रमाणे भक्ती वाढवली, तर ईश्वर भक्तांचे रक्षण करणारच आहे !
नैसर्गिक संकटांच्या काळात पंचमहाभूतांना प्रार्थना करणे आवश्यक आहे. पंचमहाभूते ही ईश्वराचेच रूप असल्याने त्यांना प्रार्थना केल्याने मानवाचे रक्षण नक्की होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी भक्ती वाढवून ईश्वराला आळवणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाचे वचनच आहे, ‘न मे भक्तः प्रणश्यति’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीच नाश होणार नाही.’ यानुसार आपत्काळातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता प्रभाव पहाता प्रत्येकाने ईश्वराचे भक्त बनण्याची आवश्यकता अधोरेखित होते !