शरीरस्वास्थ्यासाठी नियमित आणि वेळेवर व्यायाम करावा. त्याच्या समवेत आहार नियंत्रित (डाएटिंग) करणे, म्हणजे उपाशी रहाणे नव्हे, तर संतुलित आहार घेणे आणि तोही वेळेवर घेणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढे उष्मांक (कॅलरीज) मिळून हृदयविकार (हार्ट प्रॉब्लेम) आणि लठ्ठपणा या समस्या उद्भवत नाहीत. वजन न्यून करण्यासाठी अल्प उष्मांक आणि अल्प चरबी असलेला आहार घेणे आवश्यक असते. व्यायामाच्या समवेत आपण योगासने केली, तर आपल्या शरिरात शक्तीसह तग धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा (स्टॅमिना) वाढेल. शरीर सुंदर आणि आकर्षक हवे असेल, तर नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
शरीर स्वास्थ्यासाठी कोणती काळजी घ्याल ?
अ. ‘टोस्ट सँडविच’वर ‘बटर’चा वापर अल्प करावा. ‘बटर’मुळे चरबी वाढते.
आ. कोशिंबिरी किंवा ‘सॅलड’वर मलई न घालता लिंबाचा वापर करावा.
इ. उपाहारगृहातील पदार्थांत चरबी अधिक असते. त्यामुळे बाहेरील पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
ई. ‘एरोबिक’ व्यायामाने (उदाहरणार्थ चालणे, धावणे, पोहणे इत्यादी हृदय आणि श्वसनसंस्था यांच्यासाठी लाभदायक अशा व्यायामाने) वजन लवकर न्यून होते अन् मांसपेशी कणखर होतात.
त्यामुळे योग्य तो विचार करून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास वजन न्यून होते. या क्रियेत पुष्कळ दिवस जातात; परंतु आपल्या शरिराला योग्य आकार मिळतो.
– श्री. यतिन ठाकूर, पनवेल
साभार : ‘श्रीपूर्णानंद वैभव’, माघी गणेशोत्सव २०१४
व्यायाम कोणता करावा ?
‘व्यायाम करतांना शरिराची चयापचय क्रिया (ऊर्जा निर्मितीची क्रिया) वाढायला हवी. सर्व सांध्यांच्या हालचाली व्हायला हव्यात. शरिराचे स्नायू ताणले जायला हवेत. त्यामुळे केवळ चालणे, केवळ सूर्यनमस्कार किंवा केवळ प्राणायाम न करता स्वतःच्या क्षमतेनुसार प्रत्येक प्रकारातील व्यायाम थोडा थोडा करावा. असे नियमित केल्याने व्यायामाचा शरिरावर सुपरिणाम दिसायला लागतो. व्यायाम करून शारीरिक क्षमता वाढू लागल्यावर व्यायामाचे प्रमाणही थोडे थोडे वाढवावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)