वाहनाचा अपघात होऊ नये, यासाठी साधकांनी घ्यावयाची दक्षता आणि प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. त्यामुळे साधकांच्या संदर्भात वाहनाचा अपघात होण्याचा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.

१. साधकांनी घ्यावयाची काळजी

१.अ. वाहन चालवण्यास आरंभ करण्यापूर्वी नामजप आणि प्रार्थना करावी. प्रवासात आध्यात्मिक स्तरावरील उपायांद्वारे संरक्षककवच निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

१.आ. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने दुचाकी चालवण्याची वेगमर्यादा (स्पीड लिमिट) ४० किलोमीटर, तर चारचाकी चालवण्याची वेगमर्यादा ६० किलोमीटर अशी असते. शहरातील रहदारीचे रस्ते, महामार्ग (हायवे), पूल आदी ठिकाणी वाहनाची वेगमर्यादा किती असावी ? याचे फलक तेथे लावलेले असतात. त्या वेगमर्यादेचे, तसेच अन्य नियमांचे पालन करून वाहन चालवावे.

१.इ. दुचाकी गाडी चालवतांना शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा), तर चारचाकी वाहन चालवतांना ‘सीटबेल्ट’चा वापर करावा.

१.ई. वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलू नये, तसेच भ्रमणभाष हाताळू नये.

 

२. प्रवासात अपघात टाळण्यासाठी वापरावयाचे ‘अपघात निवारण यंत्र’ !

 

२ अ. यंत्र बनवण्याची आणि ते सिद्ध करण्याची पद्धत !

‘येथे दिलेले यंत्र एका पांढर्‍याशुभ्र कागदावर पेनने काढावे. त्यासाठी आधी चौकोन आखावेत. यंत्रात दिल्याप्रमाणे त्या त्या चौकोनात तो तो आकडा लिहावा. आकडे लिहितांना लहान अंकापासून आरंभ करून मोठ्या अंकापर्यंत आकडे लिहावेत. (उदा. आधी यंत्राच्या ४ थ्या स्तंभातील ३ र्‍या ओळीतील ‘१’ हा आकडा लिहावा, त्यानंतर ३ र्‍या स्तंभातील १ ल्या ओळीतील ‘२’ हा आकडा लिहावा इत्यादी.) प्रत्येक आकडा लिहितांना आधी ‘ॐ ह्रीं नमः ।’, असा नामजप करावा आणि मग आकडा लिहावा. अशा प्रकारे यंत्र कागदावर काढून झाल्यावर त्या यंत्राभोवती उदबत्ती ओवाळावी. त्यानंतर डोळे मिटून ‘अंजनीसुत-हनुमान् रक्षतु रक्षतु स्वस्ति ।’ (म्हणजे ‘अंजनीपुत्र हनुमान आमचे रक्षण करो आणि आमचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडो’) हा मंत्रजप म्हणत उजव्या हाताचे मधले बोट यंत्रातील एका चौकोनावर ठेवावे. नंतर डोळे उघडून त्या चौकोनात लिहिलेल्या संख्येइतका वरील मंत्रजप करावा. आता हे ‘अपघात निवारण यंत्र’ सिद्ध झाले असल्याची निश्चिती बाळगावी.

२ आ. यंत्र वापरण्याची पद्धत !

हे यंत्र सिद्ध झाल्यावर प्रवासाच्या वेळी (सार्वजनिक वाहनाने प्रवास करतांनाही) आपल्या खिशात बाळगावे. ज्यांचे स्वतःचे वाहन आहे आणि ज्यांना वारंवार लांबचा प्रवास करावा लागतो, त्यांनी यंत्र लिहिलेल्या कागदाचे ‘लॅमिनेशन’ करून घ्यावे. नंतर हे यंत्र चारचाकी वाहनाच्या आत चालकाच्या समोरील काचेला (‘विंडस्क्रीन’ला) उजवीकडे आतील बाजूने (चालकाला दिसेल असे) लावावे. दुचाकी गाडीला पुढच्या बाजूला निर्गुण (बाहेरील बाजूने) लावावे. हे यंत्र अपघातापासून संरक्षण करते. त्याला कार्यान्वित करण्यासाठी प्रवासाला, तसेच वाहन चालवण्यास आरंभ करतांना प्रत्येक वेळी यंत्राला आपल्या संरक्षणासाठी प्रार्थना करावी.’

(संदर्भ : ग्रंथ ‘यंत्र रहस्य दर्शन’)

२ इ. महत्त्वाच्या सूचना

२ इ.१. ‘अपघात निवारण यंत्र’ काढण्यासाठी त्यातील रिकाम्या रकान्यांची (आखलेल्या चौकोनांची) प्रत (प्रिंट) काढू शकतो. त्यावर ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या अन् आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाकडून यंत्रातील सर्व आकडे हाताने लिहून घ्यावेत.

२ इ.२. यंत्र बनवणार्‍याने आरंभी भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान यांना प्रार्थना करावी.

२ इ.३. दुचाकी किंवा चारचाकी गाडीने प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाची गोमूत्र किंवा सात्त्विक विभूती घातलेल्या पाण्याने शुद्धी करावी. तसे करणे शक्य नसल्यास कोर्‍या कागदावर चिमूटभर सात्त्विक विभूती घ्यावी आणि ती आपल्या वाहनामध्ये अन् वाहनाच्या सभोवती फुंकरावी.

 

३. वाहनात नामपट्ट्या लावणे

वाहनात नामपट्ट्या लावल्या नसल्यास प्रथम त्या लावाव्यात. (त्या कोणत्या आणि कशा पद्धतीने लावाव्यात, हे पुढे दिले आहे.) या नामपट्ट्यांमुळे आपल्या वाहनाभोवती देवतांच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होईल आणि आपले अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होईल. वाहन चालवण्यापूर्वी त्या भक्तीभावाने पुसाव्यात आणि त्यांना रक्षणासाठी प्रार्थना करावी.

३ अ. चारचाकी वाहनातील नामपट्ट्यांची रचना

वाहनशुद्धीसाठी वाहनात देवतांच्या नामपट्ट्या लावतांना छताच्या आतील बाजूने त्यांची रचना खाली दिलेल्या क्रमांकाप्रमाणे करावी.

१. चालकाच्या आसनासमोर – श्रीकृष्ण
२. चालकाच्या बाजूच्या आसनासमोर – गणपति
३. चालकाच्या मागील बाजूस डावीकडील खिडकीच्या वर – श्रीराम
४. चालकाच्या मागील बाजूस उजवीकडील खिडकीच्या वर – दत्त
५. गाडीच्या मागील बाजूस डावीकडे – देवी (दुर्गा, अंबादेवी, भवानीदेवी, रेणुकादेवी इत्यादींपैकी कोणतीही)
६. गाडीच्या मागील बाजूस मध्यभागी – शिव
७. गाडीच्या मागील बाजूस उजवीकडे – मारुति

३ आ. दुचाकी वाहनास नामपट्ट्या लावण्याची पद्धत

दुचाकीच्या पुढच्या बाजूला ‘गणपति’ आणि मागच्या बाजूला ‘श्रीकृष्ण’ या देवतांच्या नामपट्ट्या लावाव्यात.

 

४. वरीलप्रमाणे वाहनशुद्धी करून आणि
‘अपघात निवारण यंत्र’ जवळ बाळगून गाडीने प्रवास करावा.
प्रवास सुखरूप झाल्यावर श्रीकृष्ण आणि हनुमान यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२२)

Leave a Comment