अनुक्रमणिका
- छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम अन् स्वामी विवेकानंद यांनाही प्रिय असलेला श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !
- हनुमान
- हनुमान जयंती व्हिडिओ
- १. छ. शिवाजी महाराजांचे कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी हातात गदा घेऊन उभ्या असलेल्या महाबली मारुतीची मूर्ती असणे
- २. हनुमंताला ‘भक्तीच्या वाटा दाखव’, अशी संत तुकाराम महाराजांनी विनवणी करणे
- ३. स्वामी विवेकानंद
- ४. हनुमंताची दास्यभक्ती !
- ५. ‘प्रभु श्रीरामांची सेवा’, हेच हनुमंताचे जीवन !
छ. शिवाजी महाराज, संत तुकाराम अन् स्वामी विवेकानंद
यांनाही प्रिय असलेला श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !
हनुमान
हनुमान जयंती व्हिडिओ
१. छ. शिवाजी महाराजांचे कोट, दुर्ग आणि गड यांच्या
महाद्वारापाशी हातात गदा घेऊन उभ्या असलेल्या महाबली मारुतीची मूर्ती असणे
‘छ. शिवाजी महाराजांनी राज्याच्या संरक्षणासाठी बांधलेले कोट, दुर्ग आणि गड यांच्या महाद्वारापाशी महाबली मारुति हातात गदा घेऊन उभा असलेला दिसतो. कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.
२. हनुमंताला ‘भक्तीच्या वाटा दाखव’, अशी संत तुकाराम महाराजांनी विनवणी करणे
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही एका अभंगात हनुमंताला विनवणी करून म्हणतात,
‘शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलों रामदूता ।
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ।। (तुकाराम गाथा, अभंग ३२८३, ओवी १, २)
भावार्थ : ‘अहो मारुतिराया, तुम्ही रामाचे सेवक आहात; म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. (असे द्विवार सांगतात.) अहो श्रेष्ठवीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या मला दाखवाव्यात.’ ‘सुभटा’, म्हणजे ‘चांगल्या योद्ध्या’, असे म्हणून त्यांना हनुमंताला सन्मानिले आहे.
३. स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद हेही आपल्या शिष्यांना हनुमानाची जीवनगाथा कथन करून त्यांची मने प्रभावित करत असत.’
– डॉ. (सौ.) सुमेधा प्रभाकर मराठे (मासिक ‘हितगुज’, अंक ८९, मार्च २०१२)
४. हनुमंताची दास्यभक्ती !
हनुमंत स्वतःला प्रभु श्रीरामांचा दास, सेवक समजतो. हनुमंत हा दास्यभक्तीचा उत्तुंग असा आदर्श आहे. त्याची दास्यभक्ती ही हिमालयाच्या गौरीशंकर शिखरापेक्षाही अधिक उंचीची आहे. श्रीरामाचे ‘दास्य’ ज्याला लाभले, असा परमभाग्यशाली केवळ हनुमंतच आहे. साक्षात् भगवंताचे दास्य लाभलेल्या हनुमंताला कोणत्याच प्रकारच्या वैभवाची इच्छा नव्हती. त्याला मोक्षप्राप्तीचीही इच्छा नव्हती. प्रभु श्रीरामांचे दास्य, ‘रामदास्य’ हेच त्याचे परमश्रेष्ठ ‘वैभव’ होते. ‘रामदास्य’ हेच त्याचे सुख, हेच त्याचे परमभोग, हीच त्याची परमशांती, हीच त्याची परममुक्ती आहे. हेच त्याचे कैवल्य आहे, मोक्ष आहे.
प्रभु श्रीरामांवर हनुमंताची अपरंपार आणि दृढ निष्ठा होती. स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य, स्वतःचा प्रभाव हा सगळा प्रभु श्रीरामांच्या कृपेचाच परिणाम आहे, ही सगळी रामकृपाच आहे, अशी हनुमंताची पूर्ण श्रद्धा होती. त्यामुळेच तो स्वतःला श्रीरामप्रभूंचा नम्र सेवक समजतो. श्रीरामपरमभक्त हनुमंताची जगातील ७ चिरंजिवांमध्ये गणना केली जाते.
५. ‘प्रभु श्रीरामांची सेवा’, हेच हनुमंताचे जीवन !
हनुमंताचे जीवन स्वतःकरता नव्हतेच. रामसेवा हेच हनुमंताचे जीवन होते. त्याला स्वतःला कशीचीही आवश्यकता नव्हती. केवळ प्रभु श्रीरामांची सेवा ! केवळ त्यांचे दास्य ! केवळ आणि केवळ त्याकरताच हनुमंताचे अंतःकरण तळमळायचे. यासंदर्भात साक्षात् प्रभु श्रीरामांनी स्वतःच सांगितले की, ‘‘सुग्रीव आणि बिभीषण यांची दृष्टी सिंहासनावर होती. त्याकरता त्यांना माझे साहाय्य हवे होते; म्हणून त्यांनी मला सहकार्य केले’; परंतु हनुमंताचे तसे नव्हते. केवळ ‘रामदास्य’ हीच हनुमंताची उत्कट भक्ती होती.’’
अतीप्रचंड शक्तीसंपन्न, सद्गुणांचे आश्रयस्थान, साक्षात् नम्रतेचे प्रतीक असलेला हा हनुमान राजांचाही राजा होऊ शकला असता. अगदी सहजतेने त्याला सम्राट होता आले असते, तरीही हनुमंताने वैभवशाली सम्राट होणे टाळले. त्याचा त्याग केला आणि तो प्रभु श्रीरामांचा दास होऊन राहिला. त्याने श्रीरामांचे दास्य स्वीकारले. कारण केवळ एकच होते. प्रभु श्रीरामांवर त्याची निस्सीम भक्ती होती. प्रभु श्रीराम हेच त्याचा ‘प्राण’ होते.
अशा या निस्सिम, परमभक्ताला साक्षात् श्रीविष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांकडून अनायासे मोक्ष मिळत असतांना, साक्षात् प्रभु श्रीराम त्याला मोक्ष देण्यास सिद्ध असतांनाही युगानुयुगांच्या अंतापर्यंत हनुमंताने श्रीरामांचा दास होऊन रहाणेच स्वीकारले आहे. हनुमंताची दास्यभक्ती परमोच्च, अवर्णनीय आणि अनाकलनीय आहे. आज सहस्रो वर्षांपासून जमसमुदायाच्या हृदयात रामाएवढेच आदरणीय स्थान हनुमंतालाही लाभले आहे.