अनुक्रमणिका
या लेखात आपण चातुर्मासाचे महत्त्व आणि या मासांविषयी माहिती पहाणार आहोत.
१. चातुर्मास कालावधी आणि महत्त्व
१ अ. चातुर्मास कालावधी
‘चातुर्मास’, म्हणजे ‘४ मासांचा काळ.’ याचा आरंभ ‘देवशयनी’, म्हणजेच आषाढ शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी होतो आणि ‘प्रबोधिनी’, म्हणजेच कार्तिक शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी संपतो. या दोन्ही ‘महाएकादशी’ असून अनेक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीला आळंदीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाते. पालखीच्या समवेत लक्षावधी वारकरी असतात.
१ आ. चातुर्मासात ‘देवशयनी’ एकादशीच्या दिवशी देव
झोपत असल्याने असुरांपासून रक्षण होण्यासाठी त्या कालावधीत व्रत-वैकल्ये केली जाणे
आषाढ मासाच्या पौर्णिमेच्या मागेपुढे ‘पूर्वाषाढा-उत्तराषाढा’ नक्षत्र असते. मनुष्याचे १ वर्ष, म्हणजे देवांची अहोरात्र. ‘दक्षिणायन’ म्हणजे ६ मासांची ‘रात्र’, तर उत्तरायण म्हणजे ‘दिवस’ होय. ‘यथा देहे तथा देवे’, म्हणजे मानवाने ‘आपल्यासारखेच देव आहेत’, ही कल्पना गृहीत धरल्यामुळे आपल्यासारखेच देव झोपी जातात; म्हणून आरंभ ‘देवशयनी’ एकादशीने होतो आणि ४ मासांनी कार्तिक शुक्ल ११, म्हणजेच ‘प्रबोधिनी’ एकादशीच्या दिवशी ‘देव जागे होतात’, असे समजले जाते.
देव निद्रिस्त असल्यामुळे अनेक असुर मानवाला त्रास देतात. हे त्रास टाळण्याकरता व्रत-वैकल्ये करावीत, म्हणजे धर्माची अभिवृद्धी होऊन मानवाला त्याचा लाभ होतो आणि त्याच्यात संकटाला तोंड देण्याची मानसिकता निर्माण होते.
२. चातुर्मासातील व्रतांचे महत्त्व
२ अ. व्याख्या
‘व्रत’, म्हणजे विशिष्ट काळासाठी किंवा आमरण आचरायचा धर्म. ‘नियम’ आणि ‘व्रत’ हे समानार्थी शब्द आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा आचार, अन्नादी व्यवहार, रूढी आणि उपासना यांवर निर्बंध घालते किंवा घालून घेते, त्या वेळी या गोष्टी ‘व्रत’ या संज्ञेत येतात.
२ आ. व्रतांचे प्रकार आणि नियम
व्रते ‘नित्य’ (नेहमी करायची) आणि ‘काम्य’ (इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी केलेली) अशा दोन्ही प्रकारची असतात. एकादशीचा उपवास करणार्याने संपूर्ण दिवस ‘अन्न वर्ज्य करणे, एकदाच पाणी पिणे आणि दिवसा न झोपणे’, असे नियम पाळावेत. एकादशीचे पारणे (उपवास सोडणे) द्वादशीला किंवा दुसर्या दिवशीही उपवास आल्यास त्रयोदशीला करता येते.
व्रत करणार्यांनी मद्य-मांसादी पदार्थांचे सेवन न करणे, पलंगावर न निजणे आदी निर्बंध पाळावयाचे असतात.
३. चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव
३ अ. श्रावण मास
३ अ १. माहिती : चातुर्मासाचा दुसरा मास श्रावण मास आहे. या मासातील पौर्णिमेच्या मागेपुढे ‘श्रवण’ नक्षत्र येते; म्हणून हा श्रावण मास आहे. या मासात स्त्रियांची अनेक व्रत-वैकल्ये असून सातही वारांना काही ना काही पूजा सांगितल्या आहेत.
३ अ २. नवविवाहित स्त्रियांनी ५ वर्षे पाळावयाची व्रते आणि वारानुसार करायची पूजा
अ. सोमवारी शिवपूजा : यामध्ये अनुक्रमे तांदूळ, तीळ, मूग आणि जवस या धान्यांची शिवामूठ वाहिली जाते.
आ. सोळा सोमवार व्रत : सोमवती व्रत हे ‘काम्य’ (इच्छा) व्रत आहे.
इ. मंगळवारी मंगळागौरीची पूजा : नवविवाहित मुली सौभाग्यवृद्धीसाठी मंगळवारी मंगळागौरीची षोडशोपचारे पूजा करतात. यात १६ या संख्येला महत्त्व असते. त्यामुळे पूजेसाठी १६ सुवासिनींना बोलावतात, तसेच पूजा करतांना देवीला १६ प्रकारची पत्री, फुले इत्यादी वहातात.
ई. बुधवार आणि गुरुवार : या दोन्ही दिवशी बृहस्पतीची पूजा करतात.
उ. शुक्रवारी जिवतीची पूजा : या दिवशी मुलांच्या आरोग्याकरता जिवतीच्या चित्राची पूजा करतात. सुवासिनींना हळदकुंकू लावून फुटाणे देतात.
ऊ. शनिवार : नरसिंह आणि पिंपळ यांची पूजा करतात.
ए. रविवार : सूर्याची (आदित्यराणूबाईची) पूजा करतात.
३ अ ३. श्रावण मासातील दुसर्या पंधरवड्यातील व्रते
अ. ‘जन्माष्टमी’ : या दिवशी श्रीकृष्ण जयंती असते. कृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. या दिवशी संत ज्ञानेश्वर जयंती असते.
आ. श्रावण कृष्ण द्वादशी : या दिवशी पावस (जिल्हा रत्नागिरी) येथील स्वामी स्वरूपानंद यांची पुण्यतिथी असते.
४. दर्श (पिठोरी) अमावास्या : या दिवशी पोळा सण साजरा करतात. या दिवशी वृषभपूजन केले जाते. वृषभांना (बैलांना) गोड-धोड खाऊ घालतात. हा सण ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.’
३ आ. भाद्रपद मास
३ आ १. माहिती : ‘हा चातुर्मासापैकी तिसरा मास आहे. या मासाच्या पौर्णिमेच्या मागेपुढे ‘पूर्वा भाद्रपदा’ नक्षत्र येते. भाद्रपद शुक्ल पक्षात हरितालिका, गणपति, ऋषिपंचमी, गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन, अदुःखनवमी, स्वर्णगौरी इत्यादी व्रते असतात.
३ आ २. भाद्रपद मासातील व्रते
अ. भाद्रपद शुक्ल तृतीया (हरितालिका व्रत) : या दिवशी मातीच्या हरितालिकेच्या मूर्ती (सखीसह) आणतात. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि कुमारिकांना चांगला पती मिळावा; म्हणून केले जाणारे हे व्रत सर्व स्त्रिया अन् मुली करतात. या दिवशी पूजा, उपवास आणि रात्री जागरण करतात. दुसर्या दिवशी पारणे सोडतात. या संदर्भात पुराणात एक कथा आहे. ‘पार्वतीला शंकरा समवेतच विवाह करायचा होता; म्हणून ती आणि तिची सखी अरण्यात तपश्चर्येकरता गेल्या. पार्वतीच्या खडतर तपाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्याकरता तिने जे व्रत केले, ते हे हरितालिका व्रत.’
आ. भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) : भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घरोघरी पार्थिव (मातीच्या) गणेशाच्या मूर्तीची पूजा असते. कुलाचाराप्रमाणे दीड दिवस, ५ दिवस, गौरीसह किंवा अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतात.
इ. ऋषिपंचमी : भाद्रपद शुक्ल पंचमी या दिवशी सप्तर्षि आणि अरुंधती यांची पूजा करायची असते. या व्रतात १०८ वेळा आघाड्याच्या काड्यांनी दंतधावन करायचे असते. १०८ वेळा नदीच्या पाण्यात डुबक्या (नदीवर स्नान करत असतील, तर) मारायच्या किंवा १०८ तांबे पाणी स्नानाला घ्यायचे असते. १०८ वस्तूंचे वायन दान (स्त्रियांनी ब्राह्मणास द्यायचे दान) करावे. हे व्रत ७ वर्षे करायचे असते. या दिवशी बैलाच्या श्रमाचे काहीही खायचे नसते. पुरातन काळी असे आचरण केले जात होते.
ई. अदुःखनवमी : भाद्रपद शुक्ल नवमी या दिवशी गौरीची पूजा, उपवास आणि जागरण करतात. हे व्रत ९ वर्षे करायचे असते. या दिवशी भागवत सप्ताहाचा आरंभ होऊन पौर्णिमेला समाप्ती होते.
उ. अनंतचर्तुदशी : अनंताच्या पूजेचे व्रत ज्यांनी घेतले आहे, ते अनंतचतुर्दशी (भाद्रपद शुक्ल १४) या दिवशी पूजा करतात. ही पूजा घरातील कर्ता पुरुष करतो.
ऊ. भाद्रपद पौर्णिमा : या दिवसाला ‘प्रौष्ठपदी पौर्णिमा’ म्हणतात. या दिवशी ‘प्रपितामहाच्या (पणजोबांच्या) पूर्वीच्या तीन पुरुषांना उद्देशून श्राद्ध करावे’, असे सांगितले आहे.
ए. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून महालयारंभ : पक्ष पंधरवड्यात पितरांना पिंड देतात. भाद्रपद अमावास्येला ‘सर्वपित्री अमावास्या’, असे म्हणतात आणि त्या दिवशी श्राद्ध केले जाते.
ऐ. भाद्रपद कृष्ण नवमी (अविधवा नवमी) : स्वतःची माता किंवा कुटुंबातील अन्य कुणी स्त्री अहेवपणे (सौभाग्यवती असतांना) मृत झाली असल्यास तिचे श्राद्ध करायचे असते. त्या दिवशी ब्राह्मणासह सुवासिनीलाही भोजन देण्याचा प्रघात आहे.
३ इ. आश्विन मास
१. माहिती : या मासात पौर्णिमेच्या मागे पुढे ‘आश्विन’ नक्षत्र असते. हा मास म्हणजे उत्साहाचा मास.
२. आश्विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना) : आश्विन शुक्ल पक्षाचा आरंभ घटस्थापनेने होतो. हे देवीचे नवरात्र असते. या व्रतात कुलाचाराप्रमाणे पूजा, सप्तशतीचा पाठ, नंदादीप इत्यादी आचार केले जातात. नवरात्रात प्रतिदिन फुलांच्या माळा वाढवत जातात. कुमारिका, सवाष्ण आणि ब्राह्मण यांना प्रतिदिन किंवा पहिल्या दिवशी अन् शेवटच्या दिवशी भोजनाला बोलावतात.
३. ललितापंचमीचे व्रत : ज्या स्त्रियांनी हे व्रत घेतले आहे, त्या ‘उपांगललिता’ या देवीची पूजा करतात. देवीला गंधयुक्त साग्र (३ किंवा ५ पाती असलेल्या दुर्वा) ४८ दुर्वा वहातात, तसेच घारग्यांचे वाण देतात. त्या दिवशी मंत्रजागर करतात.
४. दुर्गाष्टमी : या दिवशी श्री महालक्ष्मीची पूजा करतात. या पूजेसाठी तांदुळाच्या उकडीचा मुखवटा सिद्ध करून देवी वस्त्रालंकारांनी सजवतात आणि तिची पूजा करतात. कोकणस्थ ब्राह्मण शाखेचे लोक हे व्रत करतात. नवविवाहित मुली विवाहानंतर ५ वर्षे पूजा करतात. घागरी फुंकून पूर्ण रात्र महालक्ष्मी जागवतात आणि दुसर्या दिवशी मुखवट्याचे विसर्जन करतात.
५. विजयादशमी (दसरा) : हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास ते अधिक शुभदायक असते. या दिवशी पोथी आणि शस्त्रास्त्रे यांची पूजा करतात. सीमोल्लंघन करून आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटतात. याच दिवशी देवीने शुंभ-निशुंभ आणि महिषासुरादी असुरांचा नाश करून विजय मिळवला. याच दिवशी रामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला; म्हणून ही विजयादशमी !
६. कोजागरी पौर्णिमा : या दिवशी चंद्राला औक्षण करून चंद्रप्रकाशात आटवलेले दूध प्राशन करतात. आई मोठ्या मुलाला किंवा मुलीला औक्षण करते.
७. आश्विन कृष्ण द्वादशी (वसुबारस) : या दिवशी सायंकाळी सवत्स गायीचे पूजन करतात.
८. आश्विन कृष्ण त्रयोदशी (धनत्रयोदशी) : या दिवशी दीपदानाचे व्रत केल्यास अपमृत्यू येत नाही.
९. आश्विन कृष्ण चतुर्दशी (नरकचतुर्दशी) : चतुर्दशीपासून कार्तिक शुक्ल २ अखेर असे सलग ४ दिवस दिवाळी सण आहे. हिंदूंचा हा मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी सूर्याेदयापूर्वी अभ्यंगस्नान करावे.
१०. आश्विन अमावस्या (लक्ष्मीपूजन) : या दिवशी लक्ष्मी-कुबेर यांचे पूजन अर्थात् लक्ष्मीपूजन असते. व्यापारी लोक वह्यांचे पूजन करतात. दिवाळीचे पुढील दोन दिवस कार्तिक मासात येतात.
३ ई. कार्तिक मास
१. कार्तिक शुक्ल प्रतिपदा (बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा) : कार्तिक मासाचा पहिला दिवस, म्हणजे ‘बलिप्रतिपदा’. बली हा प्रल्हादाचा नातू, म्हणजेच प्रल्हादाचा मुलगा विरोचन याचा पुत्र होता. त्याने (बलीने) इंद्रादी देवांना पराभूत केले. तो देवांची संपत्ती दैत्य लोकांत नेत असतांना ती सागरात पडली; म्हणून पुढे समुद्रमंथन करून ती संपत्ती वर काढली. बली १०० वा यज्ञ करत असतांना वामनाने (भगवान विष्णूच्या पाचव्या अवताराने) बलीकडे त्रिपादभूमीचे दान मागितले. वामनाने दोन पावलांत त्रिभुवन व्यापले आणि तिसरे पाऊल बलीच्या सांगण्याप्रमाणे मस्तकावर ठेवले अन् त्याला ‘सुतल’ या पाताळात घातले.
२. कार्तिक शुक्ल द्वितीया (भाऊबीज) : याला ‘यमद्वितीया’, असे म्हणतात. या दिवशी यम बहिणीकडे ओवाळणी घालण्यास जातो.
या लेखात चातुर्मासातील व्रते-सण यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे. बहुतेक व्रते स्त्रियांनीच करायची आहेत. संसारात येणार्या अनेक अडचणींना त्यांना तोंड देता यावे, हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ‘ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुखाकडे लक्ष द्या, म्हणजेच फलासक्ती न ठेवता कर्म करत रहा’, हा भगवद्गीतेचा संदेशच वेगवेगळ्या प्रकारे सांगितला आहे. कृष्ण पक्षापेक्षा शुक्ल पक्षात अधिक व्रते आहेत.
४. चातुर्मासातील कथा
व्रतपूजा झाल्यावर कथा वाचतात. ‘एक आटपाट नगर होते’, या वाक्याने आरंभ होणार्या आणि ‘साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ म्हणून संपणार्या कथा पूर्वी सगळ्यांना ठाऊक होत्या. या कथा सांगणार्या स्त्रिया होत्या. त्यांना बोलावल्यास त्या कथा सांगण्यास येत असत. त्या वेळी व्रतामुळे होणारे लाभ, रूढी आणि नैतिक आचरण यांवर भर असे. खुलभर (थोड्याशा) दुधाने महादेवाचा गाभारा कसा भरला किंवा दरिद्री असलेल्या बहिणीचा भावाने केलेला अपमान आणि नंतर बहिणीला संपत्ती मिळाल्यावर तिने भावाच्या डोळ्यांत कसे अंजन घातले ? इत्यादी कथा वाचण्याजोग्या अन् विचार करायला लावणार्या आहेत. यज्ञ, दान, तप आणि कर्म हे व्रताचे आधार आहेत. व्रतांच्या अखेरीस दान देण्यास सांगितले आहे. दान देतांना प्रसन्न चित्ताने आणि आनंदाने द्यावे, म्हणजे दानाचा हेतू सफल होतो.
५. दानाची अंगे आणि प्रकार
५ अ. दानाची ६ अंगे
दाता प्रतिगृहीता च शुद्धिर्देयं च धर्मयुक् ।
देशकालौ च दानानामङ्गान्येतानि षड् विदुः ।।
– स्कन्दपुराण, माहेश्वरखण्ड, अध्याय ३, श्लोक ५०
अर्थ : दान करणारा, दान घेणारा, पावित्र्य, धर्मयुक्त देयवस्तू, स्थान आणि काळ ही दानाची सहा अंगे जाणावीत.
५ आ. कूर्मपुराणात सांगितलेले दानाचे ४ प्रकार
नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविधं दानमुच्यते ।
चतुर्थं विमलं प्रोक्तं सर्वदानोत्तमोत्तमम् ।।
– कूर्मपुराण, भाग २, अध्याय २६, श्लोक ४
अर्थ : नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत. चौथे ‘विमल’ हे दान सर्वांत उत्तम सांगितले आहे.
५ आ १. नित्य दान : जे कोणत्याही फलाचा उद्देश न धरता प्रत्येक दिवशी थोडे बहुत दिले जाते, ते नित्य दान.
५ आ २. नैमित्तिक दान : पापनाश, प्रायश्चित्त आणि ग्रहणादी पर्वकाळी जे देतात, ते नैमित्तिक दान.
५ आ ३. काम्य दान : संतती, संपत्ती, विजय आणि स्वर्ग यांचे प्राप्तीसाठी जे देतात, ते काम्य दान.
५ आ ४. विमल दान : भगवंताच्या संतोषासाठी धर्मयुक्त अंतःकरणाने आणि निष्काम बुद्धीने दिले जाते, ते विमल दान.
दान द्यायची वस्तू सन्मार्गाने मिळवलेली असावी. दान नेहमी निष्काम बुद्धीने करावे. पात्रापात्र विचार करावा. (म्हणजे दान घेणारा त्यासाठी पात्र आहे कि नाही ? हे ठरवावे.) दान घेणार्याविषयी तुच्छता बुद्धी असू नये.’
– आ.म. वझे, पुणे (साभार : ‘आदिमाता’, जुलै २००५)