सतत आनंद मिळावा यासाठी ‘अध्यात्म’ !
‘मानवाला अध्यात्माची आवड का असते ?’, या प्रश्नाचे उत्तर पुढील सूत्रे अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येईल.
१. निर्मात्याचा शोध घ्यावासा वाटणे
‘ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच वाटते. एखाद्याला मोठेपणी कळले की, तो समजतो ती त्याची खरी आई नसून जन्मदात्री आई दुसरीच आहे आणि ती अमुक एका ठिकाणी आहे, तर तो तिचा शोध घेऊन तिला भेटेल. सुट्टीत आपण कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी गेलो, अगदी परदेशात गेलो, तरी परत घरी येण्याची ओढ आपल्याला असते. तसेच ज्या परमेश्वरापासून आपली निर्मिती झाली, त्याचा शोध घ्यावा, त्याच्याकडे जावे, असे प्रत्येकालाच सूक्ष्म रूपाने तरी वाटत असतेच.
२. ‘आनंद मिळावा’, अशी इच्छा होण्यामागील कारण
‘आनंद मिळावा’, अशी इच्छा का होते ?
आनंदाचे कोटी । साठविल्या आम्हा पोटी ।
आनंदाचे डोही । आनंद तरंग । आनंदचि अंग । आनंदाचे ।। – संत तुकाराम महाराज
भावार्थ : आनंद हा आपल्यातच साठवलेला असतो. साधना केल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूतीयेते. शरीररूपी डोहात आनंदरूपी तरंग उमटतात. संपूर्ण शरीरभर आनंदच आनंद जाणवतो. स्वतःमध्ये असलेल्या आनंदाची अनुभूतीआल्यावर चराचरातील आनंदाची अनुभूती येते. आनंद हा जिवाचा आणि विश्वाचा स्थायीभाव, स्वभाव, स्वधर्म आहे; म्हणून जिवाची स्वाभाविक प्रवृत्ती मूळ स्वरूपात जाण्याकडे, म्हणजे आनंद मिळवण्याकडे आणि मूळ स्वरूपात गेल्यावर येणार्या आनंदाची अनुभूती टिकवण्याकडे असते.
३. अशाश्वताकडून शाश्वताकडे जाण्याची ओढ वाटणे
‘या अशाश्वत जीवनाला शाश्वताची जोड द्यावी, अपूर्णातून पूर्णत्वाकडे जावे’, असे आज ना उद्या प्रत्येकालाच वाटते. चिरंतन आनंद या मार्गानेच मिळेल, याची प्रत्येकाला निश्चिती (खात्री) असते.’