अखंड ईश्वरभक्तीचा ध्यास असणारे ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक कथा !

पू. राजाराम भाऊ नरुटे

१. कथा क्र. १. – संतांनी सांगितलेल्या गोष्टींचा भावार्थ जाणून त्यानुसार साधना करणे आवश्यक असणे

‘एक संत होते. त्यांचा अध्यात्मात मोठा अधिकार होता. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. त्यांच्याकडे प्रतिदिन अनेक भक्त येत असत; मात्र त्यांचा मुलगा साधना करत नसे. संत जी साधना करायचे, ती त्याला पटत नसे. तो चित्रपट आणि तमाशा पहाणे, अशा मायेतील गोष्टींत अडकला होता.

श्री. शंकर नरुटे

त्या संतांचे वय झाल्यावर मुलाला साधना करण्याची ओढ लागली. तो वडिलांना म्हणाला, ‘‘मी साधना म्हणून काय करू ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘माझे आता मोजून ४ दिवसांचे आयुष्य राहिले आहे. तू सावलीतून नदीवर अंघोळीला जा. सावलीतून नदीचे पाणी देवपूजेसाठी आणत जा आणि गावोगावी घर बांध.’’ त्यानंतर ४ दिवसांनी संतांनी देहत्याग केला. त्यांचा संप्रदाय तसाच चालू राहिला.

मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सावलीतून अंघोळीला जाण्यासाठी घरापासून नदीपर्यंत मांडव घातला. तो प्रतिदिन सावलीतून जाऊन नदीचे पाणी आणून देवपूजा करू लागला. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याने गावोगावी जागा घेऊन घरे बांधणे चालू केले. काही वर्षांनी त्या संतांचे एक शिष्य त्या मुलाला भेटायला आले. तेव्हा ते त्या मुलाला संतांच्या बोलण्याचा भावार्थ सांगतांना म्हणाले, ‘‘सावलीतून अंघोळीला जाणे, म्हणजे सूर्योदयाच्या आधी पहाटे लवकर उठून नदीवर अंघोळ करणे आणि गावोगावी घरे बांधणे, म्हणजे गावोगावी जाऊन सर्वांना साधना सांगणे.’’ त्यानंतर तो मुलगा वडिलांनी सांगितल्याप्रमाणे साधना आणि धर्मकार्य करू लागला.

 

२. कथा क्र. २. – गुरूंवर श्रद्धा ठेवून साधना आणि सेवा केली, तरच ती फलदायी होते !

एका धनगराचा मुलगा शेळ्या हाकत असे. एकदा त्याला एक संत दिसले. तो त्यांना गुरु मानू लागला; पण प्रत्यक्षात दोघांची भेट झाली नव्हती. एक दिवस तो त्यांना ‘मी साधना काय करू ?’, असे विचारायला गेला. त्या वेळी ते संत घाईत कुठेतरी चालले होते. जेव्हा तो संतांजवळ पोचला, तेव्हा संतांच्या समोरून एक डुक्कर जात होते. त्या वेळी संत त्या डुकराला म्हणाले, ‘‘खुड !’’ नंतर ते संत पुढे निघून गेले.

त्या मुलाने तो शब्द ऐकला. त्या मुलाला वाटले, ‘संतांनी मला ‘खुड’, हा गुरुमंत्र दिला आहे.’ त्यानुसार त्याने ‘खुड’, असा नामजप सतत आणि भावपूर्णरित्या केला. तो त्या नामजपाशी पूर्णपणे एकरूप झाला.

काही दिवसांनी नदीला मोठा पूर आला. त्या वेळी ते संत नदीच्या पलीकडच्या तिरावर होते. त्यांना अलीकडे आणायचे होते; पण पुरामुळे त्यांचे शिष्य त्यांना आणण्यासाठी जात नव्हते. ते स्वतःचा जीव धोक्यात घालायला घाबरत होते. त्या वेळी धनगर मुलाने त्याची घोंगडी नदीच्या  पाण्यावर पसरली आणि त्यावर बसून तो ‘खुड, खुड’, असा नामजप करत राहिला. ती घोंगडी पाण्यावरून तरंगत दुसर्‍या तिरावर संतांपर्यंत पोचली. तो मुलगा संतांना सुखरूपपणे अलीकडच्या तिरावर घेऊन आला.

तेव्हा सर्व शिष्य संतांना म्हणाले, ‘‘तुम्ही धनगराच्या मुलाला गुरुमंत्र दिला. आम्हाला दिला नाही.’’ त्यावर संतांनी सर्व शिष्यांना समजावून सांगितले. ‘संतांच्या मुखातून आलेला ‘खुड’, हा शब्द, म्हणजे गुरुमंत्र आहे’, असे समजून त्या मुलाने भावपूर्ण नामजप केला. त्यामुळे त्याला त्याचे फळ मिळाले. गुरूंवर श्रद्धा ठेवून साधना आणि सेवा केली, तरच ती फलदायी होते.’

– श्री. शंकर नरुटे (मुलगा, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०२२)

Leave a Comment