अध्यात्मशास्त्र : परीपूर्ण शास्त्र

Article also available in :

१. अध्यात्म

‘सुख पहाता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।’ याचा अनुभव बहुतेकांना असतो. कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख सरासरी २५ प्रतिशत आणि दुःख ७५ प्रतिशत असते. मनुष्याचीच नव्हे, तर अन्य प्राणीमात्रांचीही धडपड जास्तीतजास्त सुख कसे मिळेल, यासाठी असते.

याकरता प्रत्येक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे विषयसुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो; परंतु विषयसुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, तर आत्मसुख, अर्थात आनंद हा चिरंतन अन् सर्वोच्च प्रतीचा असतो. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म.

अध्यात्म या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

अध्यात्म हा शब्द ‘अधि ± आत्मन् (आत्मनः अधि)’ या दोन शब्दांपासून बनलेला आहे. ‘अधि’ म्हणजे त्याविषयी; म्हणून अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी. आत्म्याचे स्वरूप, खरा मी म्हणजे कोण, मी कोठून आलो, कोठे जाणार, इत्यादींसंबंधीचे ज्ञान म्हणजे अध्यात्म. म्हणूनच ‘सुखं च न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भवेत् ।’ म्हणजे ‘खरे सुख (आनंद) हे धर्माचरण केल्याविना मिळत नाही; म्हणून सदा धर्माचरण करावे’, असे म्हटले आहे.

अध्यात्माची कास धरून, म्हणजे साधना करून आत्मसुख मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास लौकिक आणि पारलौकिक सुख, ही आनुषंगिक फलेही प्राप्त होतात.

अध्यात्म ही हिंदु धर्माची मानवजातीला अमोल देणगी आहे; अध्यात्मशास्त्राचे इतके महत्त्व असतांना खेदाची गोष्ट म्हणजे बहुतेकांना अध्यात्म या शब्दाचा अर्थही ज्ञात नसतो. त्यामुळे अध्यात्म यासारख्या सर्वोच्च आनंद आणि सर्वज्ञता देणार्‍या विषयाकडे फारच थोडे जण वळतात. विषयसुखाच्या अनंतपटीने आनंद असतो, हे कळले तर विषयसुखापेक्षा आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करील.

 

२. विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र

विज्ञान ही अध्यात्माची एक शाखा !

‘विज्ञान’ म्हटले की, ढोबळमानाने ‘आधुनिक विज्ञान’ असे आपल्या डोळ्यांसमोर येते. बुद्धीप्रामाण्यवाद्यांना, तसेच सर्वसामान्य व्यक्तींनासुद्धा ‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ या दोन निरनिराळ्या गोष्टी वाटतात. अध्यात्म म्हणजे अनंताचे, सर्व विषयांचे ज्ञान ! मग अध्यात्मात विज्ञान कसे येणार नाही ? विज्ञान ही अध्यात्माची एक शाखा आहे, असे म्हणता येईल.

 

३. अध्यात्म : महत्त्व

अ. अध्यात्म : चिरंतन आणि सर्वोच्च आनंद देणारा विषय

आपल्याला सदोदित सर्वोच्च सुख मिळावे, असे सूक्ष्मातीसूक्ष्म प्राण्यापासून सर्वांत प्रगत अशा मनुष्यप्राण्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी त्याची क्षणोक्षणी धडपड चालू असते. चिरंतन सर्वोच्च सुख (यालाच आनंद म्हणतात.) कसे प्राप्त करून घ्यायचे, हे शिकवणारे शास्त्र, म्हणजे अध्यात्मशास्त्र. एका विदेशातील धर्मगुरूंना अध्यात्माचे महत्त्व सांगतांना सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी (बाबांनी) पुढील उत्तर दिले.

धर्मगुरु : अमेरिकी जनतेसाठी आपला काही विशेष संदेश आहे का ?

बाबा : जगातल्या सार्‍या लोकांसाठी माझा एकच संदेश आहे. मनुष्याने सुख, शांती आणि समाधान यांचा शोध बाह्य जगतात घेण्याचे सोडले पाहिजे; कारण या गोष्टी इतर कुठेही नसून त्याच्या अंतर्यामीच आहेत. आपण दिवसभर कितीही सुख संपादन केले किंवा कितीही भोग भोगले, तरी दिवसअंती थकवाच पदरी पडतो. कृतकृत्य झाल्यासारखे काही वाटत नाही. मग थकवा घालवण्यासाठी आपण दिवसभराच्या सार्‍या उत्पन्नाचा त्याग करून निद्रेचा आश्रय घेतो. मनुष्याला लागणारी निद्रेची आवश्यकता हेच सिद्ध करते की, बाह्य विषयांच्या प्राप्तीसाठी धडपड करण्यापेक्षा अंतर्मुख झाल्यानेच मनुष्याला कितीतरी अधिक शांती आणि समाधान प्राप्त होते. ध्यान(साधने)द्वारा अंतर्मुख झाल्याने मनुष्याला प्रत्यक्ष त्याच्या हृदयात वास करत असलेल्या आत्मप्रभेचा, परमेश्वरी शक्तीचा शोध लागतो.’

या संदर्भात पुढील सुवचन प्रसिद्ध आहे,

अध्यात्मविद्या विद्यानाम् । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३२

अर्थ : (सर्व) विद्यांमध्ये अध्यात्मविद्या (श्रेष्ठ आहे.)

आ. अध्यात्म : सर्वज्ञता देणारा विषय

विश्वात अनंत विषय असल्याने सर्वांचा अभ्यास करून सर्व विषयांत नैपुण्य मिळवणे जन्मोजन्मी अभ्यास केला, तरी शक्य नाही. सर्वज्ञ अशा ईश्वराशी एकरूप व्हावयाचे असेल, तर सर्वज्ञता असायलाच हवी. त्यासाठी परमेश्वराने अध्यात्म या विषयाची सोय केली आहे. अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, त्यात सर्वज्ञता आली की, सर्व विषयांत सर्वज्ञता येते. याचे कारण म्हणजे अध्यात्मापासूनच सर्व विषयांची निर्मिती आहे.

इ. अध्यात्म : प्रत्येकासाठी उपयुक्त

संसारात निश्चिती नाही, पदोपदी संकटे आहेत. याउलट परमार्थात आनंद मिळण्याची निश्चिती आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘तुझा सगळा परमार्थ जर देहासाठी असेल, देह सुखी असावा, देहाला रोग नसावा इत्यादींसाठी असेल, तर ते आपली स्वतःची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे.’ सकाम (अपेक्षा ठेवून केलेली) साधनेने यांना सुख मिळते, तसेच यांचे दुःखही न्यून होते, तर निष्काम (निरपेक्ष) साधनेने आनंदावस्था येते. म्हणजेच ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी, अर्थात प्रत्येकासाठी अध्यात्म हा विषय उपयुक्त आहे.

वरील विवेचनावरून प्रत्येकाने अध्यात्मासारख्या परिपूर्ण शास्त्राची कास धरून उद्या नव्हे आज, आज नव्हे, तर या क्षणापासून साधनेला आरंभ करावा. साधनेने येणार्‍या आध्यात्मिक अनुभूती आणि मिळणारा आनंद हा अर्वणनीय अन् शब्दांच्या पलिकडचा असून प्रत्येकाला तो स्वत: अनुभवता येईल. साधनेने अंतर्यामी आनंदाचा झरा लवकर निर्माण होईल, याची खात्री बाळगा !

 

विज्ञानाची अपूर्णता आणि अध्यात्माची पूर्णता

 

प.पू. डॉ. आठवले

मायेत पुढे पुढे अनेक शोध लागत जातात; कारण माया अनंत आहे आणि विज्ञान अपूर्ण आहे. याउलट अध्यात्मात नवीन शोध लागत नाहीत; कारण ईश्‍वर एक आहे आणि ईश्‍वरप्राप्तीचे सर्व मार्ग परिपूर्ण असल्याने काही शोध लावायचे बाकी नाही. – (प.पू) डॉ. आठवले (१४.१.२०१५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’

Leave a Comment