अनुक्रमणिका
६. श्री. मुकुल गाडगीळ संत झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
७. कुटुंबीय आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
७ आ. कु. सायली गाडगीळ (मुलगी) (वय १६ वर्षे)
७ इ. सौ. माधुरी आणि श्री. माधव गाडगीळ (आई-वडील), देवद आश्रम, पनवेल
७ ई. सौ. शैलजा आणि श्री. सदाशिव परांजपे (सासू-सासरे), सांगली
या लेखाचा पहिला भाग वाचण्यावाठी येथे क्लिक करा.
६. श्री. मुकुल गाडगीळ संत झाल्याचे घोषित
केल्यावर त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
६ अ. श्री. मुकुल हात जोडून उभा असून त्याला प.पू. डॉक्टर
हार घालत असल्याचे दृश्य दिसणे, त्याला संतपद घोषित करणार
असल्याचे जाणवणे आणि तसेच घडल्यावर त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटणे
‘मागील वर्षी श्री. मुकुल याच्यावर वाईट शक्तींनी जोरदार आक्रमण केल्याचे पाहून ‘संतपद मिळणे फारच अवघड गोष्ट आहे, त्यासाठी किती त्रास सोसावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात’, हे समजले. केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच तो त्यातून वाचला. ‘त्याची लवकरात लवकर प्रगती होवो’, अशी सतत ईश्वराला प्रार्थना होऊ लागली. अर्थात ‘प.पू. डॉक्टर त्याला संत बनवणारच’, अशी मनोमन निश्चिती होती. कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी सकाळी ‘लाईव्ह स्ट्रीम’वर कार्यक्रम चालू झाला आणि अचानक ‘श्री. मुकुल हात जोडून उभा असून त्याला प.पू. डॉक्टर हार घालत आहेत’, असे मला दिसले. मी मनात खूणगाठ बांधली की, आज नक्कीच त्याला संत म्हणून घोषित केले जाईल. थोड्या वेळापूर्वीच कु. अनुताईचा प.पू. पांडे महाराजांच्या हस्ते संतपदाचा कार्यक्रम झाला होता आणि नेमके तसेच झाले. मुकुलला संतपद घोषित केल्यावर मला आनंदाने भरून आले. त्या वेळी ‘आपल्या संपूर्ण कुळाचा, घराण्याचा उद्धार झाला आणि जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटले. कठोर साधना करून थोड्या कालावधीत शांत स्वभाव, प्रेमळपणा, तळमळ आणि चिकाटी या गुणांनी त्याने संतपद मिळवून दाखवले. त्याचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.’ – श्री. माधव गाडगीळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
६ आ. पू. मुकुल संत झाल्याचे घोषित केल्यावर अखंड
भावाश्रू येणे आणि आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे वाटणे
`मुलगा पू. मुकुल गाडगीळ याच्या संत झाल्याबद्दल प.पू. डॉक्टरांकडून होत असलेल्या सन्मानाच्या वेळी अखंड अश्रू येत होते. ते कितीही आवरण्याचा प्रयत्न केला, तरी आवरता येत नव्हते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या चरणी सतत कृतज्ञता वाटत होती. या प्रसंगावरून पूर्वीचा एक प्रसंग आठवला. आम्ही साधनेत नवीनच होतो. एके ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन होते. प.पू. डॉक्टरांच्या आईंना आसंदीतून वर आणले. अर्थात मला ते ठाऊक नव्हते. मी कोणालातरी शोधत असतांना आमच्या दोघींची दृष्टादृष्ट (नजरानजर) झाली. त्यांच्याकडे बघून मला आनंद झाला आणि तो व्यक्त झाला. त्यापण माझ्याकडे बघून गोड हसल्या. त्यांचे नाते कळल्यावर ‘अशा मुलाला जन्म देणारी माऊली किती थोर असेल’, असे वाटले. पू. मुकुल संत झाल्याचे घोषित केल्यावर मलाही जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले.’ – सौ. माधुरी गाडगीळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
७. कुटुंबीय आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
पू. डॉ. मुकुल गाडगीळ (मध्ये), त्यांच्या धर्मपत्नी सौ. अंजली गाडगीळ (उजवीकडे)
आणि त्यांची कन्या कु. सायली गाडगीळ (डावीकडे)
७ अ. सौ. अंजली गाडगीळ (पत्नी)
७ अ १. गुणवैशिष्ट्ये
७ अ १ अ. पहिल्यापासूनच संतवृत्ती !
पू. मुकुल गाडगीळ पहिल्यापासूनच संतवृत्तीचे आहेत. त्यांचा आहार, आणि विचारही सात्त्विकच आहेत.
७ अ १ आ. अहं अल्प असणे
त्यांनी कधीच माझ्यावर एक पती या नात्याने आणि इतरांवरही कसलाच अधिकार गाजवला नाही. स्वतः उच्च शिक्षित असूनही त्यांनी कधी विद्येचा अभिमानही बाळगला नाही. नेहमीच ते परेच्छेने वागत आले आहेत.
७ अ १ आ १. अहं अल्प असल्याविषयी प.पू. डॉक्टरांनी २००३ मध्येच सांगणे
‘‘तुमच्यात (सौ. गाडगीळ यांच्यात) ३० टक्के अहं असून स्वयंपाक विभागात सेवा करून तुमचा तोंडवळा श्री. गाडगीळ यांच्यासारखा झाला पाहिजे. त्यांचा अहं जन्मतःच १० टक्के आहे.’’ असे प.पू. डॉक्टरांनी २००३ या वर्षी सांगितले होते.
७ अ २. सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी पहाटे उठून सेवा करणे
२००५ या वर्षी प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘श्री. गाडगीळ यांची सेवेतील फलनिष्पत्ती अल्प आहे. त्यांना ती वाढवण्यास सांगा.’’ श्री. गाडगीळ यांनी सेवेतील फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून सेवा करण्यास चालू केले आणि अजूनही त्यांनी हा नियम मोडलेला नाही.
७ अ ३. आध्यात्मिक स्तर आणि येणार्या अनुभूतींचे स्वरूप
अनुभूतींचे स्वरूप |
आध्यात्मिक स्तर (टक्के) |
अ. तोंडवळा तेजस्वी वाटणे | ६० |
आ. देहाभोवती दैवी सुगंधाचे वलय जाणवणे, केस काळे होऊ लागणे | ६४ |
इ. सहवासात नामजप होणे आणि पू. काका खोलीत येण्यापूर्वी दैवी सुगंध येणे | ६६ |
४. केस चमकदार होणे, तसेच कुठलीही कृती करतांना त्यात नाहीत, असे वाटणे, तसेच शांत वाटणे | ६८ |
५. तोंडवळा लालसर होणे, सहवासात भावजागृती होणे | ६९ |
६. पाहूनच थंड वाटू लागणे, तसेच ‘ते देवस्वरूप आहेत’, असा भाव निर्माण होणे, त्यांचा आतून होत असलेला नामजप बाहेरही ऐकू येऊ लागणे | ७० |
७ अ ४. संतपद जवळ येत चालल्याच्या निसर्ग, तसेच पक्षी यांनी दिलेल्या पूर्वसूचना !
७ अ ४ अ. पक्ष्यांनी मंजूळ कूजन करणे
खोलीच्या बाहेर असलेल्या सज्जात विविध रंगांचे पक्षी येऊन मंजूळ आवाजात ओरडू लागले.
७ अ ४ आ. पक्ष्यांनी घरटे बांधणे
खोलीच्या अगदी लगत बुलबुल पक्ष्याने घरटे बांधले.
७ अ ४ इ. पक्षी जवळ येणे
पू. काका सज्जात उभे असतांना पक्षी न घाबरता त्यांच्या जवळ येऊ लागले.
७ अ ४ ई. एका खारीने तिच्या डोळ्यांतून वात्सल्यभाव व्यक्त करणे
एकदा एक खार शेजारी असलेल्या घराच्या गच्चीवरून धावत होती. आम्ही दोघे हे दृश्य पहात होतो. ती अचानक थांबून आम्हा दोघांकडे पाहू लागली आणि मग पुढे गेली. तिच्या डोळ्यांत खूप वात्सल्य होते. आम्हाला या प्रसंगाचे खूप आश्चर्य वाटले.
७ अ ४ उ. तुळस टवटवीत होणे
तुळस टवटवीत दिसू लागली आणि तिला अचानक खूप मंजिर्या आल्या. ती खूप आनंदी आहे, असे वाटू लागले.
वरील सर्व उदाहरणांवरून ‘पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या आश्रमात पशूपक्षीही एकत्र नांदत आणि आश्रमाच्या परिसरात वावरत, याची मला आठवण आली. हे सर्व पाहून ‘जेथे संत असतात, तेथील वातावरण साधनेला पूरक, तसेच ते चैतन्यमय बनत असल्याने सात्त्विक पक्षी, तसेच प्राणीही अभय मिळेल, या विश्वासाने तेथे आश्रयाला येतात.’ असे वाटले.
७ अ ४ ऊ. देवाने आकाशमंडलात एका नेत्रदीपक दृश्याच्या माध्यमातून दिवाळी साजरी करणे
संतपद घोषित करण्यापूर्वी ४ दिवस अगोदर एका सायंकाळी अकस्मात खूप पाऊस पडला. काही वेळाने पाऊस थांबून ऊन पडले आणि सर्वत्र संधिप्रकाश पसरला. झाडांची पाने आणि नारळाच्या झावळ्या यांवरील चमकणार्या पावसाच्या थेंबांवर ढगाआडून आलेल्या सूर्याचे पिवळे किरण पडले अन् ते थेंब अक्षरशः दिव्याच्या माळा सोडल्याप्रमाणे पिवळ्या प्रकाशाने चमचमू लागले. सभोवती पडू लागलेला थोडासा काळोख आणि त्यातील चमचमणारा प्रकाश हे दृश्य इतके नयनमनोहर होते की, जणुकाही ‘आकाशमंडलात देवाने आमच्यासाठी आधीच दिवाळीचे दिवे अंतराळी लावले आहेत’, असे वाटले. केवळ २-३ मिनिटांतच सूर्य ढगाआड झाल्याने ही दिवाळी केवळ आम्हा दोघांपुरतीच मर्यादित राहिली. या दृश्यावरून असे वाटले, ‘पू. गाडगीळ यांच्या संतपदाची पूर्वसूचना म्हणून देवाने आकाशमंडलात दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी केली.’
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (कार्तिक शु. ११, कलियुग वर्ष ५११३ (६.११.२०११))
७ आ. कु. सायली गाडगीळ (मुलगी) (वय १६ वर्षे)
७ आ १. गुणवैशिष्ट्ये
७ आ १ अ. नम्रता
पू. बाबांचा स्वभाव प्रथमपासूनच मनमिळाऊ आणि नम्र आहे.
७ आ १ आ. प्रेमभाव
प्रत्येक चूक प्रेमाने सांगणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
७ आ १ इ. नीटनेटकेपणा
बाबा प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच करतात. त्यांच्या पिंडातच शिस्त मुरलेली आहे.
७ आ १ ई. आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे
व्यष्टी साधनेत मला त्यांच्या शिकवणीचा लाभ होतो. ते प्रत्येक गोष्ट मला अध्यात्माच्या ढंगाने समजावून सांगतात.
७ आ १ उ. अनासक्त
बाबांना पूर्वीपासूनच कशाचीच आसक्ती नाही. देवाने जे दिले आहे, त्यातच चांगले कसे रहाता येईल, असा त्यांचा विचार असतो. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ हे त्यांच्या व्यक्तीमत्वातच आहे.
७ आ २. पू. गाडगीळकाकांविषयी विविध टप्प्यांवर आलेल्या अनुभूती
७ आ २ अ. संत होण्यापूर्वीच्या अनुभूती
७ आ २ अ १. बाबांमध्ये प.पू. डॉक्टर दिसत असल्याने प.पू. डॉक्टरांच्याप्रती ओढ निर्माण होणे
लहानपणी मला प.पू. डॉक्टरांपेक्षाही प.पू. भक्तराज महाराज अधिक आवडायचे; परंतु बाबा खोलीत आले की, त्यांच्यात प.पू. डॉक्टर दिसायचे. ते सतत दिसून दिसून आता प.पू. डॉक्टरच आवडू लागले.
७ आ २ अ २. दैवी सुगंध येणे
प.पू. डॉक्टरांच्या खोलीत जसा सुगंध येतो, तसा सुगंध बाबा खोलीत आल्यावर येत असे.
७ आ २ अ ३. कपड्यांतून दैवी चैतन्य येत असल्याचे जाणवणे
बाबांच्या कपड्यांचा स्पर्श कापसासारखा मऊ लागतो. त्यांचे कपडे दोरीवर वाळत टाकलेले असतांना त्यांच्याखालून जातांना दैवी चैतन्य माझ्याकडे येत असल्याचे जाणवते.
७ आ २ अ ४. बाबांची त्वचा मऊ झाली आहे.
७ आ २ आ. पू. गाडगीळकाका संत बनणार असल्याविषयी स्वप्नदृष्टांताद्वारे मिळालेल्या पूर्वसूचना !
७ आ २ आ १. स्वप्नात ‘पू. राजेंद्र शिंदे यांच्याबरोबर बाबा जेवायला बसले आहेत’, असे दिसणे
एकदा मला एक स्वप्न पडले. स्वप्नात ‘पू. राजेंद्र शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय भोजनकक्षात जेवायला बसलेले असून त्यांच्याजवळ बाबा, आई अन् मी जेवायला बसलो होतो.’ त्या वेळी मला जाणवले, ‘बाबा आता लवकरच संत होणार !’
७ आ २ आ २. बाबांच्या खोलीत उपाय चालू आहेत, असे दिसणे
एकदा स्वप्नात असे दिसले की, प.पू. डॉक्टरांची खोली प.पू. डॉक्टरांनी बाबांना रहावयास दिली आहे आणि आमच्या खोलीत उपाय चालू आहेत, त्या वेळीही ‘ते लवकरच संत बनतील’, असे वाटत होते.
७ आ २ इ. संत घोषित झाल्यावर आलेल्या अनुभूती
७ आ २ इ १. बाबा साक्षीभावाच्या टप्प्याकडे निघाले आहेत, असे वाटणे
बाबांना संत घोषित केले, त्या वेळी प.पू. डॉक्टरांकडून सत्कार स्वीकारतांना त्यांच्या तोंडवळ्यावर कोणत्याच भाव-भावना नव्हत्या. यावरून मला वाटले की, ते साक्षीभावाच्या टप्प्याकडे निघाले आहेत.
७ आ २ इ २. साधना करण्याची स्फूर्ती येणे
पू. बाबांचे संतपद घोषित झाल्यावर मलाही आतून साधना करण्याची स्फूर्ती आली. माझी ईश्वरप्राप्तीची ओढ जागृत झाली. सन्मान सोहळा चालू असतांना ‘बाबा मला आणि आईला समवेत घेऊन एका दैवी मार्गावरून ईश्वराकडे निघाले आहेत’, असे दृश्य परत परत दिसत होते.
७ आ २ इ ३. सन्मानसोहळ्याच्या वेळी आलेली आनंदाची अनुभूती महत्त्वाची असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
बाबांना संतपद घोषित झाल्यावर मी मिरज आश्रमात होते. तेथून मी प.पू. डॉक्टरांना दूरध्वनी केला आणि सांगितले, ‘‘बाबांचा सन्मानसोहळा पाहून मला काही वाटले नाही; परंतु आनंद मात्र झाला.’’ त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आनंद हा सुख-दुःखाच्या पलीकडचा असल्याने तुला आलेली ही अनुभूती महत्त्वाची आहे.’’
७ आ २ ई. रामनाथी आश्रमात आल्यानंतर पू. बाबांकडे संत म्हणून पहातांना आलेल्या अनुभूती
७ आ २ ई १. पारदर्शकता
‘बाबांकडे पाहिल्यावर त्यांच्यातून पलीकडचे दिसते’, असे वाटते, इतके ते पारदर्शक वाटतात.
७ आ २ ई २. बाबांभोवती प्रकाशवलय दिसणे
पूर्वी भोजनकक्षात बाबांना शोधायला वेळ लागायचा; परंतु आता त्यांच्याभोवती प्रकाशवलय दिसत असल्याने त्यांना एवढ्या साधकांतून शोधायला मला वेळ लागत नाही.
७ आ २ ई ३. बाबांच्या डोळ्यांकडे पाहून शांत वाटते.
७ इ. सौ. माधुरी आणि श्री. माधव गाडगीळ (आई-वडील), देवद आश्रम, पनवेल
७ इ १. शांत स्वभाव
‘आमचा मुलगा मुकुल हा लहानपणापासून शांत स्वभावाचा आहे. त्याने कधीही कोणत्याही गोष्टीविषयी हट्ट केलेला आठवत नाही. त्याचे कुठल्याही मुलाशी भांडण, मारामारी झालेलीही आठवत नाही. त्याचे कोणाविषयी कधीच गार्हाणे नसायचे. घरीही भावंडांशी त्याचा वादविवाद झालेला आठवत नाही. तो लहान भावंडांना स्वतःसमवेत शाळेत नेत असे.
७ इ २. लहानपणापासूनच साधकत्वाचे लक्षण असणे
मुकुल लहानपणापासून समजूतदारही होता. अभ्यासासाठी त्याच्या मागे कधी लागावे लागले नाही. ‘प्रतीदिन नियमित वेळेवर झोपणे आणि पहाटे ५ वाजता उठून अभ्यास करणे’, हा त्याचा क्रम होता. त्याची कुठल्याही गोष्टीत आवड-नावड नव्हती. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त हे त्याचे अंगभूत गुण. त्याच्यात लहानपणापासूनच साधकत्व असल्याने त्याची जलद उन्नती झाली.
७ इ ३. अहं न्यून असल्याचे लक्षण
ख्रिस्ताब्द १९९८ मध्ये आम्ही साधनेत आल्यावर त्यालाही नामजपाविषयी सांगितले. तो ठाणे जिल्ह्यातील बोईसर येथे नोकरीला असल्याने त्याने घरी दूरभाष केला की, आम्ही त्याला सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे सांगत होतो. आमच्या घरी मुलुंडला कोणी मार्गदर्शक-साधक येणार असतील, तर ‘सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि त्या निमित्ताने सेवा मिळावी’, या दृष्टीकोनातून त्याला बोलवून घेत होतो. त्या वेळी तो अगदी वाढण्यापासून सर्व प्रकारचे साहाय्य करायचा. त्याला नामजपाविषयी विचारल्यावर तो ‘घरी नामजप होत नाही; पण मुलुंडला येतांना आपोआप चालू होतो’, असे सांगायचा.
७ इ ४. साधनेचा ठाम निश्चय
ख्रिस्ताब्द १९९९ मध्ये त्याला सनातन संस्थेविषयी आवड निर्माण झाली. आमच्या घरी नेहमी सत्संग आणि इतर कार्यक्रम होत असत. तो सुटीच्या दिवशी सत्संगासाठी येऊ लागला. त्याने श्री. विष्णुदादा कदम यांच्या सत्संगाने प्रभावित होऊन नोकरी सोडून पूर्ण वेळ होण्याचा निश्चय केला. हे त्याने विष्णुदादांना सांगताच ते त्याला ‘६ मास थांब. नीट विचार कर. एवढी घाई करू नकोस’, असे म्हणाले. त्याचा ठाम निश्चय असल्याचे पाहून आम्हीही त्याला होकार दिला आणि त्याच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. पुढे मुख्यतः श्री. प्रकाश जोशी यांनी त्याला पूर्ण वेळ होण्यास अनुमती दिली. तो साधनेसाठी नोकरी सोडणार असल्याचे कळल्यावर नातेवाइकांनी आम्हाला मूर्खात काढले; पण प.पू. डॉक्टरांनी आम्हाला साधनेत आणून आमच्या मनाची पूर्ण सिद्धता केल्याने कोणी काहीही बोलले, तरी त्याचे दुःख झाले नाही किंवा कधीही पश्चात्ताप झाला नाही.
७ इ ५. पदोन्नतीची संधी झुगारून पूर्ण वेळ साधना करण्याचा निश्चय करणे
पूर्ण वेळ साधना करण्याकरता नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी मिळत असूनही त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी न सोडण्यासाठी तेथील आस्थापनाने त्याला बरीच आमिषे दाखवली; पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याने नोकरी सोडली. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीचेही त्याला पूर्णपणे सहकार्य लाभले. ख्रिस्ताब्द २००० मध्ये ते साधनेसाठी गोव्याला गेले.
७ इ ६. चिकाटीने आणि तळमळीने सेवा करून ७ वर्षांत ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे
गोव्याला त्याच्या घरापासून सनातनचा फोंडा येथील आश्रम ३ कि.मी. लांब होता. तो, त्याची पत्नी सौ. अंजली आणि ४ वर्षांची मुलगी कु. सायली आश्रमात सेवा करून रात्री घरी पोहोचायचे. सेवेची तळमळ आणि कष्ट याचे फळ म्हणून त्याने ७ वर्षांत ६० टक्के आध्यात्मिक स्तर गाठला. यावरून हेच सिद्ध होते की, कोणतीही सेवा असो, ती चिकाटीने, तळमळीने आणि पूर्णपणे झोकून देऊन परिपूर्ण केल्यास जलद आध्यात्मिक उन्नती होते.
७ इ ७. व्यावहारिक आणि भावनिक स्तरावर न वागता आध्यात्मिक दृष्टीकोनातून वागणे
तो आम्हाला साधनेत मार्गदर्शन करून साहाय्य करतो. कोणत्याही प्रसंगात तो व्यावहारिक आणि भावनिक स्तरावर न वागता आध्यात्मिक दृष्टीकोनातूनच वागतो. त्याचे आदरयुक्त वागणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि सतत सेवेत रहाणे, याचे फळ म्हणून त्याला संतपद लाभले, याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. मुकुल संत होण्यापूर्वी आम्हाला सतत भारद्वाज पक्षी दिसायचा. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला दिवाळीची ही अपूर्व भेट दिली. त्यामुळे श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’
मुकुलची उत्तरोत्तर झालेली प्रगती पाहून ‘घेतलेला निर्णय किती योग्य होता’, हे लक्षात आले. त्याने त्याच्या जीवनाचे सार्थक केले. त्याच्या संतत्वाचा आम्हा सर्व कुटुंबियांना लाभ होऊन आमचीही उन्नती व्हावी, हीच श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर आणि पू. मुकुल यांच्या चरणी प्रार्थना !’
७ ई. सौ. शैलजा आणि श्री. सदाशिव परांजपे (सासू-सासरे), सांगली
पू. मुकुल गाडगीळ यांच्यासारखा सद्गुणी जावई देऊन सर्व कुटुंबियांची साधनेकडे वाटचाल करवून घेणे, हे ईश्वरी नियोजनच !
७ ई १. देवाने सौ. अंजलीसाठी साधी आणि प्रेमळ माणसे मिळवून देऊन मुंबईच्या लोकांविषयी वाटणारी शंका दूर करणे
‘१५ वर्षांपूर्वी पू. मुकुल आणि सौ. अंजली यांचा विवाह झाला. श्री. गाडगीळ रहाणारे मुंबईचे. आम्हाला तेथील काहीच माहिती नाही आणि मुलगा मुंबईचा म्हटल्यावर आम्हाला जरा काळजीच वाटली; कारण ‘तेथील माणसे अती सुधारित असतात’, असे आम्ही ऐकून होतो. परमेश्वराने आमचा हा प्रश्न सहजतेने सोडवला आणि आम्हाला अगदी साधी, आध्यात्मिक वळण असलेली अन् प्रेमळ माणसे मिळवून दिली. म्हणतात ना, ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना !’
७ ई २. ‘पू. मुकुल यांना अल्प ऐकू येते’, असे कळल्यावर अतिशय दुःख होणे; परंतु सौ. अंजलीचे प्रगल्भ विचार ऐकून समजूत पटणे
विवाहानंतर सौ. अंजली सासरी गेली. मुलगी सासरी गेल्यानंतर आई-वडिलांना जशी काळजी असते, तशी आम्हालासुद्धा होती. कधी कधी ‘सौ. अंजली तिथे कशी काय रमेल, सगळेच नवीन आहे’, असे वाटायचे. काही दिवसांनी सौ. अंजली प्रथमच माहेरी आल्यावर आम्ही तिच्या सासरची विचारपूस केली. त्या वेळी तिने ‘पू. मुकुलना कमी ऐकायला येते’, असे आम्हाला सांगितले. हे ऐकून आम्हाला अतिशय दुःख झाले आणि ‘गाडगीळ कुटुंबाकडून आम्ही फसलो गेलो’, असे वाटले; परंतु सौ. अंजली आम्हाला म्हणाली, ‘‘आई, मला त्याविषयी काहीही वाटत नाही. लग्नानंतर असे झाले असते, तर काय केले असते ? त्यांच्या अंगी इतके गुण आहेत की, हे एखादे न्यून त्यापुढे काहीच नाही !’’ (तेव्हा प्रत्यक्षात ऐकू कमी येण्याचे प्रमाण अगदी अल्प होते की, ते इतरांच्या लक्षातही यायचे नाही. पुढे ते वाढत गेले. – सौ. अंजली)
इतक्या लहान वयात किती प्रगल्भ विचार ! त्या वेळी आम्ही काही भलतासलता विचार केला नाही, ही ईश्वराची कृपाच म्हणायची !
७ ई ३. मुळातच अहं अल्प असल्याने पत्नीच्या घरी (सासरी) सहजतेने वागणे
विवाह झाल्यापासून आजपर्यंतची त्यांची वर्तणूक आहे तशीच आहे. ते अत्यंत प्रेमळ आहेत. जावई असूनही ते आमच्या घरी सर्व सेवा करायला सतत सिद्ध असत. कपडे वाळत घालणे, केर काढणे, स्वयंपाकात साहाय्य करणे, दुचाकी स्वच्छ धुणे इत्यादी सेवाही ते आनंदाने करत. आम्हालाच लाज वाटायची की, जावयांना हे सर्व कसे सांगायचे ?
७ ई ४. अनेक गुणांचा सुरेख संगम म्हणजे पू. मुकुल !
पहिल्यापासूनच ते मितभाषी आहेत. खाण्यापिण्यात त्यांची कधीही आवडनिवड नसते. ते लहान मुलांशी अतिशय प्रेमाने वागतात. त्यांची परमेश्वरावर नितांत भक्ती आहे. त्यांचे आचार-विचार अत्यंत सात्त्विक असून घरातील मोठ्या माणसांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदर आणि प्रेमभाव आहे. त्यांच्या आजेसासूबाईंची (श्री. परांजपे यांच्या आईची) सेवाही ते प्रेमाने करत. ते एकटे असले की, त्यांचा आतून नामजप सतत चालू आहे, हे लक्षात येते.
७ ई ५. साधनेविषयी मार्गदर्शन मिळताच सर्वस्वाचा त्याग करून प.पू. डॉक्टरांच्या छत्राखाली रहायला जाणे आणि आयुष्याचे सार्थक करून घेणे
ख्रिस्ताब्द १९९३ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर ६ वर्षांनी ते साधनेत, म्हणजे सनातन संस्थेत आले. साधनेत येण्यापूर्वी ते चांगल्या पदावर चाकरीला होते आणि त्यांना वेतनही भरपूर होते. सौ. अंजलीसुद्धा शिकवण्या घेत असे. दोघे मिळून प्रतीमास २५ सहस्र रुपये मिळवत. पूर्वी आमच्या मनाचा ग्रह असा होता की, शिक्षण, चांगल्या पदावर चाकरी, भरपूर वेतन, बंगला, चारचाकी इत्यादी सर्व मिळाले की, आयुष्याचे सार्थक होते; पण त्यात देवाला काहीही स्थान नव्हते.
एकदा त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शन मिळाले आणि एका रात्रीत घर सोडण्याचा निश्चय करून २००० साली ते गोव्याला प.पू. डॉक्टरांच्या छत्राखाली रहायला आले. (मी स्वतः साधना पूर्णवेळ करण्याचा निर्णय गुरुप्राप्तीनंतर ७ वर्षांनी घेतला ! – डॉ. आठवले) आम्हा सर्वांना मात्र ‘मी आता दुसरी चाकरी करत असून इथे मुंबईपेक्षा जास्त वेतन मिळते’, असे त्यांनी सांगितले. हे आम्हाला ५ वर्षांनी कळले; मात्र त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी तो निर्णय त्याच वेळी सांगितला होता आणि त्यांना तो आवडला होता. सर्वस्वाचा त्याग करून त्यांनी त्यांचे सर्व आयुष्यच साधनेसाठी झोकून दिले. आपण सुतळीचा एक तोडासुद्धा सोडत नाही. लहान वयात तन, मन आणि धन गुरुचरणी अर्पण करणे, फारच अवघड आहे. ते त्यांनी साध्य केले.
आरंभी आम्ही त्यांना पुष्कळ विरोध केला; पण नंतर गुरूंनी आम्हाला सद्बुद्धी दिली. ही केवळ गुरुकृपाच, नाहीतर आम्ही त्यांच्या साधनेतील मोठी धोंडच होऊन बसलो असतो. आम्हाला सनातन संस्था आणि साधना यांविषयी काहीच ठाऊक नव्हते. नंतर एकेक कोडे उलगडत गेले. त्यांनी आम्हालाही साधना शिकवली.
७ ई ६. जावई संत झाल्याची प.पू. डॉक्टरांची ‘अमृत वाणी’ ऐकायला मिळणे
आम्हाला ईश्वरी गुण असलेला जावई मिळाला. पू. मुकुल गाडगीळ संत झाल्याची प.पू. डॉक्टरांच्या तोंडची ‘अमृत वाणी’ ही ऐकायला मिळाली. प.पू. डॉक्टर म्हणतात, ‘जन्म, मृत्यू आणि विवाह हे सर्व ईश्वरेच्छेनेच घडते. आम्ही परमेश्वराच्या नियोजनात काही ढवळाढवळ केली असती, तर काय घडले असते, याचा विचार केला, तरी मनातून भीती वाटते. शेवटी देवानेच आजचा अविस्मरणीय क्षण आम्हाला दाखवला.
७ ई ७. शिक्षणातील पी.एच्.डी.सह गुरुकृपेने अध्यात्मातील पी.एच्.डी.ही (संतपद) मिळवणे
पू. मुकुल यांनी शिक्षणातील पी.एच्.डी. पदवी संपादन केली आहे. गुरुकृपेने त्यांना अध्यात्मातील पी.एच्.डी. पदवीसुद्धा मिळाली, यासाठी आम्ही गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. घडवणारे आणि घडणारे दोघेही श्रेष्ठच !
७ ई ८. प्रार्थना
त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन ‘त्यांना अध्यात्मातील पुढील सर्व पदव्या मिळोत’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना ! या मुलांचे लहान वयातील विचार केवढे प्रगल्भ आहेत ! आम्ही नुसते वयानेच मोठे झालो; पण ज्ञानाने शून्यच आहोत ! त्यांच्याप्रमाणे आमच्याकडूनही अशी साधना होऊ दे, त्यांच्यामधील गुण आम्हाला अंगीकारता येऊ देत, हीच प.पू. डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !’ (श्री. आणि सौ. परांजपे यांनी अत्यंत निर्मळपणाने जावयांविषयीचे आपले मनोगत गुरुचरणी अर्पण केले आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडेच ! – डॉ. आठवले)
७ उ. पू. संदीप आळशी
७ उ १. धर्मसूर्याच्या रथाचे सारथी : पू. गाडगीळकाका !
आपल्या दिव्य ज्ञानप्रकाशाने जगतातील अज्ञानरूपी अंधःकार दूर करणारे प.पू. डॉक्टर हे समष्टीसाठी जणू धर्मसूर्यच ! या धर्मसूर्याच्या रथाचे वारू चौफेर उधळणार्या रथाचा सारथी होणे किती कठीण असेल नाही ? या धर्मसूर्याच्या रथाचे सारथी आहेत – पू. गाडगीळकाका ! या सारथीची ही काही निवडक वैशिष्ट्ये…
७ उ १ अ. प.पू. डॉक्टरांचा कार्यभार सांभाळण्यासाठी त्यांचे विश्वासपात्र बनलेले पू. काका !
नियतकालिकांना देण्यासाठीचे प्रबोधनपर लिखाण असो कि साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन असो कि असो संतांना लिहायची पत्रे… या सर्व सेवा पू. काका एकटे सांभाळतात ! एकदा ते बाहेरगावी गेले असतांना प.पू. डॉक्टर म्हणाले होते, ‘‘काका नाहीत म्हणून जरा पंचाईत होते. काकांना एकदा एखादी गोष्ट सांगितली की पुन्हा पहावे लागत नाही.’’ प.पू. डाक्टरांचे मन जिंकणारे पू. काका मग त्यांची कृपा संपादन का नाही करू शकणार ?
७ उ १ आ. चुकीची खंत वाटल्याने रात्र रात्र झोप न लागणारे पू. काका
एकदा पू. काका मला म्हणाले, ‘‘माझ्याकडून जेव्हा एखादी चूक होते, तेव्हा त्या विचारामुळे मला रात्री झोपही लागत नाही !’’ चुकीविषयी अशी तीव्र खंत असल्यामुळेच पू. काका सेवा परिपूर्ण करू शकतात.
७ उ १ इ. सूक्ष्मातील उत्तरे देण्याची क्षमता
पू. काकांना एखाद्या आध्यात्मिक त्रासाविषयी विचारले, तर पुढच्याच क्षणी ते एखादा नामजप किंवा उपाय सांगतात. याविषयी मी त्यांना विचारले, ‘‘एवढे पटकन तुम्ही कसे सांगू शकता ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मन निर्विचार असले की, उत्तरे सुचतात आणि ती योग्य असतात. माझे मन बर्याचदा निर्विचारच असते.’’ (आश्विन शुद्ध २, कलियुग वर्ष ५११३ (२७ ऑक्टोबर २०११)
७ ऊ. कु. भाविनी कपाडिया
साधकांना साधना चांगली होण्यासाठी साहाय्य करणारे पू. (डॉ.) गाडगीळकाका !
‘एखादे सूत्र प.पू. डॉक्टरांना विचारल्यास त्यांचा वेळ जाईल; म्हणून त्यांना न विचारता आणखी कोण आपल्याला त्यांच्याइतकेच योग्य उत्तर देऊ शकेल, असा प्रश्न मनात आल्यावर पू. (डॉ.) गाडगीळकाका यांचेच नाव सुचते. ख्रिस्ताब्द २००६ पासून मला पू. (डॉ.) गाडगीळकाका यांच्यासमवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
७ ऊ १. प्रेमभाव
७ ऊ १ अ. आईप्रमाणे प्रेमळ असणे
एकदा माझ्याकडून झालेल्या एका चुकीची जाणीव पू. काकांनी मला करून दिली आणि प्रायश्चित्त घ्यायला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘माझी चूक झाली; म्हणून पू. काका माझ्यावर रागवले असतील.’ काही वेळाने मी त्यांना चूक लिहून त्यावर ठरवलेले प्रायश्चित्त दाखवले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘हे प्रायश्चित्त तुम्हाला जमणार का ? तुम्हाला त्रास होणार नाही, असे बघा.’’ तेव्हा पू. काका आईप्रमाणेच प्रेमळ आहेत, हे माझ्या लक्षात आले.
७ ऊ १ आ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना साधना चांगली होण्यासाठी साहाय्य करणे
पू. काका काही साधकांना काही दिवसांनी एक ध्येय ठरवून द्यायचे आणि त्यांना तसे प्रयत्न करायला सांगायचे. ‘‘आज आपण कृतज्ञताभाव ठेवूया किंवा श्रीकृष्णाप्रती शरणागतभाव ठेवूया’’, अशा वेगवेगळ्या गोष्टी ते त्यांना सांगायचे. एकदा मी पू. काकांना म्हणाले, ‘‘तुम्ही मला सांगाल का भाव कसा ठेवायचा, म्हणजे मीही प्रयत्न करीन.’’ तेव्हा काका म्हणाले, ‘‘त्या साधकांना आध्यात्मिक त्रास असल्यामुळे त्यांना निराशा येते. साधनेत त्यांचा उत्साह टिकून रहावा, यासाठी मी त्यांना सांगतो.’’ तेव्हा पू. काकांमधील प्रेमभावामुळेच ते बारकाईने साधकांकडे लक्ष देतात, हे शिकायला मिळाले.
७ ऊ १ इ. रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही, असे एकदा सहज पू. काकांना सांगितल्यावर त्यांनी योगतज्ञ
प.पू. दादाजींनी सांगितलेल्या उपायांसाठी नाव देणे आणि नंतर प्रतिदिन झोपेविषयी विचारपूस करणे
मला काही कालावधीत रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. याविषयी मी एकदा सहज पू. काकांना सांगितले. १५ दिवसांनी ‘ज्या साधकांना आध्यात्मिक त्रास आहे आणि ज्यांना झोप लागत नाही’, अशा साधकांची नावे आश्रम व्यवस्थापनाकडे द्यायची होती. त्यांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेले ८ दिवसांचे उपाय करायला सांगितले होते. आध्यात्मिक त्रास नसल्याने मी माझे नाव दिले नाही. नंतर मला कळले, ‘पू. काकांनी माझे नाव त्या सूचीत दिले आहे.’ ८ दिवसांमध्ये ते मला प्रतिदिन झोप लागली का, असे विचारत असत. त्यांचे प्रेम पाहून मला देवाप्रती जास्त कृतज्ञता वाटली की, माझी काही पात्रता नसतांनाही पू. काका किती काळजी घेतात.
७ ऊ २. साधनेसाठी प्रोत्साहन देणे
पू. काकांना ‘मी काय प्रयत्न करू’, असे विचारले असता त्यांनी मला ‘समष्टी भाव’ वाढवायला सांगितले. पू. काकांनी सांगितले, ‘‘तुम्हाला जे येते ते इतरांना शिकवणे आणि त्यांचा सेवेत भाव टिकून रहाण्यासाठी त्यांची तळमळ वाढण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे समष्टी भाव.’’ तसे प्रयत्न चालू केल्यावर पू. काका मला मधे मधे ‘हे चांगले केले. हे चुकले. तुम्हाला हा भाग का सुचला नाही’, असे विचारून सारखे प्रोत्साहन देऊन शिकवत होते.
७ ऊ ३. पू. काकांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
७ ऊ ३ अ. उत्तम स्मरणशक्ती
पू. काकांसमवेत आतापर्यंत सेवा करतांना त्यांची स्मरणशक्ती किती उत्तम आहे, हे लक्षात आले. त्यांना काही लिहून ठेवावे लागत नाही. ते कला, दैनिक, ग्रंथ, उपाय या विभागांतील आणि प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले लिखाण एवढ्या सेवांचे अंतिम भाग पहातात, तरी काहीच लिहून न ठेवता या सर्व विभागांतील सेवा ते वेळेत पूर्ण करतात आणि साधकांचाही पाठपुरावा घेतात.
७ ऊ ३ आ. पू. काका म्हणजे चैतन्य-स्तरावरील संत असल्याप्रमाणेच आहेत, असे प.पू. डॉक्टरांनी दोन वर्षांपूर्वी सांगणे
सप्टेंबर २००९ मध्ये आम्ही शक्ती, भाव, चैतन्य आणि आनंद या स्तरांवरील संतांची सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रे काढत होतो. त्या वेळी ‘‘चैतन्य-स्तरावरील संतांसाठी कोणत्या संतांचे सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्र काढायचे’’, असे मी प.पू. डॉक्टरांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘गाडगीळकाका आहेत ना ! ते चैतन्य-स्तरावरील संत असल्याप्रमाणेच आहेत. त्यांच्यातील सेवेची तळमळ आणि चिकाटी यांमुळेच ते सतत सेवा करू शकतात अन् त्यांच्यातील चैतन्य वाढत रहाणार.’’(कार्तिक शु. ११, कलियुग वर्ष ५११३ (६.११.२०११))