सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकमध्ये ३२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

मंगळुरू येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि जिज्ञासू

मंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यातील बेंगळुरू, बेळगाव, शिवमोग्गा, उडुपी, दक्षिण कन्नड, बागलकोटे, धारवाडसह एकूण ३२ ठिकाणी १३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण साजरा करण्यात आला. या महोत्सवात प्रारंभी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके ध्वनीचित्रफितीद्वारे दाखवण्यात आली.

बेंगळुरू येथील गुरुपौर्णिमेला उपस्थित पू. रमानंद गौडा आणि जिज्ञासू

बेंगळुरू येथे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, कारवार येथे पू.  विनायक कर्वे, मंगळुरू येथे पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि बालकसंत पू. भार्गवराम प्रभु, तर शिवमोग्गा येथे सुप्रसिद्ध पंचशिल्पकार पू. काशिनाथ कवटेकर उपस्थित होते. संपूर्ण राज्यात अनुमाने ४ सहस्र ८०० हून अधिक जणांनी गुरुपौर्णिमेचा लाभ घेतला.

उडुपी येथील गुरुपौर्णिमेला जिज्ञासूंची उपस्थिती

 

१. वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१.अ. हगरिबोम्मनहळ्ळी येथे एका कापडाच्या व्यापार्‍याने पांढर्‍या कपड्याचा पूर्ण रोल (तागा) निःशुल्क दिला.

१.आ. रायचूर येथे आलेले हिंदुत्वनिष्ठ वक्ता श्री. प्रकाश खेणिद यांनी स्वतः अर्पण देण्यासह धर्मप्रेमींकडूनही अर्पण गोळा करून आणले होते.

१.इ. एका पत्रकाराने स्वतःहून स्थानिक ‘सिटी केबल चॅनेल’वाल्यांना बोलावून गुरुपौर्णिमेचे चित्रीकरण करण्यास सांगितले.

१.ई. धर्मप्रेमी अधिवक्ता वीरनारायण देसाई हे १०० कि.मी. अंतरावरून येऊन बदामी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात शेवटपर्यंत थांबले.

१.उ. राजाजीनगर (बेंगळुरू) येथे ‘गणेश स्टुडिओ’ यांनी एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवण्याच्या दृष्टीने गुरुपौर्णिमेचे ध्वनीचित्रिकरण केले.

१.ऊ. रामनगर, बेळगाव येथील पंचायत अधिकारी गुरुपौर्णिमेच्या सभागृहात आले होते. सभागृहाची स्वच्छता पाहून ते म्हणाले, ‘‘तुम्ही सभागृहाची केलेली स्वच्छता पाहून मला आनंद होत आहे. यापुढे तुम्हाला जेव्हा लागेल, तेव्हा या सभागृहाचा उपयोग करू शकता.’’

 

२. क्षणचित्र

कुमटा (जिल्हा उत्तर कन्नड) येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यावर एक गाय सभागृहाच्या प्रवेशदाराजवळ येऊन पुष्कळ वेळ उभी होती. साधकांनी तिला खायला दिल्यावरही ती गेली नाही, उलट ती कान टवकारून गुरुपौर्णिमेचे मार्गदर्शन ऐकत थांबत असल्याचे साधकांना जाणवले.

 

३. अभिप्राय

१.अ. श्री. एस्. भास्करन्, अध्यक्ष, विश्व सनातन परिषद, बेंगळुरू – सभागृहातील दैवी वातावरणामुळे पुष्कळ सकारात्मकता अनुभवता आली.

१.आ. श्री. प्रशांत संबरगी, उद्योगपती तथा चित्रपट निर्माते, बेंगळुरू – कुणालाही सनातन धर्माविषयी जाणून घ्यायचे असेल, तर त्याने आयुष्यात एकदा तरी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट द्यावी.

१.इ. श्री. राजशेखर हेब्बार, उडुपी – आज समाजाला धर्मशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे, ती म्हणजे सनातन संस्था !

Leave a Comment