मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)

Article also available in :

लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा, ‘मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म : भाग १’ !

अनुक्रमणिका

मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मृत्युलोकात न अडकता, त्याला सदगती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो. यामुळे त्याच्याकडून (पूर्वजांकडून) कुटुंबियांना त्रास होण्याची, तसेच असा लिंगदेह वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते.

 

४. मृतदेह चितेवर ठेवणे

४ अ. स्मशानात पोहोचल्यावर तिरडीसह मृतदेह चितेवर ठेवतांना मृताचे पाय उत्तर दिशेला आणि डोके दक्षिण दिशेला येईल, असे करावे.

४ आ. तिरडीचे सर्व सुंभ आणि बांबू सोडवावेत. ते सर्व साहित्य चितेवरच ठेवावे.

४ इ. मृतदेहाच्या पायांचे अंगठे सोडवावेत.

 

५. चिता प्रज्वलित करण्यापूर्वीचे विधी

५ अ. मृत व्यक्तीचे मुख, दोन्ही नाकपुड्या आणि कान यांत, तसेच डोळे यांवर सोन्याचे तुकडे घालावेत / ठेवावेत. सोन्याचे तुकडे घालणे शक्य नसल्यास दर्भाच्या अग्राने किंवा तुळशीच्या पानाने तुपाचे थेंब घालावेत.

५ आ. कर्त्याने अग्नीचे मडके चितेच्या वायव्य दिशेला ठेवावे आणि त्यातील अग्नी प्रज्वलित करावा. ‘क्रव्यादनामानमग्निं प्रतिष्ठापयामि ।’ असे म्हणून त्या अग्नीवर काळे तीळ घालावेत. (काही जण मृतदेहाच्या वायव्य दिशेला भूमीवर मातीची त्रिकोणी वेदी बनवतात अन् त्यात गोवर्‍यांवर मडक्यातील अग्नी ठेवून तो प्रज्वलित करतात.) त्यावर पळीने पुढीलप्रमाणे तुपाच्या आहुत्या द्याव्यात. प्रत्येक वेळी पुढील एकेक मंत्रातील ‘स्वाहा’ म्हणतांना आहुती द्यावी आणि नंतर ‘…. इदं न मम ।’ असे म्हणावे.

अग्नये स्वाहा । अग्नय इदं न मम ।।
कामाय स्वाहा । कामाय इदं न मम ।।
लोकाय स्वाहा । लोकाय इदं न मम ।।
अनुमतये स्वाहा । अनुमतय इदं न मम ।।

यानंतर ‘ॐ अस्माद्वैत्वमजायथा अयं त्वदभिजायताम् । असौ….(मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) प्रेताय स्वर्गाय लोकाय स्वाहा ।।’ असे म्हणून तुपाची आहुती मृतदेहाच्या छातीवर द्यावी आणि ‘…. (मृत व्यक्तीचे नाव घ्यावे.) प्रेताय इदं न मम ।’ असे म्हणावे.

५ इ. मृत व्यक्तीचे कपाळ, मुख, दोन्ही बाहू आणि छाती या पाच ठिकाणी सातूच्या / तांदळाच्या पिठाचे सुपारीएवढ्या आकाराचे गोळे ठेवावेत. प्रत्येक गोळ्यावर तूप घालावे.

 

६. दहनविधी

दहनविधी
दहनविधी

६ अ. उपस्थितांनी मृतदेहावर चंदनकाष्ठ, अन्य लाकूड, उदबत्ती किंवा कापूर ठेवावा. ही कृती शास्त्रात नसून ती लौकिक पद्धत आहे.

६ आ. आणलेल्या अग्नीच्या साहाय्याने कर्त्याने चितेला अग्नी द्यावा.

१. प्रथम मृतदेहाच्या (पुरुष असल्यास) डोक्याकडे किंवा (स्त्री असल्यास) पायाकडे आणि त्यानंतर अप्रदक्षिणेने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने) फिरत चारही अंगांनी (बाजूंनी) चिता प्रज्वलित करावी. त्यासाठी आणलेल्या अग्नीवर माडाची एखादी झावळ पेटवून घ्यावी.

६ इ. चितेमध्ये ‘टायर’सारख्या वस्तूंचा वापर टाळावा. रॉकेलचा वापर करावयाचा झाल्यास तो अत्यल्प करावा.

६ ई. शक्यतो चितेचा धूर आपल्या अंगाला लागू देऊ नये.

६ उ. मृतदेहाचा कपाळमोक्ष झाल्यानंतर (कवटी फुटल्याचा ध्वनी ऐकू आल्यानंतर) कर्त्याने खांद्यावर पाण्याचे मडके घेऊन मृत व्यक्तीच्या पायांकडे दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे. दुसर्‍या कोणत्याही व्यक्तीने कर्त्याच्या मागे उभे राहून स्मशानातीलच लहान दगडाने (या दगडाला ‘अश्मा’ असे म्हणतात.) त्या मडक्याच्या गळ्याच्या खाली एक भोक पाडावे. कर्त्याने मडक्यातील पाणी सांडवित चितेभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पहिली प्रदक्षिणा घालावी. दुसर्‍याने परत मडक्याला पहिल्या भोकाच्या खाली दुसरे भोक पाडावे. यानंतर कर्त्याने आधीसारखीच दुसरी प्रदक्षिणा घालावी. यानंतर दुसर्‍याने परत मडक्याला दुसर्‍या भोकाच्या खाली तिसरे भोक पाडावे. कर्त्याने आधीसारखीच तिसरी प्रदक्षिणा घालावी. तिसर्‍या प्रदक्षिणेनंतर मृत व्यक्ती पुरुष असल्यास त्याच्या डोक्याकडे मृतदेहाला पाठ करून आणि मृत व्यक्ती स्त्री असल्यास तिच्या पायांकडे मृतदेहाला पाठ करून कर्त्याने उभे रहावे अन् मागे न पहाता मडके खांद्यावरून मागच्या अंगाला टाकून फोडावे.

 

ज्याप्रमाणे पूजेसाठी सात्त्विक आणि नैसर्गिक वस्तूंचा उपयोग केला जातो,

त्याप्रमाणे चिता प्रज्वलित करतांनाही सात्त्विक वस्तूंचा उपयोग करणे आवश्यक !

पूजा करतांना आपण तूप, तेल, कापूर या नैसर्गिक आणि सात्त्विक वस्तूंचा उपयोग करतो. आपण भोजन करतांना शिळे, कच्चे किंवा खराब झालेले पदार्थ न खाता ताजे अन्न खातो. त्याचप्रमाणे अंत्येष्टी (अंत्यकर्म) करतांना तो मृतदेह हाही एक समिधाच असल्याने चिता प्रज्वलित करतांना ‘पेट्रोल’, ‘रॉकेल’, ‘डिझेल’ आणि ‘टायर’ अशा अनैसर्गिक अन् असात्त्विक वस्तूंचा वापर करणे अयोग्य आहे. तसेच या वस्तू वायूप्रदूषण करणार्‍या असतात.

ज्यांना सात्त्विक आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू वापरणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, त्यांनी न्यून प्रतीच्या वस्तू वापराव्यात, म्हणजे ज्यांना देशी गायीचे शुद्ध तूप वापरणे शक्य नाही, त्यांनी किमान वनस्पती तूप वापरावे. ज्यांना तिळाचे तेल किंवा चांगल्या प्रतीचे तेल वापरणे शक्य नाही, त्यांनी अल्प प्रतीचे पाम तेल वापरावे. हे सूत्र स्पष्ट करण्याचा उद्देश इतकाच आहे की, अंत्यकर्म करतांना चिता प्रज्वलित करण्यासाठी अनैसर्गिक आणि असात्त्विक वस्तू वापरणे अयोग्य आहे. त्यामुळे या वस्तूंचा वापर टाळावा.’

– श्री. सिद्धेश करंदीकर, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२०)

टीप – सध्याच्या काळात चितेला अग्नी देऊन झाल्यावर लगेचच वरील कृती करतात.

६ ऊ. कर्त्याने मडक्याला भोक पाडण्यासाठी वापरलेला अश्मा सुरक्षितपणे घरी आणावा.

लहान मुलांचा अंत्यसंस्कार कसा करावा ?

‘मृत्यूनंतर लहान मुलांचा देह पुरावा (त्याचे खनन करावे) आणि वयोवृद्धांचा (मोठ्या व्यक्तींचा) देह दहन (अग्नीसंस्कार) करावा’, असे शास्त्रात सांगितले आहे. लहान मुलांच्या अंत्यसंस्काराविषयीची सूत्रे आणि त्यांविषयीचे शास्त्र पुढे दिले आहे.

१. नामकरणापूर्वी (१२ व्या दिवसापर्यंत) बालकाचा मृत्यू झाल्यास खनन करावे. (देह पुरावा.)

२. चौलसंस्कार झालेल्या अथवा न झालेल्या ३ वर्षांपर्यंतच्या बालकाचे मृत्यूनंतर दहन किंवा खनन यांपैकी काहीही केलेले चालते. (संदर्भ : धर्मसिंधु, पृष्ठ ६०८ आणि ६०९)

लहान मुलाचा मृतदेह पुरणे आणि
वयोवृद्धांच्या मृतदेहाचे दहन करणे यांमागील शास्त्र

१. ‘स्थूलदेह हा पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतो. २ वर्षांपूर्वीच्या बालकाचा स्थूलदेह कोवळा असतो. त्यामुळे तो स्थूलदेह (पृथ्वीतत्त्व) मातीत (पृथ्वीतत्त्वात) सहज मिसळू शकतो, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते. जसजसे वय वाढत जाते, तसतसे स्थूल आणि सूक्ष्म देहांचे जडत्वही वाढत जाते. देह पुरल्यास त्याचे पंचतत्त्वात विघटीकरण होणे कठीण असते. मृत्यूनंतर स्थूलदेह दहन केल्याने त्याची राख होते. ही राख मातीत सहज मिसळते, म्हणजेच स्थूलदेहाचे पंचतत्त्वात विघटीकरण सहज होते.

२. वयोवृद्धांच्या चित्तावर गुणदोष, देहाविषयीची आसक्ती आदी संस्कार दृढ झालेले असतात. असा देह पुरल्यास स्थूलदेहाविषयीची आसक्ती असलेला लिंगदेह त्या ठिकाणी घुटमळण्याची शक्यता अधिक होते.’

– वेदमूर्ती केतन शहाणे, अध्यापक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०१४)

 

७. दहनविधीनंतर त्याच दिवशी करायच्या कृती

७ अ. शास्त्रानुसार पद्धत

१. दहनविधीनंतर लगेचच नदी, तलाव किंवा विहीर येथे नामजप करत कर्त्यासह कुटुंबियांनीही स्नान करावे.

२. कर्त्याने तिलांजली देण्यासाठी एका भांड्यात पाणी घालून त्यात काळे तीळ घालावेत. त्यानंतर तेथेच कर्ता, कुटुंबीय आणि आप्तेष्ट यांनी ‘….गोत्र (मृत व्यक्तीचे गोत्र उच्चारावे.) ….प्रेत (मृत व्यक्तीचे नाव उच्चारावे.) एष ते तिलतोयाञ्जलिस्तवोपतिष्ठताम् ।’, असे म्हणत अश्म्यावर पितृतीर्थावरून ३ वेळा तिलांजली द्यावी. ज्यांचे वडील विद्यमान आहेत, अशांनी तिलांजली देऊ नये.

३. घरी आल्यावर आधी अश्मा अंगणातील तुळशी-वृंदावनाच्या परिसरात ठेवावा; मात्र तुळशीत ठेवू नये. तुळशीवृंदावन नसल्यास अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

४. घरात प्रवेश करण्याआधी कडुनिंबाचे पान चावावे. मग आचमन करून अग्नीचे दर्शन घेऊन, तसेच पाणी, गोमय, पांढरी मोहरी आदी मांगलिक पदार्थांना हाताने स्पर्श करून, त्यानंतर दगडावर (घराच्या दगडी पायरीवर चालेल.) पाय ठेवून हळूहळू घरात प्रवेश करावा.

५. जेवणासाठी शेजारच्या घरी पिठले-भात करून तो मृत व्यक्तीच्या घरी आणावा. त्यातील थोडासा भाग एका पानावर घेऊन तो नैवेद्य म्हणून वास्तुदेवता आणि स्थानदेवता यांच्यासाठी घराबाहेर ठेवावा. उर्वरित अन्न इष्टदेवतेला अर्पण करून नंतर सर्वांनी ग्रहण करावे.

७ आ. शास्त्रानुसार बाहेर स्नान करणे शक्य नसल्यास आचरायची पद्धत

१. घरी आल्यावर आधी अश्मा अंगणातील तुळशी-वृंदावनाच्या परिसरात ठेवावा; मात्र तुळशीत ठेवू नये. तुळशीवृंदावन नसल्यास अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

२. घरात प्रवेश करण्याआधी सर्वांगावर गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी.

३. कडुनिंबाचे पान चावावे… हळूहळू घरात प्रवेश करावा. – ही कृती वर उल्लेखल्याप्रमाणे करावी.

४. नामजप करत सर्वांनी स्नान करावे.

५. वर उल्लेखल्याप्रमाणे तिलांजली द्यावी.

६. जेवणासाठी शेजारच्या घरी पिठले-भात….. ग्रहण करावे. – ही कृती वर उल्लेखल्याप्रमाणे करावी.

 

८. अस्थीविसर्जन

दाहसंस्कार केलेल्या दिवशी किंवा मृत झाल्याच्या तिसर्‍या, सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थी गोळा करून त्यांचे दहा दिवसांच्या आत विसर्जन करावे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी अस्थी गोळा करणे अधिक चांगले असते. दहा दिवसांनंतर अस्थीविसर्जन करायचे असल्यास तीर्थश्राद्ध करून विसर्जन करावे.

 

९. पिंडदान

शास्त्रानुसार पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत प्रतिदिन तिलांजली, पिंडदान, तसेच विषम दिवशी विषम श्राद्ध करावे. असे शक्य नसल्यास निदान नवव्या दिवसापासून उत्तरक्रिया चालू करावी. मात्र आजकाल पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंतचे पिंडदान दहाव्या दिवशी एकत्रच करतात. दहाव्या दिवशी नदीकाठच्या किंवा घाटावरच्या शिवाच्या किंवा कनिष्ठ देवतांच्या देवळांत पिंडदान करावे. दहाव्या दिवशी पिंड देऊन झाल्यावर अश्म्यावर थोडेसे खोबरेल तेल घालून तो विसर्जित करावा.

 

१०. ११ व्या आणि १२ व्या दिवशी करावयाच्या कृती

११ व्या दिवशी स्नान झाल्यानंतर वास्तूत पंचगव्य होम करून सर्वत्र पंचगव्य शिंपडावे. सर्वांनी पंचगव्य प्राशन करावे. कर्त्याने मृताच्या उद्देशाने संकल्प करून आमान्न (शिधा), तसेच दशदाने आदी द्यावीत. घराच्या बाहेर, गोठ्यात किंवा अन्यत्र एकोद्दिष्ट श्राद्ध, तसेच वसुगण श्राद्ध आणि रुद्रगण श्राद्ध करावे.

१० अ. सपिंडीकरण श्राद्ध

सपिंडीकरण श्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून १६ मासिक श्राद्धे सपिंडीकरण श्राद्धापूर्वी ११ व्या किंवा १२ व्या दिवशी करावीत. १२ व्या दिवशी सपिंडीकरण श्राद्ध करावे. सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला ‘पितृ’ ही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते. खरे पहाता १६ मासिक श्राद्धे त्या त्या मासात करणे आणि सपिंडीकरण श्राद्ध वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी करणे उचित ठरते; पण आजकाल हे सर्व १२ व्या दिवशीच करायचा प्रघात आहे.

 

११. निधन शांतीविधी (शांतोदक)

१३ व्या दिवशी पाथेय श्राद्ध करून निधन शांतीविधी करावा. सर्वांना बोलावून गोड जेवण द्यावे. आजकाल हा विधी १२ व्या दिवशीच केला जातो.

या लेखाच्या पहिल्या भागात पुढील माहिती देण्यात आली आहे –

१. मृत्यूनंतर करण्यात येणारे आरंभीचे क्रियाकर्म,

२. दहनविधीची सिद्धता आणि

३. अंत्ययात्रा

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’

44 thoughts on “मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)”

  1. मृत्यू नंतर एका वर्षाने वर्ष श्राद्ध करावे लागते,ते तिथीप्रमाणे करायचे की तारखेप्रमाणे?
    तसेच यापुढेही पुण्यस्मरण करायचे असेल तर ते तिथीप्रमाणे करावे की तारखेप्रमाणे?

    Reply
    • नमस्कार श्री. निलेश गायकरजी,

      मृत्यू नंतर एका वर्षाने वर्ष श्राद्ध करावे लागते, ते तिथीप्रमाणे करावे, तसेच त्यापुढेही पुण्यस्मरण करायचे असेल तर ते तिथीप्रमाणे करावे. हिन्दु धर्मात तिथीला महत्त्व आहे. त्या तिथीला असलेली नक्षत्रे त्या व्यक्तीला पूरक असतात किंवा कार्याला अनुकूल असतात म्हणून तिथीला महत्त्व आहे.

      Reply
  2. 13 वा आनी 14 वा दिवस का व केव्हा करतात पुरुष आणि सुहागन मयत हया बद्दल काहि आहे का
    सुहागन मयत असेल तर वरील विष्यास अनुसरण कृपया अचूक माहिती हवी आहे

    Reply
    • नमस्कार,

      हा विषय सविस्तर आहे. विस्तारभयास्तव येथे देणे शक्य नाही. तसेच त्यात प्रांतानुसार पालट असू शकतात. त्यामुळे या विषयी स्थानिक पुरोहितांना विचारावे, ही विनंती.

      Reply
      • घरात कोणी पुरूष कर्ता नसेल त्या घरातील महिलांनी काय करावे?

        Reply
        • नमस्कार अश्विनी जी

          श्राद्ध करण्यासाठी कुटुंबात पुरुष नसतील तर धर्मशास्त्रात पुढील पर्याय आहेत. येथे दिलेल्या क्रमाने कोण श्राद्ध करू शकतात हे आपण ठरवू शकतात.
          मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्‍या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्‍याने श्राद्ध करावे.
          प्रत्येक मृत व्यक्तीचे श्राद्ध होईल अन् तिला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्मात श्राद्ध करण्याच्या अधिकाराच्या संदर्भात सांगितली आहे.

          आपली,
          सनातन संस्था

          Reply
  3. पौर्णिमा असल्यास त्या दिवशी तेरावे करता येते का?

    Reply
    • नमस्कार,

      हो. पौर्णिमा असल्यास त्या दिवशी तेरावे करता येते.

      Reply
  4. आणि काही कारणास्तव दहवा ज्याने केला त्याला तेरावा नाही करता आला नाही तर पुढे काही समस्या निर्माण होईल का तर त्याचे निवारण कसे करावे

    Reply
    • नमस्कार श्री. संजय शिंदे जी,

      तुम्हाला कोणत्या कारणामुळे शक्य नाही ते सांगू शकता का ? म्हणजे त्याला काही पर्याय असतील तर सुचवता येईल.

      Reply
  5. मृत्युंनंतर भरणी श्राद्ध कधी करावे त्याच वर्षी कीं वर्षश्रद्धांनंतर

    Reply
    • नमस्कार,

      कर्त्याने क्षौर करावे (डोक्यावरचे केस पूर्णपणे काढावेत.), तसेच दाढी-मिशा काढून नखेही कापावीत. क्षौर करतांना बटूप्रमाणे केसांचा घेर न ठेवता केवळ शेंडी ठेवावी.
      – कर्त्याचे अन्य भाऊ, तसेच मृत व्यक्तीपेक्षा लहान असलेले कुटुंबीय (ज्यांचे वडील विद्यमान नाहीत असे) यांनीही त्याच दिवशी क्षौर करावे. ते शक्य नसल्यास दहाव्या दिवशी क्षौर करावे.
      – कर्ता मृत व्यक्तीपेक्षा वयाने मोठा असल्यास त्याने क्षौर करू नये.
      – सूर्यास्तानंतर क्षौर वर्ज्य असल्याने सूर्यास्तानंतर क्षौर करू नये. अशा वेळी मृताची उत्तरक्रिया (प्रतिदिन करावयाचे पिंडदान अन् द्यावयाची तिलांजली) ज्या दिवशी चालू करणार त्या दिवशी कर्त्याने क्षौर करून उत्तरक्रिया आरंभ करावी. इतरांनी १० व्या दिनी क्षौर करावे.
      – स्त्रियांनी केस किंवा नखे कापू नयेत.

      केसांच्या मुळांशी आश्रित असलेले पाप नष्ट व्हावे आणि विधी करण्याचा अधिकार यावा यासाठी केस कापणे आवश्यक असते.

      Reply
  6. गरुड पुराणानुसार महिलेला अग्नी संस्कार करता येतात असे वाचले आहे आहे ते खरे आहे का ?

    Reply
    • नमस्कार,

      हो, खरे आहे, मात्र काही गोष्टी काळाच्या ओघात अल्प झाल्या, त्यानुसार हे ही अल्प झाले; मात्र त्यांनी विधी करायचे झाल्यास कसे करावेत हे दिलेले आहे.

      Reply
    • मयताचे दहावी दिवशी जिथे अग्नी दिला आहे त्या जागेवर नयेध्या निवध दाखवितात का

      Reply
  7. आमच्या मुलगा २४ वयाच्या अविवाहित होता तचा १० वा नंतरच्या विधी माहिती विषयक मार्गदर्शन

    Reply
    • नमस्कार,

      या साठी निधन कसे झाले, अंत्यविधी कसे आणि कुठले झाले इत्यादी माहिती लागते, त्यावर ते ठरते. त्यामुळे ज्या पुरोहितांनी अंत्यविधी केले त्यांना याविषयी विचारले तर अधिक योग्य होईल.

      Reply
  8. पत्नीचे क्रियाकर्म मुलगा नसताना कोणी करावे.
    पतीने केलेंने काही चुकीचे आहे का.
    चुकीचे असल्यास आता उपाय आहे का.

    Reply
    • नमस्कार,

      मुलगा नसेल तर पती पत्नीचे श्राद्ध करू शकतो.

      Reply
    • नमस्कार श्री. कुंदन कांबळीजी,

      सोयर संपल्यावर येणाऱ्या द्वादशी अथवा अमावस्येला करावे.

      Reply
  9. शनिवारी बारावे आहे रविवारी तेरावे आहे
    शनिवारी बारावे तेरावे एकत्र केले तर चालते का

    Reply
    • नमस्कार श्री. प्रवीण जोशी जी,

      स्थानिक परंपरा आणि स्थानिक पुरोहितांना विचारून या विषयी निर्णय घ्यावा.

      Reply
  10. तेरा दिवसाचे विधी आम्ही पाच दिवसात केले आहेत, त्यामुळे माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी काही त्रास होईल का?

    Reply
    • नमस्कार श्री. पराग कोलतेजी,

      पाच दिवसांमध्ये म्हणजेच नवव्या दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत किंवा दहाव्या पासून चौदाव्यापर्यंत विधी करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची नाही तोही शास्त्रातला एक पर्यायच आहे
      तरी विधी करणाऱ्या पुरोहितावर श्रद्धा ठेवावी आणि यापुढचे जे वर्ष श्राद्ध आणि महालय श्राद्ध विधी आहेत ते मात्र नियमित श्रद्धा भक्ती ने करावेत.

      Reply
  11. एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला एकच मुलगी असेल व तिचे लग्न झाले असेल व त्या स्त्रि किवा पुरुषाचा एका चा मृत्यू पहिला असेल व नंतर दुसराचा मृत्यू झाल्यास त्याचे इतर भावकी त्याचे क्रिया विधि करण्यास टाळाटाळ करत असतील व त्या मृत्य व्यक्तिला अग्नि त्याच्या नातवाने म्हणजे मुलिच्या मुलाने दिला असेल तसेच त्याची रक्षा विर्सजन पन त्यानेच केली असेल तर त्या व्यक्तिचे पुढील विधि कोणी करावे . ..

    Reply
    • नमस्कार श्री. गणेश पेडणेकरजी,

      मुलीच्या मुलाला आपल्या आजी आजोबांचे म्हणजे आईच्या आई, वडिलांचे विधी करता येतात.

      Reply
    • नमस्कार,
      आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
      10 वे, 12 वे इत्यादी अत्यावश्यक विधींना अधिक मास, सोमवार वगैरे कोणतेही बंधने लागू होत नाही. त्यामुळे आपण 10वा दिवस करू शकता.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
  12. नमस्कार मला विचार्याचे होते माज्य सासूचे २०२१ ला निधन झाले तर त्यांचे वर्ष श्रधा झाले तर आता पितृपक्षाचे तिथी काढावी लागते का

    Reply
    • नमस्कार

      आपले सासरे हयात असतील तर ते पितृपक्षात अविधवा नवमीला हे श्राद्ध करू शकतात.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
  13. बाहेर तिर्थस्थळी गेलो असताना वडील,आजोबा हयात आहेत व श्राद्ध करावे असे वाटत आहे अश्या वेळेस श्राद्ध करू शकतो का?

    Reply
    • नमस्कार

      याविषयी आपण स्थानिक पुरोहितांचे अथवा तीर्थक्षेत्री असलेल्या पुरोहितांचे मार्गदर्शन घ्यावे ही विनंती.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
    • नमस्कार निलेश जी

      मासिक श्राद्ध म्हणजे प्रतिमास त्याच तिथीस येणारे श्राद्ध.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply
    • नमस्कार निलेश जी

      त्याच दिवशी करण्यात काही अडचण नाही.

      आपली
      सनातन संस्था

      Reply
  14. मला सास-यांचे श्राद्ध कधीच करायचे नाही आहे…तर त्या साठी काही विधी आहे का?

    Reply
    • नमस्कार

      शास्त्रानुसार सासऱ्यांचे श्राद्ध तुमच्या पतीने प्रतिवर्षी करणे अपेक्षितच आहे.

      श्राद्ध विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. त्याचे काही उदाहरणे येथे दिलेली आहेत – https://www.sanatan.org/mr/a/1298.html

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment