मुंबई – मुंबईसह नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत असलेले विविध गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी जिज्ञासू आणि भाविक यांनी उपस्थित राहून गुरुपूजन अन् अध्यात्माविषयीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. मुंबईमध्ये जोगेश्वरी, दादर, मुलुंड, घाटकोपर, नवी मुंबईमध्ये ऐरोली आणि सानपाडा, तर पालघर जिल्ह्यात वसई येथे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटन यांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील धर्मप्रेमी यांनी उपस्थितांना अध्यात्म अन् राष्ट्र-धर्म विषयक मार्गदर्शन केले.
१. जोगेश्वरी, मुंबई
निधर्मी मानसिकतेमुळेच हिंदूंची अधोगती !
– अधिवक्ता मधुसूदन द्विवेदी, विश्वस्त, श्रीराम मंदिर, वैष्णवाश्रम ट्रस्ट
मुसलमान आणि ख्रिस्ती कितीही शिकले, तरी ते स्वत:च्या धर्माचे पालन अभिमानाने करतात. हिंदू मात्र शिकले की, ‘सेक्युलर’ होतात. ‘मंदिरात का जायचे ?’, ‘धर्माचरणाने काय होईल ?’, अशी त्यांची मानसिकता होते. अशा निधर्मी मानसिकतेमुळेच हिंदूंची अधोगती झाली. हिंदु मंदिरात जाण्याचे प्रमाण अल्प झाले. ते धर्मापासून दूर गेले. हिंदूंवरील संकटांचे त्यांना काहीच वाटत नाही. हिंदू संघटित होत नाहीत. त्यामुळे स्वत:च्या देशातच हिंदू असुरक्षित जीवन जगत आहेत. मंदिरात जाणे, साधना करणे, टिळा लावणे, वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे आदी धर्माचरणातून हिंदु धर्म वाचवला आणि वाढवला पाहिजे.
२. वसई
२.अ. ईश्वराशी अनुसंधान ठेवून हिंदूंनी कार्य करावे !
– भार्गव श्री. बी.पी. सचिनवाला, संचालक, श्री परशुराम तपोवन आश्रम, वसई
हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर आपली संस्कृती आणि वेद यांचा अभ्यास करायला हवा. आपली संस्कृतीच आपल्याला बलवान बनवू शकते. ईश्वराशी सातत्याने अनुसंधान ठेवून कार्य करायला हवे. सध्याच्या भ्रष्ट राजतंत्राला पालटायला हवे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन दुष्प्रवृत्तींचा प्रतिकार केला पाहिजे.
२.आ. हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, हीच खरी गुरुदक्षिणा !
– डॉ. विजय जंगम, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सर्वांत प्रथम आपल्याला हिंदु राष्ट्राचा विचार दिला आणि तो समाजापर्यंत नेला. गुरु आणि शिष्य यांचे नाते जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये समर्पणभाव भरलेला आहे. गुरुपौर्णिमेला गुरूंचे केवळ लौकिक अर्थाने पूजन करण्यापेक्षा गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहे. गुरूंना धन, वस्तू आदी देणे अपेक्षित नसून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वत:चे योगदान देणे, त्यासाठी निष्ठेने प्रयत्न करणे, हीच खरी गुरुदक्षिणा आहे.
३. ऐरोली
हिंदु राष्ट्राची स्थापना हाच सर्व समस्यांवरील उपाय ! – अधिवक्ता संतोष दुबे
देशातील विविध समस्यांनी आपण जर्जर झालेलो आहोत. ‘हिंदु राष्ट्र’ हे सर्व समस्यांचे निराकरण आहे. आपण पारमार्थिक प्रगती केल्यानंतरच हिंदु राष्ट्र येणार आहे. यासाठी आपण परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना प्रार्थना करून त्यांनी सांगितल्यानुसार अनुसरण करूया. साधना केल्यानेच आपल्यातून ‘विवेकानंद’ निर्माण होतील.
४. दादर
… तर राज्यघटनेविषयी प्रश्न विचारायला हवा !
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
भगवद्गीता, वेद आणि उपनिषदे यांमध्ये सहस्रावधी वर्षांनंतरही कोणताही पालट करण्यात आलेला नाही; परंतु राज्यघटनेत काही वर्षांत १०० हून अधिक वेळा पालट करावे लागले आहेत. ज्यातून लोकशाही स्वीकारली, त्यामध्ये इतक्या वेळा पालट करावा लागत असेल, तर त्याविषयी आपण प्रश्न विचारायला हवा. राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ शब्द मतदान घेऊन लोकशाही मार्गाने आलेला नाही, तर आणीबाणीच्या काळात हा शब्द घुसडण्यात आला आहे. ही कसली लोकशाही ? घटस्फोटाचे खटले चालण्यासाठी मोठमोठी न्यायालये निर्माण होणे, म्हणजे समाजातील हे प्रकार वाढणे. समाजव्यवस्थेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाही. ज्याप्रमाणे शारीरिक संतुलन बिघडल्यास व्यक्ती आधुनिक वैद्यांकडे जाते, त्याप्रमाणे गुन्हा घडल्यास आपण न्यायालयात जातो. गुन्हा का घडतो ? याचे कारण भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. गुन्ह्याच्या मागे षड्रिपू आहेत. न्यायालये, न्यायाधीश, पोलीस ठाणी आदी वाढवून किंवा कायदे करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.