चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य पाहून राजकीय मंडळींनी केली नेत्यांची पाद्यपूजा !

‘धर्मवीर’ या चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य

मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – ‘आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करून मोक्षाचा मार्ग दाखवणारे’, असे गुरूंचे महत्त्व हिंदु धर्मात आहे. त्यामुळे शिक्षण, राजकारण यांसह विविध क्षेत्रांतील स्वत:च्या मार्गदर्शकांना गुरुस्थानी मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे. यावर्षी मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटातील गुरुपूजनाचे दृश्य पाहून काही राजकीय मंडळींनी त्यांच्या नेत्यांचे गुरुपूजन करून त्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आनंद दिघे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची, तर सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांची पाद्यपूजा करत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग पाहून काही राजकीय मंडळींनी धर्मवीर चित्रपटातील ‘भेटला विठ्ठल’ हे गुरुपूजनाच्या प्रसंगातील गाणे लावून राजकीय नेत्यांची पाद्यपूजा केली आहे. याविषयी सामाजिक माध्यमांतून टीका करण्यात आली आहे.

‘राजकारणातील गुरु तात्पुरते असतात. कधी पक्ष पालटतील सांगता येत नाही’, ‘चित्रपट बघून कुणाचेही पाय धरण्यापेक्षा सकाळी नियमित देवाला नमस्कार करा’,  अशा अनेक प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत.

राजकीय लाभासाठी नव्हे, तर आध्यात्मिक लाभ होण्यासाठी गुरुपूजन करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सिंहासनारूढ होऊन स्वत:च्या कार्यकर्त्यांकडून स्वत:चे पाद्यपूजन करवून घेतले आणि कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसाठी फुलांच्या पायघड्या पसरणे, त्यांना गुरुस्थानी मानून त्यांचे पूजन करणे, असे प्रकार केले. या राजकीय गुरुपूजन कार्यक्रमाचे ‘व्हिडिओ’ बनवून ते फेसबूकद्वारे प्रसारित करण्यात आले. या व्हिडिओंविषयी काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, काहींनी खिल्ली उडवली, तर काहींनी संताप व्यक्त केला. काही राजकीय पक्षांनी त्यांचे नेते अथवा प्रमुख यांना गुरुस्थानी मानून प्रत्येक गुरुपौर्णिमेला त्यांचे पूजन करण्याची चुकीची परंपरा काही वर्षांपासून चालू केली आहे. पाद्यपूजन करून घेणार्‍या संबंधित नेत्यांना विचाराल, तर ते सांगतील, ‘कार्यकर्त्यांच्या भावनेला मान देऊन मी हे केले, माझी इच्छा नव्हती.’ कार्यकर्त्यांची भावना काहीही असली, तरी ते नेते आहेत, म्हणजेच कार्यकर्त्यांहून अधिक चांगला विचार ते करू शकले असते. असे असले, तरी लोकेषणा म्हणा अथवा अज्ञान म्हणा राजकारण्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याविषयी काही सांगितले नाही. ‘गुरु’ शब्दाची व्याप्ती जाणून न घेता गुरु-शिष्य परंपरेचा अवमान आणि त्याची टिंगल करण्याचे याहून मोठे उदाहरण असू शकते का ?

 

गुरूंची महती !

अनेक आध्यात्मिक संस्था, संप्रदाय, धार्मिक संघटना गुरुपूजनाचा कार्यक्रम करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. संगीत क्षेत्रातही अनेक ठिकाणी गायक कलाकार त्यांच्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाचे आयोजन करतात; मात्र याला आध्यात्मिक अंग असते. या दिवशी गुरूंचे पाद्यपूजन केले जाते, गुरूंनी देहत्याग केला असेल, तर गुरूंच्या पादुकांचे पूजन विधीपूर्वक केले जाते. या माध्यमातून अंशत: का होईना, शिष्य गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. ‘जे शिष्याला सर्वार्थाने घडवून त्याला ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर गतीमान करतात, शिष्याला ईश्वरस्वरूप करतात, त्या गुरूंची थोरवी किती मोठी आहे ?’ याची कल्पनाही करता येत नाही.

‘गुरु थोर कि देव थोर म्हणावा । नमस्कार आधी कोणा करावा ।
मना माझीया गुरु थोर वाटे । जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ।।

हा श्लोक देव आणि गुरु यांच्याविषयी शिष्याच्या मनातील स्थान व्यक्त करण्यास किती सार्थ आहे, हे लक्षात येते. तसेच ‘देव रागावला, तर गुरु सांभाळून घेतात; मात्र गुरु जर रागावले, तर कुणी काहीच करू शकत नाही. गुरूंनाच शरण जावे लागते’, असे संतवचन आहे. एवढे गुरूंचे महत्त्व आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास गुरु शिष्याकडून योग्य प्रकारे साधना करवून घेऊन त्याला आत्मज्ञान प्रदान करतात, मोक्षप्राप्ती करून देतात, तेच गुरुपदाचे अधिकारी ठरतात. या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण्यांचे जे गुरुपूजन होते, ते पाहिल्यास ‘गुरु-शिष्य परंपरेचा किती मोठ्या प्रमाणात अवमान संबंधितांकडून केला जात आहे ?’, हे लक्षात येते.

 

राजकारणी बनले गुरु !

‘राजकीय पक्षाचा नेता, राजकारणी यांविषयी जनतेच्या मनात किती चीड अथवा घृणा आहे ?’, हे या नेत्यांनी जनतेला जाऊन विचारावे. ४० टक्के मतदान झाल्यानंतर त्यात अधिक मते मिळवणारा राजकारणी हा लोकप्रतिनिधी बनतो, म्हणजे तो सर्व जनतेचा प्रतिनिधी नसतोच मुळी ! सध्या राजकारणात कलंकित लोकांचा भरणा आहे. हे लोक जनतेचे किती भले करतात ? हा कळीचा प्रश्न ! पूर्वीच्या काळी अनेक राज्यांच्या दरबारी राजगुरु असत. ते उच्चकोटीचे संतच असत. त्या काळचे राजे या संतांना गुरुस्थानी मानत. या राजगुरूंची पाद्यपूजा करणे वेगळे आणि राजकारण्यांची पाद्यपूजा करणे वेगळे. गुरु-शिष्य परंपरा हा हिंदु संस्कृतीचा आत्मा आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमा, गुरुपूजन यांना हिंदूंच्या जीवनात अनन्य महत्त्व आहे. राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या अशा कृतींमुळे हिंदु संस्कृतीच्या मूळ गाभ्यालाच धक्का बसतो. सध्याच्या बिकट काळात हिंदूंना दिशादर्शनाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राजकारण्यांची ही कृती हिंदूंची दिशाभूल करणारी आहे.

‘गुरु-शिष्य परंपरा’, ‘गुरु-शिष्य नाते’ हे राजकीय जीवनात, व्यवहारात खालच्या स्तरावर कसे आणले जाते ? व्यक्ती, नेता, कुणी गडगंज श्रीमंत अथवा देशाच्या सर्वाेच्च पदावरील व्यक्ती असली, तरी त्या व्यक्तीला गुरुस्थानी मानणे, गुरुस्थानी मानून तिच्याविषयी कृती करणे, हे धर्माच्या विरुद्ध आचरण आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये अधर्माचरणच आहे, तसेच असे कथित गुरु ‘भोंदू गुरु’ या संज्ञेस पात्र आहेत. अध्यात्मात गुरु प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, शब्दजन्य, शब्दातीत, अनुभूती, आचरण, स्वप्न या विविध माध्यमांतून शिष्याला सतत शिकवत असतात, त्याला त्याच्या सध्या असलेल्या आध्यात्मिक उन्नतीच्या टप्प्यापासून पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील असतात. जेव्हा गुरूंच्या मनात शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी विचार येतो, तेव्हाच शिष्याचे परमकल्याण होते, त्याला आनंदावस्था प्राप्त होते. अशी क्षमता सोडाच, स्थुलातून अशा किती राजकारण्यांचे वागणे आदर्शवत् आहे ? जे स्वत:चे, स्वत:च्या कार्यकर्त्यांचे हित साध्य करून देऊ शकत नाहीत, ते गुरुपूजन, पाद्यपूजन कसे करून घेत आहेत ? पाद्यपूजन करवून घेतलेल्या राजकारण्यांची नावे पाहिली, तर ते सतत या ना त्या गोष्टींमुळे लोकांमध्ये चर्चेत राहिलेले आहेत. काही तर पक्षबदलू आहेत. भारतात कार्यरत भोंदू संत, साधू यांची संख्या पुष्कळ आहे. या राजकारण्यांची गणनाही त्यांच्यातच केली जाईल. भारतीय धर्मग्रंथांनुसार भोंदू गुरु आणि त्यांचे स्वार्थी शिष्य यांची पुढची गती पुष्कळ बिकट असते. लोकांना फसवल्याचे पाप भोंदू गुरूंच्या माथी, तर अपात्राला मोठे केल्याचे पाप तथाकथित शिष्य आणि भक्त यांच्या माथी ! भाविक आणि भक्त यांनी सातत्याने तीव्र निषेध केल्यावरच असे प्रकार थांबून हिंदु धर्माची हानी टळेल, ही आशा !

गुरु शिष्य परंपरेचे अवमूल्यन करणाऱ्या प्रवृत्तींना वैध मार्गाने रोखणे, हे धर्माचरणी हिंदूंचे धर्मकर्तव्यच !

 

 

Leave a Comment