सोलापूर जिल्ह्यात ३ ठिकाणी, तर लातूर, धाराशिव आणि बारामती येथे भावपूर्ण वातावरणात पार पडला सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव !

सोलापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करतांना ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज

गुरुंना आवडणाऱ्या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निश्चय करा ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज

सोलापूर, १४ जुलै (वार्ता.) – गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा. गुरूंना धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण करणे, तसेच धर्माचा प्रसार करणे या गोष्टी प्रिय आहेत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी गुरूंना आवडणार्‍या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निश्चय करा, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने येथील आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात १३ जुलै या दिवशी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.  या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थितांना ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर अवगत केले. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. गुरुपूजन श्री. तुलसीदास चिंताकिंदी आणि सौ. सुजाता चिंताकिंदी या दांपत्याने केले. महोत्सवाला सोलापूर जिल्ह्यातील जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि अकलूज येथे, तर बारामती, धाराशिव आणि लातूर येथेही गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

 

काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करतांना सद्गुरु स्वाती खाडये

भारताचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! आतापर्यंतच्या गुरु- शिष्य परंपरेने काळानुसार आणि आवश्यकतेनुसार राष्ट्र अन् धर्म यांचा प्रचार- प्रसार केला आहे. धर्माला ग्लानी आल्यानंतर गुरु-शिष्य परंपरेनेच समाजाचे रक्षण केले आहे. धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ म्हणजे आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने ऊर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन सद्गुरु स्वाती खाडये यांनी या वेळी केले.

 

वर्तमान प्रतिकूल स्थितीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घ्या ! – भागवताचार्य पद्मनाभ व्यास महाराज

धाराशिव येथील महोत्सवात मार्गदर्शन करतांना भागवताचार्य व्यास महाराज

सर्व ग्रंथांचा अभ्यास केला, तरी जीवनात गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांनीही गुरुकृपेसाठी साधना केली आहे. त्यामुळे गुरूंनी  सांगितल्यानुसार व्यष्टी आणि समष्टी साधना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपले शरीर असूनही रुग्णाईत झाल्यावर वैद्यांकडे जावे लागते, त्याप्रमाणे आपल्या आध्यात्मिक जीवनातील अडचणी अन् अडथळे गुरूंनाच कळतात. वर्तमान प्रतिकूल स्थितीत भारताच्या उन्नतीसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचा लाभ करून घ्यावा, असे प्रतिपादन धाराशिव येथील भागवताचार्य पद्मनाभ व्यास महाराज यांनी केले. धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

गुरु म्हणजे पृथ्वीचे संचलन करणारी प्रचंड शक्ती ! – प्राध्यापक (डॉ.) नाथराव गरजाळे

लातूर येथील महोत्सवात मार्गदर्शन करतांना प्राध्यापक (डॉ.) नाथराव गरजाळे

गुरु म्हणजे पृथ्वीचे संचलन करणारी प्रचंड शक्ती आहे. सर्वप्रथम साधना म्हणजे नामसाधना आहे. त्यामुळे सर्वांनी ‘नामसाधना’ करावी. ईश्वरप्राप्ती करण्यासाठी प्रथम गुरूंना शरण जावे लागते. स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सिद्ध केले, त्याप्रमाणे सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातनच्या साधकांना सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाचे मराठी भाषा आणि साहित्य विभाग प्रमुख प्राध्यापक (डॉ.) नाथराव गरजाळे यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने लातूर येथील श्री बालाजी मंदिर सत्संग भवन येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.

या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. लातूर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये श्री. नंदकिशोर पोतदार आणि सौ. अंजली पोतदार यांनी गुरुपूजन केले.

क्षणचित्रे

१. सोलापूर जिल्ह्यांतील बार्शी, अकलूज, तर लातूर, धाराशिव येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पाऊस असूनही जिज्ञासू उपस्थित राहिले.

२. सोलापूर येथे श्री. आयलेश यल्ला यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली, तसेच कार्यक्रम झाल्यानंतर सभागृहात सर्व साधक सेवा करत असल्याचे पाहून त्यांचे सहकारी स्वत:ही सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

३. सोलापूर येथे मागील १ मासापूर्वी चालू झालेल्या धर्मशिक्षणवर्गातील धर्मपे्रमींनी कार्यक्रमानंतर आवराआवर करण्याची सेवा केली.

४. धाराशिव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गजानन चौगुले यांनी त्यांच्या चारचाकी वाहनातून साधकांना घरी सोडले. नगरसेवक श्री. सोमनाथ गुरव यांनी गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी साहित्य पोचवण्यासाठी वाहन दिले. ‘लव्ह जिहाद’ या विषयाचे ११ ग्रंथ खरेदी केले आणि २०० ग्रंथांची मागणी केली.

अन्य

१. अकलूज येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आणि सौ. सुनिता दीक्षित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येथील गुरुपूजन श्री. विजयकुमार दत्तात्रय देवकर आणि सौ. स्मिता विजय देवकर या दांपत्याने केले, तर पौरोहित्य श्री. संतोष नारायण मुदगलशास्त्री यांनी केले.

२. बारामती (जिल्हा पुणे) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे आणि सनातन संस्थेच्या सौ. प्रमिला ननवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुरुपूजन धर्मप्रेमी श्री. तानाजी मालूसरे आणि सौ. राणी मालूसरे या दांपत्याने केले, तर पौरोहित्य साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. महेश कुलकर्णी यांनी केले.

३. बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि सनातन संस्थेच्या सौ. अंजली बंडेवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुरुपूजन श्री. संजय इंगळे आणि सौ. राधा संजय इंगळे या दांपत्याने केले.

Leave a Comment