सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

 

मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे गुरुच असतात. अशा परम पूजनीय गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा !  याच कृतज्ञताभावात आणि चैतन्यमय वातावरणात सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.

सर्वत्रच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये मान्यवर वक्त्यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या महोत्सवांत स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली. महोत्सवांमध्ये धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शन लावण्यात आले होते.

 

९ भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’

यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली आणि उडिया या ९ भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवही पार पडले. या माध्यमांतून देशभरातील सहस्रो भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.

 

‘इम्पॉर्टन्स ऑफ गुरु’ या ‘ई-बूक’चे प्रकाशन

‘ई-बूक’चे प्रकाशन करताना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ गुरु’ या ‘ई-बूक’चे प्रकाशन करण्यात आले.

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची श्री दत्तगुरूंच्या रूपात पाद्यपूजा

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात झाला सोहळा

फोंडा (गोवा), १३ जुलै (वार्ता.) – गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! या शुभदिनी सनातनच्या साधकांना गुरुदर्शनाची अनमोल पर्वणी लाभली ! सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले. १३ जुलै या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पार पडलेल्या या भक्तीमय महोत्सवात श्री दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पाद्यपूजा करण्यात आली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्री दत्तात्रेय रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पाद्यपूजा केली. संगणकीय प्रणालीद्वारे सनातनच्या सर्वत्रच्या साधकांनी श्री गुरूंच्या या पावन पूजेचा लाभ घेतला.

दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पूजनस्थळी आगमन झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांना मोगर्‍याचा पुष्पहार, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुलाबाच्या फुलांचा पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर चंदनाचे गंध, कुंकू आणि अक्षता अर्पण केल्या. सप्तर्षींनी यापूर्वीच सांगितले आहे की, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे आता ‘सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप’ आहेत. त्यामुळे त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ असे संबोधावे. त्यामुळे या वेळी सप्तर्षींच्या आज्ञेने १०८ वेळा ‘ॐ ऐं क्लिं श्रीं श्रीं श्रीं सच्चिदानंद परब्रह्मणे नमः ।’ हा मंत्रघोष करत श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌‌शक्ति यांनी गुरुदेवांच्या चरणांवर पुष्पे अर्पण केली. या वेळी संगणकीय प्रणालीद्वारे जोडलेल्या सर्वत्रच्या साधकांनीही मंत्रजप करून श्री गुरूंना आळवले. श्री गुरूंचे धूप आणि दीप यांनी औक्षण केल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. या वेळी सामवेदाच्या मंत्रघोषात श्री दत्तगुरूंच्या रूपातील गुरुदेवांची आरती करण्यात आली.

श्री गुरूंच्या पाद्यपूजनातील अनमोल क्षण अंतर्मनात साठवून साधकांनी सनातनच्या गुरुपरंपरेच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली !

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या श्री दत्तगुरूंच्या रूपातील दर्शनाने साधकांना विविध अनुभूती !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिल्यानंतर सोहळ्यात निर्गुण स्तरावरील वातावरण होते. या सोहळ्यात साधकांना ‘मन निर्विचार होणे’, ‘ध्यान लागणे’ अशा विविध उच्च आध्यात्मिक अनुभूती आल्या. सोहळा चालू असतांना साधकांनी निर्गुण स्तरावरील शांतता अनुभवली. सप्तर्षींनीही हा सोहळा निर्गुण स्तरावर झाल्याचे सांगितले. साधकांना श्रीगुरूंच्या दत्तरूपातील दर्शनाचा आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला.

या निमित्ताने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’लाही ‘आध्यात्मिक उन्नतांनी देवतांचे वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर त्यांचा देह अन् वातावरण यांवर काय परिणाम होतो ?’, याचे वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करता आले !

संतांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘अवतार’ संबोधण्याचे कारण !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःला ‘अवतार’ म्हटलेले नाही. सनातन संस्थाही असे कधी म्हणत नाही. ‘नाडीभविष्य’ या प्राचीन अन् प्रगल्भ ज्योतिषशास्त्रानुसार सप्तर्षींनी प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवले आहे. तमिळनाडूतील जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी जीवनाडीपट्ट्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे लिहून ठेवले आहे. सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेने आणि नाडीपट्टीमध्ये सांगितल्यानुसार जन्मोत्सवाच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूच्या रूपात वस्त्रालंकार धारण केले आहेत.

 

Leave a Comment