ईश्वरप्राप्ती होण्यासाठी सनातनच्या साधकांनी भावभक्ती वाढवून गुरुसेवारूपी क्रियमाण वापरावे !
१. साधकांनी भावभक्ती वाढवून गुरुसेवारूपी क्रियमाण
वापरल्यास गुरुदेव प्रसन्न होऊन साधकाला भवसागरातून पार करतील !
पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे. हात-पाय मारणार्या व्यक्तीकडे पाहून लोक तिला साहाय्य करायला येतील. साधकांची स्थितीही पोहायला येत नसलेल्या व्यक्तीसारखी आहे. या भवसागरात बुडालेल्या साधकांना पोहण्याची कला ठाऊक नाही. साधक म्हणतील, ‘मी सनातन संस्थेमध्ये आलो आहे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले मला ईश्वरप्राप्ती करवून देतील.’ सनातन संस्थेमध्ये आलेल्या प्रत्येक साधकाने भावभक्ती वाढवायला हवी आणि गुरुसेवारूपी क्रियमाण वापरायला हवे. तेव्हाच गुरुदेव प्रसन्न होऊन साधकाला या भवसागरातून बाहेर काढतील.
२. साधकांनी ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’,
असा विचार करण्यापेक्षा हनुमंताप्रमाणे अखंड ‘गुरुस्मरण’ करावे !
काही साधक ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, असा विचार करतात. ‘कोणत्या साधकाची प्रगती कधी होणार ?’, हे गुरुदेवांना ज्ञात असते. साधकाची आध्यात्मिक प्रगती झाल्यावर ‘तो साधक कधी संत होणार ?’, हेही गुरुदेवांना ज्ञात असते. गुरुदेव योग्य वेळ येईपर्यंत वाट बघतात. ते घाई-घाईने एखाद्या साधकाला संत घोषित करत नाहीत. गुरुदेव योग्य वेळ आल्यावर त्या त्या साधकाला योग्य ते देतात; म्हणून साधकांनी ‘माझी आध्यात्मिक प्रगती कधी होणार ?’, असा विचार करण्यापेक्षा ‘मी दिवसभरात किती वेळा गुरुदेवांचे स्मरण करतो ?’, याचे चिंतन करून गुरुस्मरण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. हनुमंताने त्याच्या हृदयात श्रीराम आणि सीता यांना स्थापित केले. त्याचप्रमाणे सनातनच्या प्रत्येक साधकाने त्याच्या हृदयात सनातनच्या तिन्ही गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) स्थापित करावे. हनुमंत अखंड श्रीरामाचे स्मरण करत असे. त्याप्रमाणे साधकांनीही अखंड ‘गुरुस्मरण’ करावे.’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडी वाचन क्र. २०४ (१४.६.२०२२))