अनुक्रमणिका
आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांमध्ये ऋषिमुनींच्या आश्रमामध्ये जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगातील सनातनचे आश्रम, सद्गुरु, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे. या लेखात सद्गुरूंच्या सहवासात पशू-पक्षी अनुभवत असलेले निर्भय वातावरण याविषयी संक्षिप्त सूत्रे जाणून घेऊया !
सनातनचे संत सहजावस्थेत असतात. संतपदी विराजमान होऊनही ते सातत्याने शिकण्याच्या स्थितीत असतात, तसेच त्यांची नावे ‘चैतन्यानंद’, ‘स्वामी’ अशा प्रकारची नसल्यामुळे समाजातील व्यक्तींना ‘ते संत आहेत’, हे सहजतेने कळून येत नाही. वस्त्रे, आभूषणे यांसारख्या बाह्य गोष्टींमध्ये अडकलेल्या सामान्य व्यक्तीला जरी संतांचे संतत्व जाणता येत नसले, तरी निसर्ग, सात्त्विक पशू-पक्षी यांना ते जाणता येते. ते संतत्व केवळ जाणतातच, असे नाही, तर त्यांना प्रतिसादही देतात, हेच या उदाहरणांतून लक्षात येते !
१. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या सत्संगाचा लाभ घेणारे सात्त्विक मांजर !
‘सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये कुडाळ सेवाकेंद्रात आल्या असतांना एक मांजराचे पिल्लू आणले होते. मांजर सेवाकेंद्रात आले, तेव्हा त्याला अनेक त्रास व्हायचे. त्याला १ – २ वेळा रुग्णालयातही न्यावे लागले. एकदा सद्गुरु स्वातीताई कुडाळ सेवाकेंद्रातून अन्य ठिकाणी जायला निघतांना त्यांनी मांजरावर सनातनच्या भीमसेनी कापराची पूड टाकली आणि ‘आजारी पडू नकोस हं’, असे त्याला म्हणाल्या. तेव्हा ‘त्यांचा संकल्प झाला’, असे मला वाटले. तेव्हापासून आजपर्यंत मांजर कधीच आजारी पडले नाही किंवा हरवलेही नाही.
ते मांजर आरती चालू असतांना, साधक नामजप करतांना आणि सत्संगाच्या वेळी तेथे येऊन शांतपणे बसते. सद्गुरु ताई सत्संगात बोलत असतांना ते त्यांच्या चरणांजवळ येऊन बसते.’
– कु. वैभवी सुनील भोवर (वय २५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), कुडाळ सेवाकेंद्र, जिल्हा सिंधुदुर्ग. (२.३.२०२२)
२. मुल्की येथील सनातनच्या सेवाकेंद्रात प्रतिदिन येणारा सात्त्विक मोर !
‘सनातनच्या मुल्की येथील सेवाकेंद्रात प्रतिदिन सकाळी एक मोर येतो. तो सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही अल्पाहाराच्या वेळी येतो आणि खायला दिल्यावर जातो. विशेष म्हणजे दिलेल्या खाऊने त्याचे पोट भरले नसेल, तर तो तेथेच थांबून रहातो. त्यावरून आपण समजायचे की, याचे पोट भरलेले नाही. त्याला परत खायला दिल्यावर त्याचे पोट भरले की, तो निघून जातो. आता तो सेवाकेंद्रात आल्यावर कुणी साधक नसल्यास तेथेच थांबून रहातो आणि साधकांनी त्याला खाऊ दिल्यावर निघून जातो. प्रारंभीच्या काळात मोर सेवाकेंद्रात आला की, त्याला खाण्यासाठी लांब ठेवावे लागायचे. आता तो हातातील पदार्थ घेऊन खातो आणि सेवाकेंद्रातील परिसरातही निर्भयपणे फिरतो. कधी-कधी तो सेवाकेंद्रात येतांना सोबत एक-दोन मोरांना घेऊन येतो. इतर दोन मोर हातातील पदार्थ घेऊन खात नाहीत.’
– सद्गुरु सत्यवान कदम, कर्नाटक (२४.६.२०१५)
३. सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सहवासात आनंदी होणारा श्वान ‘हिरा’ !
‘जळगाव सेवाकेंद्राजवळ ‘हिरा’ नावाचे श्वानाचे पिल्लू आहे. सद्गुरु बाबा (सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव) साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले की, ते पिल्लू ‘सद्गुरु बाबांनी त्याला घेऊन जावे’, यासाठी इकडून तिकडे फिरत रहायचे. जेव्हा त्याला समजायचे, ‘मला नेत नाही’, तेव्हा ते लहानसे तोंड करून रुसून बसल्यासारखे करायचे. जेव्हा सद्गुरु बाबा परत यायचे, तेव्हा ते आनंदाने उड्या मारत त्यांच्या जवळ जायचे. त्यालाही ‘त्यांच्यातील चैतन्य जाणवायचे’, असे मला वाटते. काही वेळा ‘हिरा’ हट्टीपणा करतो, तेव्हाही तो त्यांचे ऐकून लगेच शांत होतो.’
– कु. अनुराधा जाधव (सद्गुरु नंदकुमार जाधव यांची मुलगी), फोंडा, गोवा. (२९.५.२०२२)
४. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हातांवर निर्भयपणे विसावलेली खारूताई !
‘ऑगस्ट २०१९ मध्ये वाराणसी आश्रमात एक खारूताई आली होती. ती धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हातावर सहजतेने विसावली. सामान्यतः खार हा चंचल प्राणी आहे; मात्र सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी तिच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला, तरी ती स्थिर राहिली. ती हातावर ज्या पद्धतीने बसली होती, ते पहाता जराही न घाबरता तिथे बसली आहे, हे लक्षात येते.’
– श्री. सोहम् सिंगबाळ (सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा मुलगा) (२९.६.२०२२)