अनुक्रमणिका
- १. जन्म आणि बालपण
- १ अ. जिल्हा स्तरीय कार्यक्रमात कवायत आणि नेमबाजी यांमध्ये पारितोषिक मिळणे
- १ आ. शाळेतील वर्गाच्या अंकाचे दायित्व मिळणे आणि त्या अंकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळणे
- १ इ. बालपणी झालेला त्रास – लहानपणापासून अनावर झोप येत असल्याने अभ्यास लक्षात न रहाणे
- १ ई. घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने लहानपणापासून देवाविषयी आवड निर्माण होणे
- २. शिक्षण
- ३. विवाह
- ४. नोकरी
- ५. देवाच्या कृपेने आई-वडिलांनी कुटुंबाचे दायित्व घेणे
- ६. सनातनच्या माध्यमातून साधना करण्यापूर्वी आलेल्या अनुभूती
- ७. सनातनमध्ये येण्यापूर्वी केलेली साधना
- ८. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ
- ९. केलेल्या विविध सेवा
मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणार्या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा साधनाप्रवास येथे पहाणार आहोत.
१. जन्म आणि बालपण
माझा जन्म १२.१०.१९४९ या दिवशी ओझरे खुर्द (मु.पो. देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथे झाला. माझ्या उजव्या मांडीवर जन्मखूण म्हणून तुळशीचे पान आहे. ‘अशी जन्मखूण असल्यानंतर कुणीतरी पूर्वज जन्माला आलेला आहे’, असे समजत असत.
१ अ. जिल्हा स्तरीय कार्यक्रमात कवायत आणि नेमबाजी यांमध्ये पारितोषिक मिळणे
मी इयत्ता ९ वीमध्ये असतांना ‘होमगार्ड’च्या वतीने प्रत्येक शाळेत प्रशिक्षण असायचे. या प्रशिक्षणातील मुलांचा जिल्हास्तरीय कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित केला होता. तेव्हा कवायत आणि नेमबाजी यांमध्ये मला पारितोषिक मिळाले होते.
१ आ. शाळेतील वर्गाच्या अंकाचे दायित्व मिळणे
आणि त्या अंकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळणे
इयत्ता १० वीत असतांना मी आमच्या वर्गाची हस्तलिखित मंत्री होते. शाळेतील सर्व वर्गांचे अंक प्रसिद्ध व्हायचे. यांमध्ये सर्व मुलांचे लेख, कविता आणि कथा, असे लिखाण असायचे. अंक सिद्ध करण्याचे दायित्व माझ्याकडे होते. मी या अंकामध्ये लेखाच्या खाली मोकळ्या जागेत सुविचार, बोधप्रद वचने, चित्रे इत्यादी स्वतः सिद्ध केले होते. अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र काढून अंकाची रचना मीच सिद्ध केली होती. या अंकाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
१ इ. बालपणी झालेला त्रास – लहानपणापासून
अनावर झोप येत असल्याने अभ्यास लक्षात न रहाणे
लहानपणापासून मला अनावर झोप येत असे. शाळेत गेल्यानंतरही झोपेमुळे माझे डोळे तारवटलेले दिसत असत. त्यामुळे शाळेत शिकवलेला आणि मी केलेला अभ्यास माझ्या लक्षात रहात नसे.
१ ई. घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने
लहानपणापासून देवाविषयी आवड निर्माण होणे
माझ्या आई-वडिलांना ((कै.) दमयंती एकनाथ जागुष्टे आणि (कै.) एकनाथ शंकर जागुष्टे यांना) देवभक्तीची आवड होती. आमच्याकडे वर्षातील सर्व सण शास्त्रीय पद्धतीने साजरे व्हायचे. त्यामध्ये माझ्या आईचा पुढाकार असायचा. ती प्रतिवर्षी श्रावण मासापासून गणपति विसर्जनापर्यंत गणपतीला १ लाख दूर्वा वहायची. माझे वडील गुरुचरित्राचे पारायण करायचे. त्यांची गणपतीवर अधिक श्रद्धा होती. आम्ही सर्व भावंडे सायंकाळी एकत्र बसून स्तोत्रे म्हणायचो.
२. शिक्षण
माझे मॅट्रिकपर्यंतचे (जुन्या ११ वीपर्यंतचे) शिक्षण विशेष परिश्रम न घेता पूर्ण झाले.
३. विवाह
माझा विवाह १६.१२.१९६८ या दिवशी रमेश तुकाराम शेट्ये यांच्याशी झाला.
४. नोकरी
४.अ. प्रामाणिकपणे नोकरी करणे
४.अ.१. मी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक म्हणून नोकरी करत होते. त्या वेळी अधिकोषातून आम्हाला कार्यालयीन कामाच्या लिखाणासाठी पेनची रिफिल मिळत असे. तिचा उपयोग मी केवळ कार्यालयीन कामासाठीच करत होते.
४.अ.२. मला अनेकदा अधिकोषात जायला ५ – १० मिनिटे उशीर होत असे. त्यामुळे मी सायंकाळी कामाची वेळ संपल्यावरही माझे नेहमीचे काम पूर्ण होईपर्यंत अधिकोषात थांबत असे.
४.अ.३. ‘मी प्रतिदिन अधिक वेळ केलेल्या कामाचा मला लाभ मिळावा’, असे मला कधीही वाटले नाही.
४.अ.४. अधिकोषातील कर्मचारी आणि अधिकोषात येणार्या बाहेरील व्यक्ती यांना मी पूर्णपणे सहकार्य करत असे.
४.अ.५. अधिकोषात गहाण ठेवलेल्या दागिन्यांचा लिलाव होत असे. लिलावातले दागिने मी कधीही घेतले नाहीत.
४.अ.६. मी अधिकोषात काही मास ‘शाखाधिकारी’ या पदावर काम करत होते; परंतु मी शाखाधिकार्याच्या कक्षात (‘केबिन’मध्ये) न बसता बाहेर बसून लिपिकाची कामे करत असे.
४ आ. नोकरी करत असतांना झोपेच्या तीव्र त्रासामुळे अडचण निर्माण होणे
मी नोकरीवर असतांना मला झोपेचा तीव्र त्रास होत असे. त्यामुळे मी सतत गोंधळलेल्या स्थितीत असायचे. एकदा ‘काऊंटर’वर बसून बेरीज करत असतांना मला झोप लागली. हे शाखाधिकार्यांनी पाहिले. त्यांनी मला बोलावून विचारले, ‘‘शेट्येबाई, तुम्ही आता काय करत होता ?’’ त्या वेळी ‘मी काय करत होते ?’, हे न आठवल्याने मला सांगता येईना. थोड्या वेळाने त्यांनी मला जाण्यास सांगितले. मी माझ्या जागेवर बसल्यावर बेरीज करत असल्याचे माझ्या लक्षात आले.
४ इ. देवाच्या कृपेने सहकार्यांनी साहाय्य करणे
अधिकोषाच्या कामाची वेळ संपल्यानंतर माझे दिवसभराचे राहिलेले काम त्याच दिवशी पूर्ण करण्यासाठी सर्व कारकून आणि शाखाधिकारी मला साहाय्य करायचे. असे प्रसंग वारंवार घडायचे. ‘नोकरीच्या काळात मी या लोकांच्या सहकार्यामुळेच नोकरी करू शकले’, ही देवाची कृपाच होय.
५. देवाच्या कृपेने आई-वडिलांनी कुटुंबाचे दायित्व घेणे
माझ्या मुलांना (श्री. राजेश आणि श्री. मंदार यांना) लहानपणापासून मुलांचे आजी-आजोबा ((कै.) नीला सुरेंद्र जागुष्टे अन् श्री. सुरेंद्र एकनाथ जागुष्टे (वय ७० वर्षे)) आणि मामा-मामी (श्री. वैजनाथ एकनाथ जागुष्टे अन् सौ. उमा वैजनाथ जागुष्टे) सांभाळत असत. त्यामुळे माझ्याकडे कुटुंबाचे दायित्व नव्हते. आई-वडिलांच्या माध्यमातून देवच आम्हाला सांभाळत होता.
६. सनातनच्या माध्यमातून साधना करण्यापूर्वी आलेल्या अनुभूती
६ अ. प्रवास करतांना देवाच्या कृपेने मोठ्या अपघातातून वाचणे
आम्ही ११ जण सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे गेलो होतो. तेथून परत येतांना आमच्या वाहनाला समोरून येणाऱ्या एस्.टी.ची धडक बसली. आमचे वाहन दोन पलट्या घेऊन एका झुडपावर अडकले. त्याच्यापुढे मोठा उतार होता. त्या वेळी १ – २ जणांना केवळ खरचटले. त्या वेळी ‘आम्ही देवाची विशेष अशी कोणतीही साधना करत नसतांनाही त्याचे आमच्यावर लक्ष आहे’, असे मला जाणवले.
६ आ. स्वप्नामध्ये मुलगा झोके घेत असतांना अडकून पडल्याचे
दिसणे, शिवलीलामृताचे वाचन केल्यावर तो पूर्ववत् होणे, प्रत्यक्षातही मुलाच्या
हातावर फोड आलेले दिसणे आणि तेव्हापासून शिवलीलामृत वाचण्यास आरंभ करणे
मी नोकरीनिमित्त चिपळूण येथे होते आणि माझी मुले देवरुख येथे होती. एकदा गुरुवारी पहाटे मला पुढील स्वप्न पडले, ‘माझा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मंदार आडव्या दांडीला हातांनी धरून लटकून पुढे-मागे झोके घेत होता. त्या वेळी तो अकस्मात् दांडी धरलेल्या स्थितीत निश्चल थांबला. त्याच्या शरिराची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्याच्याशी खेळणारी मुले मला सांगायला आली. मी त्याला बघायला गेल्यानंतरही मुलगा त्याच स्थितीत स्तब्ध होता. त्या वेळी मला आतूनच आवाज आला, ‘शिवलीलामृताचा ११ वा अध्याय वाच.’ मी स्वप्नातच तो अध्याय वाचला. वाचन पूर्ण झाल्यावर मुलगा पूर्वस्थितीला आला.’ दुसऱ्या दिवशी मी गावाला जाऊन पाहिले. तेव्हा मुलाच्या हातावर फोड आलेले दिसले. तेव्हापासून मी प्रतिदिन शिवलीलामृत वाचू लागले.
७. सनातनमध्ये येण्यापूर्वी केलेली साधना
मी दत्त आणि श्री स्वामी समर्थ यांची उपासना करत असे, तसेच प्रत्येक गुरुवारी उपवास अन् स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे.
८. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ
८ अ. सत्संगाला जाणे आणि नामस्मरण चालू करणे
वर्ष १९९५ मध्ये आमच्या अधिकोषामध्ये ७१ दिवस संप चालू होता. त्या कालावधीत रत्नागिरी येथील साधक डॉ. चंद्रशेखर प्रसादी आणि सौ. शीतल प्रसादी सनातनच्या प्रसारकार्यासाठी यायचे. त्या वेळी मी सत्संगाला जाऊ लागले आणि नामस्मरण चालू केले.
८ आ. देवरुख येथील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर
प्रवचनाच्या वेळी त्यांना टिळा लावण्याच्या सेवेतून आनंद मिळणे
देवरुख येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जाहीर प्रवचन होते. या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांना टिळा लावण्याची सेवा माझ्याकडे होती. त्या वेळी मला त्यांचे जवळून दर्शन झाले. त्या वेळची माझी स्थिती मला आठवत नाही; परंतु माझ्या मनाला आनंद मिळाला. परात्पर गुरु डॉक्टरांवर आधीपासूनच माझी श्रद्धा होती.
८ इ. कुलदेवतेचे नामस्मरण करतांना आरंभी विकल्प येणे;
परंतु त्यानंतर निश्चय करून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे
पूर्वी मी स्वामी समर्थांची भक्ती करत असल्यामुळे सनातनच्या सत्संगात सांगितल्याप्रमाणे कुलदेवतेचे नामस्मरण करण्यासाठी ६ मास लागले. कुलदेवतेच्या नामस्मरणाला आरंभ केल्यावर ‘हे योग्य आहे का ?’, याविषयी माझ्या मनात विकल्प येत राहिले. त्यानंतर ठाम निश्चय करून मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला.
९. केलेल्या विविध सेवा
९ अ. अधिकोषातील सहसाधिकेच्या समवेत विविध सेवा करणे
मी नोकरी करत असलेल्या अधिकोषात माझ्या सहकारी आणि साधिका श्रीमती सुजाता सावंत होत्या. कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतर आम्ही दोघीही सेवेसाठी बाहेर पडायचो. तेव्हा आम्ही ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अर्पण मिळवणे, विज्ञापन घेणे, संपर्क करणे’ इत्यादी सेवा करायचो. त्या वेळी माझ्याकडे बोलण्याचे कौशल्य नव्हते. त्यासाठी श्रीमती सुजाता सावंत यांनी मला साहाय्य केले.
९ आ. तपोधाम येथे राहून विविध सेवा करणे
मी तपोधाम येथे येऊन १० वर्षे झाली. सध्या येथे मी, श्री. मेघश्याम आंबेकरकाका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि सौ. कल्पना चव्हाणकाकू, असे ३ साधक आहोत. साधना किंवा सेवा यांविषयी कुठल्याही अडचणी आल्या, तर आम्ही एकमेकांना विचारतो आणि नियोजन करतो. आम्ही ‘आंब्यांवर फवारणी करणे, आंबे गोळा करणे, ते खोक्यात भरून इतर आश्रमांत पाठवणे, काजूच्या बिया गोळा करून पाठवणे, चिकू आणि लिंबे काढून पाठवणे’ इत्यादी सेवा करतो. आम्ही ‘स्वरक्षण प्रशिक्षण, प्राणायाम, नामजपादी उपाय’, इत्यादींचे गांभीर्य एकमेकांच्या लक्षात आणून देतो.
– (पू.) श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे), देवरुख, रत्नागिरी. (७.३.२०२२)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भाग २
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |