आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.
मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया. यातून बोध घेऊन मातृभाषा मराठीला वाचवण्यासाठीची कृतीच्या स्तरावरील आपली तळमळ जागृक होवो हीच श्रीगुरुचरणी प्रार्थना !
मराठीवरील प्रथम संकट फारसी आणि उर्दूचे
‘ख्रिस्ताब्द १३१८ मध्ये २०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या देवगिरीच्या साम्राज्याचा पाडाव झाला आणि महाराष्ट्राच्या वैभवसूर्याला ग्रहण लागले. स्थापन झालेल्या मुसलमानी राज्यात हिंदूंना आणि त्यांच्या धर्माला काहीच स्थान नसल्याने संस्कृत अन् मराठी यांचा बहुमानही सीमापार झाला. या भाषांचे स्थान फारसीने घेतले. मुसलमानांकडे काम (चाकरी) मिळावे; म्हणून सर्वजण फारसीचा अभ्यास करू लागले. स्वभाषेचा अभिमान संपल्यामुळे अस्मितेचेही ‘फारसीकरण’ होऊ लागले. हिंमतराव, जानराव, शरीफजी अशी नावे मुलांना ठेवण्यात येऊ लागली. अर्जदारांच्या ‘फिर्यादी’ ‘काजी’कडे जाऊन त्याचा ‘फैसला’ होऊ लागला. खाना, दरवाजा, सराई, इमारत, झनाना, महाल, दिवाणखाना, हौद, रंगमहाल, जमीन, कसम, फवारा, बुरूज, बेशक, बेलाशक, वाहवा, अफसोस, शाब्बास, उर्फ, बेमालूम, बरखास्त, इसम, हद्द, हवा, मुलूख, तयार, शिवाय, हयात इत्यादी शेकडो शब्द ओळखू न येण्याइतपत मराठीत घुसले ! उत्तरेत तर हिंदी भाषेत अरबी अन् फारसी प्रयोगांची, तसेच नाम आणि विशेषण यांची भर पडून विकृत हिंदी अस्तित्वात आली. तिला ‘उर्दू’ हे नाव मिळाले. हीच स्थिती अल्लाउद्दीन खिलजी दक्षिणेत आल्यानंतर दाक्षिणात्य हिंदु भाषेची झाली असती.’ – प्रा. श.श्री. पुराणिक (मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर – उत्तरार्ध)
औरंगजेबाने महाराष्ट्रातील गड आणि गावे यांची हिंदु नावे पालटून त्या ठिकाणी मुसलमानी पद्धतीची नावे ठेवण्यामागचा दुष्ट हेतू
‘औरंगजेब मराठ्यांचे गड आणि गावे घेऊनच थांबला नाही, तर त्याने त्यांची मूळची हिंदु नावे पूर्णपणे पालटून (बदलून) टाकली. त्या ठिकाणांना त्याने मुसलमानी पद्धतीची नावे दिली. त्याने परळीचा नौरसतारा, सातार्याचा अजीमतारा, पन्हाळ्याचा नबीशहादुर्ग, पावनगडचा बनीशाहदुर्ग, खेळण्याचा सखरलाना, सिंहगडचा बख्शिंदाबख्श, पुरंदरचा आजमगड, तोरण्याचा फत्-उल्-घलीब, रायगडचा इस्लामगड, वसंतगडचा किली-द-फतेह, पुण्याचे मुहियाबाद, खेडचे मुकसदाबाद, वाकिणखेड्याचे रहमानबख्शखेडा करून टाकले.
औरंगजेब हा पराकाष्ठेचा हिंदुद्वेषी मनुष्य होता. ‘एका नावाच्या ठिकाणी दुसरे नाव ठेवणे, हा केवळ रिकामटेकडा उद्योग आहे’, असे त्याला वाटले असते, तर त्या कामात त्याने त्याचा बहुमोल वेळ मुळीच खर्च केला नसता. ‘नावात काय आहे’, असे शहाणे लोक म्हणोत; पण यापेक्षा ‘नावात काय नाही’, असेच विचारणे जास्त योग्य होईल. देश, गाव, नदी, माणूस आणि देव यांच्या नावात येथील संस्कृती, धर्म आणि अस्मिता यांचे सारसर्वस्व भरलेले आहे. औरंगजेबाला हे माहीत होते आणि (‘नावात काय आहे’, असे विचारणार्या) त्या तथाकथित शहाण्यांपेक्षा तो जास्त शहाणा होता; म्हणूनच वेळात वेळ काढून आणि बारीक विवरणात (तपशीलात) शिरून त्याने नावे पालटण्याचा खटाटोप या उद्देशाने केला की, हिंदुत्वाचे नावसुद्धा या भूमीत शिल्लक राहू नये. औरंगजेबाच्या आक्रमणाच्या या स्वरूपाबद्दल मराठ्यांना कसलाही भ्रम नव्हता.’
– प्रा. श.श्री. पुराणिक (मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर – उत्तरार्ध)
ख्रिस्ताब्द १८३५ नंतर मराठी दुय्यम स्थानावर !
‘ख्रिस्ताब्द १८१८ पासून महाराष्ट्रावर इंग्रजांचे राज्य सुरू झाले. मुंबई प्रांताचा पहिला गोरा प्रशासक असलेल्या एल्फीन्स्टनच्या सत्ताकालात महाराष्ट्रात (तत्कालीन मुंबई प्रांतात) सर्व विषयांचे शिक्षण मराठीतूनच सुरू झाले होते. विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयांची शालेय पुस्तकेही मराठीत लिहून घेण्यात आली होती. ज्ञान-विज्ञानातील अन्य इंग्रजी ग्रंथांचे भाषांतरही मराठीत करवून घेतले गेले. पुढे १८३५ मध्ये मेकॉलेने केलेल्या सूचनेनुसार हिंदुस्थानचा महाराज्यपाल बेंटींगने एक आदेश काढला. त्यानुसार सर्वच क्षेत्रांतील कामकाज आणि शिक्षण इंग्रजीतून होऊ लागले. उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले. न्यायालये आणि कार्यालये यांची भाषा इंग्रजी झाली. त्यांचे न्याय-निर्णयही इंग्रजीतून होऊ लागले. त्यामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले आणि महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होऊ लागली. संस्कृत आणि मराठी पंडितांना इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. इंग्रजी शिकणार्यांना काम (नोकरी) मिळू लागले. शासनाशी संबंध ठेवण्यासाठी जनतेलाच इंग्रजीची आवश्यकता वाटू लागली. इंग्रजी बोलणे आणि लिहिणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाऊ लागले. ‘इंग्रजीविना आपला अभ्युदय होऊच शकणार नाही’, ही भावना दृढमूल होत गेली आणि मराठीला गौणत्व आले; म्हणजे एका अर्थाने इंग्रजीचे मानसिक दास्यत्वच आपण स्वीकारले.’
दैनंदिन जीवनात परकीय शब्दांचा सहजतेने वापर
‘दैनंदिन जीवनात आपण परकीय शब्द इतके सहजतेने वापरतो की, ते शब्द परकीय आहेत, याचीही आपल्याला जाणीव नसते. ‘मालक’ हा शब्द परकीय असून तो ‘मालिक’ या शब्दापासून बनलेला आहे. त्यासाठी मराठीमध्ये ‘धनी, स्वामी, प्रभू’ असे शब्द आहेत. तसेच आपल्या नित्य वापरात असलेला ‘जखमी’ हा शब्दही परकीय असून त्यासाठी ‘घायाळ, आहत’ हे योग्य मराठी शब्द आहेत. असे शेकडो परकीय शब्द आपल्या मराठी भाषेत इतके प्रबळ होऊन बसले आहेत की, त्याच अर्थाचे पूर्वीचे मराठी शब्द आहेत, याचा मागमूसही राहिलेला नाही. हे पंगुपण घालवून मराठी भाषेचे शुद्धीकरण करणे आणि भाषेला पुनरुज्जीवन देण्यासाठी झटणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.’ – स्वा. सावरकर
‘रस्त्यावरून जातांना ठेच लागली, तर `आई गं’ असे कळवळणारा मराठी माणूस आज कुठे आहे ? तो `ओ-द-हेल’ असे किंचाळतो. जरा कुठे आश्चर्य वाटले तर `माय गॉड’ म्हणतो. कंडक्टर `वन हाफ टू फुल’ सांगतो. फळे विकणारा भाजीवाला म्हणतो, “साहेब, आता बिझनेस उरला नाही.’’ आमच्या लग्नात, समारंभात, महाशिवरात्रीलादेखील टेबल डिनर, तंदुरी डिनर, कॅंडल डिनर, डेझर्ट डिनर यांना प्राधान्य आले आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
नव्या पिढीस मराठी बोलतांना घरीदारी, पेठेत सहजासहजी इंग्रजी शब्द घुसडण्याची घातक खोड जडणे
‘शुद्ध मराठीचा सक्रिय अवलंब करण्याचा यत्न जसा पूर्वी होत असे, तसा आजकाल मुळीच होत नसून शाळा आणि विद्यापिठे यांतील होतकरू तरुण पिढीची स्थिती तर शोचनीय होत चाललेली आहे. या दहा-बारा वर्षांत या विषयावर कटाक्ष ठेवून सरमिसळ मराठी बोलण्यावर कोरडे ओढणारा एखादा विष्णूशास्त्र्यांचा शिष्य उत्पन्न न झाल्याने तरुण नव्या पिढीस मराठी बोलतांना घरीदारी, पेठेत (बाजारी) सहजासहजी इंग्रजी शब्द घुसडण्याची घातक खोड इतकी जडली आहे की, इंग्रजी चवथ्या-पाचव्या इयत्तेतील मुलांसही ती सोडता सोडणे कठीण झाल्याचे आम्ही पहात आहोत.
लाला हरदयाळांसारखे इंग्रजी भाषेतील पारंगत स्वीडनमधूनही पत्रे शुद्ध हिंदीतच लिहीत. येथील शाळेतील पाचशे इंग्रजी शब्दही पुरे न येणारी सहावी-सातवीतली मुले ‘मी पेपर हँड ओव्हर केला, तेव्हा माझे हेडेक होत होते !’ म्हणून अर्वाच्य भकतांना ऐकू येतात. ‘फादर, मदर, वाईफ’ हे शब्द अगदी नियमाने विद्यार्थी आपसात किंवा श्रेष्ठांशी बोलत असतांना प्रौढपणाचे निर्देशक समजून वापरतात आणि त्यास यत्किंचित दूषण न देता ऐकून घेतात. मोठ्या माणसांची गोष्ट तर याहूनही तिरस्करणीय झाली आहे. आम्ही अक्षरशः एका प्रमुख गृहस्थास असे बोलतांना आजकालच ऐकले आहे की, ‘त्याने जी पोझिशन अॅश्युम केली, ती ओरिजनलीच फॉल्स होती!’ अशी हास्यास्पद शेकडो उदाहरणे देता येतील.
लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – “मराठीवरील आक्रमणे (भाग २)“