अनुक्रमणिका
- १. अनुभव आणि अनुभूती यांच्यातील फरक
- २. अनुभूतींचे महत्त्व
- ३. एकाच तर्हेच्या अनुभूतींची उदाहरणे देण्याचे महत्त्व
- ४. अनुभूतींची मर्यादा
- ५. साधना करूनही अनुभूती न येणे
- ६. व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती
- ७. अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून
- ८. ईश्वराप्रती असलेल्या भावामुळेच जिवाला अनुभूती येणे
- ९. भावामुळे ईश्वर एखाद्याच्या माध्यमाद्वारे अनुभूती देणे
१. अनुभव आणि अनुभूती यांच्यातील फरक
१ अ. अनुभव शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ
अनुभव हा शब्द अनु ± भव या दोन शब्दांपासून बनला आहे. अनु म्हणजे तत्सदृश व भव म्हणजे होणे किंवा बनणे. याचाच अर्थ ‘ज्या वस्तूचा अनुभव घ्यायचा, तिच्याशी वृत्ती तद्रूप होणे’ असा आहे.
१ आ. व्याख्या
‘स्मृतिभिन्नं ज्ञानम्’ म्हणजे स्मृतीहून भिन्न असे ज्ञान म्हणजे अनुभव होय (तैत्तिरीय संहिता). आंब्याची स्मृती (आठवण) होऊन त्याची चव आठवणे याला अनुभव म्हणत नाहीत. आंबा प्रत्यक्ष खातांना जी चव लागते तिला अनुभव म्हणतात.
१ इ. प्रकार
१. यथार्थ : इंद्रिये, मन आणि/किंवा बुद्धी यांनी प्रत्यक्ष अनुभव घेणे.
२. अयथार्थ : संशय, विपर्यय व तर्क हे याचे प्रकार होत. दोरीच्या जागी साप अनुभवणे हा विपर्यय झाला.
१ ई. अनुभव कसा येतो ?
बुद्धीवृत्ती विषयानुरूप बनणे म्हणजे अनुभव, असे पातंजल योगशास्त्राचे मत आहे. पाटाचे पाणी शेतात गेले म्हणजे ते शेताचा तुकडा चौकोनी, त्रिकोणी असेल त्याप्रमाणे चौकोनी, त्रिकोणी बनते. तद्वत् इंद्रियांच्या पन्हाळीतून अंतःकरण बाहेर जाते आणि त्या त्या विषयानुरूप बनते. यामुळे अनुभव येतो.
१ उ. अनुभव व अनुभूतीतील फरक
पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी या स्थूल इंद्रियांद्वारे जीवाला येणार्या संवेदनांना अनुभव म्हणतात. याला ‘स्थूलातील कळणे’ असे म्हणतात. उदबत्ती लावलेली असतांना नाकाद्वारे तिचा गंध येणे याला अनुभव म्हणतात, तर उदबत्ती लावलेली नसतांना नाकाच्या वापराशिवाय गंध येणे, याला अनुभूती म्हणतात.
काही अनुभूती पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारा, तर काही अनुभूती या माध्यमांशिवाय जीवात्मा आणि शिवात्मा यांना येतात. एखाद्या अनुभवाच्या मागचा कार्यकारणभाव न समजल्यास त्यालाही अनुभूती म्हणतात, उदा. बाह्य कारणाशिवाय एखादी वस्तू हालतांना स्थूल डोळ्यांना दिसणे. अशा तर्हेच्या अनुभूती बर्याच जणांना एकाच वेळी येऊ शकतात. अद्वैताची अनुभूती शिवदशेत येते.
‘प्रत्यक्षात्मकं ज्ञानम्’ · साक्षात्कारः (न्यायमंजिरी).
अर्थ : स्वतःचे खरे रूप जाणणे प्रत्यक्ष असते. आत्मानुभवाचे शब्दाने वर्णन करणे म्हणजे ते आत्म्याचे अप्रत्यक्ष ज्ञान होय. त्याला परोक्षानुभूती म्हणतात. तिच्यामुळे आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकडे प्रवृत्ती होते. आत्म्याशी एकरूप होऊन होणारे ज्ञान हे साक्षात् अनुभवरूप असल्यामुळे त्याला अपरोक्षानुभूती असे म्हणतात.’
२. अनुभूतींचे महत्त्व
२ अ. प्रगतीची जाणीव होणे
अनुभूतींमुळे आपण योग्य साधना करीत आहोत आणि आपली अध्यात्मात प्रगती होत आहे, याची साधकाला खात्री पटते. एखाद्या साधनामार्गाने साधना करीत असता सलग तीन वर्षे ती साधना करूनही एकही अनुभूती न आल्यास आपला साधनामार्ग चुकीचा तर नाही ना, याची उन्नतांना विचारून खात्री करून घ्यावी.
२ आ. अध्यात्माच्या तात्त्विक भागाबद्दल विश्वास व श्रद्धा निर्माण होणे
सनातन संस्थेतर्फे ‘अध्यात्मशास्त्र’ या विषयाची तात्त्विक माहिती देणारे बरेच ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यांच्या आधारे संस्थेतर्फे ठिकठिकाणी प्रवचने, सत्संग आणि अभ्यासवर्ग घेतले जातात. त्या तात्त्विक माहितीच्या आधारे साधना करणारे आध्यात्मिक उन्नती करतात. त्यांना अनुभूती येतात. नुसत्या तात्त्विक माहितीने जिज्ञासूंचा अध्यात्मावर फक्त विश्वास बसतो, तर साधकांच्या अनुभूती ऐकून त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण व्हायला मदत होते. यासाठी सत्संगात अनुभूतींविषयी चर्चा होते. सनातन संस्थेच्या एका सत्संगाला प्रथमच आलेल्या एका जिज्ञासूंना साधकांच्या अनुभूती ऐकून वाटले की, त्यांना हे सर्व भास होत असावेत. असे वाटण्याचे कारण सांगतांना ते म्हणाले, ‘‘मी इतकी वर्षे साधना करतो; पण मला एकही अनुभूती आलेली नाही. यांना काही महिन्यांत कशा अनुभूती येतील ? अनुभूती येण्यासाठी शरीर झिजवावे लागते.’’ त्यांच्या हे लक्षात आले नव्हते की, साधना अयोग्य असली तर प्राण गेला तरी अनुभूती येणार नाही आणि योग्य असली तर अनुभूती लवकर येतात. सत्संग घेणार्याने त्यांना एवढेच सांगितले की, तुम्ही फक्त कुलदेवीचे नामस्मरण सुरू करा. सहा महिन्यांनी तुम्हीच काय ते सांगा. सहा महिने काय, सहाव्या आठवड्यातच त्यांना सूक्ष्म गंधाची अनुभूती आली. मग त्यांचा दृष्टीकोन आणि साधना बदलली. अनुभूतींमुळे तात्त्विक माहिती ही नुसती माहिती नसून माहितीत सांगितलेले साधनेने खरोखरच साध्य होऊ शकते, हे सत्संगात येणार्यांच्या लक्षात येते.
२ इ. ईश्वराचे मोठेपण मनावर ठसून अहंभाव कमी होणे
ईश्वर ज्या विविध तर्हेच्या अनुभूती साधकांना देतो, त्या पाहून मन अक्षरशः थक्क होते. ईश्वराइतके सामर्थ्य आपल्याला ईश्वराने दिले, तरी त्याच्याइतकी निरनिराळ्या तर्हेने अनुभूती द्यायची कल्पनातीत कल्पकता आपल्यात नसल्याने साधकातील श्रद्धा वाढवायला आपण त्यासामर्थ्याचा उपयोग करू शकणार नाही, हे समजल्यामुळेही साधकातील अहंभाव कमी व्हायला मदत होते.
३. एकाच तर्हेच्या अनुभूतींची उदाहरणे देण्याचे महत्त्व
अ. एखाद्याला एखाद्या तर्हेची अनुभूती आली आणि तशी दुसर्या कोणाला कधीच आली नाही, तर तिच्याबद्दल कोणाला शंका येऊ शकत; मात्र तशाच तर्हेची अनुभूती बर्याच जणांना आली तर तिच्यावर विश्वास बसतो व त्यामागे काहीतरी शास्त्र असावे, असे वाटायला लागते. मग ती व्यक्ती अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करण्याची शक्यता असते.
आ. एखादा मुद्दा मनावर बिंबविण्यासाठी पुनःपुन्हा सांगतात, हा उद्देशही या उदाहरणांमागे आहे.
४. अनुभूतींची मर्यादा
अनुभूती आलेल्यांपैकी ३० प्रतिशत लोक साधना करणे किंवा सत्संगाला जाणे बंद करतात; कारण अनुभूतींनी ‘मला अध्यात्मात उन्नती करून या जन्माचे सार्थक करायचे आहे’, असा बुद्धीचा निश्चय व्हायला फारशी मदत होत नाही, त्यासाठी अध्यात्माचा अभ्यासच हवा.
५. साधना करूनही अनुभूती न येणे
साधना करूनही अनुभूती न येणे याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. अध्यात्मात उन्नती व्हायला लागली की बहुधा अनुभूती यायला लागतात. एखादा साधक साधना करायला लागल्यावर त्याची उन्नती लगेच व्हायला लागेल, असे नसते. याचे कारण असे की, त्याच्या प्रारब्धात किंवा संचित कर्मात जर तीव्रतेचे काही वाईट असेल, तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काही साधना वापरली जाते. यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्याला अनुभूती येत नाही.
आ. एखाद्याची श्रद्धा डळमळायला लागली, तर ती बळकट करण्यासाठी ईश्वर त्याला अनुभूती देतो. श्रद्धा बळकट असली, तर अनुभूतीची आवश्यकता नसते. सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांना १९९३ सालापासून १९९५ मधील गुरूंच्या देहत्यागाच्या वेळीही ‘आनंद’ सोडून एकही निराळी अनुभूती आलेली नाही.
६. व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती
एखाद्याला आलेली एक विशिष्ट अनुभूती दुसर्याला बहुधा तशीच्या तशी न येणे कोणत्या तर्हेच्या अनुभूतीमुळे कोणाची श्रद्धा वाढायला मदत होईल, हे प्रत्येकात निरनिराळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाची प्रकृती आणि पातळी निरनिराळी असल्याने प्रत्येकाला निरनिराळ्या तर्हेच्या अनुभूती येतात, उदा. कोणाला सूक्ष्म गंधाची येईल, तर कोणाला सूक्ष्म दर्शनाची. थोडक्यात म्हणजे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती’ असे आहे.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘साधकांच्या अनुभूती खंड-३’
अनुभूती का येते ? याचे शास्त्र सांगणारे ज्ञान !
७. अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून
‘अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून असते. जसा भाव, तशी अनुभूती. समोरच्या उन्नतांची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी साधकाचा भाव जेवढा असेल, त्या प्रमाणातच अनुभूतीचे मापन होते.’
– ब्रह्मर्षि (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.१२.२००३)
८. ईश्वराप्रती असलेल्या भावामुळेच जिवाला अनुभूती येणे
‘भावऊर्जा म्हणजे जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे कार्यरत झालेला मनःशक्तीचा वेग. जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावावरच मनाचा वेग अवलंबून असतो. मनाचा वेग जेवढा जास्त, तेवढी जिवाला अल्प कालावधीत अनुभूतीची जाणीव होते. ईश्वराप्रती असलेल्या भावामुळेच जिवाला अनुभूती येते. या भावऊर्जेच्या बळावरच अनुभूतीच्या जाणिवेचा कालावधी ठरतो.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१०.२००४)
९. भावामुळे ईश्वर एखाद्याच्या माध्यमाद्वारे अनुभूती देणे
‘एखादे माध्यम पात्र नाही; पण जिवाची श्रद्धा अन् भाव त्या माध्यमावर अवलंबून आहे असे असते, तेव्हा ईश्वर त्या माध्यमातूनही अनुभूती देतो. जिवाची सर्वाधिक श्रद्धा आणि भाव ज्याच्यावर आहे, त्याचे रूप घेऊन देवता अनुभूती देतात; म्हणून बहुतांश सनातनच्या साधकांना प.पू. डॉक्टरांच्या रूपात अनुभूती येतात.’
– ब्रह्मर्षि (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून, २५.८.२००३ आणि ९.९.२००३)