अनुक्रमणिका
- १. आधीचा आहार पचलेला नसतांना लागलेली भूक ही खोटी !
- २. भूक लागण्यापूर्वी खाणे हानीकारक !
- ३. उठल्यावर शरिरात क्लेद शिल्लक असल्याने लगेच घेतलेले पेय किंवा आहार न पचता दूषित बनतो !
- ४. आदल्या दिवशीचा आहार पचल्याची लक्षणे
- ५. जेवणाचे प्रमाण ठरवण्यामध्ये तृप्तीचे महत्त्व !
- ६. प्रमाणापेक्षा अधिक जेवल्याने होणारी हानी !
- ७. सायंकाळच्या जेवणानंतर रात्री झोपेपर्यंत भूक लागल्यास काय करावे ?
- ८. जेवण योग्य प्रमाणात झाल्याचे लक्षण !
- ९. जेवणाचे योग्य प्रमाण !
आयुर्वेद काय सांगतो ?
१. आधीचा आहार पचलेला नसतांना लागलेली भूक ही खोटी !
काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.
खोटी भूक ओळखण्याचे अजून एक लक्षण म्हणजे, भुकेची थोडीशी संवेदना झालेली असतांना स्वतःला कामांत (उदा. कचरा काढणे, फरशी पुसणे, स्वयंपाक करणे) गुंतवून घेतल्यास भुकेची संवेदना जाते. थोड्या वेळाने जेव्हा दोषांचे पचन होऊन जाते, तेव्हा खरी भूक लागते.
खोट्या भुकेला खरी भूक समजून जेवल्यास शरिरात विषसदृश पदार्थ निर्माण होतात. हे कालांतराने विकार उत्पन्न करतात किंवा असलेला विकार वाढवतात. त्यामुळे आदल्या दिवशीचा आहार पचल्याची सर्व लक्षणे दिसल्याविना सकाळचा आहार घेणे कटाक्षाने टाळावे. ‘आहार’ म्हणजे केवळ घन अन्न नव्हे, तर चहा, कॉफी, दूध, औषध आदी पोटात घेतला जाणारा कोणताही पदार्थ, म्हणजे आहार.
खोटी भूक जाण्यासाठी थोडेसे गरम पाणी प्यावे. यामुळे एका बाजूला थांबलेले अन्न पुन्हा अग्नीच्या मार्गात येते आणि अन्न पचल्याची लक्षणे निर्माण होतात. काही कारणामुळे ही लक्षणे निर्माण झाली नाहीत आणि भुकेमुळे थरथरायला होऊ लागल्यास किंवा ग्लानी येऊ लागल्यास पचण्यास हलका असा आहार (उदा. राजगिरा लाडू, लाह्या) शक्ती टिकून राहील, एवढ्या अल्प प्रमाणात घ्यावा.
२. भूक लागण्यापूर्वी खाणे हानीकारक !
२.अ. ‘भूक लागलेली नसणे’, म्हणजे शरिरात क्लेद असून अग्नि मंद असणे’. अशा वेळी जेवल्यास अन्नपचन नीट होत नाही. त्यामुळे कधी पोटफुगी (गॅसेस) होते. सर्वसाधारणपणे योग्य प्रमाणात घेतलेला आहार ३ घंट्यांनी जठरातून लहान आतड्यांत जातो. त्यामुळे दोन आहारांमध्ये न्यूनतम ३ घंट्यांचे अंतर असावे. भूक नसतांना केवळ ‘आवड’ म्हणून किंवा ‘चव पहाण्यासाठी’ खाल्ल्याने अर्धवट पचलेल्या अन्नामध्ये नवीन अन्न मिसळले जाते आणि आरोग्याची हानीच होते.
२.आ. बहुतेकांना दिवसातून अधेमधे येता-जाता शेव, चिवडा, गोड खाऊ, सुकामेवा आदी तोंडात टाकण्याची सवय असते. आरोग्याच्या दृष्टीने ही सवय कटाक्षाने सोडणे आवश्यक आहे. असे पदार्थ ठरलेल्या आहाराच्या वेळांतच खावेत.
२.इ सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडतांना भूक लागलेली नसल्यास समवेत जेवणाचा किंवा खाण्याचा डबा घेऊन जावा. कामावर पोचल्यावर भूक लागल्यावर आधी खाऊन मग कामाला आरंभ करावा. यासाठी घरातून थोडे लवकर बाहेर पडावे.
‘सकाळी शौचाला झाल्याविना आणि कडक भूक लागल्याविना आहार घेणे’, हे सर्व विकारांचे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘शौचाला होऊन कडक भूक लागल्यावरच आहार घेणे’, ही निरोगी आयुष्याची चावी आहे.
३. उठल्यावर शरिरात क्लेद शिल्लक असल्याने
लगेच घेतलेले पेय किंवा आहार न पचता दूषित बनतो !
१. ‘आदल्या दिवशीच्या आहाराचे पूर्ण पचन झालेले नसतांना
सकाळी काहीही खाणे’, हे सर्व विकारांचे एक महत्त्वाचे कारण !
रात्री दवाने लाकडे ओली झाली असतांना नीट पेट घेत नाहीत, त्याप्रमाणे रात्री शरिरात निर्माण झालेला क्लेद (शरिरातील अतिरिक्त ओलावा) पूर्णपणे पचून गेलेला नसतांना कोणताही आहार, उदा. चहा, अल्पाहार, औषध घेतल्यास त्याचे पचन होत नाही. नासत चाललेल्या दुधात चांगले दूध घातल्यास सर्वच दूध नासते. रात्री शरिरात निर्माण झालेल्या क्लेदाचे स्वरूपही नासत चाललेल्या दुधाप्रमाणे असते. असा क्लेद शरिरात असतांना आहार घेतल्याने त्यापासून निर्माण होणारा अन्नरस दूषित बनतो. अशा दूषित अन्नरसानेच दिवसभर शरिराचे पोषण होते. असे एखादा दिवस नव्हे, तर वर्षानुवर्षे प्रतिदिन चालू असते. त्यामुळे नेहमीच शरिराचे पोषण चांगल्या दुधासारख्या आहाररसाने व्हायचे सोडून नासलेल्या दुधासारख्या दूषित आहाररसाने होते. बहुतेक वेळा विकारांवर अनेक औषधे घेऊनही विकार बरे न होणे, औषधे चालू असेपर्यंत विकार नसणे; पण ती बंद झाल्यावर विकार पुन्हा निर्माण होणे, एक विकार बरा होईपर्यंत दुसरा विकार होणे आदींचे मूळ कारण ‘क्लेदाने दूषित झालेल्या आहाररसाने शरिराचे होणारे (कु)पोषण’ हेच असते !
२. व्यायामाने शरिरातील ‘क्लेद’ पचण्यास साहाय्य होते !
व्यायामामुळे हृदयाची गती वाढते. यामुळे शरिरात निर्माण झालेला क्लेद पचण्यास साहाय्य होते. व्यायामामुळे आळस आणि जडपणा दूर होऊन उत्साह अन् हलकेपणा येतो. सकाळी व्यायाम करणे शक्य नसल्यास शरिराची हालचाल होईल, अशी घरातील कामे करावीत.
४. आदल्या दिवशीचा आहार पचल्याची लक्षणे
४.अ. सकाळी उठल्यावर अधोवात आणि मल-मूत्र यांचे वर्तन होणे
४.आ. छातीत जडपणा नसणे
४.इ. शरिरातील दोषांचे त्यांच्या योग्य मार्गाने जाणे, उदा. ढेकर येणे, वायूचे अधोमार्गाने निःसारण होणे
४.ई. ढेकर शुद्ध असणे, त्याला अन्नाचा किंवा करपट वास नसणे • कडकडून भूक लागणे
४.उ. डोळे, नाक, कान आदी इंद्रिये निर्मळ असणे, उदा. सकाळी उठल्यावर डोळ्यांवर झापड नसणे, झोप पूर्ण झाल्याचे समाधान असणे, जीभ स्वच्छ असणे
४.ऊ. सर्व शरिरात हलकेपणा जाणवणे.
५. जेवणाचे प्रमाण ठरवण्यामध्ये तृप्तीचे महत्त्व !
जेवणाचे प्रमाण ठरवतांना तृप्तीला पुष्कळ महत्त्व आहे. जेवल्यावर मिळणारे विशिष्ट प्रकारचे समाधान म्हणजे तृप्ती. जेव्हा जेवणातील मुख्य पदार्थ लघु (पचायला हलके) असतील, उदा. वरणभात, तांदुळाची भाकरी, तेव्हा मन तृप्त होईपर्यंत जेवावे. त्यापेक्षा अधिक जेवू नये. जेवणात श्रीखंड, पुरणपोळी यांसारखे गुरु (पचायला जड) पदार्थ असतील, तेव्हा अर्धी भूक ठेवून जेवावे. तृप्ती होईपर्यंत जेवू नये. असे केल्याने अन्नाचे प्रमाण योग्य रहाते आणि अन्न योग्य रितीने पचते.
६. प्रमाणापेक्षा अधिक जेवल्याने होणारी हानी !
अतिमात्रं पुनः सर्वान् आशु दोषान् प्रकोपयेत् ।
– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ८, श्लोक ४
अर्थ : अती मात्रेत घेतलेला आहार लगेचच वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांचा प्रकोप करतो. दोषांचा प्रकोप म्हणजे त्यांची साम्यावस्था बिघडणे आणि रोगाच्या निर्मितीला आरंभ होणे !
७. सायंकाळच्या जेवणानंतर रात्री झोपेपर्यंत भूक लागल्यास काय करावे ?
राजगिरा लाडू; साळीच्या लाह्या; फुटाणे; तांदूळ, गहू आदींचे भाजके (भट्टीत फुलवलेले) पोहे किंवा भाजलेल्या धान्यांपासून बनवलेले पदार्थ भूक शमेल, एवढ्याच प्रमाणात खावेत. जेवणाचे प्रमाण आणि वेळा योग्य असल्यास रात्री झोपेपर्यंत भूक लागत नाही. त्यामुळे ते योग्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री झोपण्यापूर्वी भूक लागल्यास चॉकलेट; तिखट, चटपटीत (चविष्ट), तळलेले आदी पदार्थ खाऊ नयेत.
८. जेवण योग्य प्रमाणात झाल्याचे लक्षण !
मात्रा प्रमाणं निर्दिष्टं सुखं यावत् विजीर्यति ।
– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ८, श्लोक २
अर्थ : आहार घेतल्यावर कोणताही त्रास न होता, तो सुखाने पचल्यास त्या आहाराचे प्रमाण योग्य आहे, असे समजावे.
आपण दिवसभरात २ किंवा ३ वेळा आहार घेत असू, तर एकदा आहार घेतल्यावर दुसरा आहार घेईपर्यंत पोटात जडपणा वाटणे, आळस येणे, झोप येणे किंवा पोट रिकामे वाटणे, लगेच पुन्हा भूक लागणे, थकवा येणे आदी कोणतीही लक्षणे निर्माण न झाल्यास आणि पुढच्या आहाराच्या वेळी यथायोग्य भूक लागल्यास आहाराचे प्रमाण योग्य आहे, असे समजावे. तसे न झाल्यास आहाराचे प्रमाण चुकत आहे, हे ध्यानात घेऊन ते नीट करण्याचा प्रयत्न करावा.
९. जेवणाचे योग्य प्रमाण !
गुरूणाम् अर्धसौहित्यं लघूनां नातितृप्तता ।
– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय ८, श्लोक २
अर्थ : पचायला जड असलेले पदार्थ अर्धे पोट रिकामे राहील एवढ्या प्रमाणात खावेत. पचायला हलके असलेले पदार्थ मन तृप्त होईपर्यंत खावेत; पण ते अतीतृप्ती होईपर्यंत खाऊ नयेत. (जेवतांना पोटाचे दोन भाग अन्न सेवन करा. तिसरा भाग पाण्यासाठी आणि चौथा भाग वायूसाठी रिकामा ठेवा.)