पू. अनुराधा वाडेकर यांनी मिरज आश्रमातील गुणसंवर्धन सोहळ्यात केली घोषणा !
‘भाव’ या शब्दाचे प्रकट रूप असणारे श्री.भाऊ (सदाशिव) परबकाका (वय ७१ वर्षे) हे मंगळवारी सनातनचे २६ वे संत झाल्याची घोषणा पू. अनुराधाताई वाडेकर यांनी केली. मिरज येथील ब्राह्मणपुरीमध्ये असणार्या सनातनच्या आश्रमात गुणसंवर्धन सोहळ्याच्या निमित्ताने ही घोषण करण्यात आली. पू. महादेव नकातेकाका यांनी पू. भाऊ परबकाका यांचा सन्मान केला. या वेळी सौ. अंजली गाडगीळ, कु. स्वाती खाडये, तसेच अन्य साधक उपस्थित होते. या सोहळ्यामुळे साधकांसह मिरज आश्रमही आनंद सोहळ्यात न्हाऊन निघाला.
संपूर्ण सोहळ्यात पू. भाऊकाका सतत शरणागत अवस्थेत होते आणि संत घोषित केल्यावर पू. भाऊंना भावाश्रू आवरता आले नाहीत. ते बराच काळ भावावस्थेत आणि नमस्काराच्या मुद्रेतच होते. संपूर्ण सोहळा साधकांना एक चैतन्य, आनंद यांची महापर्वणी देणारा आणि शब्दातीत होता. पू. भाऊकाका संत झाल्याची घोषणा केल्यावर उपस्थित साधकांच्या डोळ्यांतही भावाश्रू तरळले.
संतांकडून आपण काय शिकू शकतो, अखंड भावावस्था कशी टिकवावी, त्यासाठी आपण काय प्रयत्न करायचे, गुणग्राहकता म्हणजे काय, हे शिकण्यासाठी गुणसंवर्धन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित सर्वांनी पू. भाऊकाका यांच्याकडून काय शिकायला मिळाले ते सांगितले. हा सोहळा चालू असतांनाच अचानक पू. अनुताई यांनी पू. भाऊकाका संत झाल्याची घोषणा केली.
अखंड व्यक्त किंवा अव्यक्त भावावस्थेत असणारे पू. भाऊ परब !
‘अखंड भावावस्थेत असणारे, अव्यक्त भावावस्थेत साधकांमध्ये भाव जागृत करणारे, नुसत्या अस्तित्वाने साधकांकडून साधनेचा निश्चय आणि त्या दिशेने प्रयत्न करवून घेणारे अन् नुसत्या आठवणीनेही साधकांना आधार वाटणारे सनातनचे एकमेव संत म्हणजे पू. भाऊ परब ! परवा भाऊंची भेट झाली, तेव्हा त्यांना प्रथमच मिठी मारली. त्यांना मिठी मारावेसे का वाटले, याचा उलगडा आज झाला. पू. भाऊंच्या मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ घेऊन साधकांनी साधनेत जलद गतीने प्रगती करावी ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – डॉ. आठवले (निज भाद्रपद कृ. ९, कलियुग वर्ष ५११४ (९.१०.२०१२))
गुरुचरणांपर्यंत जाणार हा ध्यास आणि ध्येय ठेवा ! – पू. भाऊकाका
संत घोषित केल्यानंतर पू.भाऊकाका म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. प.पू. डॉक्टर भरभरून देतात. प.पू. डॉक्टर सर्वकाही करवून घेतात. ते सतत माझ्यासमवेत असतात. प.पू. डॉक्टरांच्या रूपात आपल्याला ईश्वर भेटला आहे. ५१ जन्मांनंतर आपल्याला सनातन संस्था मिळाली आहे. त्याचे सार्थक करून घ्या. जे काही गुरुदेवांनी सांगितले आहे, त्याचे आज्ञापालन करा. आता मागेपुढे पहायचे नाही. भूतकाळ विसरा. गुरुचरणांपर्यंत जाणार हाच ध्यास ठेवा. ‘माझा देह चंदनासारखा झिझवून घ्या’, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.’’
कसे प्रयत्न केले हे सांगतांना पू. भाऊकाका म्हणाले, ‘‘सातत्याने श्रीकृष्ण,प.पू. डॉक्टर यांच्याशी अनुसंधान असते. संसार, माया याविषयी विचार नसतात. या विचारांचा त्याग झाला आहे. सतत आनंदावस्था असते. अजून मी काय करू शकतो,याचा सतत विचार असतो.
संत होण्यापूर्वीच गोपी वृषालीने भाऊकाकांचे संतत्व
जाणले अन् भावावस्थेतील भाऊकाकांना श्रीकृष्णाने संतपदावर विराजमान केले
श्रीकृष्णाच्या कृपेने निज भाद्रपद कृ. ३ ते निज भाद्रपद कृ. ६, कलियुग वर्ष ५११४ (३.१०.२०१२ ते ६.१०.२०१२) या कालावधीत गोपींप्रमाणे भावावस्था अनुभवणार्या ती. भाऊ परब यांच्या सत्संगात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. ‘प.पू. डॉक्टरांनी मला फार मोठे कुटुंब दिले आहे’, या
कृतज्ञताभावाने साधकांशी आंतरिक प्रीतीने वागणारे पू. भाऊकाका !
भाऊकाका सत्संगाला जातांना तेथील साधकांसाठी आठवणीने खाऊ घेऊन जात. साधकांच्या लहान मुलांसाठीही भाऊकाका खाऊ घेऊन जातात आणि त्यांची आवर्जून विचारपूस करतात. ते मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना आपलेसे करून घेतात. त्यांच्या हास्यातून त्यांची आंतरिक प्रीतीच दिसून येते. त्यांच्या शब्दांतील प्रीतीमुळे प्रत्येक साधक न्हाऊन निघायचा. त्या वेळी ‘भाऊ म्हणजे प्रीतीचा सागर !’ हे अनुभवायला मिळाले.
‘प.पू. डॉक्टरांनी मला फार मोठे कुटुंब दिले आहे, ‘हे विश्वचि माझे घर !’असे व्यापक कुटुंब मला मिळाले आहे’, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काना-कोपर्यांतील साधकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित केल्याने साधकांना भाऊ आपलेसे वाटतात. त्यांच्याविषयी जवळीक आणि आदर वाटतो.
२. ‘साधकांचा वेळ जाऊ नये, यासाठी गाडीत बसल्यावर केवळ
जयघोष करायला हवा’, असे सांगून इतरांचा विचार कसा करायचा, हे शिकवणे
आम्ही गाडीतून सत्संगाच्या ठिकाणी जात असतांना गाडीत बसल्यावर जयघोष आणि श्लोक म्हणत असू. त्या वेळी भाऊकाकांनी सांगितले, ‘‘गाडी चालू करतांना केवळ जयघोष करायला हवा आणि नंतर काही अंतर पुढे गेल्यावर श्लोक म्हणायला हवा.’’ याविषयी सांगतांना ते म्हणाले, ‘‘आपल्याला सोडण्यासाठी काही वेळा साधक आलेले असतात, त्यांना तेवढा वेळ थांबावे लागते. काही वेळा बाहेर ऊनही असते.त्यांचा वेळ वाया जायला नको आणि त्यांना त्रासही व्हायला नको.
३. क्षणोक्षणी श्रीकृष्णाला आळवणार्या आणि कृष्णाने ‘या जिवाला माध्यम म्हणून निवडले आहे’, असा शरणागत भाव असलेल्या पू. भाऊकाकांचे निराळे अस्तित्वच न जाणवणे
‘मी केवळ माध्यम आहे. श्रीकृष्णच त्याचे कार्य करत आहे. तोच साधकांच्या अडचणी सोडवत आहे आणि केवळ या जिवाची साधना व्हावी; म्हणून श्रीकृष्णाने या जिवाला माध्यम म्हणून निवडले आहे’, असा त्यांचा सतत भाव असतो. प्रत्येक साधक जेव्हा त्याच्या अडचणी विचारण्यासाठी येतो, तेव्हा ते प्रार्थना, कृतज्ञता आणि जयघोष करतात. तेव्हा ते या साधकाची अडचण सोडवण्यासाठी ‘आता तूच ये श्रीकृष्णा, तूच त्याला साधनेत उत्साही कर’, असे श्रीकृष्णाला आवाहन करतात’, असे जाणवते. त्यामुळे सत्संगामध्ये त्यांचे निराळे अस्तित्व न जाणवता केवळ श्रीकृष्णाचेच अस्तित्व जाणवते. सर्व साधकांनाही भावमय वातावरण अनुभवता येते. केवळ सत्संगातच नाही, तर प्रत्येक कृती करतांनाही ते श्रीकृष्णाला आळवत असतात. त्यामुळे श्रीकृष्ण सातत्याने त्यांच्यासमवेतच असतो.
४. ‘प्रत्येक साधकाला ईश्वरप्राप्ती व्हायला हवी’, अशी प.पू. गुरुदेवांची तळमळ असल्याने आणि साधकांची अनेक जन्मांची साधना वाया जाऊ नये, या तळमळीने प्रोत्साहन देणे
सनातनमध्ये आलेल्या प्रत्येक जिवाची ५१ जन्मांची साधना आहे. या जन्मीही तो पुष्कळ वर्षे साधना करत आहे. त्याचे एवढे जन्म, साधनेची एवढी वर्षे वाया जाऊ नयेत, यासाठी ते तळमळीने त्यांना साधनेसाठी प्रोत्साहित करत असतात. ‘प्रत्येक साधकाला ईश्वरप्राप्ती व्हायला हवी’, अशी माझ्या गुरूंची तळमळ आहे. तसा त्यांचा संकल्प आहे. मलाही त्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत’, असे ते सांगतात. त्यामुळे प्रत्येक साधकाशी बोलत असतांना ते आई होऊन त्याला लहान मुलाप्रमाणे समजावत असतात.
साधकांशी बोलतांना त्यांचा कुठेच अपेक्षांचा भाग नसतो. एवढी वर्षे त्याला साधनेचे महत्त्व समजले नाही; म्हणून त्याचे प्रयत्न झाले नाहीत, आतातरी त्यांना महत्त्व पटवून द्यायला हवे; म्हणजे ते प्रयत्न करतील, अशा तळमळीने ते सांगतात.
५. समष्टी कृष्णाशी एकरूप होऊन आत्मानंद अनुभवणे
त्यांची प्रत्येक कृती भावपूर्णच असते. सत्संगामध्ये ते समष्टी कृष्णाशी एकरूप होऊन साधकांच्या अडचणी सोडवत होते आणि सत्संग संपल्यानंतर जेव्हा आम्ही त्या साधकाच्या घराबाहेर आलो, तेव्हा ते आत्मानंदात ‘आनंद कंद दाता । नांदे या हृदयी माझ्या ।।’ हे भजन गुणगुणत होते.
६. पू. भाऊकाकांमधील विविध भावांचे श्रीकृष्णाने घडवलेले दर्शन !
१. ‘नंदकिशोरा’ हे गीत ऐकतांना कृष्णाच्या बासरीने वेड्या झालेल्या गोपीसम भासणे
एकदा सत्संगाला जातांना पू. भाऊकाकांनी विचारले, ‘‘आपण ‘नंदकिशोरा’ हे गीत ऐकायचे का ?’’ त्यांनी ते गीत लावले आणि त्या गीताचा आनंद घेत कृष्णानंदात डोलू लागले. त्या वेळी ते गोकुळात कृष्णाच्या बासरीने वेड्या झालेल्या गोपीसम भासले. ते म्हणाले, ‘‘हे गीत ऐकतांना गोकुळात गेल्यासारखे वाटते ना ?’’
२. सुदामाभावात तल्लीन होणे
नंतर भाऊकाकांनी ‘भार्या म्हणे सुदाम्यासी’ हे भजन गायले. त्या वेळी ते त्या भजनाशी एकरूप होऊन त्यात तल्लीन झाले होते.
३. भाऊकाकांनी खट्याळ अन् खोडकर कृष्णाला समजावणारे यशोदाभावातील गीत गाणे
त्यानंतर भाऊ खट्याळ, खोडकर कृष्णाला समजावणार्या यशोदाभावातील ‘कान्हा तू खोड्या करू नको रे’ हे गीत गातांना पहायला मिळाले. ‘संत भावावस्थेमध्ये गेल्यावर स्वतःला स्त्री समजायचे. राधा, गोपी, यशोदा होऊन कृष्णाचा आनंद अनुभवायचे’, असे मी ऐकले होते. आज श्रीकृष्णाने भाऊंच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष अनुभवायला दिले; पण केवळ या आनंदातच ते रमणारे नाहीत, हे नंतर लक्षात आले.
४. शक्तीस्तवन म्हणून क्षात्रभावाचे दर्शनही घडवणे
आता आपत्काळ आहे आणि त्यासाठी क्षात्रवृत्तीही हवी आहे. त्यानंतर ‘आदिशक्ती तू अंतःशक्ती तू’ हे शक्तीस्तवन म्हणणारे क्षात्रवीर भाऊकाकाही पहायला मिळाले.
‘हे श्रीकृष्णा भाऊकाकांच्या माध्यमातून तू जे काही शिकवलेस, ते कृतीत आणता येऊ दे आणि प्रत्येक क्षणी कृष्णाच्या अनुसंधानात राहून त्याचा आनंद घेता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
– कु. वृषाली कुंभार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (निज भाद्रपद कृ. ६, कलियुग वर्ष ५११४ (६.१०.२०१२)
संत म्हणून उद्घोषित होण्यापूर्वी श्री. भाऊ (सदाशिव) परब यांच्याविषयी सौ. योया वाले यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. भाऊ (सदाशिव) परब यांच्या तोंडवळ्याभोवती गुलाबी रंगाचा तेजस्वी प्रकाश जाणवणे आणि त्यांच्याकडे पाहून ‘एका संतांकडेच पहात आहे’, असे वाटणे
श्री. भाऊ (सदाशिव) परब यांना भोजनकक्षात चालतांना पाहिले, तेव्हा मला त्यांच्या तोंडवळ्याभोवती गुलाबी रंगाचा तेजस्वी प्रकाश जाणवला, तसेच त्यांच्याकडून आनंद प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. त्यांच्याकडे पाहून मला ‘मी एका संतांनाच पहात आहे’, असे वाटले.
२. श्री. भाऊ (सदाशिव) परब सतत शिकण्याच्या
स्थितीत असल्यामुळे ते सतत आनंदी आणि भावावस्थेत असणे
जेव्हा ते साधकांशी हसत बोलतात, तेव्हा ‘त्यांचे मन निर्विचार अवस्थेत असते’, असे मला वाटले. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा साधकांप्रती असलेला भाव व्यक्त होतो. ‘त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे आणि त्याची आपण सूक्ष्मातूनही अनुभूती घेऊ शकतो’, असे वाटले. साधकांशी बोलतांना ‘प्रत्येक साधक हा प.पू. डॉक्टरांचेच रूप आहे’, असा भाव ठेवून ते बोलतात. तसेच त्यांची निरीक्षणक्षमता चांगली असल्यामुळे साधकांना साधनेत साहाय्य होईल, अशा पद्धतीने ते योग्य मार्गदर्शन करतात. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असल्यामुळे आनंदी आणि भावावस्थेत असतात.
श्री. भाऊ (सदाशिव) परब यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये
मी श्रीकृष्णाला त्यांच्यातील सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण आणि आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांविषयी (सूक्ष्मातून) विचारले, तेव्हा त्याने मला पुढील माहिती सांगितली.
१. सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण
भाव ६ टक्के, आनंद ५ टक्के आणि चैतन्य ५ टक्के
२. आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये
आध्यात्मिक स्तर | अहं | भाव | तळमळ | साधना | आध्यात्मिक त्रास |
७० टक्के | १५ टक्के | ६० टक्के | ५८ टक्के | ६० टक्के | नाही |
– सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ (निज भाद्रपद कृ. ५, कलियुग वर्ष ५११४ (५.१०.२०१२))
पू. भाऊ (सदाशीव) परब यांच्यातील दैवी गुणांविषयी भगवंताने सुचवलेल्या काव्यपंक्ती
१. पू. भाऊंचा देह कसा आहे, याविषयी भगवंत काय म्हणतो ?
देह नव्हे, ही तर भगवत् काया ।
असे अंतरी भगवत् सगुण माया ।
अनुभवास द्याहो एकदा तरी सदगुरुराया ।
हीच प्रार्थना आपुल्या पाया ।।
२. पू. भाऊंचे हास्य कसे आहे ?
भाऊंचे हास्य असे आनंदाचा झरा ।
साधकजनहो, एकदाच डुंबा ।
सांडेल विकार-विकल्प सारा ।।
३. पू. भाऊंच्या वाणीविषयी भगवंत म्हणतो.
भाऊंची वाणी असे चैतन्याची खाण ।
शाश्वत धनाला कधीच नसे वाण ।
या वाणीच्या स्पर्शाने करा देह रे पवित्र ।
या अमृतवाणीत सारेच होऊन जाऊ आत्मतृप्त ।।
४. पू. भाऊंचे चालणे असे आहे –
चालणे हीसुद्धा एक भगवंताची लीला ।
पहातांना करी निर्विचार मनाला ।
मायेची आठवण न होई ।
कारण रमले अंतःकरण भगवंताच्या चरणी ।।
५. पू. भाऊंचे अंतःकरण असे आहे –
अंतःकरण शुद्ध निर्मल ।
तेथे भाव तरल ।
भगवत् भक्तीची गुंफण सरल ।
डोकावाल, तर आनंद परिमल ।।
६. पू. भाऊंचे वर्तन असे आहे –
समष्टीशी वाटावा अभिमान ।
ऐसेच असे भाऊंचे वर्तन ।
दिसे पदोपदी प्रसंगातून ।
त्यातून डोकावे भगवंतभक्ती ।।
७. पू. भाऊंच्या भक्तीविषयी –
ऐशी श्रेष्ठ गुरुभक्ती ।
भाऊंची निष्ठा किती ।
वसे तेथे शुद्धभक्ती ।
म्हणूनच सर्व देव गुण गाती ।।
८. पू. भाऊंच्या भावाविषयी –
सद्गुरु तोची देव ।
ऐसा सदाचा त्यांचा भाव ।
अर्पिती आपला जीव ।
सर्वार्थाने गुरुचरणी ।।
दर्शनासंदर्भात एक संतवचन आहे –
सर्व तीर्थे लागती चरणांसी ।
ऐशी महती या संतांसी ।
पार नसे परम भाग्यासी । दर्शन घेता ।।
कृतज्ञता !
जगदगुरु श्रीकृष्णाने स्फुरविले ।
तैसेची सर्व वदिले ।
जे काही न्यून असेल राहिले ।
त्याची क्षमा मागितसे ।।
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(याच काव्यपंक्तींमुळे पू. भाऊ परब यांचा सन्मान सोहळा अनुपम आणि अवर्णनीय झाला.)
अशी नम्रता केवळ सनातनच्या संतांमध्येच असू शकते !
स्वतःकडून कोणतीही चूक झालेली नसतांना साधकाची क्षमा मागणारे पू. भाऊकाका !
‘निज भाद्रपद कृ. ३ ते ६, कलियुग वर्ष ५११४ (३ ते ६.१०.२०१२) या कालावधीत पू. भाऊकाका रामनाथी आश्रमात आले होते. परत जाण्याच्या दिवशी पहाटे ५.३० वाजता त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवून मला उठवले आणि सांगितले, ‘‘विशाल, प.पू. डॉक्टरांनी दिलेला हा खाऊ घे.’’ नंतर दोन्ही हाताने कान पकडून म्हणाले, ‘‘विशाल, खोलीत रहात असतांना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मला क्षमा कर !’’ त्या वेळी ‘भाऊंमध्ये किती नम्रता आहे आणि त्यांच्यात अहंही किती अल्प आहे’, ते माझ्या लक्षात आले.’ प.पू. डॉक्टर, आपणच माझ्यात पू. भाऊंप्रमाणे अल्प अहं आणि नम्रता निर्माण करा अन् त्यासाठी आवश्यक प्रयत्नही करवून घ्यावे, ही प्रार्थना !’ – श्री. विशाल पवार, रामनाथी, गोवा. (निज भाद्रपद कृ. ९, कलियुग वर्ष ५११४(९.१०.२०१२))