दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना मिळाली आनंदवार्ता !
रामनाथी – केरळसारख्या राज्यात साम्यवाद्यांचे प्राबल्य असल्यामुळे हिंदुत्वाचे कार्य करण्यास अत्यंत प्रतिकूल वातावरण असूनही अत्यंत चिकाटीने आणि सातत्याने गेली २० वर्षे हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करणारे थ्रिसूर (केरळ) येथील हिंदुत्वनिष्ठ पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदवार्ता दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या व्यासपिठावरून १८ जून या दिवशी उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांना दिली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले पी.टी. राजू हे जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले’, या शब्दांत सद़्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी श्री. पी.टी. राजू यांच्याविषयी गौरवोद़्गार काढले. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर पी.टी. राजू यांचा अष्टसात्त्विक भाव अत्यंत जागृत झाला. पुष्कळ वेळ त्यांना भावाश्रू रोखता आले नाहीत.
या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर आणि सद़्गुरु (सुश्री) स्वाती खाडये हे उपस्थित होते. सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन श्री. पी.टी. राजू यांचा सत्कार केला. या वेळी श्री. पी.टी. राजू यांच्या धर्मपत्नी जी.जी. राजू आणि मुलगी अपर्णा राजू याही उपस्थित होत्या.
१. यापुढे समर्पित होऊन पूर्णवेळ धर्मकार्य करणार !- पी.टी. राजू
माझी पत्नी शिवणकाम करते. त्यातून जे पैसे मिळतात, त्यातून मी धर्मप्रसाराचे कार्य करतो. धर्मकार्याला साहाय्य करणारी माझी पत्नी ही माझी शक्ती आहे. कोरोनाच्या काळात मला चांगल्या प्रकारे साधना करता आली. गुरुदेवांच्याच कृपेने माझ्या मुलीला या मासात चांगल्या पदावर नोकरी लागली आहे. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला गृहस्थी जीवनातून मुक्त केले आहे. त्यामुळे यापुढे मी समर्पित होऊन पूर्णवेळ धर्मकार्य करणार आहे.
२. धर्मकार्याच्या तळमळीपोटी भाषिक अडचणींवर मात करणारे पी.टी. राजू !
श्री. पी.टी. राजू हे प्रथम अधिवेशनापासून आतापर्यंतच्या सर्व अधिवेशनांना उपस्थित राहिले आहेत. वास्तविक त्यांना हिंदी भाषा येत नव्हती. असे असूनही ते चिकाटीने सभागृहात बसून बाजूला असलेल्या धर्माभिमान्यांकडून विषय समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. भाषा समजत नसूनही ते एकदाही ‘सत्र चालू असतांना सभागृहाबाहेर रेंगाळले आहेत’, ‘भ्रमणभाष इत्यादी हाताळत आहेत’, असे दिसून आले नाही. त्यांनी आता हिंदी बोलणेही थोडे शिकून घेतले आहे. आध्यात्मिक प्रगती घोषित झाल्यानंतर त्यांनी ‘मी आज हिंदी भाषेतून बोलणार आहे’, असे सांगून आपले मनोगत जमेल तसे हिंदीतून मांडण्याचा प्रयत्न केला.