सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी यशाचे श्रेय केले अर्पण !
नवी मुंबई – कर्मचारी भविष्य निधी संघटना महाराष्ट्र राज्य या युनियनच्या सरचिटणीस पदावर वाशी कार्यालयातील सौ. प्रविणा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या पदावर निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला पदाधिकारी आहेत. देशातील ट्रेड युनियनच्या इतिहासामध्ये संघटनेच्या सरचिटणीस पदावर महिला पदाधिकारी यांची यापूर्वी निवड झाली नव्हती. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या महाराष्ट्र युनियनच्या द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये सौ. प्रविणा पाटील यांची निवड झाली आहे. सौ. प्रविणा पाटील या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.
याविषयी वाशी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सरचिटणीस पदाचे उत्तरदायित्व यशस्वीपणे पार पाडून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी त्या वाशी कार्यालयात युनियनच्या सचिव म्हणून काम पहात होत्या. त्यांनी संघटनेत आतापर्यंत सकारात्मक योगदान दिले असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
यशाविषयी सौ. प्रविणा पाटील म्हणाल्या, ‘‘भविष्य निधी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र या संघटनेच्या सरचिटणीस पदावर कार्य करणारी व्यक्ती मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवत नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रातील अनुमाने २ सहस्र ५०० कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढत होत्या. एका मोठ्या संघटनेचा पाठिंबा असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणीही उभे रहायला धजावत नव्हते. हे दायित्व मोठे होते; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्या सर्वांना निर्भयता आणि नेतृत्वगुण दिला आहे. अन्यायाच्या विरोधात उभे रहाण्याचे बळही दिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘दिसेल ते कर्तव्य’ या वचनानुसार मी अपक्ष उभे रहाण्याचा निर्णय घेतला. केवळ गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच हा विजय प्राप्त करू शकले, यासाठी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करत आहे.’’