
पुढे येणार्या भीषण आपत्काळात हिंदुत्वनिष्ठ आणि साधक यांना सात्त्विक व्यक्तींना वाचवण्याचे प्रमुख कार्य असेल. आपत्तीमध्ये फसलेल्या सज्जन हिंदूंना सर्वतोपरी साहाय्य करावे. हे सर्व कार्य कोणत्याही एका संघटनेचे किंवा व्यक्तीचे नाही. आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी हे कार्य करायला हवे. असेे करणे म्हणजे समाजऋण फेडण्यासारखेच आहे आणि यातून आपली साधनाही होणार आहे. आपत्काळात होणार्या या भीषण हानीमुळे काहीजण दु:खी होतील, तर काहींना ‘ही हानी रोखण्यासाठी ईश्वर काही करणार नाही का ?’ असा प्रश्न पडेल. आपण लक्षात घेतले पाहिजे की, हा आपत्काळ जगभरात ईश्वरी राज्य स्थापन होण्याच्या दृष्टीने ईश्वरानेच घडवून आणलेली योजना आहे. पृथ्वीवरील रज-तमाचा भार हलका करून सत्त्वगुणाचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी ईश्वराने केलेली उपाययोजना आहे; म्हणजे सज्जन लोकांच्या दृष्टीने हा आपत्काळ इष्टापत्तीसारखा ठरणार आहे. त्यामुळे ‘आपत्काळ योग्य कि अयोग्य ?’, याचा विचार न करता ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी आणि हिंदुरक्षणाचे कार्य करून ईश्वरकृपा संपादन करण्याची संधी आहे’, असा विचार हिंदू समाजाने करायला हवा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी येथे केले. ‘सनातन संस्थेचे आवाहन ! : हिंदु सामज आपतकालाची सिद्धता करणे’ या विषयावर ते बोलत होते.