मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य असून आज ना उद्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धकर्मानुसार तो येतोच ! जीवाचा मृत्यू होतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व काय आहे याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे. याबरोबरच मरणासन्न व्यक्तीचे प्राण जात नसतील, तर तिच्या हातून मिठाचे दान करवावे किंवा मीठ-भाकरीचा उतारा द्यावा असे म्हणतात यामागील शास्त्र काय हे पण या लेखातून कळेल. यांतून साधनेचे जीवनातील महत्त्वही लक्षात येईल.
१. शेवटच्या क्षणी मुखात नाम असण्याचे महत्त्व
१ अ. नामसाधना न करणारा जीव वर्षानुवर्षे एकाच योनीत अडकणे
किंवा वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाणे, तर मरतांना मुखात नाम असलेला पुढच्या गतीला जाणे
‘ज्या वेळी एखादा जीव मरतो, त्या वेळी त्याच्या देहात असणारी सूक्ष्म ऊर्जा ही सूक्ष्म वायूंच्या रूपात त्याच्या देहात कार्यरत असते. या वायूंच्या आधारावर त्याला पुढची गती प्राप्त होत असते.
१ अ १. नामसाधना न करणारा
अ. नामसाधना न करणार्या जिवांना कोणतीही आंतरिक ऊर्जा (नामजपाने निर्माण झालेली सूक्ष्म ऊर्जा) किंवा बाह्यात्मक ऊर्जा (गुरु किंवा देवता यांचे आशीर्वादात्मक बळ) न मिळाल्याने असे जीव वर्षानुवर्षे एकाच योनीत आपल्या आशा-आकांक्षा घेऊन भटकत रहातात.
आ. या लिंगदेहांना कसलेच संरक्षण नसल्याने ते वाईट शक्तींच्या नियंत्रणात जातात आणि वर्षानुवर्षे त्यांच्या हाताखाली काम करत रहातात.
अशा लिंगदेहांना पुढची गती मिळण्यासाठी श्राद्धकर्मातून बाह्यात्मक बळ पुरवणे आवश्यक ठरते.
१ अ २. शेवटच्या क्षणी मुखात नाम असलेला
मरतांना जिवाच्या मुखात नाम असेल, तर त्याच्या देहात सात्त्विक ऊर्जेचा प्रवाह संक्रमित होत राहिल्याने तो मर्त्यलोकामध्ये (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) न भटकता पटकन त्याच्या कर्माप्रमाणे पुढच्या गतीला प्राप्त होतो.
– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.३.२००५, दुपारी १२.३६)
२. मरणासन्न व्यक्तीच्या संदर्भात करावयाच्या कृती
२ अ. मरणासन्न व्यक्तीचे प्राण जात नसतील, तर तिच्या हातून
मिठाचे दान करवावे किंवा मीठ-भाकरीचा उतारा द्यावा असे म्हणतात, त्याचे कारण काय ?
ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यः स्त्रीणां शूद्रजनस्य च ।।
आतुरस्य यदा प्राणान् नयन्ति वसुधातले ।
लवणं तु तदा देयं द्वारस्योद्घाटनं दिवः ।। – गरुडपुराण, अंश ३, अध्याय १९, श्लोक ३१, ३२
भावार्थ : मरणासन्न व्यक्तीचे प्राण जात नसतील, तर तिच्या हातून मिठाचे दान करवावे. असे करणे, हे त्या व्यक्तीसाठी स्वर्गाचे दार उघडल्याप्रमाणे आहे.
मिठाचे दान देणे ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत म्हणजे मीठ-भाकरीचा उतारा देणे. या दोन्ही पद्धतींमागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
‘बर्याच वेळा मृत्यूसमयी वाईट शक्तींच्या लिंगदेहावर नियंत्रण मिळवण्याच्या भांडणामुळे किंवा चढाओढीमुळे मरणासन्न व्यक्तीचा प्राण न जाता देहात अडकून बसतो. यामुळे मरणासन्न व्यक्तीला पुष्कळ यातना भोगाव्या लागतात. मिठातून प्रक्षेपित होणारा रजतमात्मक लहरींयुक्त सूक्ष्म वायू वाईट शक्तींना ग्रहण करणे लगेच शक्य होते; कारण हा वायू अतिशय हलका असल्याने तो वाईट शक्तींच्या भोवती असलेल्या वायूकोषाकडून लगेच ग्रहण केला जातो. म्हणून मरणासन्न व्यक्तीच्या हातून मिठाचे दान करवले असता किंवा तिच्या हातून मीठ-भाकरीचा उतारा दिला असता, मर्यादित काळापुरती त्या व्यक्तीवरची वाईट शक्तींची पकड सैल होते आणि त्या व्यक्तीचा प्राण देहाच्या कुडीतून सुलभतेने बाहेर पडतो. ज्या घराण्यांना पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास तीव्र प्रमाणात असतात, त्या घराण्यातील व्यक्तींचे प्राण जातांना त्यांना असेच क्लेश होतात. अशी घराणी दत्तोपासनेने पूर्वजांच्या त्रासांतून मुक्त होऊ शकतात, म्हणजेच शेवटी साधनेला पर्याय नसतो.’
२ अ १. मरणासन्न व्यक्तीचे प्राण जात नसतील, तर तिच्या हातून मिठाचे दान कोणाला करावे आणि पुढे त्या दानाचे काय करावे ?
मिठाचे दान करतांना ते कोणालाही करावे; केवळ दान करतांना त्यात त्यागाचा भाव, म्हणजेच ‘आपल्या (दान देणार्या व्यक्तीच्या) माध्यमातून ईश्वरच त्या मरणासन्न व्यक्तीचे कल्याण करत आहे’, असा भाव असावा (दान कोणीही, म्हणजेच मरणासन्न व्यक्ती किंवा दुसरी व्यक्ती देत असली, तरी ‘हे दान ईश्वरच देत आहे’, असा भाव असावा.) आणि घेणार्याचा दान देणार्या व्यक्तीकडे बघण्याचा भाव ईश्वररूपी उपकारकर्त्याचा (‘या दानाच्या माध्यमातून ईश्वर माझ्यावर अनंत उपकार करत आहे’, असा) असावा. यामुळे दान स्वीकारण्यामध्ये दोघांमध्येही आदरभाव उत्पन्न होऊन ईश्वरी शक्तीच्या सामर्थ्यामुळे वाईट शक्तींच्या त्रासापासून दोघांनाही परावृत्त रहाता येते. दान घेण्याचा कर्मविधी पार पडल्यानंतर ‘ते दान त्या त्या शक्तींना संतुष्ट करण्यासाठी फलद्रूप होऊ दे’, अशी प्रार्थना करून वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.’
– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.३.२००५, रात्री ९.५५ अन् ५.३.२००६, सायं. ५.१८)
मृत्यूशय्येवरील निकटवर्तियासाठी त्याचा मृत्यू लवकर व्हावा, यासाठी प्रार्थना करण्याचा लाभ
काही वेळा निकटवर्तियाचा आजार इतका तीव्र असतो की, त्याचे हाल पहावत नाहीत. आजार बरे होण्याची शक्यता नसल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितलेले असते. अशा वेळी त्याला मृत्यू लवकर यावा, यासाठी प्रार्थना करावी कि करू नये ?, असा प्रश्न काही जणांना पडतो. सर्व माया आहे, असे मानणारे ज्ञानमार्गी, तसेच प्रारब्धानुसार सर्व होत आहे, असे मानणारे कर्ममार्गी प्रार्थना करत नाहीत. भक्तीमार्गी त्यांच्यातील करुणेमुळे त्याच्यासाठी प्रार्थना करतात, तेव्हा ती एक प्रकारे स्वेच्छा नसते; कारण तिच्यात स्वार्थ नसून दुसर्याचे हाल दूर व्हावेत, हा हेतू असतो. अशी प्रार्थना करणार्याचा स्तर चांगला असला, तर रुग्णाचा मृत्यू लवकर होतो आणि स्तर चांगला नसला, तर प्रार्थना करणार्याला मानसिक समाधान मिळते. अशा तर्हेने अशी प्रार्थना करण्याचा लाभच होतो.
-प.पू. डॉ. जयंत आठवले
बर्याच कालावधीपासून मृत्यूशय्येवर असणार्या
व्यक्तीची त्या स्थितीतून मुक्तता होण्यासाठी पुढील प्रयत्न करा !
१. मृत्यूशय्येवर असलेल्यासाठी प्रार्थना करणे
१ अ. मृत्यू जवळ आल्याचे वाटत असल्यास करावयाची प्रार्थना ! : ‘हे भगवान श्रीकृष्णा / —— (कुलदेवतेचे नाव घ्यावे), —— (नातेवाईकाचे नाव घ्यावे) यांचा मृत्यू जवळ आला असेल, तर त्यांची या स्थितीतून लवकरात लवकर सुटका होऊ दे !’
१ आ. मृत्यू जवळ आल्याचे वाटत नसल्यास पुढील प्रार्थना करावी ! : ‘हे भगवान श्रीकृष्णा / —— (कुलदेवतेचे नाव घ्यावे), —— (नातेवाईकाचे नाव घ्यावे) यांचा मृत्यू जवळ आला नसेल, तर सध्या होणारे त्रास लवकरात लवकर उणावून त्यांना बरे वाटू दे !’
२. मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीला शक्य असल्यास नामजप आणि प्रार्थना करण्यास सांगणे
अशा व्यक्तीला श्रीकृष्ण, कुलदेवता किंवा तिची ज्या देवतेवर श्रद्धा असेल, ती देवता यांचा नामजप करण्याची अधूनमधून आठवण करून द्यावी. जेणेकरून मृत्यू आला, तर शेवटच्या क्षणीही त्या व्यक्तीच्या मुखात देवतेचे नाम असेल आणि तिला सद्गती मिळेल. नामजपासमवेत तिला स्वतःचे प्रारब्धभोग सुसह्य होण्यासाठी प्रार्थनाही करण्यास सांगावे. त्यामुळे स्वतःला होणार्या वेदना सहन करण्यास तिला देवतेचे साहाय्य मिळेल. त्या व्यक्तीला नामजप करणे शक्य नसेल, तर कुटुंबियांनी तिच्यासाठी नामजप करावा.
३. दिवसभर नामजप लावून ठेवणे
मृत्यूशय्येवर असणार्या व्यक्तीचा जेथे निवास (रुग्णालयात अथवा घरी) आहे, तेथे शक्य असल्यास दिवसभर ती व्यक्ती ज्या देवतेचा नामजप करत असेल, त्या देवतेचा नामजप आणि तो उपलब्ध नसल्यास दत्तगुरूंचा नामजप एम्.पी.थ्री.वर (MP3 वर) अथवा नामजप यंत्रावर लावून ठेवावा.
४. मृत्यूशय्येवरील व्यक्तीची दृष्ट काढणे अथवा उतारा देणे
मृत्यूशय्येवरील व्यक्तीचा जीव बर्याच कालावधीपासून मृत्यू न येता घुटमळत असेल, तर तिची पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकारची दृष्ट काढावी अथवा एक प्रकारचा उतारा द्यावा.
४ अ. मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीची दृष्ट काढणे
१. प्रत्येक अमावास्येला नारळ ओवाळून तो तिठ्यावर किंवा मारुतीच्या देवळात फोडावा.
२. अखंड लाल भोपळा ७ वेळा उतरवून स्मशानात नेऊन फोडावा.
३. मीठ, मोहर्या आणि मिरच्या ७ वेळा उतरवून विस्तवात टाकाव्यात.
४. जुनी चामड्याची चप्पल ७ वेळा उतरवून प्रवेशद्वाराच्या तळ-चौकटीवर आपटून फेकून द्यावी.
५. लिंबू ७ वेळा उतरवून डोक्यावर धरून मधोमध कापावा. त्याच्या दोन फाकी घराबाहेर नेऊन दोन विरुद्ध दिशांना दोन्ही हातांनी फेकाव्यात.
४ आ. मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीसाठी उतारा देणे
१. त्या व्यक्तीचे अन्नसेवन बंद झाले असेल, तर प्रतिदिन सायंकाळी ७ वेळा ‘दही-भात खा खा’, असे वाईट शक्तीला सांगून तो दही-भात तिठ्यावर ठेवावा.
२. पानावर भात घ्यावा. त्यावर दही, तसेच लिंबाच्या लोणच्याची फोड ठेवून ते पान ७ वेळा त्या व्यक्तीवरून उतरवावे आणि नंतर तिठ्यावर नेऊन ठेवावे.
४ इ. व्याधीची तीव्रता जास्त असल्यास करावयाचे अन्य उपाय
१. मृत्यूशय्येवरील व्यक्ती स्त्री असल्यास तिच्या डाव्या आणि पुरुष असल्यास त्याच्या उजव्या मनगटाच्या नाडीवर प्रतिदिन सायंकाळी हात ठेवून ‘काळभैरवाष्टक’ किंवा ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ म्हणावे.
२. व्यक्तीसाठी प्रार्थना करून १०८ वेळा नवार्ण मंत्र अथवा महामृत्युंजय मंत्र किंवा संजीवनी मंत्र न्यूनतम ११ वेळा म्हणावा. (नवार्ण मंत्र सनातन-निर्मित ‘शक्ति’ या ग्रंथात दिला आहे.)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दृष्ट लागणे आणि काढणे यांमागील अध्यात्मशास्त्र’
मृत्यूशय्येवरील व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात दुःख करत राहिल्यास त्या व्यक्तीचा जीव कुटुंबियांमध्ये अडकून रहाण्याची शक्यता असते. त्यामुळे कुटुंबियांनी अशा प्रसंगामध्ये भावनाशील न होता साक्षीभावाने पहाण्याचा प्रयत्न केल्यास भगवंताच्या कृपेमुळे त्यांची कठीण परिस्थितीतही साधना होईल.’
– (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, गोवा. (२४.१०.२०१४)
३. मृत्यूपूर्वीची सिद्धता (तयारी)
व्यक्तीचे प्राणोत्क्रमण होण्याची वेळ जवळ आली आहे, असे जेव्हा कुटुंबियांच्या लक्षात येईल, तेव्हा घरातच शेणाने सारवलेल्या भूमीवर दर्भ पसरून त्यावर गवती चटई, घोंगडी, रग किंवा धाबळी अंथरून त्यावर त्या व्यक्तीला दक्षिणोत्तर (दक्षिणेकडे पाय करून) ठेवावे (झोपवावे). भूमी शेणाने सारवणे शक्य नसल्यास भूमीवर गोमय (गायीचे शेण) किंवा विभूती यांचे पाणी शिंपडावे.त्या व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालावे.
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’