सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव हे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित १०व्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिर व्यवस्थापन’ या चर्चेमध्ये ‘मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करावी !’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
‘‘सध्या हिंदु धर्म न मानणारे किंवा देवतेवर श्रद्धा नसलेले आधुनिकतावादीच मंदिरांतील वस्त्रसंहितेला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करत असतात. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, याला आम्ही ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणणार नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. येथे व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे’’, असे मार्गदर्शन सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की,
१. तमिळनाडू उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार भाविकांनी केवळ भारतीय पारंपरिक वस्त्रे परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
२. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू झाली आहे.
३. भारतातील सर्वच मंदिरांनी अशा प्रकारे वस्त्रसंहिता लागू करून मंदिरांमध्ये धर्माचरणाला प्राधान्य द्यावे, असे आम्ही आवाहन करतो.