जिवंतिका पूजन

श्रावण हा व्रत-वैकल्यांचा महिना असून, श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे. श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते. जिवतीची पूजा होते. जिवंतिका पूजन हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. ‘जिवंतिका ऊर्फ जिवती’ ही या व्रताची देवता होय. ही लहान मुलांचे संरक्षण करणारी आहे. पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया तिची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते.

 

संदर्भ : सनातन चा ग्रंथ धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र

जिवंतिका पूजन ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. या तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. जिवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे.

जिवतीची कहाणी

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा – अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जरादेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी ही जरा देवी. जरेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात.

संदर्भ : संकेतस्थळ

2 thoughts on “जिवंतिका पूजन”

    • नमस्कार,

      आम्हाला शब्दातील त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. शब्द सुधारला आहे.

      Reply

Leave a Comment