समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करत असतांना फळाची अपेक्षा नसणे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेमध्ये ‘ईश्वरप्राप्ती’ हेच मुख्य ध्येय शिकवलेले असणे

Article also available in :

अनुक्रमणिका

 

१. सध्या स्वतः साधना (व्यष्टी साधना) करण्यासमवेतच समाजालाही
अध्यात्माकडे वळवणे आणि धर्माचरणी करणे, ही समष्टी साधना आवश्यक
ठरली असणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले तशी साधना करण्यास शिकवत असणे

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सर्वदूर ईश्वरी राज्य यावेसे वाटते. त्यांचा किती व्यापक विचार आहे ! ईश्वरी राज्यात सर्व जण साधना आणि धर्माचरण करणारे सात्त्विक लोक असतील. तेव्हा वातावरण सत्ययुगासारखे असेल. सध्याच्या रज-तम वाढलेल्या कलियुगात एखाद्याला साधना करायची असल्यास ती करण्यात त्याला अडथळे येतात; कारण सध्याचे वातावरण आणि समाज साधनेला पूरक नाही. यामुळे सध्या स्वतः साधना (व्यष्टी साधना) करण्यासमवेतच समाजालाही अध्यात्माकडे वळवणे आणि धर्माचरणी करणे, ही समष्टी साधना आवश्यक ठरली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातनच्या साधकांना व्यष्टी साधनेसमवेतच समष्टी साधनाही करायला शिकवतात. ईश्वरप्राप्ती करायची असेल, तर साधनेची ही दोन्ही अंगे आत्मसात् करणे आवश्यक आहे; कारण ईश्वर हा सर्व जगाचाच कारभार बघत असतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

 

२. ईश्वरप्राप्तीसाठी समष्टी साधना व्हावी; म्हणून ईश्वरी
राज्य येण्यासाठी निरपेक्षपणे प्रयत्न करत असल्याचे परात्पर गुरु
डॉ. आठवले यांनी सांगणे आणि ते उत्तर योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना आवडणे

ईश्वरी राज्य येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजातील अनेक संतांशी जवळीक करून त्यांना या कार्यात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. समाजातील काही संतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आवडले आणि ते या ना त्या प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साहाय्य करू लागले. या संतांपैकी एक होते २०.५.२०१९ या दिवशी देहत्याग केलेले महाराष्ट्रातील कल्याण, जिल्हा ठाणे येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन ! एक दिवस योगतज्ञ दादाजी वैशंपायन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना म्हणाले, ‘‘या कलियुगात ईश्वरी राज्य येणे कसे शक्य आहे ! तुम्ही नाहक प्रयत्न करत आहात.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना म्हणाले, ‘‘ईश्वरी राज्य येण्यासाठी आम्ही निरपेक्षपणे प्रयत्न करत आहोत. आम्हाला फळाची अपेक्षा नाही. ते ईश्वराच्या हातात आहे. आम्ही हे प्रयत्न ईश्वरप्राप्तीसाठी आमची समष्टी साधना व्हावी; म्हणून करत आहोत.’’ या उत्तरामुळे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे समाधान झाले आणि ते केवळ गोड हसले.

 

३. ईश्वरी राज्य स्थापन होण्यासाठी २५ वर्षांएवढा प्रदीर्घ काळ
वाट पहावी लागणार आणि तेवढी वर्षे साधना करावी लागणार,
हे ठाऊक असूनही सहस्रो साधक या कार्याशी जोडले जाणे; कारण
‘ईश्वरी राज्य येणे’ हे त्यांचे खरे ध्येय नसून ‘ईश्वरप्राप्ती’ हेच त्यांचे खरे ध्येय असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देश-विदेशातील सहस्रो साधक ईश्वरी राज्य येण्यासाठी गेली २५ वर्षे व्यष्टी आणि समष्टी साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून उत्तर मिळवून ‘वर्ष २०२३ मध्ये ईश्वरी राज्य येईल’, असे आरंभीच सांगितले होते. आता वर्तमान स्थितीनुसार ईश्वरी राज्य वर्ष २०२५ मध्ये येणार आहे. यावरून लक्षात येते की, जोपर्यंत साधकांची ईश्वरी राज्य येण्याएवढी व्यष्टी साधना होत नाही, तसेच साधकांकडून समष्टी साधना आवश्यक तेवढ्या प्रमाणात होऊन समाज सात्त्विक बनत नाही, तोपर्यंत ईश्वरी राज्य येत नाही. ईश्वरी राज्य स्थापन होण्यासाठी २५ वर्षांएवढा प्रदीर्घ काळ वाट पहावी लागणार आणि तेवढी वर्षे व्यष्टी अन् समष्टी साधना करावी लागणार, हे ठाऊक असूनही सहस्रो साधक या कार्यात जोडले गेले आहेत. हे त्यांनी केलेले एकप्रकारे तपच आहे; कारण ‘ईश्वरी राज्य येणे’ हे त्यांचे खरे ध्येय नसून ‘ईश्वरप्राप्ती’ हे त्यांचे खरे ध्येय आहे !

 

४. एका कुटुंबाच्या उदाहरणावरून
‘ईश्वरी राज्य येण्याची प्रक्रिया कशी असेल ?’, याची कल्पना करता येणे

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जेव्हा वर्ष १९८६ मध्ये ‘अध्यात्म’ या विषयावरील अभ्यासवर्ग घ्यायला आरंभ केला, तेव्हा हातावर मोजण्याएवढे अध्यात्मातील जिज्ञासू अभ्यासवर्गासाठी येत होते. हळूहळू हे जिज्ञासू साधना करू लागले. त्यामुळे त्यांच्यात साधकत्व निर्माण झाले. त्या साधकांनी त्यांच्या कुटुंबियांना साधना सांगितली. हळूहळू त्यांचे कुटुंबीयही साधक बनू लागले. काही कुटुंबियांनी त्या साधकांना साधनेमध्ये विरोधही केला; पण साधकांनी साधना सोडली नाही. साधनेमुळे त्या साधकांमध्ये झालेले चांगले परिवर्तन, गुणसंवर्धन आणि साधनेचे होणारे अन्य लाभ विरोध करणाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे त्यांचा विरोध मावळून ते विरोधकही साधना करू लागले आणि साधक बनले. अशा तऱ्हेने कुटुंबेच्या कुटुंबे साधना करू लागली आणि सनातन संस्थेची साधकसंख्या कधी सहस्रो झाली, हे कळलेच नाही. साधना करून प्रथम स्वतःमध्ये ईश्वरी राज्य आले, तरच आपण अन्य व्यक्तींमध्ये ईश्वरी राज्य आणू शकू. स्वतःमध्ये ईश्वरी राज्य आणणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून स्वभावदोष-निर्मूलन, गुणसंवर्धन आणि अहं-निर्मूलन करून स्वतःला शुद्ध करणे, अंगी साधकत्व आणणे, धर्माचरण करणे आणि ईश्वरचरणी लीन रहाणे. अशा प्रकारे एका व्यक्तीमुळे तिच्या कुटुंबामध्ये ईश्वरी राज्य येते, पुढे एका कुटुंबामुळे अनेक कुटुंबे सात्त्विक होऊन एका गावात ईश्वरी राज्य येते. एका गावामुळे अनेक गावांत ईश्वरी राज्य येते. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण देशात ईश्वरी राज्य येते आणि एका देशामुळे अनेक देश सात्त्विक होऊ शकतात. ही शृंखला अभिक्रिया (चेन रिॲक्शन) आहे. सनातन संस्थेचे साधक देश-विदेशात गुरुकृपेने हेच कार्य करत आहेत.

 

५. एक सहस्राहून अधिक दैवी मुले ईश्वराने
सनातनलाच देण्याचे कारण म्हणजे सनातन संस्था ईश्वरी राज्य
आणण्यासाठी प्रयत्नरत असणे आणि ईश्वराला ईश्वरी राज्य येणे अपेक्षित असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनचे साधक गेली २५ वर्षे त्यांची समष्टी साधना म्हणून ईश्वरी राज्य आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत. असे असल्याने ईश्वर त्यांना कसे साहाय्य करतो, याचे एक उदाहरण म्हणजे सनातनच्या साधकांच्या पोटी जन्माला आलेली दैवी मुले ! काही दैवी मुले उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली आहेत, तर काही महर्लाेकातून ! ३१.५.२०२२ पर्यंत एकूण १ सहस्र १६६ मुलांची गुणवैशिष्ट्ये सनातनला ज्ञात आहेत. ही मुले प्रगल्भ आहेत, ईश्वराप्रती त्यांच्यात पुष्कळ भावही आहे, तसेच त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याची तळमळ आहे. सनातनला जन्मतःच संतपदी विराजमान असलेले २ बालसंतही लाभले आहेत. हे बालसंत जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहेत. ही बालकांची पिढीच पुढे ईश्वरी राज्य सांभाळेल. तशी कुवत त्यांच्यात आता बालपणीच दिसून येत आहे. एवढी दैवी मुले ईश्वराने सनातनलाच दिली; कारण सनातन संस्था ईश्वरी राज्य आणण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि ईश्वरालाही ईश्वरी राज्य येणे अपेक्षित आहे.

 

६. सनातनचे संत आणि उन्नती केलेले साधक ईश्वरी राज्य चालवण्यास
समर्थ असणे, तसेच सनातनचे आश्रमही ईश्वरी राज्य साकार झाल्याप्रमाणेच कार्यरत असणे

ईश्वरी राज्य सामान्य लोक नव्हे, तर संत आणि उन्नती केलेले साधकच चालवू शकतात; कारण त्यांच्यातच अल्प स्वभावदोष, अल्प अहं, नेतृत्वगुण, इतरांचा विचार करणे, त्यागी वृत्ती आणि प्रीती (निरपेक्ष प्रेम) हे गुण, तसेच राष्ट्र अन् धर्म यांबद्दल प्रेम असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी केलेल्या अचूक मार्गदर्शनामुळे ३१.५.२०२२ पर्यंत सनातन संस्थेचे १२१ साधक संतपदी पोचले असून १ सहस्र ३६७ साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत. अजूनही या संख्येत भर पडतच आहे. आतापर्यंत इतक्या संख्येने संत आणि साधक सिद्ध झाले असल्याने तेही दैवी बालकांप्रमाणे ईश्वरी राज्य चालवण्यास समर्थ आहेत, तसेच सनातनचे आश्रमही ईश्वरी राज्य साकार झाल्याप्रमाणेच कार्यरत आहेत. सनातनच्या आश्रमातूनही साधक घडत आहेत. अशा प्रकारे ईश्वराने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून ईश्वरी राज्य चालवण्याची सिद्धता करवून घेतली आहे.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा. (२३.५.२०२२)

कृतज्ञता

‘सनातन संस्थेच्या साधकांना साधनेमध्ये अचूक मार्गदर्शन करून त्यांची आध्यात्मिक उन्नती करवून देणारे आणि त्यांना संतपदी नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे महान गुरु लाभले आहेत, हे साधकांचे मोठे भाग्य आहे, तसेच ‘ईश्वरी राज्याची स्थापना करणे’, हे मोठे ध्येय साधकांसमोर ठेवणे, ते साध्य करण्यासाठी दिशादर्शन करणे आणि ते ध्येय दृष्टीपथात येत असल्याचा दाखलाही देणे, हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवून आणले. ‘ईश्वरप्राप्ती’ हे अंतिम ध्येय समोर ठेवून निरपेक्षपणे साधनेमध्ये कसे प्रयत्न करायचे ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच साधकांना शिकता आले. यासाठी सर्व साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहेत !

सनातन संस्थेच्या कार्यात सहस्रो साधक ‘ईश्वरी राज्या’ च्या ध्येयासाठी जोडलेले नसून ‘ईश्वरप्राप्ती’ साठी जोडलेले आहेत.

Leave a Comment