अमरावती – अमरावती येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा गजानन पोहनकर यांना गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती यांनी नुकतेच आचार्य पदवी देऊन सन्मानित केले. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्र आणि समाजप्रबोधनपर निवडक गीतांचे सांगीतिक अध्ययन’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. विद्यापिठातील मानव विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही.एस्. चौबे यांच्या शुभहस्ते ही उपाधी देण्यात आली.
या संशोधन कार्यात त्यांना अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरीचे वयोवृद्ध सचिव, तसेच वंदनीय राष्ट्रसंतांचे नीजी सचिव, भजनसाथी आणि छायाचित्रकार श्री. जनार्दनपंत बोथे यांनी राष्ट्रसंतांच्या जीवनगाथेतील अनेक प्रसंग सांगून अनमोल सहकार्य केले. या संशोधनात मार्गदर्शक म्हणून डॉ.(सौ.) वर्षा धनंजय कुलकर्णी यांनी अथक परिश्रम घेतले. सौ. मनीषा पोहनकर यांनी त्यांच्या यशाचे श्रेय सर्व गुरुवर्य, त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय यांना दिले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी आणि उच्च शिक्षणमंत्री श्री. उदय सावंत ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.
या वेळी व्यासपिठावर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.