प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी माहूरगडाची देवी श्री रेणुकादेवी हिची रथयात्रा काढली जाते. या उत्सवामागील इतिहास आणि महत्त्व लेखातून जाणून घेऊया.
१. तिथी
‘पौष पौर्णिमा या तिथीला शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाते.
२. इतिहास आणि उद्देश
एकदा महाभयंकर दुष्काळ पडला होता. अनेक वर्षे पाऊसच पडला नाही. तेव्हा प्रजेचे रक्षण करण्याकरता श्री शाकंभरीदेवीने तिच्या अंगातून धान्य निर्माण केले आणि प्रजेला वाचवले. त्याप्रीत्यर्थ श्री शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा करतात.
३. उत्सव साजरा करण्याची पद्धत
पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास न्यूनतम ६० आणि जास्तीतजास्त १०८ भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुकादेवीची थाटात रथयात्रा काढतात.’
श्री रेणुकादेवी
४. महत्त्व
या दिवशी आदिशक्तीरूपी धारणेचे तारक रूपातील लयकारी तत्त्व ब्रह्मांडात भ्रमण करत असते. हे तत्त्व जिवातील मनःशक्तीरूपी धारणा जागृत करून त्याला जीवनातील विशिष्ट आध्यात्मिक ध्येयाचे स्मरण करून देते. ही पौर्णिमा प्राणशक्तीदायिनी असल्याने अनेक गंभीर व्याधींना या दिवशी तिलांजली दिली जाते; कारण या दिवशी लयकारी भावातील तारक शक्तीरूपी तत्त्व हे देहातील मूळ रज-तमात्मक धारणेला नष्ट करते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, वैशाख कृष्ण दशमी (३०.५.२००८), दुपारी ३.२१)