पनवेल येथे धर्मप्रेमींच्या एकजुटीने निघाली यशस्वी हिंदू एकता दिंडी !

अनुक्रमणिका

शिवरायांची कर्मभूमी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
यांची जन्मभूमी असणार्‍या रायगड येथे हिंदु राष्ट्राचा जयघोष !

पनवेल – छत्रपती शिवरायांची कर्मभूमी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मभूमी रायगड येथील हिंदू एकता दिंडीत सहभागी धर्मप्रेमी हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त २८ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. विविध संघटना आणि स्थानिक धर्मप्रेमी यांचा सहभाग अन् एकजूट यांमुळे ही यशस्वी दिंडी निघाली. ७०० हून अधिक धर्मप्रेमी दिंडीत सहभागी झाले होते.

पनवेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथून दिंडीला प्रारंभ झाला. ह.भ.प. गणेश महाराज पाटील यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाचे अध्यक्ष श्री. मोतीलाल जैन आणि पनवेल येथील गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष अन् उद्योजक श्री. हरचंदसिंग सग्गू यांनी श्रीफळ वाढवले. श्री. विनायक वाकडीकर यांनी सपत्नीक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीतील छायाचित्राचे पूजन केले. खोपोली येथील धर्मप्रेमी श्री. किशोर पडवळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेल्या रथाला पुष्पहार अर्पण केला. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेविका कु. रूचिता लोंढे दिंडीत सहभागी झाल्या होत्या. महिला-पुरुष, तसेच लहान मुले पारंपरिक वेशात दिंडीत सहभागी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडीची सांगता झाली.

 

१. दिंडीची वैशिष्ट्ये

महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे पथक

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदी राष्ट्रपुरुषांच्या वेशात दिंडीत सहभागी झालेली मुले, कथ्थक नृत्य करणार्‍या युवती, भारतीय वाद्ये, लेझीम पथक, श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या भक्तीचे दर्शन घडवणारी रासलीला, श्रीफळाचा कलश घेऊन सहभागी झालेल्या सुवासिनी, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या युवती, कराटे-लाठीकाठी-दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके, प्रथमोपचार पथक, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचे पथक दिंडीचे वैशिष्ट्य ठरले.

श्रीकृष्ण आणि गोपींचे पथक

 

२. धर्मप्रेमींकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीवर पुष्पवृष्टी आणि औक्षण !

विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्टकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेल्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच धर्मध्वज आणि पालखी यांचे पूजन करण्यात आले. दिंडीमार्गात काही धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. पू. कलावती आई भजनी मंडळाच्या भगिनी, हनुमान मंदिराचे पुजारी श्री. अशोक पडवळ यांसह काही धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी  पालखीवर पुष्पवृष्टी केली, तर काहींनी पालखीचे पूजन अन् औक्षण केले.

 

३. स्थानिक हिंदूंचे सहकार्य !

३.अ. स्थानिक रहिवासी श्री. अभिजित म्हात्रे यांनी दिंडीसाठी टेम्पो उपलब्ध करून दिला.

३.आ. सौ. केतकी मानकामे यांनी दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी संस्कारभारतीच्या आकर्षक रांगोळ्या काढल्या.

 

४. सहभागी मान्यवर आणि संघटना !

संत श्री आसारामजी बापू यांच्या भक्तगणांचे पथक

 

संत आसारामजी बापू संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्री योग वेदांत समितीचे पनवेल प्रमुख श्री. प्रकाश माणिक, नारी शक्ती फाऊंडेशनच्या सचिव प्रतिमा चौहान, पनवेल व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. नारायण ठाकूर, श्री स्वामी समर्थ संप्रदायाचे (अक्कलकोटप्रणीत) श्री. मनोहर मुंबईकर, श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ, अंबिका योग कुटीर संघ, गायत्री परिवार

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाहनावरून हिंदूंनी एकत्र यावे ! – आमदार प्रशांत ठाकूर, भाजप

हिंदु धर्मावर होत असलेल्या विविध आघातांच्या विरोधात हिंदु समाज जागरूकपणे पुढे येऊन आवाज उठवत नाही. त्यामुळे हिंदु धर्माला विरोध करणार्‍यांचे फावते. या विरोधात हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाहनावरून हिंदूंनी एकत्र यावे. या कार्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !

६. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण
देशभरात हिंदू एकता दिंडी निघावी ! – कु. रूचिता लोंढे, नगरसेविका, भाजप

पक्ष, जात, संघटना हे भेद बाजूला सारून या हिंदू एकता दिंडीत सर्वजण ‘हिंदु’ म्हणून सहभागी झाले आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिदूंनी अशाच प्रकारे एकत्र येण्याची आवश्यकता आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण देशभरात अशा प्रकारे हिंदू एकता दिंडी निघायला हवी, तसेच सर्वांकडून अशा प्रकारे राष्ट्राची सेवा घडावी.

हिंदू जनजागृती समितीचे प्रथमोपचार पथक

 

७. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे
कार्य अवतारी ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९० मध्ये सनातन संस्थेची स्थापना करून हिंदूंना संघटित करण्याचे कार्य चालू केले. सनातनच्या माध्यमातून धर्मप्रचार चालू आहे. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे हे अवतारी कार्य सनातनच्या माध्यमातून चालू आहे.

 

८. सनातन संस्था धर्मकार्य करत आहे !
– ह.भ.प. गणेश महाराज पाटील, पनवेल ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रमुख

हिंदूंनी संघटित व्हावे आणि हिंदु धर्माचा प्रसार व्हावा, यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. वारकरी संप्रदाय, तसेच विविध संघटनांना समवेत घेऊन सनातन संस्था धर्मकार्य करत आहे. या माध्यमातून सर्व हिंदूंनी संघटित व्हावे. धर्महानी रोखण्यासाठी समस्त धर्मप्रेमी हिंदूंना शक्ती मिळावी, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना !

 

९. हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना प्रत्येक हिंदूच्या मनात रुजवण्याचे कार्य
परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

ही दिंडी हिंदु राष्ट्राची नांदी आहे. आपले राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांनी हिंदु राष्ट्राचे स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. हिंदू अधिवेशने, सभा, दिंडी, साधना या माध्यमांतून हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक हिंदूच्या मनात रुजवण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत.

 

१०. वारकर्‍यांचा भावपूर्ण सहभाग !

टाळ, मृदुंगाच्या गजरात भजने म्हणताना वारकऱ्यांचे पथक

टाळ-मृदूंग यांच्या गजरात श्री विठ्ठलाला आळवत वारकरी मंडळींनी दिंडीत भावपूर्ण सहभाग घेतला. पनवेल ते पंढरपूर पायी कोकण दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज पाटील, शनैश्वर भजनी मंडळाचे ह.भ.प. रघुनाथ महाराज, खांब (रोहा) येथील ह.भ.प. मारुती महाराज कोल्हटकर, ह.भ.प. सुरेश महाराज पाटील (पनवेल), ह.भ.प. संतोष महाराज सते (भाताण) यांची दिंडीत वंदनीय उपस्थिती लाभली. यामध्ये महिला वारकरीही सहभागी झाल्या होत्या. वारकर्‍यांची भावपूर्ण भजने ही दिंडीचे आकर्षण ठरली.

वंदनीय उपस्थिती

सद्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर, सद्गुरु राजेंद्र शिंदे, ह.भ.प. गणेश महाराज (पनवेल ते पंढरपूर पायी कोकण दिंडीचे अध्यक्ष), शनैश्वर भजनी मंडळाचे ह.भ.प. रघुनाथ महाराज, ह.भ.प. सुरेश महाराज पाटील, ह.भ.प. संतोष महाराज सते, ह.भ.प. मारुति महाराज कोल्हटकर, पू.(श्रीमती) सुशीला मोदी, पू. शिवाजी वटकर, पू. (सौ.) संगीता जाधव

Leave a Comment