सांगली – गणरायाच्या सांगलीत ‘जय श्रीराम’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘हिंदु धर्म की जय’, अशा घोषणांनी मार्गक्रमण करणाऱ्या अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदू एकतेचा हुंकार देणाऱ्या हिंदू एकता दिंडीने सांगलीकरांची मने जिंकली. २५ मे या दिवशी झालेल्या या दिंडीत विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ असे दीड सहस्राहून अधिक हिंदू सहभागी झाले होते. झुलेलाल चौक येथून प्रारंभ झालेल्या दिंडीचा मारुति चौक येथे समारोप झाला.
समारोपप्रसंगी समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ, सनातन संस्थेचे श्री. राजाराम रेपाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. धर्मप्रेमी श्री. गणेश बुचडे यांच्या हस्ते झुलेलाल चौक येथे धर्मध्वज पूजनाने दिंडीचा प्रारंभ झाला. रामनाथी (गोवा) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले विराजमान झालेल्या चैतन्यमय रथाचा सहभाग या दिंडीत होता. या रथाचे पूजन सनातन संस्थेच्या आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असलेल्या साधिका सौ. शोभा शेट्टी आणि आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असलेले श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांनी केले. श्री गणेशाच्या पालखीचे पूजन सौ. निर्मला नावंधर यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित संत – पू. राजाराम नरुटे, पू. दीपक (नाना) केळकर, पू. ईश्वरबुवा रामदासी, पू. मौनीबाबा, मिरज येथील समर्थभक्त चंद्रशेखर कोडोलीकर
उपस्थित मान्यवर – माजी आमदार श्री. नितीन शिंदे, माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा मोडक, तासगाव येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. संजय चव्हाण, सांगली जिल्हा कामगार सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन चव्हाण, शिवसेनाप्रणित शिवसामर्थ्य सेनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री. पुरण मलमे, मिरज येथील शिवसेना व्यापारी सेनेचे श्री. पंडितराव (तात्या) कराडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सचिन पवार, हरिदास कालिदास, श्रीकृष्ण माळी, मिरज येथील श्री. सचिन भोसले, पत्रकार श्री. सूर्यकांत कुकडे यांसह अन्य
ही दिंडी म्हणजे एक धर्मकार्यच आहे ! – माधवराव गाडगीळ, मिरज
समारोपप्रसंगी श्री. माधवराव गाडगीळ म्हणाले, ‘‘सर्व संप्रदाय-संघटना यांना एकत्र करून हिंदू एकजुटीचे दर्शन या दिंडीच्या माध्यमातून घडले आहे. ही दिंडी म्हणजे एक धर्मकार्यच आहे. घरोघरी ‘संस्कार’ पोचवण्याचे सनातन संस्था करत असलेले कार्य पुष्कळ आवश्यक आहे. सनातन संस्थेने विविध ग्रंथ प्रकाशित केले असून हे ग्रंथही घरोघरी पोचले पाहिजेत. या कार्यात आपणही सर्वांनी सहभागी होऊया !’’
दिंडीचे स्वागत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर धर्मप्रेमी सौ. सुजाता माळी आणि धर्मशिक्षणवर्गातील महिला यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर उपस्थित होत्या. कापडपेठेत व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी श्री. शिरीष आणि सौ. निशा सारडा यांनी धर्मध्वजाचे पूजन केले, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. युवराज मोहिते यांनी उत्स्फूर्तपणे धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला.
दिंडीत वैशिष्ट्यपूर्ण असे सूप आणि घागर खेळणाऱ्या साधिका
विशेष
१. दिंडी कापडपेठेत आली असता तिथे २ गोमाता आल्या होत्या. त्या काही काळ दिंडीसमवेत थांबल्या होत्या.
२. दिंडीच्या मार्गात प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रदीप किणीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
३. अनेकांनी भ्रमणभाषमध्ये दिंडीची छायाचित्रे काढली, ध्वनीचित्रीकरण केले आणि इतरांना पाठवले.
विशेष अभिप्राय
१. पू. ईश्वरबुवा रामदासी, भाळवणी – सनातनने अनेक वर्षांपूर्वी जो वृक्ष लावला आहे, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दिंडी पुष्कळ भव्य होती. अशी दिंडी पुनःपुन्हा निघायला हवी.
२. श्री. महेश रानडे, जी.आर्. ताम्हणकर बूक सेलर्स – दिंडीच्या माध्यमातून हिंदु धर्म जगासमोर आला. अशी दिंडी वारंवार निघावी !
३. श्री. भालचंद्र तानवडे, तानवडे बूक सेलर्स – बऱ्याच कालावधीनंतर अशी दिंडी पहायला मिळाली. धर्मजागृतीपर अशी दिंडी निघणे आवश्यक आहे. दिंडीतील शिस्तबद्धता वाखाणण्यासारखी होती.
४. श्री. नितीन शिंदे, माजी आमदार – सर्व हिंदू, सर्व संप्रदाय यांना एकत्र करणारी ही दिंडी आहे. जे जे हिंदु धर्म विरोधक आहेत, त्यांच्यासारख्यांना याचप्रकारे संघटितपणाने प्रत्युत्तर मिळणार आहे.
सहभागी आखाडे
श्री. रोहित गावडे मुख्य संयोजक असलेला वीर योद्धा आखाडा कवठेसार (उमळवाड) आणि विटा येथील शिवमल्हार यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांची मने जिंकली. कुपवाड येथील जिजाऊ मर्दानी आखाडा हे पथकही दिंडीत सहभागी होते
आटपाडी येथील भजनी मंडळ, कुमठे, कौलगे, उपळावी, धुळगाव, मांजर्डे, बस्तवडे, गवळीवाडी, गणेशवाडी, येळावी, पलूस, कवठेमहांकाळ, ईश्वरपूर यांसह अनेक गावांतील धर्मप्रेमी सहभागी झाले होते.