भारत देश हा विश्व संस्कृतीचे उगमस्थान आहे. जागतिक स्तरावर मानवाने केलेल्या संशोधनांचा विचार केल्यास त्यांत भारताचा सिंहाचा वाटा आहे. प्रस्तुत लेखातून भारताने जगाला अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रात अमूल्य आणि एकमेव असे योगदान दिले असल्याचे आपल्याला लक्षात येईल. यांतून अखिल विश्वावर भारताने उमटवलेला त्याचा अद्वितीय ठसा याविषयीचा ही प्रत्यय येईल.
१. भारतीय संस्कृतीने दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे मनुष्याचा सर्वांगीण विकास होणे
२. भारतीय संस्कृतीप्रती विदेशी विद्वानांची श्रद्धा
२ अ. मॅक्समुलर – भारतियांनी विकसित झालेल्या मानसिक
आणि बौद्धिक शक्तीचा सदुपयोग करून शाश्वत आणि दिव्य आध्यात्मिक जीवन विकसित केले !
ख्रिस्ताब्द १८५८ मध्ये जर्मनीचे प्रसिद्ध विद्वान मॅक्समुलर महाराणी व्हिक्टोरियाला म्हणाले, ‘‘जर मला विचारले की, कोणत्या देशात मानवी मेंदूने आपल्या मानसिक आणि बौद्धिक शक्ती विकसित करून त्यांचा योग्य अर्थाने सदुपयोग केला आहे, तर मी भारताकडेच संकेत करीन. जर कोणी विचारले की, कोणत्या साहित्याचा आश्रय घेऊन सेमेटिक, यूनानी (ग्रीक) आणि रोमन विचारधारेत वहात असलेले युरोपीय आपले आध्यात्मिक जीवन अधिकाधिक विकसित करू शकतील, ज्याचा केवळ इहलोकांशीच संबंध नसेल, शाश्वत आणि दिव्यसुद्धा असेल, तरीही मी भारताकडेच संकेत करीन.’’
२ आ. फ्रान्सचा महान तत्त्वचिंतक व्होल्टेअर (Voltaire) – फ्रान्सला लाभलेले सर्व ज्ञान भारतातून आले !
फ्रान्सचे महान तत्त्वचिंतक व्होल्टेअर म्हणतात, ‘मला या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की, आमच्याकडे जे काही ज्ञान आहे, मग ते अवकाश विज्ञान असो, ज्योतिष विज्ञान वा पुनर्जन्म यांविषयीचे ज्ञान असो, ते आम्हाला गंगेच्या काठावरूनच (भारतातून) लाभले आहे.’
२ इ. लॉर्ड वेलिंग्टन – सर्व भारतीय विश्वातील सर्वोत्तम शीलसंपन्न
लोक असून त्यांच्यात माधुर्य आणि शालीनता यांचे अद्भुत सामंजस्य झळकते
लॉर्ड वेलिंग्टन म्हणतात, ‘सर्व भारतीय मग ते राजकुमार असोत वा झोपडीत रहाणारे दरिद्री असोत, ते विश्वातील सर्वोत्तम शीलसंपन्न लोक आहेत. जणू हा त्यांचा नैसर्गिक धर्म आहे. त्यांच्या वाणीत, तसेच व्यवहारात माधुर्य आणि शालीनता यांचे अद्भुत सामंजस्य झळकते. ते दयाळू आणि सहानुभूतीचे कोणतेही कर्म विसरत नाहीत.’
२ ई. प्रसिद्ध इतिहासकार लेथब्रिज – पाश्चात्त्य दर्शनशास्त्राचे आदिगुरु भारतीय ऋषी आहेत, यात कोणतीही शंका नाही !
२ उ. सर मोनियर विल्यम्स – युरोपचे प्रथम दार्शनिक
प्लेटो आणि पायथागोरस या दोघांनीही भारतीय गुरूंकडून दर्शनशास्त्राचे ज्ञान मिळवले !
गणितज्ञ पायथागोरस उपनिषदांच्या दार्शनिक विचारधारेने विशेष प्रभावित होते. सर मोनियर विल्यम्स म्हणतात, ‘युरोपचे प्रथम दार्शनिक प्लेटो आणि पायथागोरस या दोघांनीही दर्शनशास्त्राचे ज्ञान भारतीय गुरूंकडून मिळवले होते.’
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, २५०० वर्षांपूर्वी पायथागोरस भूमिती शिकण्यासाठी समोसहून गंगेकाठी गेले होते. जर त्या वेळी पूर्वकाळापासून युरोपात ब्राह्मणांच्या विद्येचा महिमा पसरला नसता, तर त्याने इतका कठीण प्रवास केला नसता.
संदर्भ : व्होल्टेअरच्या दिनांक १५.१२.१७७५ या दिवशी लिहिलेल्या पत्रातून
खरे पहाता, पायथागोरसचे प्रमेय शिकणारे आजचे विद्यार्थी महर्षी बोधायन लिखित ‘बोधायन श्रौतसूत्र’ या ग्रंथाच्या अंतर्गत शुल्ब सूत्रांपैकी एक प्रमेय शिकत आहेत.
१. गेटे यांनी महाकवी कालिदास रचित ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ नाटकातून प्रेरणा घेऊन ‘ड्रामा फास्ट’ची रचना केली.
२. दार्शनिक फिटके, तसेच हेगल वेदांताच्या अद्वैतवादाच्या आधारे एकेश्वरवादावर लिहू शकले.
३. अमेरिकन विचारवंत थोरो आणि इमर्सन यांनी भारतीय दर्शनशास्त्राच्या प्रभावाचाच प्रचार-प्रसार आपल्या भाषेत केला.
गणितविद्येचा संशोधक भारतच आहे. शून्य, तसेच इतर संख्या लिहिण्याची आधुनिक पद्धत मूलतः भारताचीच देणगी आहे. यापूर्वी अंक विविध चिन्हांनी दाखवले जात होते. भारतीय विद्वान आर्यभट्ट यांनी वर्गमूळ, घनमूळ यांसारख्या गणिताच्या सूत्रांचा शोध लावला. तो आज संपूर्ण जगात प्रचलित आहे.
२ ऊ. वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन (Albert Einstein)- महत्त्वपूर्ण वैज्ञानिक
शोध लावण्यासाठी गणती करायला शिकवणार्या भारतियांचे अत्यंत ऋणी आहोत !
भौतिक शास्त्राचे महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, ‘‘आम्ही भारतियांचे अत्यंत ऋणी आहोत. त्यांनी आम्हाला गणती करायला शिकवले; कारण त्या व्यतिरिक्त कोणताही महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध लावता येत नाही.’’
२ ए. अरबी लोक भारतातून अंकविद्या शिकल्याने अंकांना ‘हिंदसा’ म्हणतात. मग पाश्चिमात्त्य विद्वान त्यांच्याकडून शिकले.
२ ऐ. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्या वेळेचा
अचूक अंदाज लावणारी ज्योतिषविद्या भारताचीच देणगी असणे
कित्येक शतकांपूर्वी भारतीय ज्योतिषांनी शोधून काढले की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्या वेळेचा अचूक अंदाज लावणारी ज्योतिषविद्या याच देशाची देणगी आहे. जर्मनीच्या काही विश्वविद्यालयांमध्ये आजही वेदांच्या दुर्लभ प्रती सुरक्षित ठेवल्या आहेत. त्यात वर्णित कितीतरी गूढ सूत्रांवर तेथील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. भारताचा महिमा ऐकून चीनचे विद्वान फाह्यान, ह्युएनसांग, इत्सिंग इत्यादी भारतभूमीच्या दर्शनासाठी येथे आले आणि ते कित्येक वर्षे येथे ज्ञानार्जन करत राहिले.
३. सध्याचे देश आणि त्यांचा हिंदू पूर्वेतिहास
भारतीय संस्कृतीप्रती विदेशी विद्वानांची श्रद्धा अकारण नाही. विश्वात ज्ञान-विज्ञानांची जी सुविकसित माहिती दिसून येते, तिच्यात महत्त्वाचे योगदान भारताचेच आहे. आजही त्याचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. दक्षिणपूर्व आशियात भारताचे व्यापारी सुमात्रा, मलेशिया आणि निकटवर्ती अन्य द्विपांमध्ये जाऊन वसले होते. चौथ्या शतकापूर्वी आपल्या वैशिष्ट्यांमुळे ही संस्कृती त्या देशांची दिशादर्शक बनली. जावाचे बोरोबुदूर स्तूप आणि कंबोडियाचे शैव मंदिर राज्यांच्या सामूहिक शक्तीचे प्रतीक आणि प्रतिनिधी होते. राजतंत्र या धर्मसंस्थानांच्या अधीन राहून कार्य करत होते. चीन, जपान, नेपाळ, श्रीलंका, तिबेट आणि कोरिया यांच्या संस्कृतीवर भारताचा अमिट ठसा आजही दिसून येतो.
अ. कंबोडिया हे तिसर्या ते सातव्या शतकापर्यंत हिंदु गणराज्य होते. तेथील निवासींचा विश्वास आहे की, या देशाचे नाव भारतीय ऋषी कौंडिण्य यांच्या नावावरून पडले आहे.
आ. इंडोनेशिया सध्या मुसलमान राष्ट्र आहे; परंतु भारतीय संस्कृतीचा अमिट ठसा तेथे दिसून येतो. ‘इंडोनेशिया’ ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ होतो, ‘भारतीय द्वीप.’
इ. जावा येथील लोकांचा विश्वास आहे की, भारताच्या पराशर ऋषी आणि वेदव्यास मुनी यांनी येथे विकसित सभ्यवस्ती वसवली होती.
ई. सुमात्रा द्वीपात चौथ्या शतकात हिंदु राज्याची स्थापना झाली होती. येथे पाली आणि संस्कृत भाषा शिकवली जाते.
उ. बोर्नियोत हिंदु राज्याची स्थापना पहिल्या शतकात झाली होती. तेथे भगवान शंकर, श्री गणपति, ब्रह्मदेव आणि इतर देवी-देवतांच्या, तसेच अगस्त अन् इतर ऋषीमुनींच्या मूर्ती मिळाल्या आहेत. कितीतरी पुरातन हिंदु मंदिरे आजही येथे दिसून येतात.
ऊ. इतिहासकारांच्या मते, थायलँडचे जुने नाव ‘श्याम देश’ होते. तेथील सभ्यता भारतीय संस्कृतीशी मिळतीजुळती आहे. दसरा, अष्टमी, पौर्णिमा, अमावास्या इत्यादी पर्वांच्या दिवशी येथेही भारताप्रमाणेच उत्सव साजरे केले जातात. थाई रामायणाचे नाव ‘रामकियेन’ आहे. याचा अर्थ आहे, ‘रामकीर्ती’.
असे असंख्य पुरावे विश्वातील विविध देशांमध्ये विखुरलेले आहेत. ते पुरावे सांगतात, ‘भारताने वेळोवेळी आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या महासागरांतून विश्व-वसुंधरेवर अभिसिंचन केले आहे, आता करत आहे आणि यापुढेही करत राहील.’ (संदर्भ : ऋषीप्रसाद, ऑगस्ट २०१२)
विश्वगुरु भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अद्भुत शोधांची देणगी !
गणित
प्रमेय
बोधायन ऋषींनी सर्वप्रथम प्रमेय समजावून सांगितले होते, ज्याला आज आपण ‘पायथागोरसचे प्रमेय’ या नावाने ओळखतो.
शून्य आणि बायनरी प्रणाली
‘शून्य’ आणि ‘बायनरी’ प्रणाली हा आर्यभट्टांचाच शोध होता. नासाचे वैज्ञानिक डॉ. ब्रिग्स म्हणतात, ‘‘आपण हे विसरू नये की, गणितातील शून्यसुद्धा भारतीय विचारवंतांची देणगी आहे आणि बायनरी पद्धत, जी आता संगणकात वापरली जाते, तीसुद्धा भारताचाच शोध आहे.’’
गणिताची स्थानिक मूल्ये (value system) आणि दशांश अपूर्णांक पद्धत
ख्रिस्तपूर्व १०० मध्ये भारताने गणिताची स्थानिक मूल्ये (value system) आणि दशांश अपूर्णांक पद्धत विकसित केली होती. तेव्हाच जगातील महान भौतिक वैज्ञानिक अलबर्ट आइनस्टाईनने म्हटले आहे, ‘‘आम्ही भारतियांचे अत्यंत ऋणी आहोत; कारण त्यांनी आम्हाला गणती करायला शिकवली. तिच्याविना कोणताही महत्त्वाचा वैज्ञानिक शोध केला जाऊ शकत नाही.’’
त्रिकोणमिती (ट्रिग्नॉमॅट्री) आणि बीजगणित (अल्जेब्रा)
गणितातील त्रिकोणमिती (ट्रिग्नॉमॅट्री) आणि बीजगणित (अल्जेब्रा) विषय ही जगाला भारताची देणगी आहे. ‘कॅलक्युलस’ चा शोध न्यूटनच्या कित्येक वर्षांपूर्वी चौदाव्या शतकात केरळचे विद्वान आणि गणिततज्ञ यांनी लावला होता.
वर्ग समीकरण सोडवण्याचा नियम
अकराव्या शतकात श्रीधराचार्य यांनी बीजगणितात अनेक महत्त्वाची सूत्रे शोधली. वर्ग समीकरण (Quadratic Equations) सोडवण्याचा नियम आजही ‘श्रीधर नियम’ अथवा ‘हिंदू नियम’ या नावाने प्रचलित आहे. यांच्या ग्रंथांमध्ये अंकगणित आणि क्षेत्रव्यवहाराचे विशेष विवरण आहे.
श्रीनिवास रामानुजन् हे भारताचे जगप्रसिद्ध गणितज्ञ होते, ज्यांनी बनवलेले गणिताचे एकेक उदाहरण सोडवण्यासाठी जगातील मोठमोठ्या गणिततज्ञांना कित्येक वर्षे लागली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान
अणू संकल्पना
महर्षि कणाद यांनी आधुनिक वैज्ञानिक डाल्टन यांच्या सहस्रो वर्षांपूर्वी अणूची संकल्पना आणि वैेषेयिक दर्शनाचे संशोधन केले होते.
विमानविद्या
भारद्वाज ऋषि हे वैदिककालीन विमानविद्येचे प्रणेते आहेत. त्यांच्या ‘वैमानिक प्रकरणम्’ या ग्रंथात विमानविद्येची सविस्तर माहिती आढळते. सध्याचे पुरातन हस्तलिखित लिपीचे संशोधक आणि पुरालेखवेत्ता श्री. गणेश नेर्लेकर देसाई यांना कळून चुकले की, भारद्वाज ऋषींच्या या ग्रंथाच्या आधारे राईट बंधूंच्या आधी १० वर्षे मुंबईतील श्री. शिवकर तळपदे यांनी पहिले विमान उडवले होते.
गुरुत्वाकर्षणाचा शोध
भास्कराचार्यांनी न्यूटनच्या आधी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला होता.
अणूशक्ती
डॉ. होमी भाभा यांनी अणूशक्तीच्या क्षेत्रात कित्येक महत्त्वाचे शोध लावले.
बिनतारी संदेश
अमेरिकेच्या IEEE नामक संघटनेने एक शतक जुनी शंका दूर करत सिद्ध केले की, बिनतारी (वायरलेस) संचाराचे मार्गदर्शक मारकोनी नसून प्राध्यापक जगदीशचंद्र बोस होते; म्हणून नभोवाणी, दूरदर्शन, भ्रमणभाष वगैरेंच्या संशोधनाच्या मुळाशीही जगदीशचंद्र बोसच आहेत. बोस भौतिक, जीव, वनस्पती, तसेच पुरातत्व विज्ञानाचे विशेषज्ञ आणि ‘क्रेस्कोग्राफचे’ सर्वप्रथम संशोधक होते. नभोवाणी आणि सूक्ष्म तरंगांच्या प्रकाशिकीवर कार्य करणारे ते पहिले वैज्ञानिक होते.
भाषा आणि खगोलशास्त्र
लॅटीन भाषेद्वारे संस्कृत भाषेला सर्व युरोपियन भाषांची जननी मानले जाते. वर्ष १९८७ मध्ये छापलेल्या मासिकानुसार संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत उपयुक्त भाषा आहे. आजच्या खगोेेल शास्त्रज्ञांच्या शेकडो वर्षांपूर्वीच पाचव्या शतकात भास्कराचार्य यांनी सौरवर्ष ३६५.२५८७५६८४ दिवसांचे असल्याचे सांगितले होते.
आयुर्वेद आणि शल्यचिकित्सा
मानवाच्या माहितीनुसार आयुर्वेद ही सर्वांत प्राचीन चिकित्साप्रणाली आहे, ती स्वतः भगवान धन्वंतरी यांची देणगी आहे आणि आचार्य चरक आयुर्वेदाचे महान चिकित्सक होते. ते ‘चरकसंहिते’चे रचनाकारही होते.
शल्यचिकित्सेचे जनक (Father of Surgery) महर्षि सुश्रुत होते. आजपासून २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी महर्षि सुश्रुत आणि भारताच्या इतर स्वास्थ्य वैज्ञानिकांनी प्रसुती, मोतीबिंदू, अस्थिभंग, मूतखडा इत्यादींच्या शल्यचिकित्सा केल्या होत्या.
जगातील पहिले विश्वविद्यालय
जगातील सर्वांत पहिले विश्वविद्यालय ‘तक्षशिला’ हे ख्रिस्तपूर्व ७०० मध्ये भारतात स्थापित करण्यात आले होते. त्यात संपूर्ण विश्वातील १० सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थी ६० पेक्षा अधिक विषय शिकत होते. पाचव्या शतकात हुणांनी भारतावर विध्वंसक आक्रमण केले. त्यात तक्षशिलानगर उद्ध्वस्त झाले.
शैक्षणिक क्षेत्रात प्राचीन भारताची सर्वांत उच्च उपलब्धी असलेल्या ‘नालंदा’ विश्वविद्यालयाची स्थापना पाचव्या शतकात बिहारमध्ये झाली होती. या विश्वविद्यालयाला बाराव्या शतकात तुर्क आक्रमणकारी बख्तियार खिलजीने जाळून नष्ट केले होते.
दोन्ही विश्वविद्यालयांचा विनाश, तसेच शिक्षणाची ज्ञानमंदिरे, मठ आणि गुरुकुले यांचा विनाश हा खगोल, विज्ञान, गणित, रसायनविद्या, शरीररचना वगैरे विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेले महान संशोधन नष्ट करण्याच्या हेतूने करण्यात आला होता.
योग आणि अध्यात्म यांसाठी जगात सदैव अग्रगण्य असणारा भारत !
- संपूर्ण विश्वाच्या उद्धारासाठी सक्षम वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवद्गीता वगैरे सद्ग्रंथ भारताच्या संत-महापुरुषांचीच देणगी आहेत.
- जगभरातील मनुष्याचे सर्वांत मोठे संघटन भारतात कुंभमेळ्याच्या रूपात आयोजित केले जाते.
- अनादिकाळापासून संपूर्ण विश्व भारताच्या अध्यात्म आणि योगविद्येने शांती अन् आनंद मिळवत आहे. त्याच समवेत स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, परमहंस योगानंद, स्वामी राम, साई श्री लीलाशाहजी महाराज यांसारख्या ब्रह्मज्ञानी संतांनी विदेशांत जाऊन असंख्य लोकांना भारताच्या महान वैदिक दर्शनशास्त्रांविषयी अवगत केले आणि आध्यात्मिकता, ध्यानयोग, शाकाहार इत्यादींचे महत्त्व सांगून त्या लोेकांचा दृष्टीकोेन पालटला.
औद्योगिक, क्रीडा आणि अन्य
- नौकानयन (Navigation) शास्त्राच्या कलेचा जन्म ५ सहस्र वर्षांपूर्वी सिंध प्रांतात झाला होता. इंग्रजी शब्द ‘नेवीगेशन’ हा संस्कृत शब्द ‘नवगतिः’ पासून सिद्ध केला आहे.
- ‘जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका’ नुसार वर्ष १८९६ पर्यंत जगाला हिरे देणारा एकमेव देश भारत होता.
- जगात पाणीपुरवठ्यासाठी सर्वांत पहिले जलाशय आणि धरण सौराष्ट्रात बांधण्यात आले होते.
- जगप्रसिद्ध बौद्धिक खेळ ‘बुद्धीबळ’ याचा शोध भारतात लागला होता.
मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतमुळे गौरवशाली इतिहासाविषयी अनभिज्ञ !
वरील तथ्ये भारतीय संस्कृतीच्या महान इतिहासाची केवळ एक झलक आहेत. भारतीय संस्कृती इतकी गौरवशाली आहे की, ती जाणून घेतल्यानंतर आपला आत्मविश्वास आणखी दृढ होतो की, त्या महापुरुषांची आपण संतती आहोत, ज्यांनी जगाला सजवले-सावरले आहे. आपणही सर्वकाही करू शकतो; परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, आज शाळा-महाविद्यालयांमध्ये मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीनुसार शिकवल्या जाणार्या खोट्या इतिहासात भारताच्या या संशोधनांकडे दुर्लक्ष केले जाते, भारतीय संस्कृती आणि संतांचा महिमा यांपासून भारतियांना अनभिज्ञ ठेवण्यात येते.
ब्रह्मज्ञानी संत भारतीय संस्कृतीचा महिमा प्रकट करतील !
जोपर्यंत ब्रह्मज्ञानी संत या भारतभूमीवर अवतरित होत रहातील, तोपर्यंत भारत आणि त्याच्या संस्कृतीचा महिमा पुनःपुन्हा प्रगट होत राहील. याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे की, लक्षावधी हिंदू, जे प्रलोभन अथवा विदेशी झगमगाटाने प्रभावित होऊन भारतीय संस्कृतीपासून वंचित होत होते, ते पुन्हा सहकार्य, उपदेश आणि दीक्षेने स्वस्थ, साहाय्यक, स्नेही आणि सुखद जीवनाकडे अग्रेसर होत आहेत.’
(संदर्भ : मासिक ‘लोककल्याण सेतु’, मे २०१४)
जगाचा आध्यात्मिक गुरु : भारत
‘कधी काळी या भारतभूमीतून चारही दिशांनी वेदमंत्राचे स्वर निनादत असत. ‘सुवर्णभूमी’ असलेला हा भारत देश जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ होता. सुजलाम्, सुफलाम् असलेल्या या देशात स्थैर्य, समृद्धी आणि संपन्नता असल्यामुळे येथे वारंवार परकियांची आक्रमणे झालेली आहेत. असे असले, तरीही भारतभूमीतील पवित्रता नित्य टिकून आहे.
खरेतर भारताने संपूर्ण जगताला बहुमोल अशा अध्यात्माची देणगी दिली. या भूमीत अनेक अवतार होऊन गेले. या भूमीने श्रीकृष्णाच्या बाललीला पाहिल्या. आपल्या तपःश्चर्येने संपूर्ण भूमंडळाला पवित्र करणारे तपःपूत ऋषिमुनी पाहिले. समाजात मिसळून समाजाला अध्यात्ममार्गी बनवणार्या संतांनाही या भूमीने अनुभवले. भारतीय संस्कृतीने कोट्यवधींना जगायला आणि जीवनातील आनंद घ्यायला शिकवले. जगभरात कोठेच न घडलेल्या अत्युच्च दैवी घटना केवळ भारतातच घडल्या असून भारताने संपूर्ण जगताला अध्यात्माची देणगी दिलेली आहे.
विदेशांत सर्वत्र रज-तमप्रधान भोगविलासी संस्कृती बोकाळली आहे. तेथे साधनेविषयी मार्गदर्शन करणारे संत, अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांचीही संख्या तुरळकच आहे. त्यामुळे तेथे नामजपादी साधना करतांना अनेक अडथळे येतात. याउलट भारत ही संत आणि ईश्वराचे अवतार यांच्या चरणस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे. आजही येथे अनेक संत-महात्मे आहेत. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात चांगले वाटते. यावरून भारताला जगाचा ‘आध्यात्मिक गुरु’ का म्हटले जाते, ते स्पष्ट होते.
मान्यवरांनी विश्वगुरु भारताविषयी व्यक्त केलेली मते !
भारत पिंडतः धार्मिक असल्याने धर्मरक्षणाचे कार्य परमेश्वराने भारतावर सोपवलेले असणे
‘भारताचे राज्य जरी निधर्मी असले, तरी भारत पिंडतःच धार्मिक आहे. योगी अरविंद म्हणाल्याप्रमाणे या कल्पांतात तरी धर्मरक्षणाचे काम परमेश्वराने भारताकडे सोपवले आहे. ‘दुर्लभं भारते जन्म’, म्हणजेच ‘भारतात जन्म मिळणे दुर्लभ आहे’, असे तेवढ्याकरता म्हटले आहे.’
– श्री. मधुकर (प्रज्ञालोक, ९.१.१९६३)
भारत आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा उभा राहील, तेव्हाच तो जगद्गुरु होईल !
‘अध्यात्माविना राष्ट्र मोठे होऊ शकत नाही. ज्या राष्ट्रात धर्म नाही, ते राक्षसी राष्ट्र असेच म्हटले पाहिजे. आपला देश आध्यात्मिकदृष्ट्या जेव्हा उभा राहील, तेव्हाच तो जगद्गुरु होईल.’
– श्री. भास्कर नागरे, मुंबई प्रांतीय संवादक, भारत स्वाभिमान ट्रस्ट. (२३.५.२०११)
भारताच्या अंतरंगात शिरलेल्यांनाच या देशाच्या आगळ्या प्रभेचा अनुभव येणे शक्य !
जे लोक भारतीय जनतेला इतर देशातील जनतेपेक्षा अल्पमात्र भिन्न समजतात अन् तसे बोलतात, ते केवळ वरवर पहातात. तिच्या अंतरंगात ते शिरलेच नाहीत, असे म्हणावे लागते. ज्यांनी या देशाच्या अंतरंगात खोल प्रवेश केला आहे, त्यांना असा अनुभव आल्याविना रहाणार नाही की, या देशाची प्रभा काही आगळीच आहे. हे म्हणणे इतके खरे आहे की, मोठी मर्मग्राही दृष्टी असलेल्या एका इंग्रज लेखकाला असे म्हणावे लागलेे आहे की, प्रचलित काळातील संघर्ष पूर्व अन् पश्चिम यातला नसून, भारतवर्ष आणि तदितर सारे जग यांमधील आहे. भारताला ‘पुण्यभूमी अन् कर्मभूमी’ असे जे संबोधले जाते, ते काही उगाच नव्हे.’
– सर जॉन वुड्रॉफ, ‘शक्ती आणि शाक्त’ (इंग्रजीवरून)
भारतियांनो, विश्वाचे मंगल चिंतणार्या भारताच्या समृद्ध परंपरेपासून वंचित राहू नका !
सम्प्राप्य भारते जन्म सत्कर्मसु पराङमुखः ।
पीयूषकलशं मुक्त्वा विषभाण्डमुपाश्रितः॥
– नारदपुराण, पूर्वखण्ड, अध्याय ३, श्लोक ६५
अर्थ : एखाद्या व्यक्तीचा भारताच्या पुण्यभूमीत जन्म झाल्यानंतरही ती जर विश्वाचे मंगल चिंतणार्या भारताच्या समृद्ध परंपरेपासून वंचित रहात असेल, तर अमृतकलश सोडून विषाच्या पात्राची इच्छा करण्यासारखे आहे. (गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)
(प्रज्ञालोक, अंक २, वर्ष २, १८.८.१९५९)