जळगाव – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समग्र कार्य हे अवतारी कार्य आहे. ते जागतिक कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ, वैज्ञानिक शास्त्रज्ञ, तसेच ३५० हून अधिक ग्रंथांचे लेखन करणारे साहित्यिक, हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत, दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे संस्थापक संपादक, १४ कला आणि ६४ विद्यांचे शिक्षण देणार्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक आहेत. जे कुणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होतील, त्यांचा निश्चित उद्धार होईल, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते १९ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’त बोलत होते.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. धर्मध्वज पूजनाचे पौरोहित्य श्री. नंदू शुक्लगुरुजी यांनी केले.
अभिप्राय
१. दिंडीचे आयोजन उत्कृष्ट केले होते. ‘एवढी भव्य दिंडी असेल’, असे आम्हाला आधी वाटले नव्हते. आम्हीच अल्प पडलो. पुढील वेळी पूर्ण संख्येने सहभागी होऊ. – श्री. अमरसिंग उखा पवार, चैतन्य बापू साधक परिवार, जळगाव
२. दिंडी पाहून हिंदूऐक्याचा आविष्कार जाणवला. हिंदूसंघटनामध्ये किती शक्ती आहे, याची प्रचीती आली. – श्री. नरेश वाणी, केमिस्ट व्यापारी, जळगाव
३. भगवान जगन्नाथ महाराजांचा रथ कधी कधी १०० भक्त ओढतात, तरीही तो जागेवरून हलत नाही. दिंडीत मात्र ७-८ महिला भक्त रथ ओढत होत्या. सर्वच जण आनंदी दिसत होते. – पद्मगंधा माताजी, इस्कॉन, जळगाव
४. मला साधनेत येऊन १४-१५ वर्षे झाली. इतका आनंद मी पहिल्यांदाच अनुभवला. मी आणि आमच्या इस्कॉनच्या सर्व भक्तांना जो आनंद दिला, त्याविषयी आम्ही सनातन संस्थेचे आभारी आहोत. – श्री. मुरलीधर बारी, इस्कॉन, जळगाव
५. शिरसोली येथील १५ युवकांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. हे युवक दिंडी पाहून भारावून गेले. ग्रामीण भागात लोप पावत चाललेली हिंदु संस्कृती पुनरुज्जीवित करायची आणि सनातनच्या कार्यात सहभागी व्हायचे, असे ठरवले. – श्री. विजय पाटील, शिरसोली, ता. जळगाव
६. दिंडीचे आयोजन उत्कृष्ट होते. संपूर्ण रचना आनंद देणारी होती. सर्व जण एकत्रित आल्याचा विलक्षण आनंद केवळ सनातनमुळे घेता आला. यापुढे केव्हाही सांगा, आम्ही समवेत राहू ! – श्री. गणेश चौधरी, योग वेदांत सेवा समिती, जळगाव
परात्पर गुरुदेवांचा १०० वा जन्मोत्सव अशाच
पद्धतीने साजरा होवो, ही प्रार्थना ! – ह.भ.प. वरसाडेकर महाराज
हिंदूंमध्ये आध्यात्मिक प्रेरणा निर्माण करण्यासाठी ही दिंडी आहे. संतांचे जन्मोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात; मात्र हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने हिंदूंचे संघटन करत साजरा होणारा हा जन्मोत्सव स्तुत्य आहे. परात्पर गुरुदेवांचा १०० वा जन्मोत्सव अशाच पद्धतीने साजरा होवो आणि त्या सुवर्ण क्षणांचे आपण साक्षीदार होवोत, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !
इतक्या अल्प कालावधीत एवढी भव्य दिंडी होणे, ही केवळ गुरूंची कृपा आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले ही एक चुंबकीय शक्ती असून सर्व हिंदूंना एकत्र करण्याचे ती महत्कार्य करत आहे.
प.पू. सरयूदासजी महाराज यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार !
सर्व संप्रदायांना संघटित करण्याचे कार्य केवळ सनातन संस्था करत आहे. असे सर्व संप्रदायांनी केले, तर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास वेळ लागणार नाही. सनातन संस्था पुष्कळ चांगले कार्य करत आहे.
– प.पू. सरयूदासजी महाराज
दिंडीचे ‘फेसबूक लाईव्ह’, तसेच धुळे येथील ‘माता हिंगलाज’ या खासगी वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमातून १४ लाख जणांपर्यंत दिंडीचे प्रसारण पोचले.
सहभागी संघटना :
इस्कॉन, योग वेदांत सेवा समिती, जय गुरुदेव, चैतन्य संप्रदाय, वारकरी संप्रदाय, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान, हिंदु जनजागृती समिती
बालकक्षातील पथकात करण्यात आलेल्या वेशभूषा
१. बालसंत – संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी, संत मुक्ताबाई
२. राष्ट्रपुरुष – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ
३. क्रांतीकारक – सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक
अन्य पथके : छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा केलेले अश्वपथक, मशालधारी, मावळे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, स्वरक्षण प्रात्यक्षिक पथक, ढोल पथक, श्रीराम रथ, वारकरी पथक, कलश, तुळसधारी महिला पथक, ध्वज पथक, प्रथमोपचार पथक, शिरसोली येथील लेझीम पथक, लाडली, धरणगाव आणि चाळीसगाव येथील वारकरी पथक, इस्कॉन रथ, यावल येथील झांज पथक, विवेकानंद प्रतिष्ठान, योग वेदांत सेवा समिती
चित्ररथ : ‘खेळाडू वा अभिनेते यांचा नव्हे, तर संतांचा आदर्श घ्या !’, ‘हिंदु राष्ट्रपुरुषांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा अभिमान बाळगा’, ‘करूया स्मरण क्रांतिकारकांचे । घेऊया अखंड व्रत राष्ट्ररक्षणाचे ।।’ या मथळ्याचे चित्ररथ फेरीत सहभागी झाले होते.
पुष्पवृष्टी : फेरीच्या मार्गात नटवर प्लाझा येथे बांधकाम व्यावसायिक श्री. सपनकुमार झुनझुनवाला, टॉवर चौकात व्यावसायिक श्री. नीलेश पवार, चित्रा चौकात उद्योजक नीलेश संघवी आणि त्वष्टा तांबट परिवाराचे सदस्य, इच्छापूर्ती गणपति मंदिराजवळ केमिस्ट उद्योजक नरेश वाणी आणि शिवसेना नगर सेवक मनोज चौधरी, कोर्ट चौक येथे पू. चैतन्य बापू संप्रदाय परिवाराच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
दिंडीला यापक प्रसिद्धी देणारी दैनिके आणि अन्य वाहिन्या : दैनिक तरुण भारत, लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, देशदूत, लोकशाही, जनशक्ती या वृत्तपत्रांतून, तसेच जळगाव अपडेट, राजमुद्रा दर्पण, लाईव्ह ट्रेंड न्यूज, युट्यूब चॅनेल
क्षणचित्रे
१. संत, क्रांतीकारी आणि राष्ट्रपुरुष यांच्या वेशभूषेतील बालकांचे अनेकजण कौतुक करत होते.
२. अनेकांनी पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले.
३. दिंडी अतिशय शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध असल्याचे अभिप्राय मिळाले.
४. रस्त्याच्या दुतर्फा अनेक लोक हात जोडून नमस्कार करत होते.
५. फळविक्रेते श्री. परिष महाराज यांनी स्वतःहून दिंडीच्या प्रारंभापासून ते समारोपापर्यंत स्वतःकडे शंखाने शंखनाद केला.
६. भगवती स्वीट दुकान, जगदीश जोशी, सुरेश पाटील, दीपक दाभाडे, नीलेश पवार, मनोज चौधरी, घनश्याम देशपांडे आदींनी दिंडी मार्गावर पाणी, तसेच सरबताची व्यवस्था केली होती.
७. इस्कॉनच्या साधिकांनी दिंडीमार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढल्याने वातावरण चैतन्यमय झाले होते.
८. फुले विकणार्या एक वयोवृद्ध महिलेने स्वतःकडील काही फुले पालखीतील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला अर्पण केली आणि नमस्कार केला.
९. दिंडी मार्गावर दुतर्फा दुकाने होती. त्या दुकानांचे मालक त्यांच्या कर्मचार्यांना समवेत घेऊन बाहेर येऊन दिंडी पहात होते. त्यापैकी काही दुकानदार उत्साहाने म्हणाले, ‘‘पुष्कळ अभिमान वाटला. हे सर्व पाहून आम्हाला रहावले नाही; म्हणून बाहेर येऊन आम्ही सर्वजण हे पहात आहोत.’’
१०. एक पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘तुमचा कार्यक्रम एकदम शिस्तबद्ध आहे. तुमचे साधक सर्वच गोष्टींचे नियंत्रण करत आहेत. त्यामुळे आम्हाला काहीच पहावे लागत नाही. असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे.’’
११. धर्मध्वज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन चालू असतांना समाजातील एका व्यक्तीने तेथे येऊन भर चौकात साष्टांग नमस्कार केला.