१. ऊर्जा प्रदान करणारी वेलची !
आपल्याकडे पूर्वीपासून सायंकाळच्या कोणत्याही कार्यक्रमाला कॉफीमध्ये वेलदोडा घालून देण्याची पद्धत आहे. वेलदोड्यामुळे शरिरातील थकवा निघून जातो आणि पुन्हा ऊर्जा मिळते. तुम्ही पुष्कळ थकलेले असाल, तर पुन्हा एकदा तरतरी येते. तुम्ही दमलेले असाल आणि त्याच वेळी तुम्हाला कुठेही बाहेर जायचे असेल, तर एक वेलदोडा तोंडात टाकल्यावरही तुम्ही लगेच टवटवीत होऊ शकता !
२. बहुगुणी वेलची !
वेलची ही मानवाच्या तोंडाच्या आरोग्यासाठीही उत्तम औषध आहे. तोंडाला दुर्गंध येणे, दातांचे संसर्ग, हिरड्यांचे आजार, तसेच तोंडातील जखमा दूर करणे यांसाठी वेलची उपयुक्त आहे. वेलचीमुळे रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांना लाभ होऊ शकतो. कोलेस्टोरॉलची पातळी अधिक असलेल्या रुग्णांनाही वेलचीचा लाभ होऊ शकतो. वजन अल्प करण्यासाठीही वेलची उपयोगी आहे. दाह न्यून करणे आणि ‘ॲन्टीऑक्सिडंट’ असे गुण वेलचीमध्ये दिसून येतात.
३. कोणत्या आजारांसाठी वेलची व्यर्ज आहे ?
ज्यांना हृदयविकार किंवा अन्य आजारांमुळे रक्त पातळ करण्यासाठी, यकृत आणि पचन यांच्या विकारांवरील, तसेच नैराश्य दूर करणारी औषधे चालू आहेत, अशा लोकांनी वेलचीचे सेवन करणे अयोग्य आहे. पित्ताशयात खडे असणाऱ्यांसाठीही वेलची वर्ज्य आहे. हे लक्षात घेता दिवसातून २ इतकी वेलची खाण्यास हरकत नाही. पेठेत मिळणाऱ्या वेलचीमध्ये रसायन आणि तंबाखूजन्य पदार्थ असू शकतात. त्यामुळे तिच्यापासून दूर रहाणेच योग्य आहे.
– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे