चिपळूण (रत्नागिरी) – हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता चिपळूण येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेची वैचारिक चळवळ भारतभूमीत रुजवणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून या दिंडीचे प्रयोजन करण्यात येत आहे. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् संप्रदाय यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

येथील चितळे मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी परात्पर डॉ आठवले यांनी आरंभ केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानातील विविध उपक्रम आणि त्यांच्या फलनिष्पत्तीची माहिती दिली. डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकता दिंडी काढण्याविषयी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ यांना त्यांनी आवाहन केले. ही हिंदू एकता दिंडी रविवार, १५ मे या दिवशी दु. ३.३० ते ६.३० या वेळेत काढण्यात येईल. या दिंडीचा आरंभ श्री विरेश्वर मंदिरापासून होईल आणि बाजारपेठ मार्गाने जाऊन सांगता वेसमारुती येथे करण्यात येईल.
शौर्य जागृती प्रात्यक्षिके, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी चित्ररथ, भजन दिंड्या, ढोल, ताशा यांची पथके यांसारख्या वैविध्यपूर्ण सहभागाने भव्य दिंडी आयोजित करण्याविषयी बैठकीत सर्वांनी सहमती दर्शवली. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनीही उपस्थितांना ‘धर्मकार्य करतांना साधना करण्याचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले.
सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके, समितीचे श्री. सुरेश शिंदे आणि येथील प्रसिद्ध व्यावसायिक श्री. विश्वास चितळे यांनी दिंडी नियोजनाविषयी विविध सूत्रांवर सहभागी हिंदुत्वनिष्ठाशी चर्चा केली. शहर आणि ग्रामीण भागात बैठका घेऊन दिंडीचा प्रसार करण्याचे सर्वांनी ठरवले. हिंदू एकता दिंडी भव्य काढण्याविषयी सर्वांनी विचार मांडले.

धर्मकार्यासाठी साधनेच्या बळाची आवश्यकता !
– सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक सनातन संस्था
धर्मकार्यासाठी साधनेच्या बळाची आवश्यकता आहे. सध्याच्या आप्तकाळात साधना, उपासना वाढवायला हवी. भगवंताचे वचन आहे, ‘न मे भक्त: प्रणश्यती ।’ या वचनानुसार भगवंत भक्ताचा नाश होऊ देत नाही, यासाठी आपण भगवंताचे भक्त बनले पाहिजे. आपल्या सर्वांच्या सहभागाने हिंदूऐक्यासाठी असलेली ‘हिंदू एकता दिंडी’ यशस्वी होणार आहे. आपण सर्वांनी धर्मसेवा म्हणून प्रयत्न करूया.
बैठकीस उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
ग्रामदैवत श्री कालभैरव सांस्कृतिक मंचचे श्री. विश्वास चितळे, श्री. पराग ओक, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दत्तात्रय शितप, ह.भ.प. लक्ष्मण चिले, शिवसेना नगरसेवक श्री. शशिकांत मोदी, भाजप शहर अध्यक्ष नगरसेवक आशिष खातू, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सावर्डे येथील रामचंद्र पाटोळे, सदानंद काटदरे, ‘इस्कॉन’चे सूर्यकांत आंब्रे, जय हनुमान मित्र मंडळ ओझरवाडीचे अध्यक्ष अशोक घेवडेकर, श्री महाकाली देवस्थान पेठमापचे अध्यक्ष अल्हाद दांडेकर, शिवसेना विभागप्रमुख संदेश किंजळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रशांत परब, सुदेश कांबळी, राजस्थानी विष्णु समाज संघटनेचे प्रतिनिधी, उत्तर भारतीय समाजाचे मनोजकुमार राजभर, अ.भा.वि.प. च्या कु. तेजश्री कदम, धर्मप्रेमी दिलीप गोखले, शरद ढमाल, विवेक आंबेकर, श्रीराम गोलमडे, सौ. स्नेहल ओकटे आणि वृषाली सावंत
जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे हिंदू एकता दिंडीला शुभाशीर्वाद !

रत्नागिरी ९ मे या दिवशी नाणिज येथे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची सनातन संस्थेचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. महेंद्र चाळके यांनी भेट घेतली. चिपळूण येथे १५ मे या दिवशी होणार्या हिंदू एकता दिंडीची माहिती जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना देण्यात आली. या दिंडीत ‘श्री ’ संप्रदायाचे भक्तगण सहभागी होण्याविषयी जगद्गुरूंना प्रार्थना करण्यात आली. या वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्यजींनी ‘हिंदू एकता दिंडी’ला शुभाशीर्वाद दिले. ‘श्री’ संप्रदायांच्या भक्तगणांना ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये सहभागी होण्यासाठी सुचित करू’, असेही जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आशीर्वचन देतांना सांगितले.
या वेळी प.पू. स्वामीजी यांना सनातनचा आपत्काल विषयक ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी उपस्थित होते.