‘गुरुकृपायोगानुसार साधना’ किती टक्के करतो, याचा अभ्यास होणे महत्त्वाचे ! – सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील
सनातनच्या साधकांसाठी गुरुपौर्णिमा शिबिरे चैतन्यमय वातावरणात पार पडले !

मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर, समवेत पू. (सौ.) संगीता जाधव

मुंबई – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यानुसार तंतोतंत प्रयत्न केल्यास आपण सर्वांतून मुक्त होऊ शकतो. अगदी सर्वसामान्य जीवसुद्धा पुढच्या स्तराचे अनुभवू शकतो. जेव्हा अहंकार शून्य होतो, तेव्हा जीव ईश्वराशी एकरूप होतो. गुरुकृपायोगामध्ये ते सामर्थ्य आहे. आपण ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ किती टक्के करत आहोत, याचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने मुलुंड येथे नुकत्याच आयोजित केलेल्या एकदिवसाच्या गुरुपौर्णिमा शिबिरात उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

रायगड जिल्ह्यातील संस्थेच्या साधकांसाठी खोपोली येथेही  एकदिवसाच्या गुरुपौर्णिमा शिबिराचे आयोजन केले होते.  तेथेही सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले. रायगड जिल्ह्यातील साधकांनीही या शिबिराचा लाभ घेतला. ‘सर्वांनी त्यागाच्या टप्प्याला यायला हवे. त्यागाविना काहीही मिळणार नाही, हे लक्षात घेऊया’, असे सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर यांनी सांगितले.

दोन्ही गुरुपौर्णिमा शिबिरांत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत चालू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यंदाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त करावयाचे साधनेचे प्रयत्न आणि सेवेचे नियोजन यांविषयी साधकांना दिशादर्शन करण्यात आले. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, तसेच व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांविषयीही साधकांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

संधीकाळात साधनेसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा ! – पू. (सौ.) संगीता जाधव

सध्याच्या काळात आपल्याला साधना करायची संधी मिळाली आहे. असा संधीकाळ पुन्हा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे साधनेचे जे काही प्रयत्न करायचे, ते आताच करायचे आहेत. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. ‘माझ्या साधनेची सद्य:स्थिती काय आहे ? साधनेत पुढे जाण्यासाठी कोणत्या पद्धतीने प्रयत्न करू ?’, असे विचार करून तळमळीने साधना करूया.

क्षणचित्रे

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु. (सुश्री)) अनुराधा वाडेकर आणि सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी शिबिरात भावप्रयोग घेतला. भावप्रयोगानंतर साधकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.

Leave a Comment